कंटाळवाणी फसवणूक - इंदू सरकार (Movie Review - Indu Sarkar)

Submitted by रसप on 29 July, 2017 - 04:28

नुकताच 'डंकर्क' बघितला. दुसरे महायुद्ध आणि त्याच्याशी संबंधित पात्रं व घटना ह्यांच्यावर आधारित कित्येक परदेशी सिनेमे बनत असतात. अगदी कृष्ण-धवल कालापासून ते आत्ताच्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाच्या काळापर्यंत ह्या एका विषयाने अनेक लोकांना प्रेरित केलं आहे. राहून राहून मला नेहमी वाटायचं की फाळणी, १९७५ साली लादली गेलेली आणीबाणी, ईशान्येकडील राज्यांचे प्रश्न, भारताचं श्रीलंकेमधलं ऑपरेशन पवन, चीन आणि पाकिस्तानसोबत झालेली अनेक युद्धं व कित्येक लहान-मोठ्या मोहिमा, इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधींची हत्या, बाबरी मशीद, गोधरा वगैरे महत्वाच्या शेकडो स्वातंत्र्योत्तर घटनांना हिंदी सिनेमा कधी सशक्त परिपक्वतेने हाताळणार ? ह्या अनेक घटनांपैकी काहींना हात घालायचे काही बरे-वाईट प्रयत्न झाले आहेत. पण पुरेसं नाहीच. त्यातही १९७५ साली लादलेली आणीबाणी तर एक प्रकारचा 'टॅबू' च !
त्यामुळे 'इंदू सरकार' विषयी ऐकल्याबरोबर उत्सुकता वाटत होती. आणीबाणीविषयीचा सिनेमा फक्त आजच्या काळातच बनू शकतो. उद्या सरकार बदललं, तर हा विषय पुन्हा एकदा दाबून ठेवला जाणार. त्यामुळे सिनेमाचं उत्तम टायमिंगसुद्धा दाद घेऊन गेलं.

पण बहुतेक अपेक्षांच्या फुग्यात आपण जितका जीव फुंकावा तेव्हढा त्याचा धमाका मोठा होत असावा !
एका स्फोटक, जोरदार, वेगवान, थरारक आणि हादरवणाऱ्या सिनेमाच्या अपेक्षेने मी गेलो आणि एक मिळमिळीत, रटाळ, विस्कळीत, मरतुकडा आणि कंटाळवणारा सिनेमा पाहून आलो.

सगळ्यात मोठा आणि घोर अपेक्षाभंग म्हणजे 'इंदू सरकार' ह्या नावाशी इंदिरा गांधींचा काही एक संबंध नाही ! 'सरकार' हे त्या व्यक्तिरेखेचं आडनाव आहे, त्याचा अर्थ 'गव्हर्न्मेंट, शासन' वगैरे नाही. अर्थात, हे मला आधीच समजलेलं होतं. तरी, कुठे तरी काही तरी रिलेट होईल असं वाटलं होतं. इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी आणि त्याचे परिणाम भोगणारे काही लोक, अशी ही कहाणी आहेच. तेव्हढा सूचक संबंध आहे. पण 'इंदिरा गांधी' ही व्यक्तिरेखा (सुप्रिया विनोद) केवळ काही सेकंदांपुरती पडद्यावर झळकते, त्यातही एक शब्दही बोलत नाही. फक्त दिसते. त्याव्यतिरिक्त संपूर्ण सिनेमात १-२ वेळा संजय गांधींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 'चीफ'च्या (नील नितीन मुकेश) 'मम्मी' म्हणून उल्लेख होतो. बस्स् !

