बाळा, उरले तुजपुरती....!

Submitted by अनन्त्_यात्री on 24 July, 2017 - 01:00

कोणत्याही युद्धग्रस्त देशात घडणारी एक नेहमीची घटना. एक सैनिक लढता लढता धारातीर्थी पडतो. अंत्यविधीसाठी त्याचे शव त्याच्या घरी आणतात. सुन्न झालेले त्याचे कुटुंबीय व सुहृद त्याच्या मृत्यूचे दु:ख अन त्याच्या भविष्याची चिंता यात दुभंगून गेलेले असतात. वातावरणात एक अस्वस्थ करणारी , दुखरी शांतता……..काळ जणू गोठलाय. पण त्याचवेळी कठोर वास्तव आपल्या निर्मम अस्तित्वाची जाणीव करतंय...

सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी या अटळ परिस्थितीवर कविता लिहिली त्यावेळी ब्रिटनचा राजकवी असलेल्या कवि आल्फ्रेड टेनिसन याने. मात्र या कवितेचे वेगळेपण असे की त्याने ही कविता त्या अनाम सैनिकाच्या पत्नीच्या - गोठलेपणाची परिसीमा गाठलेल्या - अवस्थेवर लिहिली .

ती मूळ कविता (HOME they brought her warrior dead ) व तिच्या भावानुवादाचा मी केलेला प्रयत्न:

HOME they brought her warrior dead:
She nor swooned, nor uttered cry:
All her maidens, watching, said,
‘She must weep or she will die.’

Then they praised him, soft and low,
Called him worthy to be loved,
Truest friend and noblest foe;
Yet she neither spoke nor moved.

Stole a maiden from her place,
Lightly to the warrior stepped,
Took the face-cloth from the face;
Yet she neither moved nor wept.

Rose a nurse of ninety years,
Set his child upon her knee—
Like summer tempest came her tears—
‘Sweet my child, I live for thee.’

मूळ कवितेचा भावानुवाद:
==================
मृत्युंजय रणवीराचे
कफनात कलेवर बघुनी
विमनस्क वीरपत्नीच्या
डोळ्यात गोठले पाणी ...

कुणि अनुपमेय शौर्याच्या
तडिताघाताने दिपले
कुणि असह्य मित्रवियोगे
हेलावून आतून गेले….

पण नजर "तिची" थिजलेली
शून्यात जणू खिळलेली
धगधगत्या वैशाखाने
कोवळी पालवी जळली..

"अश्रूंना कोंडिल जर ही
उरी फुटेल पोर बिचारी
झेलील कसा मग असला
नियतीचा घाव जिव्हारी"

सारिले कुणी मग मागे
वीराचे कफन जरासे
पतिमुख पाहूनही तिजला
ना मूर्च्छा, नाही उसासे

अश्राप तान्हुले त्याचे
ठेविले कुणि तिज पुढती
कोसळता वळिव म्हणाली,
'बाळा, उरले तुजपुरती,
बाळा, केवळ तुजपुरती"...

Group content visibility: 
Use group defaults

अत्यंत सुरेख!
आधी धगधगता वैशाख आणि शेवटी कोसळता वळीव या उपमा आणि त्यांचा योग्य ठीकाणी उपयोग खूप आवडला.

निःशब्द....
कमालीची शब्दयोजना....