कथा एका मुलाखतीची (भाग -२)

Submitted by _तृप्ती_ on 1 August, 2017 - 23:38

गावातल्या कोपऱ्याकोपऱ्यावर आता ताराबाईच्या मुलाखतीची चर्चा जोर धरू लागली. मास्तर स्वतः जातीने प्रश्न तयार करत होते. ताराबाईचा व्यवसाय समजून घेण्यासाठी ते एकदा प्रत्यक्ष गोवऱ्या बनवून आल्याची अफवा सुद्धा गावात पसरली. मास्तरांनी ताराबाईना प्रश्नाची यादीच दिली आणि त्याची उत्तरं लिहून काढायला सांगितली. काही प्रातिनिधिक प्रश्न.
- शेणाच्या गोवऱ्या कश्या बनवतात? (४-५ वाक्यात माहिती द्या)
- गोवऱ्याचे प्रमुख उपयोग (३-४ कमीत कमी)
- गोवऱ्या बनवण्यासाठी लागणारा वेळ - एका वाक्यात उत्तर द्या.
- गोवऱ्या बनवताना येणाऱ्या अडचणी. उदाहरणासहित स्पष्ट करा.
खाली एक महत्वाची टीप दिली होती. सर्व उत्तरे मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिणे गरजेचे आहे.
ती प्रश्नावली पाहून, ताराबाईना आपण शाळेत सुद्धा कधी इतके प्रश्न सोडवले नाहीत हे आठवलं आणि मास्तरांचा हा क्लास फार काळ परवडणार नाही हे सुद्धा लक्षात आलं. तरीही त्यांनी दोन दिवस गोवऱ्या करण्याचे काम बाजूला ठेवून, नेटाने, जमेल तशी सगळी उत्तरं लिहून काढली. मास्तरांनी पेपर तपासावे, तशी सगळी उत्तरं तपासली आणि आपला विद्यार्थी फारच कच्चा आहे हे पाहून निराश झाले. मुलाखत लगेचच पुढच्या आठवड्यात होती म्हणून, नाहीतर मास्तरांनी ताराबाईना अजून २-३ पेपर सोडवायला दिले असते. पण मग 'हस्ताक्षर सुधारण्याची गरज आहे' असा शेरा मारून मास्तरांनी अभ्यास आवरता घेतला.
महिला आघाडी मात्र हमरीतुमरीवर आली होती. ताराबाईनी आपलीच साडी नेसली पाहिजे असं कमीत कमी ४-५ बायकांना वाटतं होतं. मी नाही तरी माझी साडी तरी टीव्हीमध्ये दिसेल असं त्यांना वाटत होतं. एक विचार असाही झाला की ताराबाईनी कमीत कमी दोनदा साडी बदललीच पाहिजे. पण मग मुलाखतीच्या दिवशी ठरवू, असं म्हणून पुन्हा एकदा सामना अनिर्णित.

शेवटी तो दिवस उजाडला. टीव्हीतल्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे, ताराबाईंची मुलाखत गोवऱ्या करण्याच्या जागेवरच होणार होती. त्यांना एकदम खरंखरं दाखवायचं होतं. सकाळपासून ताराबाईच्या घराला लगीनघराचं स्वरूप आलं होतं. बुजुर्ग लोकांनी आधीच आपल्या जागा राखून ठेवल्या होत्या. बायकांना घरची काम सोडून सकाळपासून यायला जमत नव्हतं म्हणून त्या कशीबशी काम उरकत नजर मुलाखतीकडे लावून होत्या. काही मुलांना वाटतं होतं आज शाळेला सुट्टीच देणार. परंतु तसं काही झालं नाही. पण मास्तरांना मात्र विशेष सुट्टी देण्यात आली. नाम्यानें चहापाण्याची सोय केली होती आणि तो स्वतः टीव्हीतल्या लोकांच्या स्वागताची जबाबदारी सुद्धा घेणार होता. आख्ख गावं या सोहळ्यासाठी तयार झालं होतं. गावातल्या तरुण मुलांना टीव्हीवाल्याची गाडी दिसली की ताराबाईच्या घरी घेऊन येण्याची कामगिरी दिली होती. या गडबडीमध्ये, वावडी गावात चहासाठी थांबलेल्या एका जोडप्याला, टीव्हीवाले समजून, त्यांना ताराबाईच्या घराचे दर्शन घ्यावे लागले होते. जरा वेळाने त्याच्याकडे कॅमेरासुद्धा नाही हे लक्षात आल्यावर त्यांना सोडून देण्यात आले.
