अतिशय हुशार माणसातही एखादा मठ्ठपणा असतो. कितीही विचारी, परिपक्व मनुष्य असला तरी त्याच्या आत कुठे तरी एका लहान मुलाचं पोरकटपण दडलेलं असतं. स्थितप्रज्ञ म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्येसुद्धा लपवून ठेवलेला थिल्लरपणा असतो. आणि शहाण्यातल्या शहाण्यातही एक वेडेपणाचं अंग असतंच असतं. ह्या सगळ्यांना ती-ती व्यक्ती कधी न कधी वाट करून देत असते. गुपचूप, खाजगीत, बंद दरवाज्याच्या आड किंवा मुखवटा ओढून वगैरे. हे मठ्ठपणा, पोरकटपणा, थिल्लरपणा आणि सोबतीला वेडेपणा फार क्वचितच एकत्र येतात. पण जेव्हा एकत्र येतात तेव्हा हुशार, परिपक्व, स्थितप्रज्ञ, शहाणा वगैरे बिरुदं मिरवणाऱ्या माणसाचा तद्दन बिनडोक, बावळट आणि मूर्खपणा असा काही समोर येतो की सगळी ओळख पुसून जाईल की काय असंच वाटावं ! इम्तियाझ अलीचा मो., पो., थि. आणि वे.पणा एकत्र आल्यावर त्याने ठरवलं की अमुक एका स्क्रिप्टवर काम करायला हवं. चुकलेल्या वाटेवर वर्षानुवर्षं मनापासून भरकटत चाललेला शाहरुख खान त्याला ह्यासाठी जोडीदार म्हणून लाभला. आणि ह्या ढवळ्या-पवळ्याच्या सोबतीला 'प्रीतम' नावाचा टवळासुद्धा आला ! ह्या अभूतपूर्व संगमाच्या पवित्र ठिकाणाचं अप्रतिम सुंदर असं नावसुद्धा अस्सल ओरिजिनालिटी मिरवेल असं ठरवलं गेलं - 'जब हॅरी मेट सेजल'.
नाव, ट्रेलर, म्युझिक आणि लोकांकडून मिळालेले अभिप्राय, ह्या सगळ्यानंतर खरं तर सिनेमा पाहायलाच नको होता. पण पाहिला. कारण पहिल्या तिन्ही बाबींना फक्त आणि फक्त इम्तियाझ अलीसाठी दुर्लक्षित करून रिलीजच्या तीन दिवस आधीच बुकिंग्स सुरु झाल्या झाल्या तिकिटं काढून ठेवली होती. अक्कलखाती जमा झालेल्या गडगंज संपत्तीत अजून काही शे रुपयांची भर टाकली आणि मनावर सलमान खान ठेवून सिनेमा पाहायला गेलो.

पर्यटकांच्या एका समूहाला सफर घडवणाऱ्या 'हॅरी' (शाहरुख खान) पासून सिनेमाची सुरुवात होते. पहिल्या एका मिनिटात अशक्य पांचट प्रकारात मोडणारे ३-४ बकवास विनोद-प्रयत्न पुढे येणाऱ्या फुटकळपणाची नांदी ठरतात. आधी डोक्यावर आपटून परिणाम झालेली आणि टप्पा पडून नंतर तोंडावर आपटल्याने चपटी झाल्यासारखी दिसणारी 'सेजल' (अनुष्का शर्मा) ह्या टूअर गाईड 'हॅरी'ला हाताशी धरून आपली हरवलेली एंगेजमेंट रिंग शोधण्यासाठी मुंबईला परत जाणारं विमान आणि आपलं संपूर्ण कुटुंब सोडून मागे थांबते. 'हॅरी'ची इच्छा नसताना, तो मुलींच्या बाबतीत 'कॅरेक्टर-ढिला' आहे हे समजल्यावरसुद्धा तिला तोच सोबतीला हवा असतो. नंतर हे दोघं अॅमस्टरडॅम, बुडापेस्ट, बर्लिन, लिस्बन वगैरे अनेक शहरांत एक अंगठी शोधत फिरतात. हॉटेलांतल्या टेबलांखाली, सोफ्यांत, हिरवळीत, रस्त्यांवर, पेव्हर ब्लॉक्समध्ये अश्या रॅण्डम जागांवर वाकून, झोपून, खरवडून वगैरे बघतात. ह्या दरम्यान रात्र झाल्यावर अर्धे कपडे घालून रेड लाईट क्लब्समध्ये बागडायची हुक्की सेजलला येत असते. ह्या अर्ध्या कपड्यांत ती सेक्सी दिसते आहे, असं तिला आणि दिग्दर्शकालाच केवळ वाटतं.
