सॉरी मेट सेजल (Movie Review - Jab Harry Met Sejal)

Submitted by रसप on 7 August, 2017 - 06:44

अतिशय हुशार माणसातही एखादा मठ्ठपणा असतो. कितीही विचारी, परिपक्व मनुष्य असला तरी त्याच्या आत कुठे तरी एका लहान मुलाचं पोरकटपण दडलेलं असतं. स्थितप्रज्ञ म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्येसुद्धा लपवून ठेवलेला थिल्लरपणा असतो. आणि शहाण्यातल्या शहाण्यातही एक वेडेपणाचं अंग असतंच असतं. ह्या सगळ्यांना ती-ती व्यक्ती कधी न कधी वाट करून देत असते. गुपचूप, खाजगीत, बंद दरवाज्याच्या आड किंवा मुखवटा ओढून वगैरे. हे मठ्ठपणा, पोरकटपणा, थिल्लरपणा आणि सोबतीला वेडेपणा फार क्वचितच एकत्र येतात. पण जेव्हा एकत्र येतात तेव्हा हुशार, परिपक्व, स्थितप्रज्ञ, शहाणा वगैरे बिरुदं मिरवणाऱ्या माणसाचा तद्दन बिनडोक, बावळट आणि मूर्खपणा असा काही समोर येतो की सगळी ओळख पुसून जाईल की काय असंच वाटावं ! इम्तियाझ अलीचा मो., पो., थि. आणि वे.पणा एकत्र आल्यावर त्याने ठरवलं की अमुक एका स्क्रिप्टवर काम करायला हवं. चुकलेल्या वाटेवर वर्षानुवर्षं मनापासून भरकटत चाललेला शाहरुख खान त्याला ह्यासाठी जोडीदार म्हणून लाभला. आणि ह्या ढवळ्या-पवळ्याच्या सोबतीला 'प्रीतम' नावाचा टवळासुद्धा आला ! ह्या अभूतपूर्व संगमाच्या पवित्र ठिकाणाचं अप्रतिम सुंदर असं नावसुद्धा अस्सल ओरिजिनालिटी मिरवेल असं ठरवलं गेलं - 'जब हॅरी मेट सेजल'.

नाव, ट्रेलर, म्युझिक आणि लोकांकडून मिळालेले अभिप्राय, ह्या सगळ्यानंतर खरं तर सिनेमा पाहायलाच नको होता. पण पाहिला. कारण पहिल्या तिन्ही बाबींना फक्त आणि फक्त इम्तियाझ अलीसाठी दुर्लक्षित करून रिलीजच्या तीन दिवस आधीच बुकिंग्स सुरु झाल्या झाल्या तिकिटं काढून ठेवली होती. अक्कलखाती जमा झालेल्या गडगंज संपत्तीत अजून काही शे रुपयांची भर टाकली आणि मनावर सलमान खान ठेवून सिनेमा पाहायला गेलो.

jab-harry-met-sejal-poster-SRK-Anushka-1.jpg

पर्यटकांच्या एका समूहाला सफर घडवणाऱ्या 'हॅरी' (शाहरुख खान) पासून सिनेमाची सुरुवात होते. पहिल्या एका मिनिटात अशक्य पांचट प्रकारात मोडणारे ३-४ बकवास विनोद-प्रयत्न पुढे येणाऱ्या फुटकळपणाची नांदी ठरतात. आधी डोक्यावर आपटून परिणाम झालेली आणि टप्पा पडून नंतर तोंडावर आपटल्याने चपटी झाल्यासारखी दिसणारी 'सेजल' (अनुष्का शर्मा) ह्या टूअर गाईड 'हॅरी'ला हाताशी धरून आपली हरवलेली एंगेजमेंट रिंग शोधण्यासाठी मुंबईला परत जाणारं विमान आणि आपलं संपूर्ण कुटुंब सोडून मागे थांबते. 'हॅरी'ची इच्छा नसताना, तो मुलींच्या बाबतीत 'कॅरेक्टर-ढिला' आहे हे समजल्यावरसुद्धा तिला तोच सोबतीला हवा असतो. नंतर हे दोघं अ‍ॅमस्टरडॅम, बुडापेस्ट, बर्लिन, लिस्बन वगैरे अनेक शहरांत एक अंगठी शोधत फिरतात. हॉटेलांतल्या टेबलांखाली, सोफ्यांत, हिरवळीत, रस्त्यांवर, पेव्हर ब्लॉक्समध्ये अश्या रॅण्डम जागांवर वाकून, झोपून, खरवडून वगैरे बघतात. ह्या दरम्यान रात्र झाल्यावर अर्धे कपडे घालून रेड लाईट क्लब्समध्ये बागडायची हुक्की सेजलला येत असते. ह्या अर्ध्या कपड्यांत ती सेक्सी दिसते आहे, असं तिला आणि दिग्दर्शकालाच केवळ वाटतं.
मूर्खपणाच्या सगळ्यात वरच्या पायरीपर्यंत चढून लिहिलेले बाष्कळ प्रसंग अंगठीशोधमोहीम आणि हॅरी-सेजल प्रेमप्रकरण दोन्हीला व पर्यायाने संपूर्ण सिनेमालाच असह्य रटाळ व कंटाळवाणेपणाच्या सर्वोच्च उंचीवर नेऊन प्रेक्षकाचा कडेलोट करतात. ही कडेलोट करेपर्यंतची मिरवणुक कानठळ्या बसवणाऱ्या भुरट्या संगीतावर नाचत नाचत काढली जाते.