इकडे ताराबाईना तयार करण्यासाठी ५-६ बायका जमल्या. बाकी काहीच नाही तरी तारीला काही नीट आवरता येणार नाही, यावर त्या सगळ्यामध्ये एकमत होतं. एकीचं मत होतं, टीव्हीवर दिसणार तर जरा गडद रंगच हवा साडीचा. दुसरीला वाटत होतं, तारीला काही गडद रंग शोभणार नाही. मग साधीच साडी असू दे, नाहीतर तारीचं लग्नच आहे असं वाटेल. तरी कोणी म्हणत होतं, नेस कि लग्नाची साडी, नाहीतरी परत वेळ येईल असं काही वाटत नाही. मग गुलाबाचं फुल घालावं का मोगऱ्याचा गजरा. अश्या अनेक रंगीबेरंगी चर्चा सतत रंग बदलत होत्या.
बराच वेळाच्या प्रतिक्षेनंतर, एकदाची टीव्हीवाल्याची गाडी गावात आली. गाडीमध्ये एक कॅमेरामन, २-३ स्पॉट बॉय, मदतनीस आणि मुलाखत घेण्यासाठी आलेली एक सुंदरी. त्यांच्या गाडीच्या पुढे २-३ बाईक्स, मागे २-३ बाईक्स, आजूबाजूने रस्त्यातली गर्दी हलवण्यासाठी धावणारी ४-५ तरुण मुले. ही मुलं गर्दी हलवत होती का स्वतःच गर्दी वाढवत होती हे मात्र ठरवणं अवघड होतं. अशी ती सगळी वरात ताराबाईच्या घरी पोचली. आतमधली सुंदरी हा सगळा प्रकार पाहून थबकून गेली होती. गाडी थांबली. गाडीतल्या सुंदरीने पाऊल बाहेर टाकले. बाहेरची गर्दी पाहून, आपल्या पापण्यांची फडफड करून, डोळे विस्फारून, तिने "ओह माय गॉड" असा एक नाजूक उद्गार काढल्यावर, तिथे कमीतकमी ७-८ पोरं तातडीने मदतीसाठी हाजीर झाली. सुंदरी छोट्या दारामधून आत जाण्यास निघाली आणि तिच्यामागे ७-८ पोरं. यामध्ये कॅमेरामन आणि मदतनिसांना जागाच उरली नाही. सुंदरीने छोटासा स्कर्ट आणि त्यावर सुंदर गुलाबी रंगाचा शर्ट घातला होता. त्यावर straightening केलेले केस मोकळेच सोडले होते. लांब वाढवलेल्या नखांवर रंगीबेरंगी फुले डोलत होती आणि काजळ घातलेल्या डोळ्यांच्या मोहक हालचालीबरोबर, असंख्य फुलपाखरे अचानक सक्रिय झाली होती. पायातल्या हिल्सचा टौक-टौक असा आवाज करत, हे उडतं गुलाबी सौंदर्य तिथे भिरभिरल्यावर, समस्त पुरुषवर्गाच्या नजरा तिकडे वळल्या नाहीत तरच आश्चर्य. मग कोणाच्या छातीची धडधड वाढली, कोणाला दिवसाढवळ्या चक्कर येते आहे असं वाटलं, कोणाची वाचा गेली, असे बरेच विकारांचं लोण अचानक तिथे पसरलं. सुंदरीने आपल्या केसांना जरा झटका दिला आणि ओठांची हालचाल करत पहिला प्रश्न विचारला, " ताराबाई कुठे आहेत?" यावर ताराबाईना बोलवा, तारूला आणा अश्या हाकांचा सपाटा सुरु झाला. नाम्याला आता आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. त्याने पुढे होऊन सुंदरीला आपली ओळख करून दिली, " I am नामदेव शंकर पाटील, leader of this गाव". सुंदरीने हस्तांदोलन करत, स्वतःची ओळख करून दिली, " मी कुमारी नैना, बित्तम बातमीची मुख्य वार्ताहार. मीच मुलाखत घेणार आहे." सुंदरीने संपूर्ण मराठीमध्ये उत्तर दिलं. पण तरीही ती कुमारी आहे ह्याची नोंद बऱ्याच उडत्या पाखरांनी घेतली. या वेळेपर्यंत ताराबाई आल्या आहेत हे नाम्याच्या लक्षातच आलं नव्हतं. मग ताराबाईनी स्वतःच ओळख करून दिली. सुंदरीने ताराबाईना थोडक्यात मुलाखतीचा कार्यक्रम समजावून सांगितला.
सुरुवातीला ताराबाई गोवऱ्या करताना दाखवण्यात येणार होतं. गोवऱ्या करत असतानाच त्यांना काही प्रश्न विचारले जाणार होते आणि काही गोवऱ्या करून झाल्यावर. म्हणजेच पर्यायने बराचसा कार्यक्रम हा शेणाच्या ढिगाजवळ, गोठ्यातच पार पडणार होता. आता सर्व जनता गोठ्याच्या दिशेने. आता हा कार्यक्रम समजल्यावर, ताराबाईना आपली चांगली साडी दिल्याचा मूर्खपणा केल्याचं मंजुळेच्या लक्षात आलं. ताराबाईना शेणातच काम करायचं होतं, तर साडीची पूर्ण विल्हेवाट लागणार यात शंकाच नव्हती.
