आय अ‍ॅम अ‍ॅट पीस - पूर्वार्ध

Submitted by हायझेनबर्ग on 4 August, 2017 - 01:46

सप्टेंबर १८, २०१६ - संध्याकाळी ७:३०. सॅनबर्ड युनिवर्सिटी कँपस

रोज साताच्या ठोक्याला सॅनबर्डच्या मॅथॅमॅटिक्स डिपार्टमेंटच्या लांबच्या लांब कॉरिडोर मधून चालत गेटवर येणारी डॉ. अ‍ॅनाबेल करींची पाच फुट दहा ईंचांची आखीव रेखीव छबी आज साडेसातला बिल्डिंग गेटवरच्या सिक्युरीटी कॅमेरामध्ये ऊमटली. सर्वेलन्स रूममध्ये मॉनिटर समोर बसलेल्या सिक्युरिटी गार्डने खुर्चीत सावरून बसत एकवार मॉनिटरच्या कोपर्‍यातल्या घड्याळाकडे पाहिले. चाळीस सेकंद डाँ. करींना डोळे भरून पाहण्याच्या त्याच्या रोजच्या व्यसनपूर्तीला आज अंमळ ऊशीरंच झाला होता. शरीराचे प्रत्येक वळण, प्रत्येक ऊभार ऊठावदार बनवणारी लयबद्धं चाल, जणू मोजून मापूनच पडणारं प्रत्येक पाऊल, एकाच लांबीचे लांबसडक सोनेरी केस, कधीही न लवणार्‍या पापण्यांमागचे निस्तेज मोठे डोळे, कधीही विलग न होणारे कोरडे गुलाबी ओठ आणि समोरच्याचे डोळे भेदून आरपार जाणारी थंड नजर, अताश्या वीशीच गाठलेल्या त्याला डॉ. करींचे सौंदर्य कायम गूढ, काहीसे जरब बसवणारे पण अतिशय मोहक वाटे. रोज पाच वाजता चार्ज घेतल्यापासून ह्या चाळीस सेकंदांची वाट तो जीवाच्या आतुरतेने पहात राही.

आज गुरुवार म्हणजे डॉ. करींनी नक्कीच त्याचा सर्वात आवडीचा निळ्या रंगाचा ड्रेसच घातला असणार हे तो जाणून होता. साडे सात वाजता निळ्या ड्रेस मधली डॉ. करींची छबी कॅमेरात दिसताच त्याने एक दीर्घ ऊसासा टाकला आणि तो खुर्चीतंच सावरून बसला.
पण आज त्याच्या ध्यानीमनीही नसतांना गेटसमोरून जातांना डाँ करींनी अचानक मान वळवून वरती कॅमेराकडे रोखून बघितले आणि त्यासरशी त्याचा काळजाचा ठोकाच चुकला. करड्या डोळ्यांची ती थंड नजर पाहताच आपले चोरून बघणे पकडले गेले की काय असे एक क्षण वाटून भितीची एक शिरशिरी त्याच्या मस्तकातून हृदयात ऊतरली. डॉ. करींच्या चेहर्‍यावर आजही पापणी लवली नाही की ओठ विलग झाले नाहीत पण कपाळावर आजवर कधीही न दिसलेली तटतटून फुगलेली एक शीर त्याला कॅमेरातूनही स्पष्टं दिसली. मागच्या दोन वर्षात घडले नाही असे गूढ आणि विचित्रं काहीतरी आज नक्कीच घडत आहे असे त्याचे मन त्याला राहून राहून सांगत होते. कुणाही नॉर्मल स्त्रीच्या आयुष्याला मुळापासून ऊखडून टाकू शकली असती अशी एक नव्हे तर दोन मोठ्ठी वादळे काही तासांपुर्वीच एका पाठोपाठ एक डॉ. करींच्या आयुष्यात थैमान घालून गेली आहेत ह्याची पुसटशीही कल्प्नना त्याला आली नाही.

