घडीभर टेकण्यालायक तरी सध्या करू घर

Submitted by बेफ़िकीर on 31 July, 2017 - 01:11

घडीभर टेकण्यालायक तरी सध्या करू घर
नसो घरपण घराला पण जरासे आवरू घर

उसासा एक छद्मीही पुरे होतो पडाया
हसू धादांत खोटे पण जरासे सावरू घर

घरावर पोचले मोर्चे चुकीच्या जवळिकींचे
कधीपर्यंत वाचवणार माझी आबरू घर

नवी मैफील थाटू चल अजुन आयुष्य आहे
नकोश्या आठवांवरती खुबीने पांघरू घर

गिलावे सर्व शपथांचे नि वचनांचे दिले की
तरी का आसवांनी लागले हे पाझरू घर

व्यथांचे देत शिडकावे, मने सांधून ठेवा
सुखांची वाळवी लागेल जेव्हा पोखरू घर

नको पाहूस सवयीने घराचे दार माझ्या
तुझ्या निष्ठूर स्मरणांनी पुन्हा मी का भरू घर

खरा मुक्काम येतो.... येथला आटोपल्यावर
प्रवासाला निघेपर्यंत इथले वापरू घर

पगाराला न येई गाठता किंमत घराची
कधीही येइना चिमटीत ते फुलपाखरू घर

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

भारी...आवडली...
>>> पगाराला न येई गाठता किंमत घराची
कधीही येइना चिमटीत ते फुलपाखरू घर<<< +१११
वास्तव

वृत्त अनवट आहे.

शेवटी टे जोडले तर वृत्त जरा ओळखीचे होते ... ( लगागागा लगागागा लगागागा लगागा गा . मुझे तेरी मुहोब्बत का सहारा मिल गया होता )