आता जागेचा ताबा टीव्हीवाल्यानी घेतला. कॅमेरामन आणि स्पॉटबॉय यांची पळापळ सुरु झाली. कुठून लाईट येईल, कुठून आवाज ऐकू येईल, कुठे कॅमेरा हलणार नाही आणि मुख्य म्हणजे गोवऱ्याचा कार्यक्रम नीट फोकस होईल असं सगळं सुरु होतं. तोपर्यंत सुंदरीने ताराबाईना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची कल्पना दिली. यामध्ये जवळजवळ एक तास सहज निघून गेला. आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुंदरीने सांगितल्याप्रमाणे ताराबाईंनी जागा पकडली आणि गोवऱ्या करायला सुरुवात केली. कॅमेरा, action. असं सगळं सुरु झालं. कॅमेराचा फोकस सुंदरीवर. तिने बोलायला सुरुवात केली. ताराबाईची माहिती सांगितली. पण तेवढ्यात कॅमेरामन ओरडला," कट कट". घोळ असा झाला, गोवऱ्या फोकस करताना, सुंदरी अंधारात गेली होती. मग पुन्हा सगळी रचना केली.
पुन्हा शूटिंग सुरु. ताराबाई गोवऱ्या करत आहेत, सुंदरीने जागा घेतली आणि बोलायला सुरुवात केली. पण तेवढ्यात, इतका वेळ गोठ्यात शांतपणे उभ्या असलेल्या म्हशीपैकी एकीला आपणही सुंदरीबरोबर कॅमेरासमोर बोलावं असं वाटल्याने, तिने ओरडायला सुरुवात केली. त्यामुळे सुंदरीचा चिमणा आवाज ऐकूच आला नाही. पुन्हा कॅमेरामन ओरडला, "कट कट". झालं. आतापर्यन्त ताराबाईच्या २०-२२ गोवऱ्या करून झाल्या, तरीही १ मिनिटांचं सुद्धा शूटिंग झालं नव्हतं.
इकडे गावातल्या लोकांनाही, ताराबाईना गोवऱ्या करताना पाहण्यात काहीही रस नव्हता. तिकडेही जनता जरा पांगायला लागली. तसंही शेणाचा वास सहन करत इतका वेळ बसणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. ताराबाईनी म्हशीला शांत केल्यावर, पुन्हा शूटिंगला सुरुवात झाली. सुंदरीने तिची जागा घेतली, ताराबाईची ओळख करून दिली आणि आता फोकस ताराबाईवर. पण पुन्हा माशी शिंकली. झालं असं होतं, सकाळपासून जवळजवळ ३ तास ताराबाई फक्त गोवऱ्या करत होत्या. आता जेव्हा फोकस त्यांच्यावर आला, तोपर्यन्त शेण संपून गेलं होतं. गोवऱ्या करणार कशाच्या? आता म्हशी तर आज पुन्हा शेण देणार नाहीत. मग पुन्हा एकदा शूटिंग बंद पडलं. तशीही आता जेवणाची वेळ झाली होती. मग त्यासाठी काम थांबवायचं ठरलं. नाम्याने टीव्हीतल्या लोकांची भोजनाची सोय केली होती. सगळे जेवायला रवाना झाले. ताराबाईनी आपल्या बायका गोळा करून, गावातून कुठूनतरी शेण मिळवण्याची सोय केली. या सगळया प्रकारात, गावातल्या लोकांचं ताराबाईवरून लक्ष उडून, सुंदरीकडे लागलं होतं. हे पाहून त्या फारच निराश झाल्या होत्या. हे म्हणजे माझं लग्न शेणाशी आणि यांचं काय सुंदरीशी? आता प्रश्न विचारु देतच, मग मी पण बघून घेते, असा त्यांनी मनोमन निश्चय केला.
जरा वेळाने मंडळी जेवून परत आली. गावातून शेणही आलं. आणि नव्या दमाने सगळे कामाला लागले.
ताराबाईंनी पुन्हा एकदा गोवऱ्या करायला सुरुवात केली. मग आधी म्हशी, मग शेण, मग गोवऱ्या आणि मग ताराबाई असं सगळं फोकस करून, नीट शूटिंग करून झालं. त्यात बायका सतत ताराबाईना सूचना देत होत्या, "अग जरा हास की", "कॅमेराकडे बघ की नीट", "हीच लक्ष आपलं म्हशीकडे नाहीतर शेणात." पण तरीही, जेवणाचा परिणाम म्हणा किंवा शेणाचा तुटवडा म्हणा, पण हा भाग लवकर पार पडला.
