नाथ सांप्रदाय

Submitted by र।हुल on 11 August, 2017 - 10:32

हा धागा नाथ सांप्रदायाचा इतिहास,साहित्य,स्वरूप, सिद्धांत, पुजापद्धती तसेच नाथपंथाची महत्वाची स्थाने, नाथपंथीयांचं सामाजिक योगदान,आलेले अनुभव यांच्याबद्दलची चर्चा करण्यासाठी उघडण्यात आला आहे.

[स्पष्ट सुचना- या धाग्यावर वरील गोष्टींची एलर्जी असलेल्यांनी कृपया येऊ नये हि आग्रहाची हात जोडून विनंती. Happy ]

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

शेवटचे नाही म्हणता येणार..पण अधिकारी नक्कीच!!
ज्ञानेश्वरांपासून जसा वारकरी सांप्रदाय पुढे आला त्याच प्रमाणे ज्ञाननाथांनी त्यांच्या सिद्ध परंपरेतील आपल्या शिष्याला, सत्यमलनाथ यांना समाधी घेण्याअगोदर आपला नाथपंथी बाणा दिलेला.
आणि दृष्टांतातून नवनाथांची गुरूशिष्य परंपरा आजही निरंतरपणे चालू आहे यापुढेही चालू राहील. ठिकठिकाणी असणार्या गुरू गोरक्षनाथांच्या तसेच चैतन्य कानिफनाथांच्या नि: स्वार्थ गाद्या याच परंपरेतून टिकून आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वर शेवटचे ठरत नाहीत.

नाथ संप्रदायाचे मूळ भगवान शंकर (भूतनाथ)
त्यांचा अनुग्रह मिळवलेले मच्छिद्रनाथ आणि तिथून पुढे नाथ संप्रदायाची सुरुवात झाली

दक्षिण भारत अथवा कृष्णेच्या दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंतचा भाग इकडे नाथ संप्रदाय आहे का?
मूळ दत्त ?
>>>
नाथपंथ जवळपास संपुर्ण भारतभर पसरलेला दिसतो. नेपाळ हि गुरू गोरक्षनाथांची तपोभूमी समजली जाते. आपल्या महाराष्ट्राचा विचार केल्यास, नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ, कानिफनाथ, नागनाथ, गहिणीनाथ आणि रेवणनाथ यांची मुळ समाधीची ठिकाणं महाराष्ट्रात येतात. यावर अभ्यासक आणि जाणकार प्रतिसादांमधून प्रकाश टाकतीलच हि अपेक्षा.

Submitted by विठ्ठल on 11 August, 2017 - 22:36
नाथ संप्रदायाचे मूळ भगवान शंकर (भूतनाथ)
त्यांचा अनुग्रह मिळवलेले मच्छिद्रनाथ आणि तिथून पुढे नाथ संप्रदायाची सुरुवात झाली
>>>
भगवान शंकर हे 'आदिनाथ' म्हणून ओळखले जातात. आदिनाथांच्या आदेशाने श्री दत्तगुरूंनी मच्छिंद्रनाथांना अनुग्रह दिला आणि नाथपंथाची सुरूवात झाली असं समजलं जातं.

नवनाथांचा चाळिसावा अध्याय हा सर्व अध्यायांचा
सार आहे माझ्या ओळखीतिल एक् मुस्लिम ग्रुहस ही या अध्यायाचे पठण करतात

मुस्लिमांनी वाचणं ह्यात काहीच विसंगती नाही. नवनाथांनी, त्यांच्या सर्व सिद्धांनी सर्व समाजाला आपल्या जवळ केलं. जातीभेदाला नाथपंथामध्ये थारा नाहीये.
>>>चाळीसावा अध्याय>>>
हो, चाळीसावा अध्याय संपुर्ण पोथीचं सार आहे. निर्मळ मनाने वाचणं गरजेचं!
लवकरच सविस्तर लेख लिहून मुळ धाग्यात समाविष्ट करतो.

पोथीमध्ये लिहिल्याप्रमाणे हे शाबरी कवित्व म्हणजे काय? त्याचा आपणाला कसा उपयोग होतो ?
अभ्यासक आणि जाणकार ह्यांनी प्रकाश टाकावा हि विनंती ..