मूर्खपणाच्या सगळ्यात वरच्या पायरीपर्यंत चढून लिहिलेले बाष्कळ प्रसंग अंगठीशोधमोहीम आणि हॅरी-सेजल प्रेमप्रकरण दोन्हीला व पर्यायाने संपूर्ण सिनेमालाच असह्य रटाळ व कंटाळवाणेपणाच्या सर्वोच्च उंचीवर नेऊन प्रेक्षकाचा कडेलोट करतात. ही कडेलोट करेपर्यंतची मिरवणुक कानठळ्या बसवणाऱ्या भुरट्या संगीतावर नाचत नाचत काढली जाते.
माझं एक मत होतं की सिनेमात गाण्यांचा अत्यंत चतुरपणे कसा वापर करावा ह्याचा इम्तियाझ अली हा एक वस्तुपाठ आहे. आग लागली त्या वस्तुपाठाला ! 'एसीची हवा लागून कुणाला झोप वगैरे लागली, तर खाडकन कानाखाली आवाज काढावा' ह्या एकमेव हेतूने ही गाणी बनवलेली आहेत. मेलोडीच्या गळ्यात धोंडा बांधून तिला कल्लोळाच्या डोहात ढकलून दिल्यानंतरच 'प्रीतम'ने चाली बनवल्या आहेत. त्यांवर इर्शाद कमिलचे शब्द स्वत:चे हातपाय तोडून घेतात. कुठलंही गाणं कथानकाला खारीएव्हढाही हातभार लावत नाही. अर्थात, कथानकच मुंगीएव्हढं असल्याने इतका मोठा हातभार लावण्यासारखा वाटा तरी कुठून मिळणार, नाही का !
गेल्या काही सिनेमांतून वेगळ्या अपेक्षा निर्माण करणारा शाहरुख पुन्हा एकदा त्याच माकडचाळ्यांत नव्याने रमलेला पाहून अगदी मनापासून वाईट वाटलं. रईस, गौरव-आर्यन आणि जहांगीर खान अश्या ठोस व्यक्तिरेखा साकारल्यानंतर 'हॅरी'सारखा पिचकवणी रोल शाहरुखला करावासा वाटतो, ही खरोखर दु:खाची गोष्ट आहे. तो कुठेही कमी पडत नाही, नक्कीच. पण कमी पडलं जाऊ शकेल, असं आव्हानात्मक काही नव्हतंच तर !
अनुष्का शर्माबाबतही तसंच. त्यात तिला गुजराथी ढब काही नीटशी जमलेलीही नाही. त्याची गरजही काय होती, कुणास ठाऊक !
शाहरुख आणि अनुष्काबाबत माझी सध्याची मतं जरी सकारात्मक असली, तरी मी फक्त इम्तियाझ अलीसाठी तिकीट काढलं होतं. कधी तरी कुणी तरी त्याला विचारायला हवं, Et tu, Brute ? 'कॉफी विथ करण' च्या एका भागात रोहित शेट्टी, कबीर खान आणि इम्तियाझची एकत्र मुलाखत होती. पडद्यावर असणाऱ्या चौघा दिग्दर्शकांमध्ये इम्तियाझ एलियनच वाटत होता. त्याची उत्तरं, त्याचे विचार खूपच भिन्न होते. आता मला कळत नाहीय की इम्तियाझचं नाव लावून 'जब हॅरी मेट सेजल' दुसऱ्याच कुणी बनवला आहे की तो मुलाखतीत दिसलेला इम्तियाझ खोटारडा होता ? सवडीनुसार आपली बोलायची ढब सर्रास बदलणारी सेजल त्याने सहनच कशी केली ? 'तू तिकडून चालत ये.. मला कॉफी प्यायला ने' वगैरे भंकस प्रसंग, असंबद्ध गाणी हे सगळं त्याला पचलंच कसं ? एखाद्या टीव्ही सिरीयलसारखी ढिसाळ, पसरट पटकथा त्याने लिहिलीच कशी ? असे सगळे प्रश्न मलाच निरुत्तर करत आहेत. राम गोपाल वर्मा आणि मधुर भांडारकरप्रमाणे इम्तियाझ अलीसुद्धा एक 'स्पेंट फोर्स' होतो की काय, अशी भीती वाटतेय.
'जब तक हैं जान' आणि 'जब हॅरी मेट सेजल' हे शाहरुखच्या तमाम सुमारपटांमध्ये आघाडीवर समजायला हवे. 'जतहैंजा'च्या वेळेस तरी शाहरूखची बऱ्यापैकी हवा होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. सुंदर सुंदर लोकेशन्स पाहायला मिळतील म्हणून तिकिटं काढेल इतका प्रेक्षक बिनडोक राहिलेला नाही आणि हळूहळू का होईना त्याची स्टारशरणताही कमी कमी होत चालली आहे. रविवार असूनही नाईट शोसाठी थिएटर जेमतेम १५-२०% भरलेलं होतं आणि त्यातही १०-१२ लोक अर्ध्यातून उठून गेले. एखाद्या आठवड्यातच 'जहॅमेसे'ला गाशा गुंडाळावा लागला, तर मला आश्चर्यही वाटणार नाही आणि वाईटही.