माझं एक मत होतं की सिनेमात गाण्यांचा अत्यंत चतुरपणे कसा वापर करावा ह्याचा इम्तियाझ अली हा एक वस्तुपाठ आहे. आग लागली त्या वस्तुपाठाला ! 'एसीची हवा लागून कुणाला झोप वगैरे लागली, तर खाडकन कानाखाली आवाज काढावा' ह्या एकमेव हेतूने ही गाणी बनवलेली आहेत. मेलोडीच्या गळ्यात धोंडा बांधून तिला कल्लोळाच्या डोहात ढकलून दिल्यानंतरच 'प्रीतम'ने चाली बनवल्या आहेत. त्यांवर इर्शाद कमिलचे शब्द स्वत:चे हातपाय तोडून घेतात. कुठलंही गाणं कथानकाला खारीएव्हढाही हातभार लावत नाही. अर्थात, कथानकच मुंगीएव्हढं असल्याने इतका मोठा हातभार लावण्यासारखा वाटा तरी कुठून मिळणार, नाही का !

गेल्या काही सिनेमांतून वेगळ्या अपेक्षा निर्माण करणारा शाहरुख पुन्हा एकदा त्याच माकडचाळ्यांत नव्याने रमलेला पाहून अगदी मनापासून वाईट वाटलं. रईस, गौरव-आर्यन आणि जहांगीर खान अश्या ठोस व्यक्तिरेखा साकारल्यानंतर 'हॅरी'सारखा पिचकवणी रोल शाहरुखला करावासा वाटतो, ही खरोखर दु:खाची गोष्ट आहे. तो कुठेही कमी पडत नाही, नक्कीच. पण कमी पडलं जाऊ शकेल, असं आव्हानात्मक काही नव्हतंच तर !
अनुष्का शर्माबाबतही तसंच. त्यात तिला गुजराथी ढब काही नीटशी जमलेलीही नाही. त्याची गरजही काय होती, कुणास ठाऊक !

शाहरुख आणि अनुष्काबाबत माझी सध्याची मतं जरी सकारात्मक असली, तरी मी फक्त इम्तियाझ अलीसाठी तिकीट काढलं होतं. कधी तरी कुणी तरी त्याला विचारायला हवं, Et tu, Brute ? 'कॉफी विथ करण' च्या एका भागात रोहित शेट्टी, कबीर खान आणि इम्तियाझची एकत्र मुलाखत होती. पडद्यावर असणाऱ्या चौघा दिग्दर्शकांमध्ये इम्तियाझ एलियनच वाटत होता. त्याची उत्तरं, त्याचे विचार खूपच भिन्न होते. आता मला कळत नाहीय की इम्तियाझचं नाव लावून 'जब हॅरी मेट सेजल' दुसऱ्याच कुणी बनवला आहे की तो मुलाखतीत दिसलेला इम्तियाझ खोटारडा होता ? सवडीनुसार आपली बोलायची ढब सर्रास बदलणारी सेजल त्याने सहनच कशी केली ? 'तू तिकडून चालत ये.. मला कॉफी प्यायला ने' वगैरे भंकस प्रसंग, असंबद्ध गाणी हे सगळं त्याला पचलंच कसं ? एखाद्या टीव्ही सिरीयलसारखी ढिसाळ, पसरट पटकथा त्याने लिहिलीच कशी ? असे सगळे प्रश्न मलाच निरुत्तर करत आहेत. राम गोपाल वर्मा आणि मधुर भांडारकरप्रमाणे इम्तियाझ अलीसुद्धा एक 'स्पेंट फोर्स' होतो की काय, अशी भीती वाटतेय.