सप्टेंबर १८, २०१६ - संध्याकाळी ८:१०. क्लेअरमाँट, सॅन फ्रान्सिस्कोतले एक अपस्केल नेबरहूड

सरत्या ऊन्हाळ्याच्या क्षितिजावरच्या सुर्याची आकाशातली रक्तपंचमी संपतच आली असतांना सॅनफ्रान्सिस्कोच्या त्या अतिश्रीमंत नेबरहूड मधल्या आलिशान घराच्या ड्राईव-वे मध्ये रोजच्यासारखीच एक मर्सिडीझ भरधाव शिरली आणि एक बाकदार वळण घेत नेहमीच्या पार्किंग स्पेस मध्ये मांजरीच्या पावलांपेक्षाही अलगद अशी काही विसावली की जणू धावती वेळच अचानक शुन्यात थिजावी. कोणी दोन्ही बाजूचे टायर्स आणि पार्किंगच्या पांढर्‍या मार्किंगमधले अंतर मोजले असते तर त्याला कदाचित एक मिलीमीटरचाही फरक सापडला नसता. दरवाजा ऊघडून आत येणार्‍या डॉ. करींनी यांत्रिकपणे न बघताच उजव्या भिंतीवरचा सिक्युरिटी अलार्म डिझेबल केला आणि त्या शांतपणे जिना चढत दुसर्‍या मजल्यावरच्या त्यांच्या बेडरूमकडे गेल्या.

डॉ. करींचे घर जणू एक अप्रतिम भुमीतीय चित्रंच असावे. 'अल्जिब्रेक जीओमेट्रीच्या' विविध मॉडेल्सवर आधारलेले एखादे शिल्पंच जणू ज्याची प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक वस्तूचा आकार प्रथमच बघणार्‍याला आपण बहुमितीय दुनियेत डोकावत आहोत की काय असेच वाटावे. घरात वावरतांना कदाचित त्याला आपल्याला दोनच डोळे असणेही पुरेसे नाही ह्याचे वाटले असते. पण डॉ. करींना ह्या घरात वावरण्यासाठी डोळ्यांची आणि डोळ्यांना लागणार्‍या प्रकाशाची आजिबातच गरज नव्हती. घराचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक भिंत, प्रत्येक आकार त्यांनी स्वतः डिझाईन केलेला होता.

अंगातला ड्रेस वॉर्डरोबमधल्या हँगरला लावून रोजच्या लॅप मारण्यासाठी घालावयाच्या बिकीनीकडे नेलेला हात मागे घेत त्यांनी नुकत्याच काढून ठेवलेल्या निळ्या ड्रेसला पडलेल्या सुरकुत्यांवरून एक क्षण हात फिरवला. आणि बिकिनी न चढवता एकाही कपड्याविनाच बेसमेंटमधल्या स्विमिंग पूलकडे एकेक पायरी शांतपणे ऊतरत त्या निघाल्या. सुरुकुतलेला निळा ड्रेस वॉर्डरोबमध्ये लटकत राहिला.
पूलमध्ये ऊतरण्याआधी शॉवर घेतांना कदाचित पहिल्यांदाच त्यांच्या डोक्यात आज युनिवर्सिटित घडलेल्या दोन्ही घटनांचा विचार चमकून गेला आणि त्या विचारांच्या तंद्रीतंच त्या पूलमध्ये ऊतरल्या.

सप्टेंबर १८, २०१६ - संध्याकाळी ८:२० डॉ. करींच्या घराचे बेसमेंट

रॉस ने आज जे केले ते चुकीचे होते.
त्याने असे करायला नको होते.
माझ्या नकाराकडेही तो दुर्लक्ष करत राहिला.
रॉस ने आज जे केले ते चुकीचे होते, त्याने असे करायला नको होते.
-- लॅप पहिला - २ मिनिटे ३० सेकंद

रॉस ईतक्या वर्षांपासून माझा मित्रं आहे, फेलो प्रोफेसर आहे आणि रिसर्च पार्टनरही आहे.
माझा त्याच्यावर विश्वास होता, पण मागच्या तीन चार महिन्यांपासून तो अस्वस्थ वाटत होता.
तीन महिन्यांपूर्वी निकोलने त्याच्या रिसर्च लॅबमध्ये ऊशीरा पर्यंत काम करण्याला वैतागून अचानक ब्रेकअप केल्याचे तो म्हणाला.
हे कारण खरे नसावे असे मला वाटते. पण तेव्हापासून तर तो सैरभरं झाला होता. त्याच्या नजरेतही झालेला बदल दिसून येत होता.
-- लॅप दुसरा - २ मिनिटे ३० सेकंद

आधी दु:खी, हतबल वाटणारी नजर एक महिन्यांपासून अवस्थं, भिरभिर कायम शोध घेत असल्यासारखी झाली होती.
माझ्या चेहर्‍यापासून प्रत्येक अंगप्रत्यंगाकडे चोरून एकटक बघतांना अनेक वेळा मी त्याला पाहिले होते.
त्याच्या लॅपटॉपवर मी काही विवस्त्रं स्त्रियांचे फोटोज ही पाहिले होते.
मी जवळ घ्यावे ह्या आशेने त्याचे दु:खावेगाचे प्रदर्शन करणेही वाढले होते.
-- लॅप तिसरा - २ मिनिटे २९ सेकंद

आज कदाचित त्याच्या भावनांचा स्फोट झाला होता. भावनांपेक्षाही त्याच्या ईच्छांचा तो स्फोट होता.
माझ्या जवळ येवून त्याने मला मिठी मारली तेव्हा मी शांतपणे त्याला 'रॉस थांब' म्हणत असतांनाही तो माझी चुंबने घेत राहिला.
माझ्या कपड्यांना त्याने हात घातला तेव्हाही मी त्याला 'असे करणे हे चूक आहे रॉस' असे सांगितले पण तो थांबला नाही.
निर्वस्त्रं होत त्याने स्वतःला माझ्यावर लादले तेव्हाही मी 'माझ्या परवानगी शिवाय तू असे करू नकोस ' हे शांतपणे सांगितले पण तो थांबला नाही.
-- लॅप चौथा - २ मिनिटे २८ सेकंद

रॉस ने आज जे केले ते चुकीचे होते.
त्याने असे करायला नको होते.
माझ्या नकाराकडेही तो दुर्लक्ष करत राहिला.
रॉस ने आज जे केले ते चुकीचे होते, त्याने असे करायला नको होते.
-- लॅप पाचवा - २ मिनिटे ३० सेकंद

कार्ल ने आज जे केले ते चुकीचे होते.
त्याने असे करायला नको होते.
माझ्या खरे बोलण्यावरही त्याने विश्वास ठेवला नाही.
कार्ल ने आज जे केले ते चुकीचे होते, त्याने असे करायला नको होते.
-- लॅप सहावा - २ मिनिटे ३० सेकंद

कार्ल ईतक्या वर्षांपासून माझा मित्रं आहे, फेलो प्रोफेसर आहे आणि बॉय फ्रेंडही आहे.
माझा त्याच्यावर विश्वास होता, पण मागच्या तीन चार महिन्यांपासून त्याला माझ्यामध्ये ईंट्रेस्ट वाटत नव्हता.
तीन महिन्यांपूर्वी 'रिसर्च लॅबमध्ये ऊशीरा पर्यंत काम करण्याने थकवा येत आहे म्हणून बोलावेसे वाटत नाही' असे कारण तो रोज देत होता.
हे कारण खरे नसावे असे मला वाटते. तेव्हापासून तो शांत, अलिप्तं झाला होता. त्याच्या नजरेतही बदल दिसून येत होता.
-- लॅप सातवा- २ मिनिटे ३० सेकंद

आधी प्रेमळ, ओलसर वाटणारी नजर एक महिन्यांपासून कोरडी, माझ्या डोळ्यात बघणे टाळत असल्यासारखी वाटत होती.
माझ्या चेहर्‍यावरून नजर दुसरीकडे फिरवतांना अनेक वेळा मी त्याला पाहिले होते.
त्याच्या लॅपटॉपवर मी त्याला कधीही न दिलेले माझे फील्ड्स मेडलसाठीच्या 'अलजीब्रेक जीओमेट्रीच्या' फायनल रिसर्च रिपोर्ट्स पाहिले होते.
मी ते बघितल्यास त्याची चोरी पकडली जाईल ह्या भितीने मुद्दाम दुसरी कामं करत असल्याचे त्याचे प्रदर्शन करणेही वाढले होते.
-- लॅप आठवा- २ मिनिटे २९ सेकंद