पोथीमध्ये लिहिल्याप्रमाणे हे शाबरी कवित्व म्हणजे काय? त्याचा आपणाला कसा उपयोग होतो ? >>>>
शाबरी किंवा साबरी कवित्व म्हणजे नवनाथ (मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, रेवणनाथ, भर्तरीनाथ, नागनाथ, चरपटनाथ) आणि त्यांनी निर्माण केलेल्या त्यांच्या ८४ सिद्धांनी रचलेली मंत्रशक्ती होय. विश्व ज्या सुत्रांमध्ये बांधले गेलेले आहे, त्या सुत्रांशी नादब्रह्माच्या माध्यमातून केलेला संवाद असं शाबरी मंत्रांबाबत म्हणता येईल. ह्या मंत्रांच्या लक्षावधी ओव्या नाथसिद्धांनी रचल्या आहेत. हे कुठलंही लिखीत साहित्य नाही. गुरूशिष्य परंपरेतून दिले जाणारे हे मंत्र स्वयंसिद्ध असून अतिशय प्रभावी आहेत. ह्या मंत्रांचा प्रभाव तात्काळ बघता येतो. बाजारात पुस्तकरूपी मिरवले जाणारे शाबरी मंत्र हे मुळ मंत्र नाहीत. ते बर्भरी मंत्र आहेत. मुळ शाबरीची बिजं मंत्रामध्ये पसरवून बर्भरी मंत्र बनवले गेलेले असावेत. नवनाथांनी ज्या ज्या प्रदेशांत तिर्थाटन केले त्या त्या भागांमध्ये त्यांचे शिष्य तयार होत गेले. त्यामुळे मुळ मंत्रांची रचना वेगवेगळ्या भाषेत होत गेली. त्यामुळे विद्देचं स्वरूप, बंगाली, कोकणी, धनगरी...इ. विस्तारत गेलं. नाथपरंपरेतील मुस्लिम साधकांनी त्यांच्या ज्या रचना केल्या त्याही मुळ शाबरी किंवा बर्भरीच आहेत. ज्यावेळी समाजात विघातक कृत्य करणार्या अघोरी तांत्रिकांनी, समाजकंटकांनी शाबरीचा दुरूपयोग करणं चालू केलं तेव्हा नाथांनी मुळ शाबरी लुप्त करून टाकली. मुळ शाबरी आज दुर्मिळ आहे. ती फक्त आणि फक्त गुरूशिष्य परंपरेतून दिली जाते अर्थात् देणार्याला ती 'वरून' मिळालेली असेल आणि देण्यासाठी 'आदेश' मिळाला असेल तरच!

शाबरी देताना स्पष्ट सांगितलेलं असतं, 'तिचा उपयोग फक्त जनसेवेसाठीच करायचाय, दीनदुबळ्यांच्या सेवेसाठीच करायचाय. पैसा, धनसंपत्ती गोळा करण्यासाठी, बडेजाव मिरविण्यासाठी नाही' अर्थात् हे सांगणं तुमचा गुरू सदेही असेल तर प्रत्यक्ष सांगितलं जातं. गुरू विदेही असेल तर गुरू किंवा प्रत्यक्ष नाथ दृष्टांतातून सांगतात -शिकवितात.

पुर्ण शाबरी कुणालाही दिली जात नाही. गरजेपुरती दिली जाते. तिचा दुरूपयोग केला तर भोगावं लागतं. नवनाथांचा साधनमार्ग सोपा नाहीये, त्याच्याएवढं कठीण काही नाही. तुमची प्रत्येक पावलावर नाथांकडून परीक्षा घेतली जाऊ शकते.

शाबरीचा उपयोग-
हा बराच मोठा आणि सविस्तर लिखाणाचा विषय आहे. आत्ता एवढंच सांगतो,
दीनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी. आपण जे वेड लागलंय, स्किझोफ्रेनिया झालाय, भूतानं झपाटलंय वैगरे म्हणतो तत्सम असह्य आणि असाध्य पीडेतून सोडविण्यासाठी!

धन्यवाद राहुलजी ....
मी नवनाथ पोथी वाचली होती त्यामध्ये शबरी कवित्व वगैरे उल्लेख होता .. सविस्तर अशी मला माहिती नव्हती .. तुमच्यामुळे बऱ्यापैकी माहिती झाली ...

राहुल,
खुप छान माहिती देत आहात. याविषयावर तुम्हाला बरीच माहिती आहे असे दिसते, तरी याविषयावर एखादा विस्तृत लेख लिहावा अशी विनंती आहे.

बर्भरी म्हणजे काय?

