मायबोली - फक्त मराठीच की इंग्रजी पण कधीकधी चालेल.

Submitted by केदार on 12 March, 2009 - 00:07

सध्या गाजत असलेला धार्मिक बाफ वरचा मराठी - इंग्रजी वादाने ह्या बाफचा जन्म झाला. Happy

मला काही गोष्टी स्पष्ट नाहीत त्या करुन घेणे हा मुख्य उद्देश.

ह्या स्थळावर प्रत्येक बाफ, (बीबी) रंगीबेरंगी इइ आणि प्रत्येक पोस्ट मराठीतच असावी का कधीकधी इंग्रजी चालेल?

फक्त मराठीचा आग्रह असेल तर माझे काही प्रश्न आहेत. त्यावर काही उपाय करता येईल का?

सर्व मराठीत करायचे तर माझे युजर नेम kedarjoshi असे दिसत आहे, तर ते पण मराठीत करुन द्या, आणि ह्या बाजुला ज्या अ‍ॅडस दिसत आहेत त्या पण मराठीत कश्या येतील हे बघता का? मराठी साइट आहे तर सर्व गोष्टी संगतवार व्ह्यायला पाहिजेत.

धार्मिक ह्या ग्रुपचा मी सदस्य नाही तर तिथे invite friend असे काहीसे दिसत आहे. मग ते का?
लिहीताना इंग्रजी ची सोय का? ही पोस्ट लिहीताना मजकूराच्या खाली अनेक इंग्रजी वाक्ये दिसत आहेत ते का?

आधी लिहील्याप्रमाने अ‍ॅडमीनना प्रश्न विचारने हा हेतू नाही तर तिथली चर्चा अनेक बाफवर कधी कधी होत असते, तर त्याला योग्य वळन देणे हा आहे.

आणि लिहीतच आहे तर पुढे हे ही लिहीतो की बरेच सदस्य दुसर्‍या सदस्यांना, हे करु नका, ते करु नका?, हे असेच पाहिजे असे सांगत असतात, तर एखादी नियमावली पण द्या म्हणजे आमच्या सारख्यांना कोणी सांगीतले तर ते बरोबर (मायबोली साइटीच्या दृष्टीने) आहे की नाही हे पण कळेल. कधी कधी नविन गोष्टी वाचायला मिळतात म्हणून विचारले. Happy

ह्यासर्व गोष्टींत तुमचे व इतरांचे मत जाणून घ्यायला आवेडल. चर्चा करुयात. Happy

मला स्वतःला मराठीतच लिहीने आवडते, येते म्हणून मी ते पाळतोच. इतरांना सांगतोही पण दुराग्रही नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर बोवा कन्फ्युज्ड>> मी पण.

शुद्ध मराठी लिहिता येण सोप असूनही काही जण तस का लिहीत नाहीत? आणि तेच काहीजण विरोध करतात... अस का?

*********************
All desirable things in life are either:
1.Illegal
2.Banned
3.Fattening or
4.Married to Others.
Wink Biggrin

की त्यात्या बीबीच्या स्वतःस नावडत्या विषयास विरोध करण्यास लिपीचा विरोध हे आडमार्गी शस्त्र???
>>>>
मला नाही वाटत की विरोध करण्याइतपत त्या बाफची पात्रता आहे Proud

हातापायाला मुंग्या येणे,पोटात जळजळ होणे , उलटी ची भावना होणे ह्याला इंग्रजीमधे काय म्हणतात ?

-----------------------------------------
- सक्षम दळवी

सक्षम्....अरे शब्दार्थ नावाचा एक बाफ आहे वेगळा..तिकडे टाक ...

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

देवनागरीमध्ये लिहावं असा अट्टाहास धरावा का? तर, हट्ट, अट्टाहास धरू नये अश्या मताची मी आहे. आग्रह, विनंती मात्र जरूर करावी.

साहित्य मराठीतच असायला हवं, यावर दुमत नाही पण मग ते साहित्येतर बाफवर ते देवनागरीमधूनच का असू नये? आपण मुळात रोज पेनानं/ पेन्सिलिनं लिहीतो किती? त्यातून मराठीत तर नाहीच. 'मायबोली' साईटवर आपण का येतो? कारण ही साईट 'मराठी' आहे. इथे मराठी साहित्य तर आहेच, पण गप्पाही मराठीत आहेत. त्या तश्या मारता येतात ही सोयही आहे. मग का आपण सर्व सदस्यांनी देवनागरी लिहिण्याचा आग्रह सगळ्यांना करू नये?

जे इन्ग्रजीमधून लिहीतात, त्यातल्या ९९% लोकांना देवनागरीमधून लिहायचे कसे हे समजत नाही, म्हणून लिहीतात. त्यांनाही उत्सुकता असते, कसे लिहायचे याबद्दल. म्हणजे एकूणात देवनागरी लिहीण्याबद्दल अनास्था नाहीये. अडचण आहे, जी दूर करता येते.

पण मुळात ज्यांना देवनागरीमध्ये लिहायचेच नाहीये, अश्यांचे काय करायचे? तेही का नाही एकदा विचार करत की इतके लोक का बरं आपल्याला हे सांगत आहेत? ते साहित्य लिहीत नाहीत, म्हणून त्यांचा अपवाद का करावा? माध्यम म्हणून ते एक मराठी साईट वापरतच आहेत ना! त्यांना देवनागरी लिहायला आवडत नसेल, तर त्यांनी ब्लॉग लिहावा, आपल्या ईमेल अ‍ॅड्रेसची जाहिरात करावी आणि सगळा मामलाच खासगी करून टाकावा! मायबोलीवर त्यांनी सर्रास इन्ग्रजी वापरलं, आणि लोकांनी त्यांना देवनागरीमध्ये लिहायला सुचवले, तर त्यात गैर ते काय?

कारणं देण्यापेक्षा, त्यांनी एक क्षण थांबून प्रयत्न केला, आणि मग सांगितलं की बाबांनो अवघड होतंय तर लोक त्यांच्याही बाजूनं विचार करतीलच की. पण मुळात त्यांना प्रयत्नच करायचा नाहीये आणि हे चूकच आहे. 'मी इन्ग्रजीमधून लिहीलं तर काय बिघडलं' असं ते विचारत असतील, तर 'जरूर लिहा, पण आधी देवनागरी लिहीण्यात तुम्हाला काय कमीपणा वाटत आहे ते विशद करा', असं ठामपणे आपण सांगितलं तर काहीही चूक नाही.

