रंग नवा

Submitted by _तृप्ती_ on 24 July, 2017 - 05:14

ते पाखरू कोळ्याने विणलेल्या जाळ्यात अडकत चालले होते. जितके बाहेर पडायचा प्रयत्न करावा तितके अजूनच अडकत होते. जाळे नाजूक आणि अत्यंत सफाईने विणलेले होते; आणि पाखरू त्याहूनही नाजूक आणि मुलायम. कधी कसे अडकले ते कळलेच नाही..
*****************************************************
त्याचे चित्र आता आकार घेऊ लागले होते. हिरव्या, निळ्या रंगामध्ये मुक्त मोकळे वारे वाहू लागले होते. पावसाची एक सर वेगाने कागदावर चितारली जाऊ लागली. त्याचा हात सफाईने कॅनव्हासवर रंगांची शिंपण करू लागला.
*****************************************************
पाखराची धडपड सुरूच होती. वाऱ्याच्या हेलकाव्याने जाळे जरा हलले पण निसटले नाही. पावसाचे काही थेंब त्यात अडकले आणि मोत्याचा साज अर्पण करून बसले. त्याचे ईकडे लक्षच नव्हते. त्याला ओढ लागली होती पुन्हा भरारी घेण्याची, वाऱ्यावर मुक्त वाहण्याची.
*****************************************************
त्याने एकदा चित्राकडे निरखून पाहिले. गवताची पाती वाऱ्यावर हळुवार डुलत होती, झाडाच्या डहाळीवर पाने थरथरत होती. सारा आसमंत नव्या नवलाईने, चैतन्याने तरारून आला होता. ते कोपऱ्यातले झुडूप मात्र थोडे कोमेजल्यासारखे दिसत होते. त्याने पुन्हा हिरव्या पिवळ्या रंगात ब्रश बुडवला. क्षणभर विचारात पडला; याला पालवी फुटेल का पावसामध्ये उन्मळून पडेल. त्याने काहीसा विचार केला आणि चितारायला सुरवात केली.
*****************************************************
पाखरू आता हतबल झाले. त्याची आधीच इवलीशी ताकद, आता अधिकच केविलवाणे दिसू लागले. पण कुठेतरी अजूनही एक अंधुक आशेचा किरण होता. कोणीतरी त्याला इथे पाहिल आणि त्याची सुटका करेल. पण या वेड्या आशेवर, ते अजून किती वेळ तग धरणार?
*****************************************************
चित्रकार प्रथमच स्वतःच्याच कलेवर मनापासून खुश झाला. तो समजून चुकला होता, हे चित्र म्हणजे निव्वळ त्याला पडलेले एक विलक्षण स्वप्न असले तरी त्याच्या मनाचे प्रतिबिंब आहे. आसमंतात वारे वाहत होते, सारी सृष्टी हिरवा साज ल्याली होती. पावसाची सर रान चिंब भिजवत होती. गवताची पाती हळुवार डोलत होती आणि त्या कोपऱ्यातल्या झुडुपावरून दोन इवलीशी पाखरे आकाशाकडे झेपावत होती...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मी इथे नवीन आहे आणि ही माझी पहिलीच post आहे. मी योग्य गटामध्ये post केली आहे का?
लेखनावर आपला अभिप्राय जरूर कळवा.

chaan lihilay..tya don goshtincha kahi sambandh ahe ka..tevdha samjla nahi...

धन्यवाद किल्ली, नित्सुला, राहुल.
थोडं उलगडून सांगायचा प्रयत्न करते. दोन कथा समांतर असल्या तरी एकमेकांशी नातं जोडू शकणाऱ्या आहेत. पाखरू हे जिवंतपणाचं लक्षण पण हळूहळू चैतन्य गमावत चालले आहे. पाखरू हे दैनंदिन आयुष्याला कंटाळलेल्या माणसाचे प्रतिक म्हणूनही पाहू शकतो. दुसरीकडे निर्जीव चित्रामध्ये जिवंतपणा आणणारा चित्रकार. तो तिथे मनातले चैतन्य निर्माण करतो, पाखराला मुक्ती मिळवून देतो. हे प्रतीकात्मक लिहिलं आहे. बऱ्याच ठिकाणी वाचक अजूनही वेगळे अर्थ लावू शकतो, त्याला जसे भावतील तसे. पण हा गर्भितार्थ आहे.

होय कळले मला - 'हे चित्र पहा - ते चित्र पहा'
__________
https://www.youtube.com/watch?v=eYZwoodmAhw

कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
समवन इज क्राइंग लॉर्ड कुम्बायाह ..
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
समवन इज प्रेइंग लॉर्ड कुम्बायाह ..
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
समवन इज लाफींग लॉर्ड कुम्बायाह ..
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
समवन इज सिंगींग लॉर्ड कुम्बायाह ..
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह

................... कोणी हसत असतं आणि त्याचवेळी जगात कोणी रडत असतं, कोणी सुखाच्या शिखरावर असतं त्याच क्षणि कोणीतरी दु:खाने पिचलेल ......
आयुष्य आहे!!