नाथ संप्रदायाचा उगम नक्की कोणत्या काळी झाला? निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी उपदेश दिला म्हणजे नक्कीच ज्ञानेश्वरांच्या आधीपासुन हा संप्रदाय अस्तित्त्वात होता असे म्हणता येईल पण नक्की/अंदाजाने काळ सांगता येईल का?

नवनाथांच्या पोथीत भारतातल्या अनेक तीर्थांचे/मंदिरांचे उल्लेख केले आहेत, पण नवनाथांची भारतात खुपच कमी मंदिरे आहेत. असे का?
त्यातही बहुतांश मंदिरे महाराष्ट्रातच आहेत.

दक्षिण भारत अथवा कृष्णेच्या दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंतचा भाग इकडे नाथ संप्रदाय आहे का?
>>
नर्मदेच्या उत्तरेकडे आणि कृष्णेच्या दक्षिणेकडे दत्तांची मंदिरे खुपच कमी आहेत. दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय हा नर्मदा आणि कृष्णा या नद्यांच्या मधल्या भागातच जास्त प्रचलित होता/आहे. दत्तांचे अवतार (स्वामी समर्थ, श्रीपाद श्रीवल्लभ इत्यादी) देखील याच भागात झालेले दिसून येतात.
भारताच्या इतर भागात हा संप्रदाय म्हणावा तसा पसरलेला नाही. याचे कारण काय असावे?

"आदेश"
जेव्हा दोन नाथपंथी सिद्ध, साधुपुरूष किंवा सामान्य भक्त एकमेकांसमोर येतात त्यावेळी तसेच एकदुसर्याचा निरोप घेतात तेव्हा "आदेश" म्हणतात. नाथपंथीयांच हे आणखी एक वेगळेपण आहे. आपण सामान्यपणे,नमस्कार, नमस्ते, रामराम, हाय -हैल्लो म्हणतो तसाच 'आदेश' हा शब्द नाथपंथीयांमध्ये वापरला जात असला तरी त्यापाठीमागे गुढार्थ असतो. दोघांपैकी जो अधिकारानं (वयानं नव्हे, नाथपंथामध्ये दहा वर्षांची मुक्ताई चौदाशे वर्षांच्या चांगदेवाची गुरू बनली! ) मोठा असतो तो ज्यावेळी 'आदेश' शब्दाचं उच्चारण करतो त्यावेळी तो समोरच्याला आदेश (order) देत असतो. जो अधिकारानं लहान असतो तो ज्यावेळी 'आदेश' म्हणतो, त्यावेळी तो आदेश मागत असतो. (आपलं काही काम मला करण्यासारखं असेल तर मला ते हक्कानं सांगा अशी प्रबळ भावना या उच्चारणामागे असते.) आपल्यासारख्याला 'आदेश' हे फक्त तिन अक्षरे दिसतात पण त्यापाठीमागील उद्देश्य, भावना आणि गुढार्थ खरा नाथपंथी जाणतोच!
नाथपंथी शाबरी आणि बर्भरी मंत्ररचनेंत निरनिराळ्या देवतांना आवाहन करणार्या मंत्रांतही हा आदेश शब्द आलेला आढळतोच.
उदा. "ॐ नमो आदेश गुरूजी को आदेश। ॐ....." यामध्ये साधक 'गुरूजीको आदेश' हे उच्चारण करून गुरूला आदेश मागून त्याच्या तपश्चर्येचं पाठबळ आपल्या मंत्रशक्तीच्या पाठीमागे उभे करत असतो.
हा शब्द उच्चारत असताना तसेच ऐकतानाही, नाथपंथी साधकाच्या अंगावर रोमांच उभा राहतो.

बर्भरी व शाबरीतील फरक

●एक शाबरी मंत्र-
ॐ ऊं, लीं, श्रीं, हुं फट् स्वाह:

●एक बर्भरी मंत्र-
ॐ नमो आदेश । गुरूजी को आदेश । पहिला गण गणपती । चौदा विद्यांचा सारथी । जती सती कैलासपती । बलभीम मारूती । आले विघ्न निवारी । साई गोरखनाथ की द्वाही ।गुरू की शक्ती मेरी भक्ती । चले मंत्र इश्वरी वाचा। पिंड कच्चा गुरू गोरखनाथ का शब्द सच्चा ।

हा विघ्न दूर करण्यासाठीचा एक बर्भरी मंत्र आहे जो गुरू गोरक्षनाथांच्या कृपेनं फलद्रुप होतो.

