तुझ्या सोबतीनं―भाग-२ (ह्रदयी वसंत फुलताना)

Submitted by र।हुल on 19 August, 2017 - 10:57

तुझ्या सोबतीनं―भाग-२ [ह्रदयी वसंत फुलताना]

भाग१

"शुssक.."
पाठिमागून कोणीतरी आवाज दिला म्हणून मागे वळून पाहिलं.
"कैन यू हेल्प मी फॉर फिलींग दिज फॉर्म्स? प्लीज.."
एक बावरलेला गोरा गोल आणि गोड चेहरा, उंची जवळपास पाच फुट पाच इंच, आकर्षक बांधा,बोलके अन् हसरे,नितळ डोळे माझ्याकडे अपेक्षेने बघत होते.
मी क्षणभर नजर रोखून तिच्याकडे पाहीलं आणि नंतर
"नविन?" भुवया उंचावत प्रश्न केला.
"याहा."
"मला इंग्रजी समजत नाही, मराठीत बोलूयात का?" मी हसत गुगली टाकली.
"अं..हो.." ती गडबडीनं उत्तरली. मला गम्मत वाटली.
"दे पाहू" तिच्या हातून एडमिशनचे ते कागद घेत मी म्हटलो.
"अरे, सगळंच तर भरलंय! आणखी काय राहीलं?" मी ते कागद चाळवत अन् तिच्याकडे बघत हसत विचारलं.
"अं..ते पेज फोर वरचं कसं लिहावं कळेना..म्हणून.." तिनं सांगितलं.
मी 'ते' पेज फोर उघडलं. काही डिटेल्स लिहीणं राहिलं होतं. ते कसे भरायचे हे मी तिला समजावलं. माझ्या हातातील कागद आपल्या हाती घेत तिनं, "तुमचं नाव?" असा एक स्मित देत प्रश्न केला.
"तु म चं ???" मी तिच्याकडे प्रश्नार्थक रोखून बघत तुटक बोललो. तिला माझ्या बोलण्यातली खोच लक्षात आली.
"सॉरी!. तुझं नाव?" तिनं खळाळून हसत चुक दुरूस्त करत विचारलं. ह्याच हसण्यानं आणि त्या 'पेज फोर' च्या निमित्ताने झालेल्या आमच्या ओळखीनं पुढील चार वर्ष माझ्यावर मोहिनी घातली.
"राहुल." मी एक स्मित देत उत्तरलो.
"आरती." म्हणून तिनं आपलं नाव सांगितलं.
"हो बघितलं!" मी हसत बोललो.
क्षणार्धात तिनं पटकन आपला उजवा हात पुढे करत, "फ्रेंड्स?" म्हणून मैत्रीचा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला.
"नक्कीच!" हातात हात घेत मी उद्गारलो.
कॉलेजमध्ये तिच्यापेक्षा मी एक वर्षानं पुढे होतो. आम्हाला ज्युनिअर असूनही माझ्या गृपमध्ये ती सहज मिसळून गेली पण माझी मैत्रिण म्हणूनच. हि रूजलेली मैत्री रूसवा-फुगवा, वाद-संवाद अशा विविध अंगानं सतत बहरत राहिली. कॉलेजमध्ये, बाहेर ट्युशन्समध्ये कधीही काहिही अडचण आली, काही हवं असेल तर ती मला, आमच्या गृपला हक्कानं सांगत असायची. गृपमधलं कोणीही तिला कधी टाळत नव्हतं. याला तिचा स्वभाव कारण होताच पण त्याचबरोबर माझा तिच्याप्रती असलेला ओढा आमच्या गृपमधील प्रत्येकाला माहीती होता. तिच्यासमोर कोणी बोलत नसलं तरी ती नसताना माझा सगळेचजण नेहेमी पिच्छा पुरवायचे, तिला सांगण्यासाठी. तिच्यावरून मला छळणं, 'तिचं पिल्लू' म्हणून मला मुद्दामहून चिडवणं असले गृपमधल्या मित्रमैत्रिणींचे नेहेमीचे उद्योग होते पण मी कधीच मनावर घेत नसायचो. हसत हसत विषय बदलायचो. यावर ते सगळे भयंकर चीडत असायचे. मी मात्र शक्य तितकं त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं पसंत करायचो.
असेच दिवस जात होते. महिने पालटत होते. दरम्यानच्या काळात तिला कॉलेजमधील दोनतीन जणांनी प्रपोज केलेलं ज्यांना तिने स्पष्ट शब्दांत नकार देऊन सगळ्यां समोर त्यांची खरडपट्टी काढलेली. आमच्या गृपसोबत वावरताना मात्र तिला नेहेमी सुरक्षित वाटत असावं. आम्हाला वेळोवेळी हे जाणवत असायचं. ती आमच्यात चांगलीच रूळली होती. अगदी सहज मिसळून गेली होती. गप्पांच्या फडात ती कधी नसली तर मला चुकचुकल्यासारखं वाटायचं.आमच्या मैत्रीच्या प्रवासातले सुरूवातीचे काही महिने सोडले तर पुढे मी काहिसा अबोल होत गेलो. तिनं सतत बरोबर, सोबत रहावं असं वाटायचं.
ती हुरहूर, ती सोबत, ते नजरांचे खेळ, मंतरलेले दिवस होते ते! 'ह्रदयात वसंत फुलत होता.'