रेटिंग - *
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/08/movie-review-jab-harry-met-sejal....
बॉक्स ऑफिसचे आकडे आले का
बॉक्स ऑफिसचे आकडे आले का सिनेमाचे..
जाब वि मेट मस्त आहे, सोचा ना
जाब वि मेट मस्त आहे, सोचा ना था बोर होतो मध्ये मध्ये..
Shah Rukh Khan's latest film,
Shah Rukh Khan's latest film, Jab Harry Met Sejal met a disastrous fate at the box office. The film earned only Rs 59.65 crore in seven days. Shockingly, the movie managed to earn only Rs 13.90 crore over the week, even with a semi-holiday (Rakshabandhan) in between. Jab Harry Met Sejal can be termed as one of the biggest flops in the otherwise glorious career of Shah Rukh Khan.
आंतरजालावरून साभार
परदेशातील कमाई जोडली आहे का
परदेशातील कमाई जोडली आहे का यात?
शाहरूखचे जगभरात चिक्कार फॅन्स असल्याने ते बरेचदा त्याचा सुमार चित्रपट तारून नेतात..
अरे आकडे म्हणजे चित्रपट हिट
अरे आकडे म्हणजे चित्रपट हिट वा फ्लॉप नसतो रे ऋन्मेष
हिट की फ्लॉप हे बॉक्स ऑफिस
हिट की फ्लॉप हे बॉक्स ऑफिस आकड्यांवरूनच समजते.
चाण्गला की वाईट हे लोकांच्या प्रतिक्रियांवरून.
आता उतारा म्हणून सोचा न था
आता उतारा म्हणून सोचा न था पाहा सगळ्यांनी. मी इतक्यांदा पाहिलाय तरी अजून प्रत्येक सिन पाहताना तितकीच उत्सुकता असते. अजूनही कंटाळा आलेला नाहीय.
Submitted by साधना on 8 August, 2017 - 07:28
>>
'सोचा न था' चं म्युझिक थर्ड क्लास आहे, टू से द लीस्ट. गाणी सुरु झाली की सिनेमा प्रचंड पिळतो. 'जब वी मेट' सर्वांगसुंदर म्हणता येईल इम्तिचा.
हा चित्रपट पाहून मानसिक
हा चित्रपट पाहून मानसिक त्रास आणि शारीरीक त्रास दोन्ही होतो पुरव्याने साबित.
जब वुई मेट चा शाहीद मला
जब वुई मेट चा शाहीद मला प्रचंड आवडतो. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात बेस्ट भुमिका आहे. त्यात शाहरूखचा प्रभावही त्यावर जाणवत नाही. अतिशय संयतपणे त्याने कॅरेक्टर साकारलेय आणि विश्वसनीय केलेय. गीतचे कॅरेक्टर चुलबुले असल्याने प्रथमदर्शनी भाव खाऊन जाते ईतकेच. पण पुन्हा पाहताना शाहीद जास्त आवडतो.
शाखा ने अमीर(दंगळ) सारख्या
शाखा ने अमीर(दंगळ) सारख्या बापाच्या भूमिका केला पाहिजे आता..
मी सहसा मुवी बघायला जात नाही
मी सहसा मुवी बघायला जात नाही पण हा बघायला गेले थेटरात. बेस्ट पार्ट ऑफ द मुवी म्हणजे थेटरात रिक्लायनर सीट्स होत्या.
अनुष्काचं सारखं अभी तो मै लायक हुं कि नही लायक हुं कि नही आणि शारुखचं दात ओठ खाणं, मै तुम्हारी ग्र्ल्फ्रेंड हुं कि नहीं फिईईईईईई र ऐसा करो वैसा करो सॉल्लिड डोक्यात गेलं. गॅसचं पात्रही उगाच घुसडलंय, त्यात कागदपत्रांवरुन पांचट जोक्स.
अख्खा मुवी कुठून कुठेच जात नाही, स्टोरी हलतच नाही. नंतर अनुष्का उगाच डेस्पो वाटत राहते. शाहरुख खान संयत वाटण्यापेक्षा इरिटेटेड जास्त वाटतो.
बाकि लोकेशन्स छान आहेत.
{{{ गीतचे कॅरेक्टर चुलबुले
{{{ गीतचे कॅरेक्टर चुलबुले असल्याने प्रथमदर्शनी भाव खाऊन जाते ईतकेच. पण पुन्हा पाहताना शाहीद जास्त आवडतो. }}}
सहमत. वाचाळतेपेक्षा संयत अभिनय करणे जास्त अवघड असते. शाहिदने ते प्रभावीपणे करुन दाखविले आहे. शाहरुखने हे "हे राम" मध्ये करुन दाखवलंय.
Pages