दोन्ही मंत्र बघितले असता फरक लक्षात येईल की शाबरी मंत्रात फक्त शाबरीचे "ऊं, लीं, श्रीं" इ. बिजं आहेत (जशी वैदिक मंत्रांची ॐऐं, र्हीं, श्रीं, ठैं,हैं, भैं, लैं, रूं, रों, रौं...वैगरे बिजं असतात तशी) तर बर्भरी मंत्ररचनेची सुरूवात, 'ॐ नमो आदेश । गुरूजी को आदेश ।' अशी झालेली आहे. हा मुलभूत भेद दोन्हींमध्ये आहे. बर्भरी मंत्र हे नवनाथांच्या शिष्यांनी बनवले ज्यांचा वापर करून, नवनाथांच्या आशिर्वादाने तसेच मंत्रात आवाहनीत केलेल्या दैवताला नाथांच्या नावाचा धाक दाखवून त्यांच्यामार्फत कामे करून घेतली जातात तर शाबरी मंत्र हे नवनाथ सिद्धांनी शाबरीची मुळ बिजं वापरून बनवलेले आहेत ज्यांद्वारे नादब्रह्माच्या माध्यमातून विश्व चालविणार्या सुत्रांशी संवाद घडवून कामे केली जातात.

अर्थात् हे सगळे मंत्र कार्यरत होण्यासाठी साधकांची चांगल्या प्रकारे योगसाधनेची बैठक असायला हवी, मंत्र म्हणण्यासाठीचं (उच्चारण करण्याचं) ठरावीक टेक्निक असतं, लय असते, गुरू अधिष्ठान असावंच लागतं.मिळालेला मंत्र हा शुद्ध स्वरूपात असावा लागतो नाहीतर त्याचा प्रभाव पडत नाही.
खरंतर मंत्रशक्ती हीसुद्धा अनुभूतीची गोष्ट आहे. घडणारी क्रिया तात्काळ बघता आणि दाखवितासुद्धा येते. अगदी 'हा सुर्य आणि हा जयद्रथ' अशी!
(शाबरी नावापाठीमागे आख्यायिका आहे. तरी शाबर, शाबरी, बर्भरी, बार्बर वैगरे शब्दांची उत्पत्ती भाषेच्या अभ्यासकांकडून जाणून घ्यायला आवडेल.)

नाथ संप्रदाया मध्ये अखंड धुनी ची परंपरा आहे,गिरनार पर्वता वर गोरक्ष नाथांची धुनी आहे अशा प्रकारच्या धुनी अजून भारतामधे कुठे आहेत कुणाला माहित आहे का ???

शिर्डी. शिर्डीला नाथसंप्रदायाची धुनी आहे साईनाथ यांनी चिमटा (नाथपंथीय) आपटून जो अग्नी निर्माण केला ती धूनी आजतागायत तेथे आहे.
-अवनिंद्रनाथ

धागाकर्त्याचं खातं बंद पडलेलं दिसतंय. त्यांनी देवेंद्रनाथाचे अलखनिरंजन मासिकातील त्यांच्या लेखांतून बरीच माहिती डिक्टो उचलली दिसते. हरकत नाही पण निदान कुठून आणि कोणाचं उचललं ते लिहलं असतं तर बर झालं असतं.

काल वरची माझी पोस्ट पाहून धागालेखकांनी मला मेल मधून संपर्क करून त्यांनी जिथून संदर्भ घेऊन ते लिहलं त्याचा नामोल्लेख न करण्याचं कारण विशद केलं. त्यांनी जे केलं ते बहुतेक योग्यच होत आणि त्यांचं हेतू माझ्या लक्षात न आल्याने मी हि वरची पोस्ट टाकली आणि ती आता एडिट करता येत नसल्याने मी हि नवीन पोस्ट लिहीत आहे.
आनंदजी तुम्ही योग्य होता आणि मी वरील पोस्ट साठी क्षमस्व आहे.

ज्ञानेश्वरांचे बंधू निवृत्तीनाथ हे कोणाचे शिष्य होते? त्याविषयी काही सांगाल काय? धन्यवाद.