ही कहाणी मुख्यत्वेकरून आहे 'इंदू सरकार' (कीर्ती कुल्हारी) ची. इंदू एका अनाथालयात वाढलेली असते. एक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी 'नवीन सरकार' (तोता रॉय चौधरी) तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. आणीबाणीच्या काळात एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून 'नवीन'ची जबाबदारीतून आलेली निष्ठा आणि इंदूला अनुभवातून झालेली माणुसकीची जाणीव ह्यांचा संघर्ष आणि मग त्यांचा स्वतंत्रपणे विरुद्ध मार्गांवर प्रवास हा ह्या कथानकाचा गाभा.

indu-sarkar-7591.jpg

आणीबाणीच्या काळात विविध कारवायांच्या वरवंट्याखाली भरडल्या गेलेल्या जनतेचे हाल अत्यंत फिल्मी उथळपणे दाखवले आहेत, हा अजून एक अपेक्षाभंग. व्यथित मनांचा आणि शोषित जनांचा आकांत दाखवताना 'आक्रोश' दाखवणं आवश्यक नसतं, हे आपण का समजू शकत नाही कुणास ठाऊक ! आरडाओरडा, पळापळ, गोंधळ, कल्लोळ वगैरे अंदाधुंदी दाखवली म्हणजे ते अंगावर येतच असतं असं नक्कीच नाही. योग्य सूर वाजण्यासाठी योग्य तार छेडली जायला हवी. त्यासाठी संयम आणि ठहराव हवा, तो कधी अंगी बाणणार आहे ? पोलीस कमिशनर मिश्रा (झाकीर हुसेन) प्रसंगी भडक आणि प्रसंगी फिल्मी का असायला हवा होता ? त्याचं निर्दयीपण फक्त त्याच्या कृतींतून दिसलं असतंच की !

'चार आने की मुर्गी को बारा आने का मसाला' हे सूत्रही आपण कधी टाळणार आहोत ? आणीबाणीच्या काळातला एका स्त्रीचा संघर्ष दाखवण्यासाठी ती अनाथ असणं, तिने तोतरं असणं का आवश्यक आहे ? तिचा तोतरेपणा तर एक सपशेल मूर्खपणे जोडलेलं अनावश्यक ठिगळच आहे. ह्या असल्या फालतू पसाऱ्यामुळे मुख्य विषयापासून भरकटायला तर होतंच आणि अनावश्यक लांबी वाढते ते वेगळंच ! जेव्हा इंदू कोर्टात सरकारी वकिलाला 'जनता भी 'इनफ' कह रही हैं' असं म्हणते, तेव्हा आपणही मधुर भांडारकरला मनातल्या मनात 'इनफ' म्हणतो.

'फॅशन' नंतर आलेल्या एकेका फिल्मनिशी मधुर भांडारकरचा आलेख उतरत चालला आहे. रामू आणि भांडारकर ह्यांच्यातला हा एक दुर्दैवी समान दुवा आहे. एखाद्या दमदार विषयावर सिनेमा बनवून तो विषय वाया घालवण्याचं कर्तृत्व गेल्या काही महिन्यांत बेगम जान, मोहेंजोदडो, सरबजीत, मेरी कोम अश्या काही सिनेमांनी गाजवलं होतं. 'इंदू सरकार' ह्या सगळ्यांचा शिरोमणी आहे. उल्लेखलेले सर्व सिनेमे 'सुसह्य' ते 'चांगला' ह्या पट्ट्यात होते. 'इंदू सरकार' मात्र ह्या पट्ट्याच्या बाहेर नकारात्मक बाजूला असावा.
निर्बुद्ध पटकथा आणि दिग्दर्शकाची पकडही बऱ्यापैकी ढिली पडलेली असतानाही प्रमुख कलाकारांची कामं मात्र चांगली झाली आहेत, हा एक दिलासा ! कीर्ती कुल्हारीने 'पिंक'मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. 'इंदू'च्या व्यक्तिरेखेचं अडखळत बोलणं अनावश्यक असल्यामुळे कंटाळा जरी आणत असलं, तरी कीर्तीचा प्रयत्न कुठेच कमी पडलेला नाही. तोता रॉय चौधरीसुद्धा छाप सोडतो. एक रुथलेस सरकारी प्रशासक आणि कधी समंजस तर कधी वर्चस्व गाजवणारा पती, असे त्याच्या व्यक्तिरेखेचे कोन आहेत, जे त्याने उत्तम प्रकारे सादर केले. अनुपम खेर, शिबा चढ्ढा, अंकुर विकल सहाय्यक भूमिका चोखपणे करतात.
'नील नितीन मुकेश' मात्र जबरदस्त प्रभाव सोडतो. त्याचा गेटअपही उत्तम जमून आला आहे. लेखकाचं बॅकिंग न मिळाल्यामुळे त्याचा 'चीफ' हा अक्षरश: वाया गेला आहे. सिनेमातील एकमेव दृश्य नकारात्मकता म्हणजे 'चीफ' आहे. तो पुरेसा व्यक्त न झाल्यामुळे सिनेमातला संघर्ष पुरेसा वाटत नाही.