बाकी मुद्दा, मराठी यूजरनेम्स आणि इतर लिन्कचा, तर त्यावर योग्य टिप्पण्ण्या झाल्या आहेतच.

-----------------------------------
Its all in your mind!

पूनम, अगदी मस्त. माझ्या मनातलं लिहिलंस अगदी.
................................
माझे जगणे होते गाणे...

हेहे Wink बादवे कुणी कुणाच्या मनातल कस लिहू / ओळखू शकतो?? म ला ही विद्या शिकायची आहे पूनम.

*********************
All desirable things in life are either:
1.Illegal
2.Banned
3.Fattening or
4.Married to Others.
Wink Biggrin

फ, मायबोलीशी संबंधित बर्‍याच (rather बहुतेक) गोष्टि ह्या महाराष्ट्राशी किंवा मराठी (बोलणार्‍या) लोकांशी संबंधित आहेत, मराठीशी भाषा म्हणून नाही ह्यातच सगळे आले. त्यामूळे प्रश्न.

राहिता राहिला तुझा प्रश्न कि "एखादी व्यक्ती 'मराठी भाषिक' आहे किंवा नाही हे कसं ताडणार? " हे मी म्हटल्याप्रमाणे विषयांतर आहे (जे नेहमी ह्या वादामधे होत आले आहे), ह्याचे उत्तर (देवनागरीमधे लिहिले काय किंवा नाही लिहिले काय तरी) कधीच ठामपणे देता येणार नाही. देवनागरीमधे मराठी लिहिले म्हणजे जसे ती व्यक्ती मराठी आहे (ह्याची उदाहरणे तुला इथेच सापडतील Happy ) हे सिद्ध होत नाही, तसेच नाही लिहिले म्हणाजे ती व्यक्ती मराठी नाही हेही ओघाने आलेच.

मला नाही वाटत की विरोध करण्याइतपत त्या बाफची पात्रता आहे>>>> कोणत्याही बीबीची पात्रता ठरवणारी ही पात्र कोण???:)

वर काही अतिशय उत्तम मुद्दे आले आहेत.
१. असामी, मायबोलीवरच्या अनेक, नव्हे, बहुसंख्य गोष्टी वैश्विक आहेत. ताज्या घडामोडी, तंत्रज्ञान, धर्म, ज्योतिष, पाककृती इ. इथल्या गोष्टींचा मराठी असण्याशी काही संबंध नाही. आपण ओबामावर चर्चा करतो, नरेंद्र मोदीवर करतो, सेतूवर करतो, देवाधर्मावर करतो, सर्व खाण्यापिण्यावर करतो... यातले कुठले विषय मराठी आहेत ? ते जाऊ दे, या सर्व ठिकाणी आपण 'मराठी' अशी खास विचारधारा मांडत आहोत का ? या सर्व विषयांकडे आपण केवळ 'मराठी' असण्याच्या भूमिकेतून बघत आहोत का ? मुळीच नाही. विषय वैश्विक आहेत, भूमिकांमध्येही मराठी असे काहीच नाही. फक्त 'साहित्य' मराठीत असते. पण गुलमोहर हा माबोचा एक भाग आहे. मग मराठी संकेतस्थळ ही ओळख कोठून ? फक्त त्या एका भागावरून ? की या संकेतस्थळावर बहुतेक ठिकाणी मराठी भाषेचा वापर होतो म्हणून ?
.
२. एखादा बाफ जर मराठी भाषेचा वापर न करता चालवला जात असेल तर त्या बाफचे मायबोलीवर असण्याचे प्रयोजनच काय ? अशा बाफंवर सर्रास इंग्रजीच लिहिले जात असेल, तर तिथे यायला मी मराठी असण्याची गरजच नाही. मग मराठी संकेतस्थळाचाच वापर का ?
.
३. अ‍ॅडमिन, तुम्ही हे बर्‍याच गोष्टी सदस्यांवर सोडल्या आहेत आणि ते होतही आहे. सुरुवातीला अडखळणे हे समजून घेतले जाते. कधीतरी एखादे पोस्ट इंग्रजीतून करणे हेही समजून घेतले जाते. पेशव्याने पिंक चड्डी बाफवर प्रतिसादांमध्ये एक इंग्रजी पोस्ट टाकले आहे (मूळ पोस्ट नव्हे). त्यात त्याची वाक्ये इंग्रजीतून आहेत, त्यावर कोणी गदारोळ केला नाही. तेवढे तारतम्य माबोकरांत आहे. तो इथे बहुतेक वेळा मराठीतून पोस्ट करतो. तुम्ही सदस्यांना जे भाषास्वातंत्र्य दिले आहे ते अशा प्रकारे वापरले जाणे अपेक्षित आहे असे माझे मत आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो.
अ‍ॅडमिन, 'मराठीची सक्ती नाही' या स्वातंत्र्याचा अत्यंत निर्लज्ज गैरफायदा ज्योतिष बाफवर घेतला जात आहे. 'सक्ती नाही' याचा अर्थ 'कधीच वापरली नाही तरी चालेल' असाच अर्थ ज्योतिष बाफवरचे लोक घेत आहेत. त्यात वर 'कधीतरी पूर्वी एकदा-दोनदा मराठीतून पोस्ट केले होते' ही मखलाशी केली जाते ती संतापजनक आहे. सक्ती नाही या स्वातंत्र्याचा अर्थ मीतरी 'तारतम्याने इतर भाषेचा वापर करावा' असा घेतो. सक्ती नाही या स्वातंत्र्याचा अर्थ मी तरी 'प्रत्येक शब्दन् शब्द मराठीत नसला तरी चालेल' असा घेतो. सक्ती नाही याचा अर्थ मी तरी 'हे स्वातंत्र्य आहे, त्याच्याबरोबर जबाबदारी येते' असाही घेतो.
मी इथे माझ्यासाठी येतो. मराठीतून बोलावे हा एक मुख्य उद्देश, दुसरा मुख्य उद्देश म्हणजे विचारांचे आदानप्रदान. त्यामुळे तांत्रिक विषयांवरही मी मराठीतून लिहिण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. उत्क्रांतीसारख्या विषयावर मी मराठीतून पोस्ट बडवून येतो, जे मला इंग्रजीतून लिहिणे अधिक सोपे आहे. इथे 'मराठीचा वापर' हा जितका माझ्यासाठी आहे, तितकाच या संकेतस्थळाच्या मला समजलेल्या संकेतातून आहे, ते संकेत मला पाळावेसे वाटतात म्हणून. पण जर मला समजलेले संकेत चुकीचे असतील, तर मी उत्क्रांतीसारख्या विषयांवर इथे असोशीने मराठीतून लिहावे यामागचे एक कारण नक्कीच कमी होते. त्यामुळे तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा माझ्यासाठी उद्वेगजनक ठरतो.

.
आतापर्यंत एक blanket policy प्रशासनाने वापरली, ती यशस्वी ठरली. पण निदान 'दिलेल्या स्वातंत्र्याचा वापर कधी व गैरफायदा कधी' यावर विचार करून, त्यावर काही धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती मी प्रशासनाला करतो.

    ***
    Entropy : It isn't what it used to be.

    तुम्हाला काय कमीपणा वाटत आहे ते विशद करा' >> मला नाही वाटत कुणाला कमीपणा वाटत असेल. बरेचदा वेळ हा मुद्द्दा असु शकतो. जेव्हडे ईंग्रजी ला आपली बोटे सरावली असतात तेव्ह्ढी मराठीची सवय नसते , त्यामुळे वेळ लागतो.

    अर्थात जे रोज पानच्या पान मराठी लिहीतात त्यांना नाही वेळ लागत. Happy

    ctrl + \ वापरुन भाषा बदलण्याची सोय दीली आहे यातच बरेच काही आले. Happy

    आणि जो नियम समाजात इतरत्र वावरताना तोच मायबोलीवर, आपण विनंती करु शकतो. सक्ती फक्त प्रशासन करु शकते.

    आणि बाफ कुठलाही असो योग्य शब्दात सुचवले तर आपल्याच मायबोली वरचे वातावरण चांगले रहाण्यास मदत नाही का होणार.

    असे आपले मला वाटते.

    माझे स्वतःचे मत सर्व गोष्टी मराठीतूनच व्हाव्यात हेच आहे.

    मराठी साइटवर इंग्रजी लिहीणार्या व्यक्तीना स्वतःलाच कळायला पाहिजे की इथे लोक मराठीतून लिहीत आहेत तर आपणही मराठीत लिहावे. माझ्यामते ही प्रक्रिया स्वतःपुरती असते, इतरांनी सक्ती करुन चालत नाही. ह्याउपरही कोणी, 'नाही मी असेच करणार' अशीच भुमीका घेत असेल तर तिथे वाद घालून काहीही फायदा नाही. ( हे धार्मिक बाफ साठीच नाही तर पूर्ण मायबोलीसाठी आहे.)

    मी स्वत: तर हाय वे वरुन एक्झीट घेताना मित्रांना ८२ क, ५३ अ, घे असे सांगतो. (आता मित्रांनाही सवय झालीये, आधी भंजाळायचे :). त्यामुळे इंग्रजी भाषेचा हट्ट मी इथे कधीच करणार नाही. पण मी एकटा म्हणजे मायबोली नाही. मी फक्त एक भाग आहे. दुसर्‍यांचा मताचा आदर करणे मला प्राप्त आहे. जर तो होत नसेल तर मी अ‍ॅरोगंट गणला जाइल.

    बाफ कुठलाही असो योग्य शब्दात सुचवले तर आपल्याच मायबोली वरचे वातावरण चांगले रहाण्यास मदत नाही का होणार >>> सहमत.

    वेळ सुरुवातीला सगळ्यांनाच लागतो आणि सुरुवातीलाच लागतो. तेवढा द्यावासा वाटणे/न वाटणे हा प्रश्न आहे.
    ctrl + \ याचा उद्देश वेगळा आहे असे मला वाटते, जे मला वाटते ते मी आधीच्या एका पोस्टमध्ये विशद केला आहे. त्या सोयीतून बरेच काही आले/येते असे मला वाटत नाही. त्यातून 'आपल्याला नेहमी इंग्रजीतून लिहिण्याची मुभा आहे' असाही अर्थ काढता येऊ शकतो, तसा काढायचा आहे का ?

      ***
      Entropy : It isn't what it used to be.

      >>> बाफ कुठलाही असो योग्य शब्दात सुचवले तर आपल्याच मायबोली वरचे वातावरण चांगले रहाण्यास मदत नाही का होणार ... दुसर्‍यांचा मताचा आदर करणे मला प्राप्त आहे. जर तो होत नसेल तर मी अ‍ॅरोगंट गणला जाइल.
      या सर्वाचा आणि या विषयाचा संबंध कळला नाही. 'भाषेची अभिव्यक्ती कशी असावी ?' हा चर्चायोग्य पण स्वतंत्र विषय आहे. सध्या इथे 'अभिव्यक्तीची भाषा व लिपी कशी असावी ?' असा विषय आहे असे मला वाटते.

        ***
        Entropy : It isn't what it used to be.

        अरे ते दोन वाक्य वेगवेगळे आहेत. Happy ती सहमती ही सध्या चाललेल्या विद्रोही वादळा बद्दल आहे.

        दुसर्‍यांचा मताचा आदर करणे हे वाक्य मी जनरल लिहीले आहे. आता उदाहरणच द्यायचे तर तिथे मिलिन्द वारंवार सांगत होता की, अरे, "इथे हिंदी भाषीक पण येतात, काही जन खास त्यासाठीच मायबोलीचे सदस्य झाले आहेत. " सोप पडावे म्हणून असे चालू आहे. तर कदाचित मी ह्या मताचा आदर करुन सोडले असते. (परत हे वाक्य व्यक्तिसापेक्ष आहे, सर्वांनाच मला वाटले तसे वाटनार नाही. पण ते ह्या चर्चेत लागू होत नसेल तर ते मागे घेईन.)

        असा slarty माझ्या मते अ‍ॅडमिन नी 'मराठीची सक्ती नाही' असे ठामपणे म्हटलेले नाहि ह्याचाच अर्थ त्यांचे मत "हे संकेतस्थळ (??) मराठी लिहिण्यासाठी नसून, मराठी भाषिकांनी एकत्र यावे आणी (शक्यतो होइल तिथे ) मराठी मधे बोलावे लिहावे" ह्यासाठी आहे असे असावे. तुझा पहिला मुद्दा ह्याला बळकटी आणतो.

        अर्थात हे माझे speculation आहे आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठीच हा प्रश्न मी विचारला होता.