ही माऊलींची गुरुपरंपरा आहे.
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा। मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य॥
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला। गोरक्ष वोळला गहिनीप्रती॥
गहीनिप्रसादे निवृत्ती दातार। ज्ञानदेवे सार चोजाविले॥

धन्यवाद जिद्दुजी ! Happy

हा 'चर्चेसाठीचा' धागा मायबोलीवर एक्टिव झाल्यानंतर (६ जून १७) अगदी सुरवातीच्या काळात काढला होता.
त्याचा एकमात्र उद्देश्य हा या क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा करणे तसेच सदर विषयासंदर्भात अधिकाधिक नाविण्यपुर्ण माहीती मिळवून येथे संकलीत व्हावी/करावी हा होता.
त्यावेळी नजरेसमोर उदाहरण म्हणून मायबोलीवरील स्तोत्रांविषयीचा https://www.maayboli.com/node/13468 हा धागा होता.

प्रतिसादामध्ये लिहीलेल्या पोस्ट्स या चर्चेच्या ओघात लिहीलेल्या होत्या आणि त्या लिहीत असताना वर जिद्दु यांनी उल्लेख केलेल्या संदर्भलेखाची नक्कीच बहुमोल मदत झाली होती. संदर्भ घेऊन लिहीलेल्या वरील दोन तिन पोस्ट [बर्भरी शाबरी यांतील फरक आणि 'आदेश' विषयक] यातील काही मुलभूत मुद्दांना छेडछाड करणं शक्यच नव्हतं त्यामुळे मंत्रविषयक बिजं, मंत्र आणि 'आदेश' शब्दाची मुलभूत संकल्पना वर लिहीलेल्या प्रतिसादांमध्ये मूळ गाभा तसाच ठेऊन समाविष्ट केलेली.
त्यावेळी प्रताधिकार धोरणांविषयी तितकासा जागरूक नसल्याने संदर्भसूचीचा उल्लेख केलेला नव्हता. अर्थात् कळत -नकळत संदर्भसूचीचा उल्लेख न करणं ही चूक होती, आहे आणि त्याबाबत दिलगीर आहे.
वरील त्या तिन प्रतिसादांत समाविष्ट केलेल्या मुलभूत संकल्पना संदर्भसूचीचा उल्लेख न करता येथे लिहील्याने जर मुळ प्रकाशक काही कायदेशीर कारवाई करतील वा माफी मागण्यास सांगतील तर त्याला सामोरं जाण्याची तयारी नक्कीच आहे.
अशा माहीतीपूर्ण विषयांवरील पोस्ट्स लिहीताना संदर्भसूची देण्याबाबत यापुढे नक्कीच जागरूकता पाळली जाईल असं नम्रपणे नमूद करतो.
धन्यवाद ! Happy
―र।

आनंदजी, ज्यांनी हे सर्व ज्ञान मुक्तपणे दिल होत, ते सर्वसामान्यांसाठीच दिल होतं, त्यांना ह्या असल्या कॉपीराईट वगैरेची चिंता नव्हती. तुमचा हेतू चांगलाच आहे त्यामुळे काही फिकीर करण्याची गरज नाही. सध्याच्या प्रकाशकांबद्दल आणि एकूणच त्या महात्म्याच्या निर्वाणानंतर त्यांच्या शिष्यांचे वाद झाले ते पाहता ह्या लोकांना महाराजांच्या साहित्यावर अधिकार सांगण्याचा अधिकार आहे का? हा संशोधनाचा विषय आहे. मी आणि माझे कुटुंबीय कधीही त्यांच्या फंदात पडलो नाही कारण आता शुद्ध परमार्थापेक्षा बाकीच्या गोष्टींचा भरणा जास्त झालाय. त्यांच्या बरेच स्वयंघोषित शिष्यांनी पुण्या-मुंबईत साधना, गुरुमंत्र, दीक्षा यांचा खेळ मांडला आहे. आता नाथपंथी मठाधीश मुख्यमंत्री , खासदार ,आमदार झालेत: ते पाहता खरा नाथसंप्रदाय (उघडपणे वावरणारा) भारतात किती शिल्लक राहिलाय हाही मोठा प्रश्नच आहे
असो, आजकाल आत्मप्रौढी साठी उचलेगिरी मोठ्या प्रमाणात चालते म्हणून माझा तसा गैरसमज झाला. तुमचा हेतू चांगल आहे आणि तुम्ही अजून ज्ञान वाटल्यास आनंदच आहे. धागा योग्य वळणाला गेला तर मीही थोडंफार टाकेल खऱ्या संप्रदायाबद्दल.

Pages