हे वर्ष अनु मलिकसाठी नक्कीच चांगलं ठरत आहे.
गाण्यांना फारसा वाव नसला, तरी 'यह पल..' आणि 'यह आवाज हैं..' ही गाणी खूप सुंदर जमली आहेत. 'यह आवाज हैं..' त्याच्या ओळखीच्या चालीमुळे मनात रुंजी घालत राहतं. ज्यांनी अजीझ नाझानच्या ओरिजिनल 'चढता सूरज..' पारायणं केलीयत, त्यांना मात्र त्याचं नावं वर्जन अंमळ सपकच वाटेल. तरी, एकंदरीत संगीत आणि पार्श्वसंगीतही एक दिलास्याचाच भाग आहे.

सरतेशेवटी एक शे'र आठवतो आहे.

किस से उम्मीद करें कोई इलाज-ए-दिल की
चारागर भी तो बहुत दर्द का मारा निकला
- लुत्फ़-उर-रहमान

मधुर भांडारकर, अगदी गेल्या काही सिनेमांतल्या सुमारपणानंतरही, एक दमदार नाव आहे आजच्या जमान्यातलं. पण त्याच्या सिनेमांमुळे पुन्हा पुन्हा होणाऱ्या अपेक्षाभंगानंतर आव्हानात्मक किंवा 'टॅबू' बनलेले विषय आपल्याकडे हाताळणार कोण ? असा प्रश्नच पडतो आहे.

रेटिंग - * *

- रणजित पराडकर

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम झालं परिक्षण लिहिलं ते..... म्हणजे जी काही हाणामारी रिलिजच्या आधी चालू होती ती केवळ पब्लिसिटी स्टंट होता हे सिद्ध होते आहे.

कथानक वाचून अगदीच्य 'अरे काय हे!' असे वाटले....

रामू, मधुर, आशुतोष या लोकांना नक्की काय झालंय ते कळत नाहीये... असो!

तुम्ही परीक्षण लिहिण्यासाठी कोणते चित्रपट निवडता, एकंदरित कोणते चित्रपट पाहता आणि कोणते सोडून देता, या गोष्टी मला कधीकधी तुमच्या परीक्षणापेक्षा जास्त इंटरेस्टिंग वाटतात.

लिप्स्टिक अंडर माय बुरखा#

ह्या सिनेमातल्या सुप्रिया विनोद (इंदिरा गांधी) यांच्या अनेक सीन्सवर सेन्सॉर बोर्डापायी कात्री लावली असे एका परीक्षणात ऐकले. तसे करावे लागल्याने सिनेमा हुकला असेल का?

सन ७५ येतोय. कदाचित तो अपेक्षाभंग करणार नाही. तसंही आणीबाणीचं चित्रीकरण काही प्रमाणात हजारो ख्वाईशे ऐंसी मध्ये आहे. के के मेननला पुन्हा एकदा त्याच विषयावरील चित्रपटात पाहण्याची उत्सुकता आहे.

रस प ... तुम्हाला निल आणि सुप्रिया जास्त दिसले नाहीत कारण भरपूर सीन्स वर कात्री चालवली आहे..

रन टाइम किती आहे? म्हणजे त्यावरुन कळेल किती सीन कापले ते....

तसेच सीन कापले असे म्हणायला काही पुरावा लागणार नाही का? की अंदाजपंचे दाहोदसे?

तुम्हाला निल आणि सुप्रिया जास्त दिसले नाहीत कारण भरपूर सीन्स वर कात्री चालवली आहे..
>>>>
असे सीन्स यू ट्यूबवर बघायला मिळतात नंतर..

रसप, लिपस्टिक अंदर माय बुरखाच्या परीक्षणाची वाट बघतोय..

