कधी मध्यम,कधी पंचम...

Submitted by सत्यजित... on 21 July, 2017 - 11:05

कधी मध्यम कधी पंचम,सुरांचा साज अलबेला
किती समतोल आहे हा,तुझा अंदाज अलबेला!

मनाचा वेगही अाता अनावर वाढला आहे
मला हाकारतो आहे तुझा आवाज अलबेला!

असे भरतेस काजळ तू तुझ्या डोळ्यांत बंगाली
निशाणा बांधतो कोणी निशाणेबाज अलबेला!

फुलांचे अंग मोहरते,तुझ्या केसांत शिरताना
असावा स्पर्शही कोमल किती निर्व्याज अलबेला!

लिहावे वाटते तेंव्हा सतत दिसतेस तू मजला
कसा गझलेमध्ये बांधू सखीचा बाज अलबेला!

कुणी का पाहिला होता?गुलाबी रंग पुनवेचा!
मला तर वाटतो आहे खरा मी आज अलबेला!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद राहुल आणि अक्षय!

शशांकजी,आपल्याकडून सतत प्रोत्साहन मिळत राहते,त्याबद्दल मनापासून आभारी अाहे!

आपण खरच अलबेले आहात ! मी प्रथमच तुमच्या गझल वाचत आहे . मंत्रमुग्ध अनुभूती !