गावामधील पोरी

Submitted by santosh watpade on 24 July, 2017 - 04:05

भिजतात पावसाने गावामधील पोरी
गंधाळल्या कणांनी भरते घरात दोरी
पुसला जरी कितीही वाफाळतो भिलावा
दिसतात व्रण गुलाबी टाचेवरी बिलोरी...

भिजतात पावसाने गावामधील पोरी
वेल्हाळतात नजरा कोठेतरी टपोरी
सरवा पुनवर्सूचा मातीत खोल मुरतो
झंकारतात त्यांच्या कायेवरी सतारी...

भिजतात पावसाने गावामधील पोरी
असतो मनात त्यांच्या आपापला मुरारी
पाऊलवाट अल्लड ओलांडुनी मनाची
जातात भेटण्याला काळोखल्या दुपारी...

भिजतात पावसाने गावामधील पोरी
सुकवून अस्तरांना खोळंबतात दारी
बंदिस्त पाखरांना घेता न ये भरारी
मन धावते तरीही भरल्या नदीकिनारी...

-- संतोष वाटपाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.

छान आहे Happy
भिलावा
बिलोरी...
सरवा
या शब्दांचे अर्थ सांगा ना

भिलावा = बिब्बा
बिलोरी = काचेप्रमाणे
सरवा = पिक कापणीनंतर उरलेल्या पिकाच्या काड्या,फळे इत्यादी

धन्यवाद मित्रांनो....