सहवास तो किती वर्णावा ?
कितींदा जगावे,
तेच क्षण पुनः पुन्हा!!

आमचं कॉलेज संपलं. सगळे मित्रमैत्रिणी आपापल्या रस्त्यांनी पुढं गेले. तिचं मात्र अजून एक वर्ष बाकी होतं. मधून मधून आम्ही दोघं भेटत असायचो. व्हाट्स अप वरचं बोलणं तर दररोजचंच होतं. सगळं काही एकदुसर्याशी शेअर करत होतो. विविध विषयांवरील सामाजिक, राजकीय चर्चा करत होतो. वाद-संवाद नित्याचेच होते. मतभेद त्यांच्या ठिकाणी होते, मनभेद मात्र कधी होऊन दिले नाहीत. पण इतकं सगळं असूनही आमच्या दोघांत एका नात्याची अपुर्णता होती. ती दुर व्हावी असं वाटायचं आणि अशातच मागचा प्रसंग घडला. कुठलीशी चर्चा करत असताना मी बोलून गेलो, 'Everything is fair in love n war.' आणि पुढे घडल्या प्रसंगांनी आमची आजची 'खास भेट' निश्चित केली.
मी कैफेत येऊन पंधरा मिनिटे झालेली. आरतीचा अजून पत्ता नव्हता. दहा वाजता भेटण्याचं ठरलं तर ही काटेकोरपणे दहा वाजता येणार तर!!
मी पुन्हा भूतकाळात गेलो. मला कॉलेजमध्ये असताना घडलेला सुरूवातीचा एक 'खास' प्रसंग आठवला. तिचं कॉलेजचं पहिलंच वर्ष होतं. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातला काळ, कॉलेजमधील डेज सुरू होते. कॉलेजमध्ये असताना साजरे केले जाणारे हे डेज म्हणजे तरूणाईला आलेलं उधाणाचं भरतंच असतं. एक वेगळंच वातावरण असतं, भारावलेलं! यादरम्यान खुप काही दृश्य-अदृश्य स्वरूपांत घडत असतं. मनामनांमध्ये प्रफुल्लित भावना झरझरत ओसंडून वाहत असतात. नजरांचे मनमुराद चोरटे खेळ खेळले जातात. अनेक जोड्या नव्यानं जमतात. तर आज ट्रेडिशनल डे होता. आम्ही चार जिवलग मित्रही असेच मनमुराद 'बागडण्याचा' आनंद लुटत होतो. एवढ्यात सच्या म्हणजे सचिननं माझं लक्ष वेधलं, "राहुल्या, ती बघ...ती...आरं ती!!!" मी झटकन त्यानं बोट दाखविलेल्या दिशेकडं बघायला लागलो आणि नुसता बघत राहिलो.
आमच्या चौकडीपैकी दिप्या म्हणजेच दिपकनं, "यार राहुल्या, सॉलिड यार! कसला जब्....." मी दिप्याकडं एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि त्याचं बोलणं अर्धवट राहीलं, त्यानं जीभ चावली. पुन्हा सगळेजण समोर बघायला लागलो.
मैत्रिणींच्या गराड्यात हास्यविनोदात रमलेली आरती लाल रंगाच्या साडीवर किती सुंदर दिसत होती! जणू स्वर्गातली अप्सरा खाली उतरलीय! ते तिचं खुललेलं, उठून दिसणारं सौंदर्य मी डोळ्यांत साठवत राहीलो. ते चौफेर उधळणारं सौंदर्य मी वर्णावं इतकं माझं शब्दसामर्थ्यच नाही. तो त्यांचा घोळका काही मिनिटांत आमच्या समोरून जाणार होता. आम्ही चौघेजण एकाच जागी त्यांची येण्याची वाट बघत स्तब्ध उभे राहीलो. थोड्याच वेळात किलकिल करणारा तो घोळका आमच्या पुढ्यात हजर झाला. आरतीची न् माझी नजरानजर झाली. अगदी एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून आम्ही काही क्षण भारावल्यागत एकमेकांना न्याहाळलं. एवढ्यात तिच्या बाजूच्या मैत्रिणीनं तिच्या पाठीत कोपर मारला न् ती भानावर आली. क्षणांत लाजून लालेलाल होत तिनं खाली पाहिलं. तिच्या मैत्रिणी तिला ओढतच आमच्यासमोरून घेऊन गेल्या. त्या पाठमोर्या घोळक्याकडे मी अजूनही एकटक बघत होतो.
"राहुलसाहेब, विकेट पडलीय आता पार्टी द्या." विशाल बोलला.
"याची पडलीय कि तिची?" सचिननं विचारलं.
"दोघांची." दिप्यानं उत्तर दिलं.
"आठ दिवसांनी वेलेंटाइन डे आहे बोलून टाक." इती विशाल.
मी मात्र अजून मघाच्या त्या स्वप्नातून जागं व्हायला तयार नव्हतो. सच्यानं डोक्यात चापट मारली तसा मी भानावर आलो आणि ते खिदळायला लागले. तो एकच प्रसंग, ज्यानं माझ्या मनांतील तिच्याविषयीच्या मैत्री आणि प्रेम यादरम्यानच्या रेषा पुसट करून टाकल्या. तिथून पुढे सुरू झाला माझा एकट्याचाच एकतर्फी प्रेमाचा प्रवास.
त्या दिवशी रात्री घरी गेल्यानंतर मी तिला मेसेज केला, 'साडीत खुप सुंदर दिसतेस.'
लगेच तिचा रिप्लाय आला, 'Thank You Happy '
______________________________