आज त्याच्या माझ्यासाठीच्या भावना संपल्या असाव्यात. भावनांपेक्षाही त्याला माझ्याकडून असलेली गरज संपली असावी.
रॉस ने जे केले ते मी त्याला शांतपणे सांगत असतांनाही तो 'मी प्रतिकार का केला नाही' म्हणत माझ्यावर ओरडत राहिला.
मीच रॉसला ह्यासाठी ऊद्यूक्त केले असे तो म्हणाला तेव्हा मी त्याला 'माझ्यावर असा अरोप करणे चूक आहे' असे सांगितले पण तो थांबला नाही.
माझ्या दंडांना धरून हलवत त्याने मला जाब विचारला तेव्हाही मी 'मला त्रास होतो आहे कार्ल' हे शांतपणे सांगितले पण तो थांबला नाही.
-- लॅप नववा- २ मिनिटे २८ सेकंद

कार्ल ने आज जे केले ते चुकीचे होते.
त्याने असे करायला नको होते.
माझ्या खरे बोलण्यावरही त्याने विश्वास ठेवला नाही.
कार्ल ने आज जे केले ते चुकीचे होते, त्याने असे करायला नको होते.
-- लॅप दहावा - २ मिनिटे ३० सेकंद

सप्टेंबर १९, २०१६ - सकाळी ७:४० डॉ. जॉर्डन ग्रे, डॉ. ऑफ सायकॉलॉजी (Psy.D.) , डॉ. ऑफ फिलॉसॉफी (PhD.)

रात्रीकडून ऊसना घेतलेला मृत्यूदेवतेचा धुरकट झगा लेवून निस्तेज सुर्यदेवतेचे मूक रूदन चालू असतांना डॉ. ग्रेंच्या दोन मजली पॉश ऑफिस बिल्डिंगच्या ड्राईव-वे मधे एक मर्सिडीझ भरधाव शिरली आणि एक बाकदार वळण घेत पार्किंग स्पेस मध्ये मांजरीच्या पावलांपेक्षाही अलगद अशी काही विसावली की जणू धावती वेळच अचानक शुन्यात थिजावी.
रिसेप्शनवरती नव्यानेच रुजू झालेली कोणी टीनेजर मुलगी फिरून फिरून डॉ. ग्रे आत बोलावण्याची वाट बघत शांतपणे सोफ्यावर बसलेल्या डॉ. करींच्या चेहर्‍याकडे बघत राहिली. पापण्यांची हालचाल नाही की ओठांचा चाळा नाही, चुकारपणे बाजूला निसटलेला केस नाही की श्वासांचा आवाज नाही, एवढा शांतं मनुष्यप्राणी तिने तिच्या जन्मात कधी पाहिला नव्हता. काही केल्या डॉ. करींच्या चेहर्‍यावरचे गूढ भाव तिला वाचता येईनात म्हणून शेवटी शांतता असह्य होत ती पेनाशी चाळा करत डॉ. करींच्या गळ्यातल्या पर्ल नेकलेस कडे आणि त्यांच्या ऊंची सँडलकडे आळीपाळीने बघत राहिली. शेवटी आठाच्या ठोक्याला डॉक्टरांचे आतून बोलावणे आले तश्या डॉ. करी आत गेल्या.

ऊत्तरार्ध - https://www.maayboli.com/node/63396

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच, पुभाप्र..
कोडं जरा सोडवलंय पण स्पॉयलर होईल म्हणून लिहीत नाही. तपासून बघते पुढच्या भागात.

मस्त !!!!