रन टाइम किती आहे? म्हणजे त्यावरुन कळेल किती सीन कापले ते....
>>>>
हे लॉजिक समजले नाही.
समजा चित्रपटातील साडे चौदा मिनिटांचे सीन्स कापले असतील तर ते तुम्हाला रन टाईम वरून कसे खरे खोटे करता येईल.
मूळ रन टाईम कसा समजणार? म्हणजे असा समजतो का?

तसेच सेन्सॉरने कापून खूपच छोटा केला चित्रपट तर पुन्हा एडिटींगमध्ये कापलेले सीन्स वाढवून चित्रपटाची लांबी वाढवता येते का? कोणाला काही माहीती...

@प्रसासक,हे रसप स्वतःला खुप मोठे चित्रपट परिक्षक समजतात,पण प्रत्यक्षात यांना कसलेही नॉलेज नाही.जवळपास प्रत्येक चित्रपटाची खिल्ली उडवने यालाच हे महाशय चित्रपट परिक्षण समजतात.यांच्या रिव्हू(?)मुळे अनेकजण डिसकरेज होतात.कृपया यांना योग्य समज द्यावीव यांचे कला क्षेत्रातले ज्ञान अद्ययावत झाल्यावर इकडे येऊन तारे तोडण्याची परवानगी द्यावी.

सिंजी, गिव असं अ ब्रेक! Happy

तुम्हाला जे खटकतं आहे ते करायला तुम्हाला कोणी अडवले नाही, अभ्यासपूर्ण ज्ञानवर्धक इन्करेजिंग डाऊन टू अर्थ चित्रपट परीक्षण लिहा की....

मला वाटतंय प्रेक्षकांबद्धल बोलतायत सिंजी... रसप यांचे रेवू वाचून लोक जात नाहीत मोवी बघायला ( धन्य आहेत असे लोक )

सिंजि यांनी अजय चव्हाणच्या धाग्यावरचे प्रतिसादाचे विडम्बन केले आहे. एनीवे, रसप यांची परीक्षणे (!) भम्पकच असतात. बहुतेक चित्रपट समीक्षक (!) चित्रपटाल्या सगळ्याच अंगाचे ते तज्ज्ञ आहेत असा आव आणून लिहीत असतात. प्रत्यक्षात १० मिनिटांची एखादी एकांकिका लिहायला अथवा दिग्दर्शित करायला सांगितली तर याना ते जमणार नाही. यांनी कुठे फिल्म अ‍ॅप्रिसिएशनचा कोर्स केलेला असतो काय. ?

स्वामीजी, मी स्वतः गायला लागलो तर धिंच्याक पूजा पेक्षा वाईट गाईन. पण मला स्वतःला गाता येत नाही याचा अर्थ असा नाही की मला गाण्यातलं चांगलं वाईट कळत नाही. जसं हर्ष भोगले ने स्वतः आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले असणं गरजेचं नाही तसंच चित्रपट परीक्षण लिहिण्यासाठी रसप स्वतः पटकथाकार किंवा दिग्दर्शक असणे गरजेचे नाही.

रच्याकने रसप यांची परीक्षणे भंपक असतात या आपल्या मताशी सहमत Proud

मला बरी वाटतात यांची परीक्षणे
तसेही ते त्यांचे मत असते, आपलं आपण ठरवायचे असते
रच्याकने
लिप्स्टिक अंडर माय बुरखा#
आलाय मोबाईलवर पण दोन मिनंटापेक्षा जास्त मलातरी बघवला नाही ईतका बोर वाटला

पुल देशपांडे म्हणतात ....
समीक्षक हे बोहारणीसारखे असतात. नवा करकरीत शालु दिला तरी तोंड वैंगाडतात.

.....
बोहारणीकडे एकात एक बसणारे पाच वाडगे असतात .. कितीही चांगला कपडा दिला तरी पहिला किंवा दुसराच लहान वाडगा मिळणार.
समीक्षकांकडे पाच चांदण्या असतात !

Proud

Rofl

व्यत्यय जी तुम्ही कसे ही गायलात तरी ते स्वन्त सुखाय असते. तुम्ही भीमसेनजींनी असे करने चूक होते असे करायला पाहिजे असले सल्ले देत नाहीत. (की देता ?). समीक्षकांचा आव असा असतो की ह्या: ह्या: माझ्या हातात हे पडले असते तर असे करायला पाहिजे होते. संगीत ठीक ठाक एवढ्या शब्दात सगळे मूल्यमापन. असे म्हणा ना की गाण्यातला हा राग कलावती या मूडला अजिबात सुटेबल नव्हता.तेव्हढा अभ्यास नसतो. असेच प्रत्येक अंगात बओलता येईल. शिवाय बाब्या- कार्टं न्याय आहेच. त्यामुळे ऑम्लेटच्या चवीबद्दल मत द्यायला स्वतः अंडं घातलं पाहिजेच असं नाही या धर्तीचा तुमचा युक्तिवाद आहे. ही परिक्षणे म्हणजे परीक्षेचे पेपर तपासल्यासारखी असतात. मग तुम्हाला मुळात २ चा पाढा येतो की नाही हे पहाणे आवश्यक आहे. हरि ओम तत्सत....

३र्ड क्लास चित्रपट नेमके कशावर फोकस करायचा आहे हे शेवटपर्यंत मधूरला कळाले नाही. बहूदा कुणाच्यातरी सांगण्यावरून विशिष्ट अजेंड्याने चित्रपट बनवला आहे असे वाटते. पटकथा लिहीताना बर्याच प्रसंगांमध्ये सुसंगती नाही. राजनिती हा एक उत्तम राजकिय खेळी असणारा चित्रपट होता त्याच्या जवळपास सुद्धा जाऊ शकला नाही याचा खेद वाटतो कारण आणिबाणीच्या वेळी बर्याच पक्षांनी वाहत्या गंगेत हातपाय धुवून घेतलेले त्याचा वापर दिसला नाही
किर्ती व निल यांचा अभिनय सोडल्यास बाकी दिवे लागलेले आहे.

आणिबाणीचा अट्टाहास केला नसता तर उत्तम कथा बनवता आली असती.

@रसप, कदाचित मी आधीच्या तुमच्या कुठल्यातरी परिक्षणावर हा मोनॉलॉग दिला होता, आज परत मोह टाळता येत नाहीये, तुमच्या इतकं मला चित्रपटसृष्टीचं ज्ञान मुळीच नाही, तरी लहानतोंडी मोठा घास न्यायाने थोडा बोलतोय. हा मोनॉलॉग आहे अँटोन इगो ह्या रॅतातुई चित्रपटातल्या अनिमेटेड पात्राचा

'In many ways, the work of a critic is easy. We risk very little yet enjoy a position over those who offer up their work and their selves to our judgment. We thrive on negative criticism, which is fun to write and to read. But the bitter truth we critics must face, is that in the grand scheme of things, the average piece of junk is probably more meaningful than our criticism designating it so. But there are times when a critic truly risks something, and that is in the discovery and defense of the new. The world is often unkind to new talent, new creations, the new needs friends.'

आता मला हा संवाद, इगोचे स्वगत इथे पेस्ट का करावे वाटले ते थोडं खुलासेवार लिहितो. तुम्ही म्हणालात.....

शेकडो स्वातंत्र्योत्तर घटनांना हिंदी सिनेमा कधी सशक्त परिपक्वतेने हाताळणार ?

परिपक्वता म्हणजे काय? ती सापेक्ष असते वगैरे घासून गुळगुळीत केलेलं मी काही बोलणार नाही, पण जर अशी काही सापेक्ष नसणारी परिपक्वता असलीच तर ती प्रत्येकातच (निर्माता-दिग्दर्शक- ते पिटातले प्रेक्षक) का असावी? आपण इथे जास्तीत जास्त नेट रिचार्ज करून लिहू, तिथे शेकडो कोटी रुपये लावून सिनेमे तयार होतायत. त्यांनी तुमच्या परिपक्वतेच्या लेव्हलवर यायलाच हवं का? बहुसंख्य जनता आजही 'पिरियड ड्रामा' बघायला जाऊन सुद्धा घसरत्या पदरावर शिट्या मारीत असावं! लोकांना जर 'आवाज वाढव डीजे तुज्यायची' आवडत असले तर ती त्यांची अभिरुची झाली, करमणूक माणसाकरता आहे माणसे तिच्या साच्यात बसण्यासाठी नव्हेत. हे एक

दुसरं म्हणजे, थेट इंदिराचं नाव घेऊन जर उद्या थेटर फोडणे वगैरे झाले तर? सिनेमाचं ब्लॅक फ्रायडे सारखा बॅन झाला तर? निर्मात्याच्या नुकसानीचा जबाबदार कोणी नसेल न त्यावेळी? मग त्याने व्यावसायिक गणितानेच सिनेमा बनवला तर बिघडले कुठे? हे मी बाजीराव मस्तानी रिलीज झाल्याबरही म्हणले होते.

