पुळण - भाग ८

Submitted by मॅगी on 20 July, 2017 - 02:27

भाग ७

चमकता कोयता जसजसा जवळ येताना दिसू लागला तसतशी समिपा घाबरून मागे सरकत सरकत इनडोअर रेस्टोरंटच्या दारापर्यंत गेली आणि पळतच समोर आलेल्या वॉशरूमचे दार उघडून आत शिरली. बेसिनसमोर उभी राहून तिने समोर पाहिले तर मोठ्या आरशात आतल्या बाजूने समुद्राच्या उधाणलेल्या लाटा टकरा देत होत्या.

अचानक त्या पलीकडच्या बाजूला अंधारून आले आणि वाळूत पाऊस पडू लागला. पावसाच्या ओघळांमधून किनाऱ्याच्या रस्त्यात एक जोरात पळणारी बैलगाडी दिसू लागली. रस्त्याच्या पलीकडे दाट पसरलेले सुरू आणि केतकीचे बन होते त्यातून काळोखात कोल्हेकुई सुरू झाली होती. त्या आवाजामुळे रस्त्यावरचे चुकार कुत्रेही जोरजोरात भुंकत होते. गाडीवान बैलाला हैsss हैss करून ढोसणी टोचून अजून जीव काढून पळवत होता. कुठेतरी एक लहान मूल कळवळून रडू लागले..

समिपा तिच्या नकळत किंचाळणे थांबवून आता रडत होती. तोंडाने "नाही, नाही.. त्याला पकडा, पकडा" एवढच वाक्य पुन्हापुन्हा म्हणत होती. नलिन दोन वेट्रेसेसना बरोबर घेऊन स्त्रियांच्या वॉशरूममध्ये आला, समिपाला शांत करून एका ठिकाणी बसवले आणि तिच्या आईला कॉल केला.

"काकू, समिपाला बरं वाटत नाही, मी तिला घरी आणतोय तुम्ही डॉक्टरांना बोलवून ठेवा" नलिन जरा घाबरूनच बोलत होता. " नाही, नाही accident वगैरे नाही.. काय? नाही. ड्रिंक्स काय कॉकटेेलसुद्धा घेतलं नाही तिने. थोडी शॉक मध्ये आहे. माहीत नाही जेवता जेवता अचानक तिला कोणीतरी दिसलं म्हणून ती घाबरली. हो.. लगेच निघतोय.. अर्ध्या तासात पोहोचू घरी"

समिपाचे डोके आता प्रचंड ठणकू लागले होते. कपाळाच्या आतून जणू काही कुणी हातोड्याचे घाव घालतोय अश्या सेकंदा सेकंदाला कळा येत होत्या. अंगातली सगळी शक्ती नाहीशी होऊन, फुलपाखरू उडून गेल्यावर राहिलेल्या एखाद्या निर्जीव कोशासारखी तिची हल्लक अवस्था झाली होती.

------------------------------------------------------

नलिन आणि त्या दोन मुलींनी तिला धरून पार्किंग पर्यंत नेऊन कारमध्ये बसवले. नलिन प्रचंड प्रेशरखाली ड्राईव्ह करत समिपाच्या घरी पोहोचला. डॉ. मिलिंद तिथे हजरच होते. नलिन आणि बाबांनी समिपाला आत नेऊन झोपवले. मिलिंदने चेक करूनही काही वेगळेपणा किंवा कुठल्याही रोगाची लक्षणे आढळली नाही.

"नलिन, तू पण दमला आहेस.. घरी जाऊन शांत झोप आता.. आम्ही घेऊ काळजी तिची" समिपाचे वडील म्हणाले. तिची आई आधीच बेडरूममध्ये समिपाच्या उशाशी तिचा हात हातात घेऊन बसली होती.

"ओके काका, मी निघतो.. तुम्हीपण आराम करा आता. काही लागलं तर सांगा, मी येतो लगेच" म्हणून नलिन निघाला.

नलिन निघताच इतका वेळ टिकवलेला धीर सुटला आणि सुनीलच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मिलिंदने येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

"सुनील, घाबरू नको पण तुला एक सुचवायचं आहे. मी बऱ्याच दिवसांपासून रेवतीला सांगत होतो की समीचे कॅट स्कॅन आणि इतर सगळे चेकअप्स करून घ्या. तिच्या डोळ्यासमोर अंधार आणि चक्कर येणं मला जरा डाऊटफुल वाटतंय. माझ्या ओळखीचे एक न्यूरॉलॉजिस्ट आहेत, हे त्यांचं कार्ड. प्लिज लवकर समीसाठी अपॉइंटमेंट घे. Ok? चल येतो मी." हातातील कार्ड बघत सुनील मटकन सोफ्यावर बसला.