आता सुंदरीने ताराबाईना प्रश्न विचारायला सुरुवात केली. पहिला प्रश्न. "ताराबाई, तुम्ही किती वर्ष हे काम करत आहात? " ताराबाईंनी काहीही उत्तर देण्याआधी, जमावामधून एक अतिउत्साही आजीबाई पुढे आल्या. " आता किती दिस म्हणजी काय? मी पहाते आहे ना तेव्हापासनं तारी आपली शेणातच खेळती हाय. अगदी तिच्या मायबरोबर यायची ना तवा बी. माय गेली पण हिनं शेणाचं सोनं केलया." कॅमेरामन ओरडला, " कट कट", आजीबाई सुरूच, "कारं बाबा, नीट दिसले नव्ह मी. पुन्हा सांगू काय?" कॅमेरामन हताश होऊन आजीबाईना बाजूला व्हा म्हणाला. आजीबाई, " काय तर याची नुसती कटकट सकाळपासून. नुसतं कटकट करतंय." मग आजीबाई स्थिरस्थावर झाल्यावर शूटिंग पुढे सुरू. सुंदरीने शिताफीने प्रश्नच बदलून टाकला. "ताराबाई, तुम्ही दिवसात किती गोवऱ्या करता ?" ताराबाई सरसावल्या. "आता असं बघा. जसं शेण असेल तसं मी गोवऱ्या करते. म्हणजे शेण संपेपर्यन्त माझं आपलं सुरूच. तसं काय सांगता येत नाही." मास्तर मागून खुणा करत होते, एका वाक्यात उत्तर द्या. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. ताराबाई पुढे सुरूच ,"आता आज तर खूपच काम झालं. तुम्ही हे सारखं कट कट करताय ना, मग जरा जास्तीच झाल्या गोवऱ्या." कॅमेरामन पुन्हा "कट कट. ते शेवटचं वाक्य कशाला घेतलंत. ते स्क्रिप्टमधे बसत नाही ". ताराबाईना हा आगाऊपणा अजिबात आवडला नाही. त्या म्हणाल्याचं, " तुम्हाला खरं दाखवायचं आहे ना. मग मी खरं तेच सांगितलं की." आता गावातल्या सगळ्या बायका पण ताराबाईच्या मागे उभ्या. नाही म्हटलं तरी शेण गोळा करायला, त्यांना कष्ट घ्यायला लागले होते. " तारे, बरॊबर आहे तुझं. केलं जास्ती काम तर केलंच म्हणार नव्ह.", " याची आपली कटकट. तारे, तू वाक्य बदलूं नकोस."
आता उन्हंही चढायला लागलं होतं आणि वातावरणही तापायला लागलं होतं. मग सुंदरीने कॅमेरामनला पटवलं की आपण ते एडिट करू. असं करत करत चहाच्या वेळेपर्यन्त कसेबसे प्रश्न संपले. तरीही काही फोटो घ्यायचे होते. मग चहासाठी पुन्हा शूटिंग थांबवलं.
पण आता या वेळेपर्यंत ताराबाईच्या चेहऱ्यावरचा मेकअप पूर्ण उतरला होता, साडीसुद्धा शेणाचे डाग मिरवत होती. सुंदरी मात्र आपला चेहरा touch-up करून करून चांगला ठेवत होती. सकाळची गर्दी पार ओसरून नावाला ४-५ लोकं उरली होती. चहा करायला स्वतः ताराबाईंनाच उठावं लागेल असं वाटत असतानाच, शेजारच्या पारुने प्रसंगावधान राखले आणि सगळ्यांना चहा मिळाला. मग पुन्हा एकदा कसेनुसे हसून ताराबाई आणि त्यांच्या म्हशी, ताराबाई आणि त्यांच्या बायका, गोवऱ्यांचा ढीग, गावातली काही लोकेशन असे सगळे फोटो झाले. सुंदरीने पुन्हा आपला मेकअप सांभाळत, गोड गोड हसत, ताराबाईचं तोंडभरून कौतुक करत मुलाखतीचा समारोप केला आणि टीव्हीवाली मंडळी गाडीत बसून निघून गेली.
ताराबाई मात्र आपल्या लाडक्या म्हशीबरोबर हितगुज करत होत्या. आईसारखी माया करणाऱ्या, आजीबरोबर बोलत होत्या. पारूचे, मंजुळेंचे आणि गावातल्या लोकांचे आभार मानत होत्या. मेकअप नसलेला आणि काम करून थकलेला, त्यांचा चेहरा सुंदर दिसत होता. टीव्हीत दाखवल्या जाणाऱ्या चित्रापेक्षा, हे दृश्य कितीतरीपटीने अधिक बोलकं आणि खरं होतं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults