'ती- तो आणि मोडकळीस आलेला संसार....'

Submitted by निर्झरा on 25 July, 2017 - 06:15

(माणसाच्या मनातील अहंकार किंवा त्याच्या हृदयाला पोहोचलेली एखादी ठेच त्याला कुठल्या थराला नेऊ शकते याच डोळ्यांदेखत बघितलेल उदाहरण. ही गोष्ट आहे त्याची आणि तीची. ही गोष्ट मी त्यांच्याच शब्दात मांडण्याच्या प्रयत्न केला आहे. या दोघांची संसाराची घडी पुन्हा कशी जुळवावी याचा नेहमी प्रयत्न चालू असतो. पण अजूनही प्रयत्नाला यश मिळत नाही. दोघांपैकी कोणीही पडती बाजू घ्यायला तयार नाही. )

‘तो’
नेहमी प्रमाणे मी वर्गात गेलो. माझा तास सुरु झाला. एकवार सगळ्या वर्गावर माझी नजर फिरली. आज सगळे होते वर्गात ‘ती’ सोडून. मी काहीसा थांबलो. का थांबलो मी? ‘ती’ आली नाही यानी खर तर मला काहीच फरक पडत न्हवता. ईतर विद्यार्थ्यांसारखीच ‘ती’ माझी विद्यार्थीनी. मग आज अस मन बावचळ का? नाही नाही, मला काहीतरी वेगळ जाणवतय हे नक्की. पण काय?
आज काल ‘ती’च्या नसण्याने माझे शिकवायला मन लागत नाही. खर तर ‘ती’ माझ्या प्रेमात पडली आहे ही गोष्ट मला कळाली होती. मी तिकडे दुर्लक्ष केल. कॉलेज मधे अशा गोष्टी घडतच असतात. मुली बर्‍याचदा प्रोफेसरच्या प्रेमात पडत असतात. ते फक्त त्या वयातल आकर्षण असत. पण ….. गेले काही दिवस मला चैन पडत न्हवत. सारख तिच्याशी बोलाव, तिच्याबरोबर वेळ घालवावा अस होत होत. तसही मी छ्ंद म्हणून शिकवत होतो. माझ प्रोफेशन तर वेगळच होत. फक्त् हवी तशी नोकरी मिळेपर्य्ंत मी ईथे असणार होतो. मग काय हरकत आहे मी पण तिच्या प्रेमात पडलो तर……
दुसर्या दिवशी ‘ती’ आली. नेहमीच्या जागेवर बसली. मी तासावर आलो. आल्या आल्या माझ लक्ष तिच्या जागेवर गेल. ‘ती’ दिसली. मी मनातच खुष झालो. आज जरा जास्त उदाहरण देऊन मी शिकवल. तास झाल्यावर मुलांनी मला ते आवडल्याच सांगीतल, पण त्यात ‘ती’ न्हवती. मी तिच्या येण्याची वाट बघत होतो. बराच वेळ मी स्टाफ रूम मधे बसलो. ‘ती’ आली नाही.
काही दिवस असच चालू होत. मी शिकवत होतो आणि मुल येऊन त्यांना आवडल्याच सांगत होते. पोरशन पुर्ण करण्यासाठी मी रविवारीही लेक्चर ठेवल होत. आज संख्या कमी होती. तरी ही मी माझ काम प्रमाणिकपणे केल. कॉलेजला सुट्टी असल्यामुळे आज स्टाफ रूम मधे न बसता मी घराच्या रस्त्याला वळालो. माझ क्वार्टर जवळच होत. जोपर्यंत नोकरी होती ते माझ होत. सगळे आप-आपल्या मार्गाने घरी जात होते. मला कूणीतरी हाक मारली अस वाटल. मी मागे बघितल…. ‘तिच’ होती…… खर तर तिची मैत्रिण सुध्दा होती बरोबर. मला मात्र तिच दिसत होती. मी थांबलो. तिने परत आवाज दिला… ‘सर’……
माझ्या समोर तिनी एक डब्बा उघडून धरला होता. मस्त खमंग सुवास त्यातून दरवळला. डब्यात तिनी पुरणपोळ्या आणल्या होत्या. मी फक्त बघतच बसलो डब्याकडे. परत तिचा आवाज आला. “सर…. तुमच्यासाठीच आहे घ्याना.”
मी डब्यात हात घालून एक तुकडा उचलला. परत आवाज आला… “सर… सगळा डबा तुमच्यासाठीच आहे. मला नंतर दिलात तरी चालेल.” एवढच बोलून तो डबा माझ्या हातावर ठेवून ती निघून गेली. मी पुन्हा त्या डब्याकडे बघत होतो. आत चार पोळ्या होत्या. मी मनाशीच म्हणालो.. बापरे! मी ईतक खातोकी काय? मी डबा घेऊन खोलीत गेलो. मला तर वाटत होत त्या पोळ्या अश्याच आठवण म्हणून ठेवून द्याव्यात. पण पोटात कावळे ओरडत होते, तसही त्या पोळ्या ठेवल्या असत्या तर त्याला मुंग्या तर झाल्याच असत्या आणि खराब झाल्यामुळे उगाच फेकून द्याव्या लगल्या असत्या. त्यापेक्षा त्या पोटात टाकलेल्या बर्‍या. मी मस्त पैकी चारही पोळ्यांचा फडशा पाडला. कितीतरी वर्षांनी मी ईतका पोटाला तड लागेस्तोवर जेवलो असेन. जेवण झाल्यावर मी मस्त् पैकी ताणून दिली.
दोन दिवसांनी मी त्या डब्यात खार्‍या शंकरपाळ्या भरल्या आणि तिला द्यायला बरोबर घेतला. एकटा रहात असलो तरी काही गोष्टी लहान पणापासून शिकलो होतो. तेव्हा ऐकल होत की कुणी आपल्याला काही आणुन दिल की त्याच भांड रिकाम द्यायच नसत. मी डबा घेऊन वर्गात गेलो. तास संपवला. तिला डबा सगळ्यांसमोर कसा द्यावा ह्याचा मला प्रश्न पडला. मी तसाच डबा घेऊन बाहेर पडलो. योग्य संधी शोधू लागलो. तस स्टाफ रूम मधे माझ्या खुर्ची जवळ कोणीतरी आल अस वाटल. मी मागे वळून बघितल. तिच होती.
‘सर…माझा डबा?’. परत तिचा तो गोड मंजुळ आवाज. मी गडबडलो. अस स्टाफरूम मधे सगळ्यांसमोर डबा मागणे… मला जरा अवघडल्यासारखेच झाले. मी पटकन माझ्या बॅगेतून डबा काढला आणि तिच्या हातात दिला. ती काही क्षण तिथच थांबली. मी विचारल अजून काही आहे का? ती नाही म्हणाली आणि मग गेली. मला काही कळालेच नाही. जरा वेळाने माझी ट्यूब पेटली. अरेच्चा! आपण तिला तिच्या पोळ्यांबद्दल काहीच बोललो नाही. मला त्या खुप आवडल्या हे तिला सांगायच होत. कदाचित ती हेच ऐकायला थांबली असेल. आता परत तिला भेटायला हव होत.
पुढचे काही दिवस असेच गेले. ती काहीन काही माझ्या साठी करून आणायची आणि मी तिचा रिकामा डबा काहीन काही भरून द्यायचो. तेव्हा मात्र मी आठवणीनी तिच्या पदार्थांच कौतुक करायचो. ती लाजायची अन् काही न बोलता निघून जायची.
मला आता ती जास्तच आवडायला लागली. नाही नाही, मी तिच्या प्रेमात पडलो होतो. पण विचारणार कस, ती माझ्याहून ७-८ वर्षांनी लहान. खरच जमेल आमच नात? एकदा विचारून बघायला काय हरकत आहे. पण तिला मी आवदत असेल की ती फक्त टाईमपास म्हणून अस करत असेल. मी विचारल्यावर नाही म्हणाली तर..... नाही म्हणाली तर बघू पुढच पुढ. मी मनाशी पक्क ठरवल. कस बोलायच, कुठ बोलायच, काय बोलायच याची उजळणी केली. मी प्रोफेसर असून सुध्दा मला आज काय बोलायच आहे त्याची उजळणी कारावी लागत होती.
आज कॉलेजचा शेवटचा दिवस होता. सगळे जण आप-आपल्या मार्गाने निघून जाणार होते. कायमचे…….. माझ मन उगाच जोरात धडकत होत. परिक्षा संपली सगळे वर्गातून बाहेर पडले. पण माझी परिक्षा तर आता सुरू झाली होती. तिच्याशी बोलायची. मी पेपर एकत्र केले गठ्ठा बांधला आणि स्टाफ रुम मधे नेऊन ठेवला. तडख बाहेर पडलो आणि तिला शोधू लागलो. सगळीकडे तिला शोधल. तिच्या मित्र-मैत्रिणींना विचारल. ती कुठेच सापडली नाही. मनात विचारांचा नुसता काहूर माजला होता. ती निघुन तर गेली नसेल; माझी आणि तिची आता कधीच भेट होणार नाही; ती खरच भेटली नाही तर. माझ प्रेम तिला कळालच नाही तर…. मी आता तिला शोधण थांबवल. विचार करता करता खिन्न् मनाने माझ्या खोली जवळ आलो.
समोर ती उभी होती. हातात डबा घेऊन. तिला बघताच मी थबकलो. ती माझ्या दिशेने येऊ लागली. माझ्या समोर येऊन थांबली. हातातला डबा पुढ केला. मी डबा घेत तिला विचारल. डबा न्यायला परत कधी येणार. तिन उत्तर दिल. ‘ तुम्ही म्हणत असाल तर….. डब्यासाठी मी कायमची ईथेच रहायला तयार आहे तो परत करायची गरज नाही.’ मला त्या वाक्याचा अर्थ कळायला बराच वेळ गेला. ती नुसती माझ्याकडे बघत होती. काय बोलाव ते कळेना. अस वाटल की तयारी करून गेलेल उत्तर मला सांगताच येणार नाही. प्रश्न् सारखाच होता, फक्त बद्लून आला होता. मला त्याच उत्तर येत असून देता येत न्हवत. अचान्क ब्लँक झाल्यासारख झाल. कस बस काही वाक्य जुळवून मी तिच्याशी बोलू लागलो.
तुझ्या घरी चालेल्…. आपल वयातल अंतर….. तिने मला मधेच थांबवल. ‘मी सगळ्याचा विचार केलाय. मला काहीच प्रोब्लेम नाहिये. माझ्या घरचे काय म्हणतील ते नंतर बघू, आधी तुमचा निर्णय कळवा.’ मी लगेच हो म्हणालो, तस ती खुष झाली. दोन दिवसांनी भेटायला परत येईल अस सांगून ती निघून गेली. ते दोन दिवस माझ्यासाठी दोन वर्षासारखे झाले होते. कसाबसा एक दिवस काढला. दुसरा दिवस जाता जाईना. त्या वेळी आमच्या कडे मोबाईल न्हवते. ती येईपर्य्ंत मला वाट बघावी लागणार होती.
ठरल्याप्रमाणे ती आली. आम्ही आता रोज भेटू लागलो. तासन तास एकमेकांसोबत वेळ घालवू लागलो. दोन वर्ष झाली आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडून. अस वाटल की सात जन्म आम्हाला कोणीच वेगळ करू शकत नाही. आकंत बुडालो होतो एकमेकांच्या प्रेमात. मला आता तिच्याशी लग्न करायच होत. मी तिला त्या बद्दल सांगीतल. तीने घरच्यांशी बोलाव लागेल म्हणून सांगीतल. मी तिच्या घरी गेलो. तिला मागणी घालायला. तिच्या आई-वडिलांशी बोललो. सगळ्यांच्या बाबतीत होत तस आमच्याही झाल. तिच लहान वय आणि जातीचा फरक या मुळे तिच्या घरी रणकंदन झाल. आमच्या लग्नाला तिच्या घरून नकार आला.
आता…… आता काय? मी निराश मनाने घरी परत आलो. दोन तीन दिवस असेच गेले. अचानक ती आली. मला भेटली. घरच्यांना आमच्या लग्नासाठी तयार केल म्हणाली. यथावकाश आमच लग्न झाल. सुखी संसार सुरू झाला. मला हवी तशी चांगली नोकरी मिळाली. मी प्रोफेसरचा जॉब सोडला. दोघ जण राजा-राणी सारखे राहू लागलो. दोन वर्षानंतर एक छान गोंडस अस बाळ तिने मला दिल. डोळे पाण्याने डबडबले होते त्या लहानश्या जीवाला बघताना. बघता बघता माझी प्रगती होत होती. स्वताच घर झाल. आमची सोनूली आता शाळेत जाऊ लागली. घरात सुखी संसारासाठी लागणार्‍या सर्व सुखसोयी आल्या.
मी माझ्या नोकरीत स्थिर-स्थावर झालो. काही वर्ष अशीच निघून गेली. सगळ काही सुरळीत होत होत. अचानक एके दिवशी तिने मला विचारल “ मी नोकरी करू” मी हो म्हणालो. तसही ती पहिल्यापासून हुशार होती. मुलगीही मोठी झाली होती. मी हो म्हणल्यावर तीने आता एका शाळेत नोकरी मिळवली. तिच्या हुशारीमुळे तिला लगेच बढती मिळु लागली. ती तिच्या नोकरीत खुष होती.
एक एक दिवस पुढे सरकत होता. तस तीच्या वागण्यात बदल जाणवू लागले. ती आता माझ्याशी कमी आणि फोनवर जास्त मैत्रीणींशी जास्त बोलू लागली. आमच्यातील संवाद हरवत चालल होता. तिच्या आजूबाजूच्या लोकांप्रमाणे ती स्वताला अॅथड्जेस्ट् करू लागली. मी आता सगळ लक्ष माझ्या मुलीकडे देऊ लागलो.
बरेच दिवस असेच निघून गेले. आता ती माझ्या मागे माझी नोकरी बदलण्याचा हट्ट् करू लागली. कारण तिला हवी तशी नोकरी लांबच्या ठिकाणीच मिळत होती. तिच्या नोकरीसाठी मी माझी नोकरी बदलावी या गोष्टीसाठी मी तिला साफ नकार दिला. कारण मला नेहमी सेफ झोन मधे रहायला आवडत. मला त्यातून बाहेर पडायच न्हवत.
तसही जीवनावश्यक सगळ्या गोष्टी आहे त्या नोकरीतून पुर्ण होत होत्या. पण नाही, तिला वाटत होत की मी अजून चांगल्या पगाराची नोकरी करावी. या काळात तिने अनेक वेळा तिची नोकरी बदलली. हातात येणारे पैसे ती विचार न करता खर्च करू लागली. हळू हळू यावरून आमचे वाद होऊ लागले. आता माझ्यात आणि तिच्यात एक दरी तयार झाली. ती माझ्याशी नीट बोलेनाशी झाली. मी बर्‍याच वेळा तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला तिला समजावल देखील. पण नाही, ती आता काहीच ऐकून घेत न्हवती.
एक दिवस तिने मला कळवल, हो कळवलच , की तिला घरापासून दूर चांगली नोकरी मिळाली आहे. ती तिकडे जाणार आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. नकळत माझा हात तिच्यावर्…………. सगळ व्यवस्थित असताना तिने अस घरापासून दूर का जाव? मी तिला याच कारण विचारल. तस तिने सांगीतल तिला माझ्यापासून दूर जायच होत. खुप दूर…….. ती गेल्यावर मला माझी चुक उमगली. मी अस तिच्यावर हात उगारयला नको होता.
बघता बघता मुलगी दहाविच्या वर्गात येऊन पोहोचली होती. मी तिला समजावल की आत्ता मुलीला तिची जास्त गरज आहे. तिने तिच्यासाठी परत याव. पण नाही, ती निघून गेली ती गेलीच. मला आणी मुलीला असच टाकून. गेल्यापासून तिने मला कधिच फोन केला नाही. ती फक्त मुलीसोबत बोलायची.
बघता बघता मुलीच दहावीच वर्ष संपल. तिचा रिझल्ट आला. मुलगी चांगल्या मार्काने पास झाली. मला वाटल आता तरी ‘ती’ परत येईल. पण नाही, तिने आधीच ठरवल होत की मुलीला ईंजीनियर करायच. त्यासाठी तिने मुलीला एका हॉस्टेल मधे ठेवायचा निर्णय घेतला. मला खर तर तो पटला नाही. कारण मुलीला जे करायचय तिकडे मी तिला घालणार होतो. पण नाही, ईथे देखील तिने माझ ऐकल नाही. मुलीवर देखील तिने दबाव आणला. तिच्या घरच्यांनीही आता तिला समजावण थांबवल होत.
मोठ्या हौशेने तिच्या पसंतीने घेतलेल्या चार खोल्यांच्या घरात उरलो फक्त मी… मी….. आणि घरातल निर्जीव सामान……बसवलेल्या संसाराची घडी आता मोडकळीस आलीये. अनेक वेळा माफी मागून बोलावून सुध्दा ती परत यायला तयार नाही. मला कळत नाही माझ नेमक चुकल कुठ?

‘ती’
काय झालय हे माझ्या संसाराला. मला अस त्याच्यापासून लांब रहाव का वाटतय. अजून तर माझी चाळीशीपण नाही आली. तरी ईतक्याक या संसाराचा कंटाळा यावा. घरात सगळ्या सुखसोई असताना का आलीये मी ईथ माझ घर सोडून लांब. काहीच सुचत नाहीये. किती तरी वेळा त्याचे मेसेज येऊन गेलेत. माफी मागायला. पण मी अजून त्याला काहीच रिप्ल्याय नाही केलाय. ईच्छाच नाही माझी त्याच्याशी कुठल्याही माध्यमातून बोलायची. कारण…. कारण आता आमच्यात बोलणी होतच नाहीत. होतात ते फक्त वाद.
किती प्रेम करायचो आम्ही एक मेकांवर. अजुनही आठवतय मला. ते कॉलेजचे दिवस. मुद्दाम मधल्या रांगेत पहिल्या बाकावर बसायची. एकटक त्याच्याकडे बघत असायची. माझ त्याच्या प्रेमात पडण. रोज त्याच्यासाठी डबा घेऊन जाण. तो शिकवत असताना त्याच्याकड बघत राहण. त्याने विचारायची वाट न बघता मीच त्याला प्रपोज करण. त्याला रोज जाऊन भेटण. तासन तास त्याच्याशी बोलण….. आमच्या लग्नासाठी घरच्यांशी केलेल भांडण. किती वेगळे होते त्या वेळेसचे दिवस.
आमच लग्न झाल्यानंतरचे दिवस….. किती जपायचा तो मला. माझी किती काळजी घ्यायचा. खर तर काहीच कमी न्हवती आमच्या संसारात. मी त्याच्याहून लहान असल्यामुळे सगळ्या गोष्टीत तो मला समजून घ्यायचा. काही चुकल तर लटक रागवायचा. आम्हाला मुलगी झाली तेव्हा तर जणू तो एक नव्हे दोन बाळ सांभाळत होता. माझी देखील एखाद्या लहान बाळासारखीच काळजी घेत होता. मी जे मागेल ते, जे म्हणेल ते माझ्या हातात मला मिळत होत. कधिच कुठल्या गोष्टीला नाही म्हणल नाही.
मी देखील जीव लावून माझा संसार सांभाळत होते. त्या साठी माझ्या स्वताचा असा विचार मी कधीच केला नाही. बघता बघता पंधरा सोळा वर्ष झाली आमच्या लग्नाला. आता सगळ सुरळीत चाललेल असताना, मी जर स्वतासाठी वेळ द्यायच ठरवल तर त्याला ते का मान्य नाही. का…..का माझी प्रगती त्याला बघवत नाही. मी स्वतंत्र पायावर उभी रहते हे त्याला मान्य नाही. मला माझा स्वाभिमान आहे. तो मला जपायचाय. सतत त्याच्या हाताखालची कठपुतली बनून मला रहायच नाही. माझ्यात असलेल्या हुशारीचा मला उपयोग करायचाय.
त्याला ही गोष्ट का कळत नाही. माझ्या पाठीशी खंबीर उभा राहणारा माझा नवरा आता मला का साथ देत नाही. खुप चिडचिड होते आता माझी.
माझ्या मुलीला मला चांगल शिक्षण द्यायचय. तिच्या शिक्ष्णासाठी तिला बाहेर ठेवाव लागणार आहे. पण, त्याला हे नकोय. मुलीला तो लांब ठेवायला तयार नाही. माझी आणि त्याची यावरून भांडण होतात. मुलीच वय आता कळत झालय. तिच्या समोर आमचे वाद होतात.
मला हवी तशी नोकरी फक्त बाहेरच मिळतीये. मग राहिले मी काही वर्ष बाहेर तर काय हरकत आहे. ईतके दिवस मी झटलेचना त्यांच्या साठी. मग आता मी माझ्यासाठी का जगू नये……
आता माझ्या लक्षात येतय. ईतके दिवस मी त्याच्याहून लहान म्हणून तो माझी काळजी घेत न्हवता ; तर तो मोठा असल्याचा अधिकार माझ्यावर गाजवत होता. मी त्याला त्याच प्रेम समजत होते. श्शी….. किती वेडी होते मी. हे सगळ मला ईतक्या उशीरा कळाव. मी मागेल ती गोष्ट् मला घरबसल्या मिळायची. मला त्याने कधी बाहेर पडूच दिल नाही. या चार खोल्यांच्या आत माझ अस्तित्व बंदिस्त झाल होत. बास आता अजून नाही. मी माझ अस्तित्व त्याला दाखवून देणार. कळूदेत त्याला, मी नसताना त्याच काय होत ते. मग त्याने कितीही माफी मागू देत मी परत येणार नाही. त्याने त्या दिवशी माझ्यावर उगारलेला हात…. हे मी कधीच विसरू शकत नाही.
पण मी हे अस किती दिवस करणार? याला नक्की अंत आहेना? की…… हे असच चालू राहील. पण मला खरच आता त्याच्या बद्दल प्रेम वाटत नाही. मी अशीच एकटी राहणार. मुलीची काळजी करायच काहीच कारण नाही. कारण तिला हॉस्टेलला ठेवल्यामुळे मला तिच्या कडे जास्त बघाव लागणार नाही. आता मी मला हव तस जगायला मोकळी आहे. खर तर मला त्याच्यापासन कागदोपत्री वेगळ व्हायचय, पण माझ्या मुलीसाठी मला तस करता येणार नाही. निदान तिच लग्न होईपर्यन्त तरी. तो पर्यंत तरी हे असच चालू ठेवाव लागणार.
मला अजूनही कळत नाही की माझ्यावर अशी वेळ का यावी. काय चुकल माझ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे...
छान लिहिलय .. दुसर्याच्या आधि आपल्याला स्वताच मन ओळखता आलं पाहिजे ..

छान आहे.
दुसर्याच्या आधि आपल्याला स्वताच मन ओळखता आलं पाहिजे ..>>>+१

छान लिहिलेय...
संसार करताना दोघांनी एकमेकांना समजून घेतल पाहिजे.. त्यासाठी संवाद गरजेचा...

मस्त लिहिलीय....
प्रेम आणि संवाद या दोन्ही गोष्टी एकमेकांबरोबर वाढतात....प्रेम असेल तर संवाद वाढतो आणि संवाद असेल तर प्रेम....

आरे व्वा.. छान लिहिलंयस!!
आपल्यापुढे उद्या कायकाय वाढून ठेवलंय, याची कल्पना यावी असं... Lol धन्स...

लग्न व्हायच्या आधी 2 वर्ष व लग्नानंतरची 15 16 वर्ष इतका प्रदीर्घ काळ एकत्र राहूनही दोघांनाही एकमेकांचे विचार काय आहेत, इच्छा काय आहेत याचा जराही अंदाज आला नाही? त्याला सेफ झोन मध्ये राहायला आवडते हे त्याने स्वतःहून प्रोपोज केले नाही व तिच्या आईवडिलांनी नकार दिल्यावर तोच फायनल समजून त्याने दुःख केले या 2 घटनांवरून तरी तिला कळायला हवे होते. पण तेव्हा प्रेमाची नशा चढलेली. ती उतरायला 17 वर्षे लागली. त्यानंतर अचानक आपण कठपुतळी झालो याचा साक्षात्कार झाला. स्वाभिमान जागा झाला. संसार असा होत नसतो. जो निर्णय घेतलाय तो खंबीरपणे निभावण्याने संसार होतो. तिचे खरेच प्रेम असते तर तिने आहे त्याच संसारात राहून त्याचा सेफ झोन टिकवला असता व स्वतःचा स्वाभिमानही सांभाळला असता. मला त्या बिचाऱ्याची दया येतेय. तिने गरज होती तेव्हा जवळ केला, गरज संपली तेव्हा दूर केला.

@ साधनाजी
तिचे खरेच प्रेम असते तर तिने आहे त्याच संसारात राहून त्याचा सेफ झोन टिकवला असता व स्वतःचा स्वाभिमानही सांभाळला असता. मला त्या बिचाऱ्याची दया येतेय.
अगदी हेच म्हणने आहे. ज्या काही चुका दोघांकडून झाल्या असतील त्या विसरून पुन्हा नव्याने संसार सुरू करावा. पण आता 'ती' ला कुठल्याही बंधनात अडाकायच नाहीये. तीच्या साठी तो आजच्या जगात कस राहील पाहीजे हे न कळणारा एक वयस्कर माणूस झाला आहे.

@ साधनाजी,
तिने गरज होती तेव्हा जवळ केला, गरज संपली तेव्हा दूर केला. >> हे कस म्हणू शकता? तो काहि लहान नव्हता तीने प्रपोज केले तेव्हा त्यालाहि ह्याची जाणीव होती कि त्याला ती हवी आहे. खरतर सतत तेच वाद घालत एकत्र रहाण्यापेक्षा वेगळे झालेले कधीहि चांगले..... हे.मा.व्य,म.

निर्झरा ..
खुपच छान लिहिल आहेस ... एकमेकांच्या मनातिल विचार आणि भावना छान मांडल्या आहेत ...
साधना मि तुझ्या मताशी सहमत आहे. ..

तिने गरज होती तेव्हा जवळ केला, गरज संपली तेव्हा दूर केला. >> हे कस म्हणू शकता? तो काहि लहान नव्हता तीने प्रपोज केले तेव्हा त्यालाहि ह्याची जाणीव होती कि त्याला ती हवी आहे.≥>>>>>>

तेव्हा दोघांनाही गरज होती, तिला जास्त म्हणून ती वय, बिरोध सगळे मॅनेज करायला तयार झाली. तीने सुरवातीपासून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ठेवायला हवे होते. ते न करता ती लाड करून घेत राहिली. त्याचा कंटाळा आल्यावर तो लगेच 'माझी किती काळजी घेतो' मधून 'मला जराही मोकळेपणा देत नाही' कॅटेगरीत गेला.

गोष्ट म्हणण्यापेक्षा वर लिहिलेला 'प्रसंग' वाचला असं म्हणेन.
कोणत्याही दोन व्यक्ती एकत्र राहताना एकत्र 'वाढल्या' तर ते नातं सुरळितपणे पुढे जाते. त्यातूनही त्या दोन व्यक्तींची वाढ ही वैयक्तिकच असते आणि त्यात खूप फरक असतो. एकमेकांचा आदर, आवडी निवडी, तफावती यांना जमेत धरून थोडे तुझे थोडे माझे करत छान निभावून जाते. मला 'ति' कुठे ही चुकिची वाटली नाही. महत्वाकांक्षी असणे चूक नव्हे. आणि नसणे हे सुद्धा. 'तो' आहे त्यात आनंद मानणारा वाटला. त्याचे ही चूक नाही. शेवटी व्यक्ती म्हणून तिची स्वप्न ही महत्वाची आहेत. अनेक बायका नवर्‍यांना बाहेर देशी नोकरी मिळते म्हणून स्वतःची स्थिरस्थावर नोकरी सोडून त्याच्या बरोबर जातात. इथे 'ती'ची अपेक्षा तशी नाही. तिला नोकरीच्या ठिकाणी काही वर्ष राहून स्वतःला सिद्ध करायचं होतं, प्रत्येक वेळी 'खूप पैसे' हा अजेंडा नसतोच, मोठे काम करून समाधान ही त्यापेक्षा कितीतरी मोठी बाब आहे. मुलिच्या शिक्षणासाठी तिला बाहेरगावी ठेवणं हे ही चूक नाही वाटत, यासाठी आता हे पहाव लागेल की मूळात ती सध्या जिथे आहे तिथे शिक्षणाची योग्य सोय आहे का? नसेल तर ती' चा विचार बरोबर आहे. असेल तर नवरा बायकोनी सल्लामसलत करून ही बाब समेटावर आणली पाहिजे.
आणि नात्यात प्रत्येक माणूस दुसर्‍याला वापरत असतोच मग ते नातं कोणतंही असो. एकमेकांना वाटणारी एकमेकांची गरज हाच मोठा उपयोग आहे. (हेमावैम)

आवडली गोष्ट पण मला असं वाटतं तिने त्याला थोडं समजुन घ्यायला हवं. त्यालाही स्वाभिमान आहे पण त्याच्या मुलीसाठी,संसारासाठी तो सोडून माफी मागतोय ना तो मग माफ करायला काय हरकत आहे?

समजुन उमजुन घेतलं तर नक्किच काहीतरी मार्ग निघू शकतो..इतक्या टोकाची भुमिका तिने घेणं. हे कुठेतरी पटत नाही मला.

मस्त

मस्त. छान लिहिलेय. दोन्ही बाजू पटल्या. दोन वेगळ्या दिशेने आयुष्याचा प्रवास करणारया लोकांनी एकत्र येऊ नये. तिचे वय लहान असल्याने हे दोघांना समजायला वा हे घडेपर्यंत काही काळ गेला असे म्हणू शकतो.

लहानपणी एक क्रूर खेळ खेळायचो. एका दोरीच्या दोन टोकांना दोन चतुर बांधायचो. दोघांना वेगळ्या दिशेला उडायचे असायचे. दोघांची एकमेकांसोबत फरफट व्हायची. ती बघून आसुरी आनंद मिळायचा. ते वेगळे. पण ही कथा वाचून सहज ते आठवले.