'जब तक हैं जान' आणि 'जब हॅरी मेट सेजल' हे शाहरुखच्या तमाम सुमारपटांमध्ये आघाडीवर समजायला हवे. 'जतहैंजा'च्या वेळेस तरी शाहरूखची बऱ्यापैकी हवा होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. सुंदर सुंदर लोकेशन्स पाहायला मिळतील म्हणून तिकिटं काढेल इतका प्रेक्षक बिनडोक राहिलेला नाही आणि हळूहळू का होईना त्याची स्टारशरणताही कमी कमी होत चालली आहे. रविवार असूनही नाईट शोसाठी थिएटर जेमतेम १५-२०% भरलेलं होतं आणि त्यातही १०-१२ लोक अर्ध्यातून उठून गेले. एखाद्या आठवड्यातच 'जहॅमेसे'ला गाशा गुंडाळावा लागला, तर मला आश्चर्यही वाटणार नाही आणि वाईटही.

रेटिंग - *

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2017/08/movie-review-jab-harry-met-sejal....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दर्द बहोत अंदर तक हुवा है भाईजान...?

असो. इ.अली कडे विशेष कामगिरी सोपवली आहे. त्यामुळे मनस्वी कलाकारांवर दुसर्‍याने सांगितल्याबरहुकूम काम करायला लागले की काय होते हे इ.अली ला बघून समजते.....

मी अशक्य हसले आहे हे परिक्षण वाचून Rofl Rofl Rofl

ह्या ढवळ्या-पवळ्याच्या सोबतीला 'प्रीतम' नावाचा टवळासुद्धा आला
मनावर सलमान खान ठेवून सिनेमा पाहायला गेलो.
मूर्खपणाच्या सगळ्यात वरच्या पायरीपर्यंत चढून लिहिलेले बाष्कळ प्रसंग अंगठीशोधमोहीम आणि हॅरी-सेजल प्रेमप्रकरण दोन्हीला व पर्यायाने संपूर्ण सिनेमालाच असह्य रटाळ व कंटाळवाणेपणाच्या सर्वोच्च उंचीवर नेऊन प्रेक्षकाचा कडेलोट करतात. ही कडेलोट करेपर्यंतची मिरवणुक कानठळ्या बसवणाऱ्या भुरट्या संगीतावर नाचत नाचत काढली जाते. >>> ही वाक्ये एपिक आहेत

हा हा... अगदी अगदि सुमुक्ता...
1 नंबर मनातलं लिहिलंय...
काही वाक्य तर मस्त आहेत एकदम...
>>>ढवळ्या-पवळ्याच्या टवळासुद्धा>>> अशक्य हसले..
>>मनावर सलमान खान >>> आई आई ग...
>>>आधी डोक्यावर आपटून परिणाम झालेली आणि टप्पा पडून नंतर तोंडावर आपटल्याने चपटी झाल्यासारखी दिसणारी 'सेजल' (अनुष्का शर्मा)>>> तिचा डक झाल्यापासून मला अजिबात आवडत नाही ती..कधीतरी अचानक ओठ बरे वाटले तरच एकटींग कडे लक्ष जाते...
>>>ह्या दरम्यान रात्र झाल्यावर अर्धे कपडे घालून रेड लाईट क्लब्समध्ये बागडायची हुक्की सेजलला येत असते. ह्या अर्ध्या कपड्यांत ती सेक्सी दिसते आहे, असं तिला आणि दिग्दर्शकालाच केवळ वाटतं.>>> खरंय... ती सेक्सी वगैरे न वाटता अशक्त ,बारीक वाटते...बाकीच्या हिरविनी हेल्थ व्हाइस बऱ्या दिसतात..तिचे हात पाय कसले हडकुळे आहेत.. आधी अकटिंग मुळे आवडायची...आता तिचा स्वतःचा फोकसच अकटिंग वरून दिसण्यावर गेल्यामुळे आता बिग नो...
शाहरुख आवडत असूनही आता हाडं बाहेर आल्यामुळे त्याच हसणं वगैरे फार कृत्रिम वाटत...ओढुन ताणून करतो आता वयामुळे...