इंटरेस्टिंग!!
पण उपमा अलंकार जरा जड वाटले मला. Happy आणि मोठमोठी वाक्यही Happy
जसे की
<<<<<<<<<<<<सरत्या ऊन्हाळ्याच्या क्षितिजावरच्या सुर्याची आकाशातली रक्तपंचमी संपतच आली असतांना सॅनफ्रान्सिस्कोच्या त्या अतिश्रीमंत नेबरहूड मधल्या आलिशान घराच्या ड्राईव-वे मध्ये रोजच्यासारखीच एक मर्सिडीझ भरधाव शिरली आणि एक बाकदार वळण घेत नेहमीच्या पार्किंग स्पेस मध्ये मांजरीच्या पावलांपेक्षाही अलगद अशी काही विसावली की जणू धावती वेळच अचानक शुन्यात थिजावी>>>

हुश्श! Happy

<<<<रात्रीकडून ऊसना घेतलेला मृत्यूदेवतेचा धुरकट झगा लेवून निस्तेज सुर्यदेवतेचे मूक रूदन चालू असतांना>>>>>>>>>>

प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
सध्या केसच्या आधीच्या रिसर्च साठी लागणार्‍या टाईम कमिटमेंटचं गणित जुळवणे अवघड झाल्यामुळे कथाच लिहिली.

सस्मित, पुढचे भाग लिहितांना लक्षात ठेवेन.

समजलं नाही नीटसं।।।रॉस आणि कार्ल दोघे वेगवेगळे आहेत की तिचे भास आहेत?>>> रॉस आणि कार्ल दोन वेगळ्या, खर्‍या खुर्‍या व्यक्ती आहेत, भास नाहीत. ती वाक्ये डॉ. करींच्या डोक्यात एकामागोमाग एक येणारे, परिणामा पाठीमागची कारणे लागलीच सुसूत्रपणे शोधू पाहणारे विचार आहेत.

नेहमीच्या नॉर्मल हालचाली यंत्रवत करणे, एकदा केलेली गोष्टं (ऊदा. अलार्म डिझेबल करणे किंवा घरात वावरणे) पुन्हा करण्यासाठी शरीराच्या सेंसरी सिस्टिमची गरज न पडणे, लॅपच्या टायमिंगमध्ये फारफार तर एखाद दुसर्‍या सेकंदाचाच फरक पडणे, ड्रायविंगवरचा अविश्वसनीय कंट्रोल, फील्ड्स मेडल थोडक्यात, डॉ. करी अ‍ॅवरेज व्यक्ती नाहीत एवढे ध्यानात आले तर बाकी गोष्टींचा ऊलगडा पुढे होईलच.

तुमच्या कथेतली लोक एक्दम हाय प्रोफाईल असतात >> त्या बिचार्‍यांबद्दलही कोणीतरी लिहायला हवे ना? Wink

. करी अ‍ॅवरेज व्यक्ती नाहीत एवढे ध्यानात आले तर बाकी गोष्टींचा ऊलगडा पुढे होईलच.
>> guard che varnanhi vegale pana dakhavanare ahe.
Varnana varun akarshan vatane pan pachale nahi. Choice of course.

तुमच्या कथेतली लोक एक्दम हाय प्रोफाईल असतात >>>सहमत .हाबच्या कथा वाचताना एकदम अब्बास मस्तान चे पिक्चर पाहायचं फील येतो.उंचे लोग, स्टायलिश राहणी गाड्या वगैरे.
तर हाबना मायबोलीचे अब्बास मस्तान म्हणायला हरकत नाही . Lol
हाब गरज भासल्यास Light 1

सुरूवात चांगली आहे. काही वाक्ये मात्र जरा अवजड आहेत.
>> तर हाबना मायबोलीचे अब्बास मस्तान म्हणायला हरकत नाही
हाब्बास मस्तान म्हणा किंवा शाब्बास हाब्बास मस्तान म्हणायला हरकत नसावी Light 1

अजून मर्डर वर्डर काही घडला नाही लोकांची डोकी कोडवायला लागली Happy
कोडी कोडी न खेळता कथांना हात घातलात हे छान केलेत. वाचकांच्या डोक्याला त्रास नाही Happy

हाब्बास मस्तान >> Lol

शुक्रवारी क्रमशः लिहिणार्‍यांना फटके दिले पाहिजेत Wink

क्रमश: काय राव! सुरुवात जबरीच आहे.

करीबाई मानव+रोबो संकर आहेत का? किंवा त्यांनी बॉडीमध्ये काही चीप बिप बसवून घेतली आहे का?

Pages