बाजूला येऊन ती उभी राहिलेली होती. कधी आली ते कळालंच नाही. मी आठवणींत रमलेलो.
"काय रे, मुलीला डेटवर बोलावतोस आणि आल्यावर बस सुद्धा म्हणत नाहीस? किती रे निष्ठुर तू! कधीची उभी आहे येथे मी, माहितीये का?" ती विचारत होती.
मी तिच्याकडे बघून हसलो. समोर हात दाखवत 'बस' म्हटलो. ती पर्स बाजूला ठेवत समोर बसली. मी कॉफिची ऑर्डर करून समोर बघितलं. बराच वेळ दोघेही काहीच बोललो नाही. एरवी एवढ्या गप्पा मारणारे आम्ही आता गप्प होतो. नक्की काय बोलावं याचा विचार करत होतो. कचरत होतो का काही बोलण्यास? कि काही बोलण्यासारखं राहिलंच नव्हतं?..नक्की काय ते उमगत नव्हतं.
थोड्या वेळाने सुस्कारा सोडत मी तिला विचारलं,
"हम्म..आता पुढं?"
"बघू." तिनं काही नक्की ठरवलेलं दिसत नव्हतं.
"बघू! किती दिवस?" मी.
"पप्पा, ममा ला अजून बोलली नाहिये."
"बोलल्यावर?"
"माहित नाही कसे रिएक्ट होतील ते."
"कधी सांगणार?"
"राहुल, स्किप इट. काय घाई आहे. सांगू नंतर."
"हम्म."
"तुला असं नाही वाटत की, आजवर न सांगता एकमेकांवर प्रेम करत होतो.. एकतर्फी! आता यापुढे एकत्र काही काळ एकमेकांच्या सोबतीनं घालवूयात?" आरतीनं विचारलं.
"आरे व्वा! कबुली दिलींस तर! छुपी रुस्तम निघालीस.." मी हसत बोललो.
"गप्प रे.. तुला नाही समजणार."
"मग समजावून सांग."
"तू पण ना! मार खाशील आता."
"ह्या स्टेजला आलीस आता? दादागिरी लगेच?"
"हम्म. मजाक सोड. पुढचा प्लान सांग."
"आधी कॉफी घेऊयात का?" मी तिची खिल्ली उडवत वेटरने आणून ठेवलेल्या कॉफीकडे निर्देश करत बोललो. कॉफीचे मग हातात घेऊन आम्ही एक एक घोट पित होतो. नजरांचा खेळ पुन्हा सुरू. मला प्रचंड हसायला येत होतं. का ते कळत नव्हतं.
"तू हसायला लावू नकोस आं." कॉफी थांबवत ती ओरडली. मला मात्र यावर काही केल्या हसू आवरेना! आजूबाजूचे लोकं मला कदाचित वेडं समजत असावेत. पण म्हणतात ना, 'प्रेम वेडं असतं त्यात पडलेल्यांना जगाची पर्वा नसते.' मलाही लोकांचं काही पडलं नव्हतं.
कॉफी संपली तशी ती बोलली, "सांग आता.."
"मला कंपनीत जायचंय अकरा वाजता. आता निघायला हवं." मी सांगितलं. तिचे आधीच मोठ्ठे असणारे डोळे आणखी मोठ्ठे झाले. त्रासून तिने माझ्याकडे पाहीलं.
"अगं, समजून घे थोडं. अर्जंट एक मिटींग आहे. टाळता येणार नाही."
"हे आधी नव्हतं कळत का?"
"आजची भेट तू ठरवलीस आं. मी नाही." मी तिला कालच्या फोनची आठवण करून दिली.
"मग सांगायचं ना काल तसं."
"मला वाटलं, मैडमचा प्लान बदलायचा." मी तिची खेचली.
"थांब रे तू. लग्न होऊ दे आपलं मग सांगते तुला सगळ. चल जायचंय ना तुला? उशीर होईल."
वेटरनं बिल आणून दिलं तसं तिनं मला ते देण्यापासून थांबवलं आणि स्वत:च्या पर्समधून पैसे काढत त्याला दिले. माझ्या त्रासलेल्या प्रश्नार्थक चेहर्याकडे बघत तिने, 'पुढे तुलाच द्यायचेत' म्हणून इशारा दिला न् खळखळून हसली.

हातांत हात घालून दोघं कैफेच्या बाहेर पडलो.

क्रमश:

―₹!हुल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षय, सायु, कऊ प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद! Happy