दुसऱ्याच दिवशी समिपासाठी अपॉइंटमेंट घेतली गेली, सगळ्या टेस्टस झाल्या. समिपाकडे बघून वाटतही नव्हते की काल ही मुलगी इतक्या तणावातून गेली आहे. उलट स्कॅनसाठी सरकत आत जातानाही ती घाबरलेल्या आईबाबांना all ok म्हणून अंगठा दाखवत आत गेली. टेस्ट रिझल्टमध्ये ना तिच्या डोळ्यांना काही प्रॉब्लेम होता, ना मेंदूला. सगळे काही नीट चालू होते.

------------------------------------------------------

समिपा वरवर शांत दिसत असली तरी तिला आजकाल फार अस्वस्थ वाटत होते, कामात इंटरेस्ट येत नव्हता. जरा विचार करायला लागली की डोक्यात निरनिराळ्या भितींची जणू कोळीष्टके लागल्यासारखे भास व्हायचे. ऑफिसला जाऊ लागली तरी फक्त नलिनचाच आधार होता. तिचं अपूर्ण राहिलेलं काम न सांगताही तो पूर्ण करत होता.

कामाचे प्रेशर खूप वाढले होते, वनराजी प्रोजेक्टची ड्यू डेट अगदी जवळ येऊन ठाकली. त्यातच 'बडे पापा की डेथ हो गई' सांगून क्यूटी पंधरा दिवस सुट्टी घेऊन चंदिगढला गेली.

वनराजीचे फ्लोअरिंग करणाऱ्या राजुभाईचे काम नीट होत नव्हते म्हणून दोन तीन वेळा कॉल आल्यावर समिपा तरातरा ऍक्टिवा काढून वनराजीकडे निघाली.

पोहोचताच फ्लोअरिंग बघायला गेली तोच पहिल्या खोलीत खुर्चीत रुबाबात बसलेली सखुबाई दिसली. तिच्याकडे दुर्लक्ष करुन समिपाने राजुभाईला गाठले.

"काय झालं राजुभाई? तुमच्या कामातला प्रॉब्लेम तुम्हाला कळत नाही म्हणजे काय?" समिपाने कंबरेवर हात ठेऊन विचारले.

"अहो मॅडम, काय सांगायचं.. इथे वेगळाच घोटाळा झालाय. ज्या खोलीचं काम सुरू करू तिथं गुलाल नि बुक्का टाकलेला भात येतंय की एकदम. माझा एक गडीमाणूस टिकत नाय बघा ". राजुभाई म्हणाला.

काय! म्हणून आश्चर्याने समिपा प्रत्येक खोलीत जाऊन पाहू लागली. प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात आंबूस वास येणारा लालकाळा वाळलेला भात एका पिंपळाच्या पानावर ठेवलेला होता.. आणि .. खिडकीच्या उघड्या दारातून समोर गुलमोहोराच्या फांदीवर फास लावलेली एक बाहुली हेलकावे खात होती.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे ! उत्तरोत्तर सर्व प्रकरण फार गुढ़ होत चाललेय
मानवी हस्तक्षेप की अजुन काही ? लवकर पुढचे भाग वाचायला आवडेल

मस्त जातेय कथा. तू फटाफट टाकतेयस ते फार छान करतेयस. आधीच्या भागाची लिंक दे ग पुढच्या भागात.

मानवी हस्तक्षेप तर आहेच, सखूबैला पसंत नाहीय जागा हातातून गेल्याचे. पण समिपाला तिथे नसताना जे भास होतात त्याचा संबंध कुठेतरी असवासा वाटतोय.

मॅगी तुझं लिखाण एकदम उत्तम आहे...यार तिकडे असल्यासारखं वाटत गोष्ट वाचताना थोडे मोठे भाग टाकल्स तर अजून गंमत येईल आणि रहस्य वाढतच चाललंय याचा उत्तरार्ध वाचायला खूप उत्सुक आहे मी करण त्यात संपूर्ण रहस्य उलगडून सांगशील पण तोपर्यंत उत्सुकता ताणली जातेय खूप...

सगळ्यांना धन्यवाद.
पहिल्यांदाच कथा लिहित असल्याने मोठे भाग लिहायला सुचत नाहीये. तशीही कथा आता चार पाच भागात संपेल.
तोपर्यंत सांभाळून घ्या Happy