एकंदरीत असाच रिव्ह्यू अपेक्षित होता...अब बघणा कॅन्सल.. Biggrin Lol

परीक्षण भारी लिहिलेय.
वर कोट केलेली वाक्ये वाचायला मजा आली.
मलाही चित्रपटाकडून अश्याच अपेक्षा होत्या. म्हणून हा विकेंड खराब करायच्या फंदात पडलो नाही.
पण पूर्ण दोष ईम्तियाझचा नाही. चित्रपटात शाहरूखला घेतले तर त्याच्या स्टारडमचा वापर करायचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही.
शेवटी आपण दिलेले रेटींग सूचक आहे - एकच स्टार , शाहरूख खान !
पुढचे मात्र तुम्ही आपल्या मेहनतीने कमवायचे असतात...

पिक्चर पाहिल्यावर खरंचंच " का ? " असा प्रश्न डोक्यात येतो. त्यात सगळा पिक्चर होताना मध्ये मध्ये अरिजीत किंचाळत असतो त्यामुळे तर अजूनच रसभंग होतो.

टाळावा असा पिक्चर Lol

अप्रतिम , मला तुम्च्या इत्क्या चान्ग्ल्या शब्दात लिहिता नसत आल. खुप सुन्दर लिहिलय तुम्हि.

कसला स्टार आणि कसलं काय. एवढे पंखा आहात तर का नाही गेलात चित्रपट बघायला. उगाच काहीतरी बादरायण संबंध जोडायचा.

पंखा आहे. भक्त नाही. शाहरूखचे भले कश्यात आहे हे समजते आणि त्याची चिण्ताही आहे. बाकी पिक्चर तद्दन फालतू असला तरी आठवड्याभराने त्याचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड समोर येतील तेव्हा तो किती मोठा सुपर्रस्टार आहे हे समजेलच. मुख्यत्वे ओवरसीज मार्केट बघाल तर आंतरराष्ट्रिय ख्यातीचा सुपर्रस्टार आहे हे देखील वेगळे सिद्ध करावे लागणार नाही Happy

पर्फेक्ट लिहीलंय, रसप. तुम्ही एक स्टार तरी कसा काय देऊ शकलात?

इम्तियाजला लिहीता लिहीता कंटाळा आला असणार म्हणून त्याने विचार केला असेल की 'चला डायरेक्ट दिग्दर्शनच करायला घेऊ' आणि मग ते करताना लक्षात आलं की 'अरेच्चा, स्टोरी तर लिहीलीच नाहीये!' म्हणून त्याने जमेल तसा पिक्चर बनवून टाकला असावा.

आधी एकतर गुजरातीच मुलगी आणायचं कारण काय होतं ते कळलं नाही. सेजल ऐवजी पंजाबी स्वीट्टी किंवा मराठी श्रावणी वगैरे पण चालली असती की! Happy काही प्रांतिक नोकझोक असेल असं वाटलं तर ते ही नाही. त्या दोघांची कॅरॅक्टर्स नीट बिल्ड झालीच नाहीयेत. हे सगळं जे चाललंय ते का चाललंय असा प्रश्न दर दोन-पाच मिनीटांनी मनात येतो. दोघांच्या बोलण्यातून त्यांची बॅकग्राऊंड थोडीफार समजते जी त्यांची व्यक्तिरेखा उभी करायला पुरेशी वाटली नाही. सेजलचा रिंग शोध नाट्यमय, मजेशीर करता आला असता. त्याऐवजी तो सपशेल सपक होतो. त्याहूनही सपक होतं त्या दोघांचं नातं. काही केमिस्ट्रीच दिसत नाही. ते एकमेकांच्यात का गुंततात याचं कुठलंही पटण्यासारखं कारण शेवटपर्यंत सापडत नाही.

सेजल मधे इम्तियाजने गीतला शोधायचा प्रयत्न केलाय जो पूर्णपणे फसलेला वाटतो. त्यामुळे सेजल कधी शहाण्यासारखी वागते तर कधी गीत सारखी. तिचं हॅरीला फॉलो करत पब मधे जाणं, त्याला सतत प्रोव्होक करणं वगैरे गोष्टींचं कारण उमगत नाही. बरं, तिचं तिच्या मंगेतरशी पटत नसतं म्हणून ती असं करते वगैरे म्हणावं तर तसंही कुठे दिसत नाही. एकूणच हा पिक्चर पाहून असंख्य 'का?' डोक्यात येतात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण हा पिक्चर का पाहिला?

बाकी शाहरूख ऑलमोस्ट पूर्ण पिक्चरभर अतिशय कळकट वाटतो. ज्याच्यासाठी हा पिक्चर पहायला गेले होते त्यानेच जोरदार घात केला Proud त्याला ना कॉमेडी करू दिली आहे ना रोमान्स. नुसताच बावचळलेला वाटत राहतो तो. अनुष्का बद्दल रसपने करेक्ट लिहीलं आहे. शिवाय प्रत्येक वाक्याच्या शेवटी 'ने' लावला की गुजराती बोलणं आलं असा तिचा समज झाल्यासारखा वाटतो. पूर्ण पिक्चरमधे जवळपास प्रत्येक फ्रेममधे हॅरी-सेजल दिसतील याचीच सतत काळजी घेतल्यामुळे युरोपचं सौंदर्य वगैरेही एंजॉय करता येत नाही. पिक्चरच्या सुरूवातीलाच इर्शादचं 'सफर' नामक सुंदर गाणं अरिजितच्या भयंकर रेकणार्‍या आवाजात लावून पिक्चरला एकूणच जी नाट लावली आहे त्याबद्दल आता अजून काय बोलणार. बाकी गाणी यथातथाच. पिक्चर टोटल 'धन्यवाद' आहे!

नंतर हे दोघं अ‍ॅमस्टरडॅम, बुडापेस्ट, बर्लिन, लिस्बन वगैरे अनेक शहरांत एक अंगठी शोधत फिरतात. हॉटेलांतल्या टेबलांखाली, सोफ्यांत, हिरवळीत, रस्त्यांवर, पेव्हर ब्लॉक्समध्ये अश्या रॅण्डम जागांवर वाकून, झोपून, खरवडून वगैरे बघतात.

अरे पण या सगळ्या प्रवासाला आणि हॉटेल स्टेला येणाऱ्या खर्चात नवी अंगठी नसती आली का?
रिव्ह्यू छान आहे!

पिक्चरच्या सुरूवातीलाच इर्शादचं 'सफर' नामक सुंदर गाणं अरिजितच्या भयंकर रेकणार्या आवाजात लावून पिक्चरला एकूणच जी नाट लावली आहे त्याबद्दल आता अजून काय बोलणार. बाकी गाणी यथातथाच....+111111

Arijit Nakosa jhalay.......

परीक्षणाशी सहमत...
शुक्रवारची रात्र वाया घालवली... शाहरूख आवडत नाहीच, इम्तियाज अलीसाठी गेलो होतो... पण घोर निराशा... ना कथा, ना संवाद, ना गाणी, ना अभिनय, ना सौंदर्यस्थळांचं धड चित्रीकरण... काहीही घडत नाही चित्रपट भर... ज्यात इम्तियाज अलीचा हातखंडा आहे, की एखादा सीन उत्कटतेला न्यायचा, भावनांचं मिश्रण, गोंधळ आणि तरीही त्यातून सहीसलामत बाहेर पडून त्या सगळ्या भावनांना पुढे एक आकार/आयाम देणं... त्याला साजेसं संगीत/गाणं किंवा त्या गाण्याचे बोलसुद्धा असे की ते सगळं आपल्यासोबत होतंय/झालंय याची जाणीव करून देणं, हे या चित्रपटात कणभरसुद्धा नव्हतं... रॅदर, सारखं आपलं असं होईल, असं होऊ शकतं, आणि आता असं करू, करत चित्रपट फरपटत पुढे सरकतो, पण कुठेच काहीच अपील होत नाही...
असो!

आता उतारा म्हणून सोचा न था पाहा सगळ्यांनी. मी इतक्यांदा पाहिलाय तरी अजून प्रत्येक सिन पाहताना तितकीच उत्सुकता असते. अजूनही कंटाळा आलेला नाहीय.

सगळ्याच रिव्ह्यूमध्ये टुकार , पैसे वाया घालवू नका वगैरे आल्याने तसंही बघणार नव्हतेच हा चित्रपट. आता नाहीच बघणार
एकंदरीतच शाखाची हॅपी न्यू इयर पासून घसरलेली गाडी रुळावर यायला तयार नाही असे दिसतेय. वाईट खरतर इमितीयाज अली साठी वाटतेय. what happened to him ? Is he lost in his own style Uhoh

ट्रेलर बघितले आताच..... शाळेत एखाद्या दिवशी श्रमदानाचा तास म्हणून मैदानातले दगड उचलायला लावत असत विद्यार्थ्यांना, त्यावेळी काही (म्हणजे बरेच) विद्यार्थी नुसते एका ठिकाणी बसून इकडचा दगड तिकडे हलवत काम करत आहोत असे दाखवतात.... तसले काहीतरी प्रत्येकाने ह्या चित्रपटात केले आहे असे दिसते. कसलीही थीम नाही काही नाही, संगीत, सिनेमॅटोग्राफी आणि सगळंच अतिशय पाट्या टाकू काम आहे.

पिक्चरच्या सुरूवातीलाच इर्शादचं 'सफर' नामक सुंदर गाणं अरिजितच्या भयंकर रेकणार्‍या आवाजात लावून पिक्चरला एकूणच जी नाट लावली आहे त्याबद्दल आता अजून काय बोलणार. बाकी गाणी यथातथाच. पिक्चर टोटल 'धन्यवाद' आहे!
नवीन Submitted by rmd on 8 August, 2017 - 01:23

>>
परफेक्ट !
खासकरून मी ठळक केलेले शब्द. असह्य झालाय आता तो. त्याचा आवाज सुरु झाला की कान बंद करून घ्यावेसे वाटतात आताशा.. Sad

वाक्य न वाक्य पटल. शाहरूखचा फॅन असल्याने "रईस, गौरव-आर्यन आणि जहांगीर खान अश्या ठोस व्यक्तिरेखा साकारल्यानंतर 'हॅरी'सारखा पिचकवणी रोल शाहरुखला करावासा वाटतो, ही खरोखर दु:खाची गोष्ट आहे. " हे तर अगदी मनापासून .

फक्त का ? शाहरूख का ? इतकच विचाराव वाटल .

मला इम्तियाज साठी फार वाईट वाटल.तमाशा नंतर तुम्ही परीक्षण लिहल आहे त्याप्रमाणे पिकचर बघणे किती अवघड असेल Sad मुळात शाहरुख साठी असा काहीतरी पिक्चर तयार केला आहे का ??? जो धड इम्तियाज ट्च पण दाखवत नाही आनि धड शाहरुख चा रोमान्स पण???
इम्तियाज कडे शाहरुख सोडुन बाकी खुप चांगले कलाकार आहेत काम करण्यासाठी..त्यांच्यावर प्रयोग करण्यासाठी.

शाहरुख टिपिकल हिरो मटेरिअल नाही दाखवलाय या मधे.. म्हण्जे सगळ्यांचे प्रॉब चुटकी सरशी सॉल्व्ह करणारा ई. ई...
म्हणुन बरा वाटला..
पण येवढा डब्बा नव्हता वाटला मुव्ही.. सगळे रिव्ह्यु वाचुन वाटायला लागला..
कधी कधी वाटतं रिव्ह्यु लिहुच नये कोणी..
ज्याला जे वाटेल जे बघितल्यावर ते तसच वाटत रहाव..

आनंदी , चित्रपट किंवा शाहरूखचा अभिनय अ‍ॅज सच वाईट नाहीये , पण हा ९०चा चित्रपट आहे . जेव्हा फक्त रॉम कॉम वर ३ तास दळण दळलेल चालायच , कदाचित तेव्हा आला असता तर चाललाही असता .
पण टाईम्स हॅव चेंजड . जसा अनिल जॅकी भाऊ भाऊ, गोविंदा नं १ , आऊट्डेटेड झाले तसच आता ही थीमही झालीये. अन त्यातही कथेत थोडा फ्रेशनेस असेल तर चालत , पण इथे सगळ्यानीच पाट्या टाकल्यात .

Rofl भयंकर. मस्त लिहिलंय रसप. जतहैजा चं परीक्षण आठवलं. Happy
सिनेमाचा ट्रेलर बघुनच काय असेल त्याची कल्पना आलेली.
एकंदर चीप ट्रीटमेंटच वाटली होती नाच गाणी बघुन.

Pages