पुढे,

आणीबाणीच्या काळात विविध कारवायांच्या वरवंट्याखाली भरडल्या गेलेल्या जनतेचे हाल अत्यंत फिल्मी उथळपणे दाखवले आहेत, हा अजून एक अपेक्षाभंग. व्यथित मनांचा आणि शोषित जनांचा आकांत दाखवताना 'आक्रोश' दाखवणं आवश्यक नसतं

मी स्वतः आणीबाणी पाहिलेली नाही, तुम्ही पाहिली आहे का माहिती नाही, पण आणीबाणीत आक्रोश खूप होता हे बऱ्याच वडीलधाऱ्यांना लहानपणी पासून बोलताना ऐकले आहे, हा एक विषय झाला, दुसरा म्हणजे भडक चित्रण, मला वाटतं एकंदरीत भारतीय हे भावनाप्रदर्शनात अग्रेसर असावेत, भरतमुनीच्या नाट्यशास्त्राचा देश आहे सरजी हा, इथली डीजेने परिपूर्ण लग्ने, विमानात बसले तरी शेजारच्या माणसाशी किमान 'काय दिल्लीला का?' विचारून संभाषण करणारे लोक, सगळे काही असलेच आहे, कालिया मर्दन ते आजचा इंदू सरकार हाच दुवा पकडून काम करणारी इंडस्ट्री आहे आपली, एकदम नाही शांत होणार, अन का व्हावं शांत? जो आम्हा भारतीयांचा स्वभावविशेष आहे तो असणारच, अन ते चित्रपट परावर्तित करत राहणारच,

शेवटी एक विनंती, माझ्या अल्पबुद्धीला पटेल तसं लिहिलं आहे, उणे अधिक वाटल्यास माफ करा.

थेट इंदिराचं नाव घेऊन जर उद्या थेटर फोडणे वगैरे झाले तर? सिनेमाचं ब्लॅक फ्रायडे सारखा बॅन झाला तर? निर्मात्याच्या नुकसानीचा जबाबदार कोणी नसेल न त्यावेळी? मग त्याने व्यावसायिक गणितानेच सिनेमा बनवला तर बिघडले कुठे?

>>> थेट इंदिरेचे नाव घेऊन (इंदु सरकार हे नाव फार क्लेवरली प्लेस केलेले आहे) केलेली पब्लिसिटी, इंदिरागांधीबद्दल काहीतरी आक्षेपार्ह आहे, सिनेमा चे प्रमोशन प्रामुख्याने इंदिरागांधी व आणीबाणी यावर बेतलेले आहे. निर्मात्याची कशी मुस्कटदाबी केल्या जात आहे, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा कसा संकोच केला जात आहे यावर पब्लिसिटी कॅश केल्या जात होती..... तेव्हा, तेव्हा निर्मात्याने नुकसानीचा विचार केला की फायद्याचा? ही सगळी पब्लिसिटी व्यावसायिक गणिताचा भाग आहे बापूसाहेब. मग त्याचा बॅकलॅश सुद्धा झेलायला तयार असावे की नाही (खरेतर बॅकलॅशवाला सगळा गोंधळही जाणूनबुजून फॅब्रिकेटेड वाटला)

मधुरची बाजू घेऊन इथे लिहिण्यात काही अर्थ नाही. कारण हा तिकिट लावून केलेला सिनेमा आहे. ज्या सिनेमाची जशी जाहिरात-पब्लिसिटी झाली तसा तो नाही आहे असे रसप यांनी लिहिले आहे. मला वाटतं ही व्यावसायिक फसवणूक आहे.

मग काय म्हणणं आहे सोन्याबापू ? मी लिहावं की नाही ? लिहिलंच तर आधी तुमच्याकडून तपासून घ्यावं की चित्रपटकर्त्यांकडून ?

Pages