        स्लार्टी, तुझ्या सर्व मुद्द्यांना पूर्ण अनुमोदन.
        ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
        There is no charge for awesomeness.... or attractiveness.

        पण देवनागरीकरणाचा मुद्दा मांडताना, हे विपर्यस्त भाषांतराचं उदाहरण गैरलागू आहे. <<<

        फ, हे उदाहरण कदाचित थोड्या अतिशयोक्ती च असेल, पण माझा मुद्दा तोच आहे की या देवनागरीकरण / भाषांतराची मर्यादा कोणी आणि कशी ठरवायची ? एकदा का इंग्लिश शब्द वापरु नका असे डोक्यात बसले की अशी भाषांतरे होतात आणि त्यावेळी वाद घालण्यात काय अर्थ आहे ? माझं उदाहरण हलकं (light या अर्थी, cheap level या अर्थी नाही...अजून एक उदाहरण :)) असलं तरी कमी महत्वाचं नक्कीच नाही. उद्देश त्याचं मंथन करणं आहे.

        फ म्हणतो तसे कदाचित ह्या दोन गोष्टी असतीलही. त्यावर एक सुचले म्हणून लिहीतो.

        मराठीचाच आग्रह करणारे काही सदस्य वीकांत, बिझने, आणि असे अनेक शब्द लिहीतात.
        हे काही मराठी शब्दही नाहीत. (अजुनतरी) मग जेंव्हा ते सदस्य शब्द योजतात तेंव्हा गंमत वाटते. Happy दोन्ही कडुन कसे बोलता येईल? मराठीचा आग्रह दुसर्‍याला करताना, आपण स्वतः ते पाळत आहोत का हे पाहने जरुरी नाही का? की ते चालून जाते.

        म्हणजे, परत मिलिंदा म्हणतो तोच मुद्दा येतो. फक्त त्याच्या मुद्द्याला थोडे बदलून लिहीले कारण देवनागरीत सर्व गोष्टी व्हाव्यात असे मलाही वाटते. Happy

        तसे नसेल तर मग उद्या कोणी "तुमच्या मुनशाईनात दुसर्‍या स्टाराने प्रवेश केला त्यामुळे तुम्हाला शनिदेवाची पिसावी लागेल." असे लिहीले तर? ते मराठी होऊ शकते का? सध्याच्या विकांताल, तु नळीला हरकत नसेल तर मग ह्यालाही हरकत नसावी. Happy

        (फ, तुला विरोध करणे हा उद्देश नाही ,मराठी विषयावर लिहीत आहोत तर मांडावे वाटले, पोस्ट मधला गमतीचा भाग सोडून द्या.)

        प्रत्येक शब्दाचे भाषांतर करावे असे मला नक्कीच अपेक्षित नाही. जर अर्थवाही भाषांतर करायचे असेल तर अनुवाद करावा लागेल. मराठीत अनुवाद करताना विशेषनामांचे भाषांतर केले जात नाही. ही मर्यादा ठरलेली आहे. पीटरला चित्रगुप्त म्हणणे हा विनोद होतो, हा अनुवाद नव्हे. (मेहता प्रकाशनाच्या पुस्तकांत 'दे मेड लव्ह' चे भाषांतर 'त्यांनी प्रेम केले' असे मी वाचले आहे आणि पुलंचे अनुवादसुद्धा वाचले आहेत. (टण्या येईल आता :फिदी:))
        >>> "तुमच्या मुनशाईनात दुसर्‍या स्टाराने प्रवेश केला त्यामुळे तुम्हाला शनिदेवाची पिसावी लागेल." असे लिहीले तर? ते मराठी होऊ शकते का? सध्याच्या विकांताल, तु नळीला हरकत नसेल तर मग ह्यालाही हरकत नसावी.
        केदार, तू हे गंमतीत म्हटला असशील तरी खरंच चांगला मुद्दा उपस्थित केला आहेस. 'shani is in third place, ketu is in the second place and rahu wins the gold !' वगैरे लिहिणे आणि 'मूनशाईनात दुसर्‍या स्टाराने...' असे लिहिणे यात मुख्य फरक हा की पहिल्यात लिपी, व्याकरण व शब्द हे सर्वच अमराठी आहे. तर दुसर्‍यात लिपी व व्याकरण मराठी आहेत, शब्द सर्व मराठी नाहीत. म्हणजे तू आणि मिलिंदा समजता तेवढेही हे सापेक्ष नाही. मायबोलीवर लिपी आणि व्याकरण मराठी ठेवा असा objective आग्रह धरता येईल. तुनळी, वीकांत इ. शब्दप्रयोग या निकषात बसतात. 'मराठी वापरा' असे मी जेव्हा म्हणतो तेव्हा मला असा अर्थ अभिप्रेत आहे.
        .
        मग शब्द सर्व मराठी का नकोत ? त्याचे कारण असे की अनेक परभाषिक शब्द मराठीने स्वीकारले आहेत, भाषेच्या समृद्धीकरणाचा तो एक प्रभावी मार्ग आहे (एकमेव नव्हे). ते रोखण्याचा आग्रह धरण्याची गरज आहे का ?
        लिपीबदलाने भाषा समृद्ध होते का ? तशी उदाहरणे इतिहासात अजूनतरी नाहीत.
        जाता जाता, जॉईसचे फिनेगन्स वेक आणि बर्जेसचे अ क्लॉकवर्क ऑरेंज या दोन्ही पुस्तकांत इंग्रजी भाषेची अतिशय नेत्रदीपक अशी सर्कस आहे, ही दोन्ही पुस्तके 'दर्जेदार साहित्यात' गणली जातात. या दोन्ही पुस्तकांत शब्द आणि व्याकरणाशी प्रचंड खेळ खेळला गेला आहे, पण लिपीबरोबर नव्हे.
        (मी इंग्रजी भाषेतील पुस्तकांची उदाहरणे दिली कारण शब्द व व्याकरणाशी अशा प्रकारे खेळ केली गेलेली मराठी पुस्तके माझ्यातरी वाचनात आलेली नाहीत.)
        .
        असामी, "मायबोलीवर देवनागरीत लिहिण्याचा आग्रह जरूर आहे पण सक्ति नाही. " असे अ‍ॅडमिननी याच बाफवर लिहिले आहे. त्यांनी 'मराठी'संबंधी तसे विधान केलेले नाही हे तुझे म्हणणे मान्य. असे असले तरीसुद्धा इथे मी सक्तीसंबंधी मांडलेले मुद्दे लागू होतात.

          ***
          Entropy : It isn't what it used to be.

          अरे किती तो ऊहापोह.. ज्यांच्यामुळे हा बाफ चालू झाला ते लोक इकडे फिरकतपण नाहित... ज्यांना मराठीत आणि देवनागरीत लिहायला आवडते आणि जे तसे लिहितात असे लोकच इकडे वाद घालत आहेत...

          देवनागरीची विनन्ती करू शकतो, जरुर करावी, पण सक्ती वा त्या त्या बाफचे अस्तित्वच नष्ट होईल इतकी झुन्डशाही नको!
          ज्या बाफवरुन चर्चा सुरू झाली त्याबद्दल माझी निरीक्षणे
          १. येथे येणारे जातक, बरेचदा एकेकदाच शन्कापुर्तीपुरते येतात, त्यास देवनागरीत टाईपकरण्याचा गन्धही नसतो, पण ते एकेकदाच येऊन जात असल्यामुळे त्यान्चे मागे "हात धुऊन लागणे" शक्यच होत नाही!
          एकेकदाच असे म्हणतो कारण फार कमी आयडीज "धन्यवादाची पोस्ट" टाकतात असे निरीक्षण आहे
          २. तेथे जातकाचे समाधान करणारे जे गृहस्थ ज्या आयडीने आहेत, त्यान्ची पोस्ट्स जरी रोमनमधे असली तरी "भाषा" ही बव्हशी मराठीच अस्ते! मात्र ते ज्या भाषेत मुलतः ज्योतिष शिकलेत, जर त्यातुन काहि एक विश्लेषण द्यायचे असेल तर मराठित भाषान्तर करण्यापेक्शा त्या त्या भाषेतील, येथे इन्ग्रजीतील, वाक्येच पुन्हा लिहीणे सोईस्कर पडते. या करता उदाहरण देतो, येथे पूर्वी आयुर्वेदावरील औषधान्च्या उपाययोजना एक विदुषी सान्गायच्या, आयुर्वेदाचे शिक्षण हे बन्व्हशी देवनागरी/सन्कृत्/मराठीतून होत असल्याने त्यान्ची भाषा अर्थातच मराठी देवनागरीत असायची, यात त्यान्ची देवनागरीविषयीची आस्थाही गृहित धरतोच आहे. मात्र हेच जर अ‍ॅलोपॅथी वरील डॉक्टर सल्ले देउ लागला तर?
          मुळात अ‍ॅलोपथी वरील डॉक्टर असे "फुकटात" सल्ले देईल असे वाटत नाही, तसेच त्यान्च्या "उपायपद्धतीमुळे" त्यान्ना त्याची परवानगी असेल असेही वाटत नाही, मात्र वरील बाफपुरते, भाशेचा सम्बन्ध येतो तेव्हा ते तसे का याची मला जाणवलेली कारणे तेवढी मी मान्डतो आहे
          ३. जे समाजात दिसत तेच इथेही, किम्बहुना मायबोली सारख्या साईट्स या समाजजीवनाचा आरसा वा प्रतिबिम्बच आहेत असे म्हणावयास हवे. अर्थातच "त्या बाफच्या" विषयाशी ज्यान्चे घेणेदेणे नाही वा तो विषयच त्याज्य मानणारे देखिल अनेक असणारच. त्यान्चे अस्तित्व मान्य करुनही, ज्योतिष नावाच्या "श्रद्धेपोटी" व सल्ल्याच्या गरजेपोटी तिथे येणारे जातक व त्यान्ना सल्ला देणारा ज्योतिषी यान्चा त्यान्ना दोघान्नाही समजु शकणार्या भाषा व लिपीत चालू असलेला "सुखसन्वाद", न बघवणारेही असू शकतात, हे देखिल मान्य करावेच लागते! अन अशा मेचक्या वेळेसच "लिपीचा" आग्रह नव्हे तर सक्तीची डीमाण्ड निर्हेतुकपणे होते आहे असे म्हणवत नाही!
          ४. मी मुलतः टायपिस्ट होतो, मागाहून सध्याच्या फिल्डमधे आलो, अन त्यामुळे मला हातहातभर लाम्ब पोस्ट देवनागरीत लिहिणे अवघड जात नाही, मात्र विचारान्च्या वेगात, तो वेग समजुन घ्यायला ज्योतिषीच व्हावे लागेल, (वा गेला बाजार प्रोग्रॅमर), तर त्या वेगात देवनागरीत पोस्ट लिहिणे केवळ अशक्यप्राय ठरते! बहुसन्ख्य डॉक्टरान्ची हस्ताक्षरे याचमुळे तर अत्यन्त खराब नस्तात ना यावरही विचार व्हावा! प्रोग्रॅमर विचारप्रकियेनुसार, रोमन मधे वेगात टायपु शकतो, जर तो मुलतः रोमन लिपीचाच टायपिस्ट असेल तर त्याने लिहिलेले कोड वेळेच्या आधीच पूर्ण होतात हा स्वानुभव आहे! अन हाच नियम वा परिस्थिती ज्योतिषावरील जातकाच्या प्रश्नान्च्या उत्तरान्नाही लावणे अवघड का जावे?
          माझ्यापुरते म्हणाल तर माझे शिक्षण मराठीत झाले असल्याने, टायपिस्त असल्याने, जर कधी ज्योतिषविशयक लिहू लागलो तर देवनागरीतच लिहीन, तसाच आग्रहही धरेन, पण सक्ती करणार नाही

          येवढ्यापुरता तरी मोहनदासान्चा "सत्याग्रहाचा" आग्रह अहिन्सक पद्धतीने धरण्यास कुणाची ना असणार नाही, नाही का? Proud
          ...;
          आपला, लिम्बुटिम्बु

          मी प्रोग्रॅमर आहे, मराठी शाळेतून शिकलो. पण गंमत म्हणजे इथे कीबोर्डावर मराठी अक्षरे नसतातच हो. असतात ती रोमन अक्षरेच !
          मनीष, तू सांगितलेले अगदी खरे.
          अ‍ॅडमिन, मला कृपया फक्त एक सांगाल का ? देवनागरीची सक्ती नाही असे तुम्ही म्हणता, इतरही म्हणतात. त्याचा अर्थ 'देवनागरी कधीही वापरले नाही तरी चालेल' असासुद्धा अपेक्षित आहे का ? तुम्हाला प्रशासक म्हणून तुमची सारासारबुद्धी कमीतकमी वापरायची आहे हे समजते, कारण सारासार ठरवणे यात फारच व्यक्तीसापेक्षता आहे. हे धोरण मलाही पटते. पण तरीही या प्रश्नाला बगल देता येईल असे मला तरी वाटत नाही. त्याचे कारण सांगतो.
          या संकेतस्थळावर इतरभाषिक येऊन त्यांचे बाफ सुरू करू शकतात. हे अजून झाले नाही, म्हणून पुढे होणार नाही हे कशावरून ? सध्या अनेक परभाषिक सदस्य आहेतच, ते सध्या एकाच बाफवर जातात. त्यांना इथे बाफ सुरू करणे अगदीच सोपे आहे आणि त्यातल्या काही लोकांना हे सुचेलही. असे अजून बाफ तयार झाले किंवा त्यांनीच पुढाकार घेऊन केले तर आपली (म्हणजे प्रशासन व सदस्य अशा सर्वांचीच) भूमिका काय असेल ? हा प्रश्न सर्वांनाच.

            ***
            Entropy : It isn't what it used to be.

            स्लार्ट्याच्या पोस्टीतल्या मुद्द्यांवरून अ‍ॅडमिनांनी मायबोलीच्या धोरणांचा जरूर पुनराढावा घ्यावा.
            ज्योतिष बीबीवर इंग्लिशीत पोस्टी टाकण्याची भलामण करणार्‍या तर्कटावरून माझ्या डोक्यात काही सुरस काल्पनिक प्रसंग आले. त्याबद्दल मायबोलीच्या व्हीजनीनुसार अ‍ॅडमिनांची भाषाविषयक धोरणं काय असतील याबद्दल मला कुतूहल आहे.
            १. समजा "Maaj/ pratimaaj kasa karava?" शीर्षकाचा बीबी निघाला, ज्यावर दैनंदिन आयुष्यात तुम्हा-आम्हा मराठी भाषिकांना भेडसावणार्‍या समस्यांवर अक्शीर अर्क इलाज म्हणून माज/ प्रतिमाज कसा करावा याबद्दल लोकांना सल्ला देण्याच्या उद्देशाने बाफनिर्मात्याने आणि सहभागी मंडळींनी (देवनागरी मराठी सोडून) इंग्लिशीत नवनवीन हितोपदेश, पंचतंत्रं, इसापनीत्या लिहिणं आरंभलं, तर मायबोली प्रशासनाचं भाषाविषयक धोरण काय असेल?
            २. जगभरात पसरलेल्या मराठीजनांना मातृभाषेखेरीज आणि माजी(/आजी) मालकाच्या (पक्षी साहेबाच्या) भाषेखेरीज ते ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणच्या भाषादेखील येतात. समजा, आडनावापुरते मराठी असलेल्या आणि दैनंदिन रहाटीत चांगलं चिनी बोलू-लिहू शकणार्‍या सिंगापुरातल्या माझ्या काही परिचितांनी मायबोलीवर 'फंगशुई'विषयक सल्ला, मार्गदर्शन करण्याकरता बीबी उघडला. आणि त्यांनी चिनी समजू शकणार्‍या मायबोलीकरांकरता चिनीत आणि इतरांकरता इंग्लिशीत मौलिक सल्ला दिला, तर मायबोली प्रशासन त्या बाफाबद्दल काय भाषिक धोरण ठेवेल?
            ३. मी/अन्य कोणी फारसीचा अभ्यासक असलेल्या व्यक्तीने फारसी रुबायांच्या रसास्वादाबद्दल समछांदिष्टांबरोबर मायबोलीवर एक बाफ सुरू केला आणि त्यावर सर्व सभासद फारसीत (लिपी आणि भाषा दोन्हींत), आणि कधीमधी इंग्लिशीत सुसाटत लिहू लागले, तर मायबोली प्रशासनाचे त्या बाफाबद्दल काय धोरण असेल?

            हे काल्पनिक प्रसंग रंगवून कोड्यासारखे प्रशासकांपुढे ठेवताना या बाफावरील चर्चा भरकटवायचा किंवा 'इफ यू काण्ट कन्व्हिन्स देम, जस्ट कन्फ्यूज देम' नीतीने (चर्चांना वादविवाद स्पर्धेचे फड समजून, भिन्नमतवाद्यांना आपल्या वाईटावर असलेला शत्रुपक्ष मानून) भिन्नमताला लोळवायचा खिडूक हेतू नाही. सदस्यांना सध्या ज्ञात असलेल्या/गृहित धरलेल्या मायबोलीच्या ध्येयधोरणांच्या चौकटीत राहून मायबोलीच्या वेबसंसाधनांचा वापर/गैरवापर होण्याच्या काही शक्यता दाखवण्याचा हेतू आहे.

            बरं, एक प्रश्न सर्वांना : देवनागरी मराठीची सक्ती करू नये, आग्रह करावा हे मलाही मान्य. पण या चर्चेत सर्व जण या वाक्याचा उद्घोष करून आपापला परिपक्वपणा, उदारमतवाद सिद्ध करताहेत, तसाच तत्त्ववादीपणा ज्योतिष बाफावर इंग्लिशीतच लिहिण्याचे समर्थन करणार्‍या, स्लार्ट्याच्या मुद्द्यांना लॉजिकल प्रत्युत्तरे देण्याऐवजी त्याची मुजोर खिल्ली उडवणार्‍या एमेन्सी यांजसमोर का दाखवला नाही?! त्या बाफावर सत्याग्रही पद्धतीने देवनागरी मराठीचा आर्जव/ आग्रहच सुरू होता; हात मुरगाळून केलेली सक्ती नव्हती.

            -------------------------------------------
            हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

            मायबोलीवर ९८% लेखन (चू.भू.द्या.घ्या.) मराठीत , देवनागरीत लिहलं जातंय. आता उरलेले २% मराठीत/देवनागरीत नाही म्हणून त्यावर आपण किती वेळ खर्च करणार? कदाचित ते २% लेखन मोजक्या ३० माणसांकडून (आणि त्यातले काही डू आयडी असले तर १०-२० माणसांकडून) होत असेल तर त्यावर आपण आपला किती वेळ द्यायचा? कदाचित काही बाबतीत आपण अगदी १००% काटेकोरपणे मराठी/देवनागरीची धोरणे अंमलात आणली नसतीलही पण त्याने बहुतेक मायबोलीकरांना किती फरक पडलाय?

            मला वाटतंय, एकदा काही अपवादाना सूट दिली की भविष्यात काय होणार? सगळेच अशी सूट घेणार आणि मायबोलीचं स्वरूप पालटणार काय अशी भिती, काही मायबोलीकरांना वाटतेय. आणि मायबोलीवरच्या प्रेमामुळेच ते तसे म्हणत असावेत. पण तसं होणार नाही याची जबाबदारी आणि काळजी आम्ही घेतो आहोत. वेळोवेळी अशा काही उपक्रमांना आम्ही नकार दिला आहे. मला असं सांगावंसं वाटतंय की देवनागरीत न लिहिणार्‍या २% मुळे मायबोलीचं स्वरूप बदलायची जितकी जास्त शक्यता आहे त्या पेक्षा कितीतरी जास्त पटीने मायबोलीचे स्वरूप बदलायची शक्यता (उतरत्या मार्गावर) इतराना मराठीत लिहीण्याचा अट्टाहास/सक्ती करून होणार आहे.

            असं पहा मराठीचा प्रसार असं आपलं उद्दीष्ट असेल तर कुणावर वेळ दवडून आपण त्या उद्दीष्टाजवळ जाणार आहोत? जे लोक मराठीत लिहायची इतकी सोपी साधनं असूनही काही कारणामुळे (मग ते काहीही असो) लिहीत नाही त्यांच्याशी वाद घालून; का जे लोक इथे नव्यानेच लिहायला लागलेत, मराठीत लिहण्याची सोय लक्षात आल्यावर स्वतःहून जमेल तसा प्रयत्न करू लागलेत, त्याना मदत करून, प्रोत्साहन देऊन?

            [आणि याचा कुणि विचार केला आहे का? उद्या रोमनमधे लिहिणारा एकदम देवनागरीत्/मराठीत लिहायला लागला आणि ते मराठी वाचल्यावर "नको त्यापेक्षा तुमचं रोमन बरं होतं, लिपीमुळे दुर्लक्ष करणं तरी सोपं होतं हो" अशी वेळ आली तर? Happy ]

            वरील काल्पनीक प्रसन्गान्ना धरून.........
            मुळात वरील प्रसन्ग "मायबोली प्रशासकान्च्या" कृपेने, येथे काल्पनीक ठरत असले, तरी माझे अनुभव काही वेगळेच सान्गतात
            अशाच एका मराठी साईटवर, (जिचे मुख्य माझे चान्गले नेटपरिचित (मित्र असे म्हणत नाहिये) आहेत व आम्हि एकमेकान्बद्दल सदहेतू बाळगुन आहोत) मी एकदा माझ्या सन्ग्रही असलेले शिवाजी महाराजान्वरचे कवी भूषण की कुणाचेसे हिन्दीतले काव्य सन्दर्भाकरीता देवनागरीत लिहून टाकले
            अर्थातच त्या साईटच्या "ध्येयधोरणान्नुसार" ते काव्य मराठी भाषेत नसल्यामुळे (हिन्दित अस्लयामुळे) तेथे प्रकाशित करण्यात आले नाही (मात्र "डिलिटही केले गेले नाही" मी ते आजही बघू शकतो)
            मी ते समजुन घेतले! Happy
            याच साईटवर (हे सान्गण्यात कोणताही वाईट हेतू नाही) विशिष्ठ सन्ख्येत रोमन लिपी लिहिली गेल्यास पोस्ट बाद होते असा प्रोग्रॅम बघण्यात आला होता
            मी ते ही समजुन घेतले Happy
            या बद्दल आक्षेप वा टीका करण्याचा तेव्हाही हेतू नव्हता आत्ताही नाही, मात्र ही दोन उदाहरणे केवळ अन केवळ येवढ्याच करता दिली आहेत की त्यान्ची ध्येयधोरणे तशी होती, व ते त्याप्रमाणे त्यान्चा अमल करत होते! (वा करत आहेत, सध्याचे मला माहित नाही) Happy
            अर्थातच, मायबोलि प्रशासनाची ही साईट सुरू करतानाची, धोरणान्ची, काही एक निश्चित रुपरेषा असणारच आहे! (उगिच कोणीतरी उठून "ब्लॉग" सुरू केल्याप्रमाणे साईट सुरू करत नाहि, निदान त्या दहा बारा वर्षामागच्या परिस्थितीत ते सहजशक्यही नव्हते) माझ्या माहितीप्रमाणे (सन्दर्भ देता येणार नाहीत, शोधा) मायबोली साईटच्या प्रशासकान्नी वेळोवेळि त्यान्ची ध्येयधोरणे विशद करुन सान्गितली आहेत, व ती आहेत तशीच राबविणे अथवा त्यात वेळोवेळी बदल करण्याचा त्यान्चा अन्तिमाधिकार सगळ्यान्नाच मान्य असेल असे वाटते.
            मात्र तरीही, त्यान्नी वेळोवेळी विशद करुन सान्गितलेल्या बाबिन्चा समूळ अर्थ लक्षात न घेता, जेव्हा अमुकतमुक बाफच्या, अशा वा तशा, अस्तित्वात असण्याबद्द्दल तक्रार वा सुचनेऐवजी जेव्हा "आक्षेप" घेतला जातो, वा ध्येयधोरणान्बद्दलच शन्का उपस्थित केली जाते, शब्दच्छल केला जातो, तेव्हा माझ्या मते तरी तो एकप्रकारचा "उपमर्द" ठरतो वा "अधिक्षेप" ठरतो.
            इन्ग्रजी व्यतिरिक्त लिपीला येथिल सिस्टिम मुळात सपोर्ट करते की नाही माहित नाही, पण जर कुणी असे विषय वा लिपीन्चा वापर करु लागलाच, अन जर ते ध्येयधोरणान्च्या विरोधात नसेल, तरीही, मायबोलीचा जो प्राण, तो म्हणजे वाचकान्चा प्रतिसाद, न मिळाल्याने, अनुल्लेख झाल्याने तो तो बाफ बन्दच पडेल याची खात्री बाळगण्यायेवढा सन्यम ठेवावा की नाही?
            १ माझ्या माहितीप्रमाणे व समजुतीप्रमाणे, महाराष्ट्राशी सम्बन्धित असलेल्या प्रत्येक व्यक्तिस नेटवर एकत्र येण्यासाठी ही साईट तयार केली गेली असावी
            २ अर्थातच महाराष्ट्राची प्रमुख भाषा ती मराठी, तिचा वापर आधिक्याने (अनिवार्य नव्हे) होणे अपेक्शित असावे (पुन्हा "अपेक्षित" असावे, सक्ती नव्हे)
            ३ याचबरोबर देशाविदेशात रहाणारे जे मराठी भाषीक व देवनागरी लिपी अवगत असलेले आहेत, त्यान्ना नेटवर मराठीत सन्वाद करणेस तसेच देवनागरी लिपीत लिहिण्यास सन्धी मिळावी म्हणूनही हा प्रपन्च मान्डला असेल
            ४ महाराष्ट्र हा केवळ भाषा व लिपी मुळे वेगळा ठरत नाही, तर येथे युगानुयुगे निरनिराळ्या कला, शास्त्रे इत्यादिक बाबी विकसित होत गेल्या आहेत, किम्बहुना त्या महाराष्ट्राची ओळख आहेत, त्यान्चे पुनरुज्जीवन वा पुनरअनुभव देशाविदेशातील लोकान्ना मिळावा हा देखिल उद्देश असू शकतो
            ५ सुरवातीस येथे देवनागरीत लिहिण्याचि सोय नव्हती, नन्तर सुधारणा घडवुन आणल्या गेल्या, पण याचा अर्थ असा होत नाही की सुरवातिस रोमन होती तर तीच कायम रहावी, तसे झाले नाही, व देवनागरीची "सोय" उपलब्ध करुन देण्यात आली! Happy इथे हे ही गृहित धरण्यात आले असावे की "सोय" उपलब्ध करुन देणे आपले काम, वापरायची की नाही वा कशी वापरायची ह्याचे स्वातन्त्र्य वापरणार्‍यास सोपविण्यात आले
            ६ जी मराठि आम्ही आज बोलतो ती उण्यापुर्‍या १०० वर्शान्पूर्वी वेगळी होती, त्यापूर्वीची समजायला तर अवघडच जाते! Happy अर्थातच आज बोलत असलेली मराठी अजुन १०० वर्शानन्तर काय रुप घेऊन असेल, देव जाणे! कालौघात हे येवढे सामर्थ्य तर ते ताठर नियमान्च्या बन्धनात कसे बरे अडकवावे?? हा प्रश्ण कदाचित पडला असेल
            ७ वरील मुद्द्यान्चा अर्थ असा नव्हे की मी देवनागरीस विरोध करतो वा त्याबाबत आग्रही नाही!
            एनिवे....... ही पोस्ट "स्वगतात्मक" फारच लाम्बली तर नाही ना? Proud
            ...;
            आपला, लिम्बुटिम्बु

            ही पोस्ट "स्वगतात्मक" फारच लाम्बली तर नाही ना? >> नाही नाही तुम्ही लिहा हो! आम्हाला काय येवढ लिहिता येत नसेल एका दमात पण वाचता येत! (वरील वाक्याचा कुठलाही वाकडा अर्थ काढू नये! :खोखो:)

            *********************
            All desirable things in life are either:
            1.Illegal
            2.Banned
            3.Fattening or
            4.Married to Others.
            Wink Biggrin

            >>>>> त्या बाफावर सत्याग्रही पद्धतीने देवनागरी मराठीचा आर्जव/ आग्रहच सुरू होता; हात मुरगाळून केलेली सक्ती नव्हती.
            जे काय होत ते होत, वाहत्या बाफचा मूळ उद्देशच बाजुला राहून मोर्चा आल्यागत पोस्टचा भडीमार असेल वा अजुन काही, पण आता ते कालबाह्य झालय, तेव्हा ते उगाळायला नको!
            पण, माझ्या दृष्टीने करता येण्याजोगा 'सत्याग्रह' त्या बाफवर सुरुही केलाय! जमेल तितका (वेळेनुसार) निभाविनच! तो कृपया बघणे! Happy
            अन हा प्रकार आत्ताच नव्याने केला असे नाही, वेळ मिळाला तेव्हा तेव्हा विनोदाच्या व इतर काही (आठवत नाहीत) बीबी वर देखिल केलाय! Happy
            ...;
            आपला, लिम्बुटिम्बु

            >>> पण तसं होणार नाही याची जबाबदारी आणि काळजी आम्ही घेतो आहोत.
            धन्यवाद अ‍ॅडमिन.

              ***
              Entropy : It isn't what it used to be.

              अ‍ॅडमिन, अनुमोदन!

              फ, अरे त्या न्यायानुसार वर्षानुवर्षे चालत आलेली हिंदी अनंताक्षरी बंद करायची का? तर नाही. पण मराठी गाण्यांचा जसा संग्रह केला तसा हिंदी गाण्यांचा संग्रह (अनेकांची इच्छा असूनही) आपण मायबोलीवर केला नाही. तसंच आहे ते. कुठे मराठी वापरायचे आणि कुठे नाही याचे तारतम्य योग्य प्रमाणात बाळगले गेले तर माझ्या मते ते पुरेसे आहे. नियमाचा बागुलबुवा सगळीकडे कसा दाखवता येणार? मला वाटते मायबोलीवर हे तारतम्य योग्य प्रमाणात वापरले जाते. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन भाषेत सर्रास इंग्रजी शब्द बोलताना आणि लिहिताना वापरता तर मायबोली केवळ त्याचा एक भाग आहे आणि तो वेगळा असू शकत नाही.

              बरं, ऑन ए लायटर नोट, ते "मायबोलीच्या व्हीजनीनुसार" वाचून गंमत वाटली आणि असंही वाटलं की इतर भाषेतले शब्द मराठीतल्या व्याकरण नियमांमधे बसवून चालवणं प्रत्येक वेळी योग्य वाटत नाही. तशी सवय नसल्यामुळे असेल कदाचित, पण पटलं नाही हे नक्की! (मी यापूर्वीचे तुझे यावरचे विवेचन वाचलेले आहे, तरीही!) त्यामुळे मला वाटत नाही की मी माझ्या बोलीभाषेत (आणि म्हणून लेखी) असे शब्दप्रयोग वापरेन... आणि तसे ते वापरण्याची सक्ती जसे कोणी करु शकत नाही, तसेच कोणी कसे लिहावे याची सक्ती करणे अवघड आहे. सुचवून पहाणे (मी आग्रहही म्हणणार नाही) हा सगळ्यात योग्य उपाय! असो.

              Pages