जग्गा जासूस - एक फ्रेश अनुभव

Submitted by धनि on 19 July, 2017 - 11:18

कालच जग्गा जासूस पाहिला. इथे आलेला रिव्ह्यू मुद्दामच वाचला नव्हता.

आता डिस्क्लेमर : मला रणबीर कपूर काही फार आवडत नाही, अरिजीत तर अजिबात आवडत नाही. प्रितम चाल ढाप्या असला तरी तो आवडतो.

असे सगळे असतानाही फक्त ट्रेलर बघून अ‍ॅडव्हान्स तिकीटं काढली होती. तिकीटं मंगळवारची होती त्यामुळे पूर्ण विकांतभर कुठले ही परिक्षणं वाचली नाहीत. चर्चा अजिबात ऐकल्या नाहीत. तसे पहाता रणबीर चे ए आय बी बरोबर पॉडकास्ट पाहिले होते. पण ते म्हणजे गावभरच्या गप्पा असतात त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. आणि पिक्चर बघायला गेलो. कुठलीही अपेक्षा न ठेवता पिक्चर बघायला जाणे चांगले असते म्हणजे कसाही असला तरी निदान काय वाटलं होतं आणि काय निघाला पिक्चर असे तरी होत नाही. पण पहिल्या १५ - २० मिनीटांमध्येच पिक्चर आवडून गेला. आणि पुढे सबंध पिक्चरभर खुप एंजॉय केले.

पिक्चर नेहमीच्या सरधोपट मारधाडपट किंवा लव्ह स्टोरी सारखा अजिबात नाहीये. त्यामुळे जर कोणी तशा अपेक्षा ठेवत असेल तर मोठाच अपेक्षाभंग होईल. पण जसा ट्रेलर मध्ये दाखवतात तशीच एका तरूण गुप्तहेराची कहाणी आहे. पहिला भाग त्याच्या सुरूवातीच्या काही केसेस दाखवण्यात जातो. तसेच आपल्याला त्याच्या लहानपणीची कहाणी सुद्धा कळते. एका माणसाने त्याचा कसा सांभाळ केला आणि मग निघून गेला ते कळते. आणि मग दुसर्‍या भागात आपण जग्गा बरोबर त्या माणसाला शोधायला निघतो. मणिपूर मधून प्रथम कलकत्त्याला आणि मग कुठेतरी अफ्रिकेत जातो. या प्रकारात तो एका आतंरराष्ट्रीय हत्यारे स्मगलींग करणार्‍या टोळीचा एक प्लॅन पण फोल ठरवतो. सगळा पिक्चर असा मस्त बघण्यासारखा झालाय. पूर्वार्धातील मणिपूर मधली हिरवळ आणि अफ्रिकेमधले रखरखीत पिवळी छटा असलेले चित्रीकरण सुंदर दिसते.

सगळ्यांची अ‍ॅक्टिंग मस्त झालेली आहे. रणबीर चक्क मला पण आवडला. रणाबीर ने एक नीट बोलता न येणारा पण खुप हुशार असणारा तरूण मस्त साकारला आहे. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव झरझर बदलतात आणि एक निरागसपणा दिसतो. सौरभ शुक्ला तर मस्त असतोच नेहमी. कत्रीना ने एक धांदरट मुलगी मस्त साकार केलीये. पण सगळ्यांत जास्ती उल्लेखनीय आहे तो म्हणजे जग्गाचा बाप झालेला सास्वत चॅटर्जी. याला आपण या आधी एक खुनी म्हणून कहानी मध्ये पाहिलेले आहे. त्याने याही पिक्चर मध्ये अगदी मस्त काम केलेले आहे. आधी स्टॅमर असलेल्या जग्गाला बोलतं करण्याकरता त्याला र्‍हाईम्स मध्ये बोलण्याची आयडीया देणे , मग त्याचा सांभाळ करणे आणि आपला क्वेर्कीनेस दाखवणे हे अगदी उत्तम जमलेले आहे त्याला. बाकी लोकांचा अभिनय पण मस्त जमलाय.

आता मेन गोष्ट संगित. तसे पहाता या पिक्चर मध्ये ६ गाणी आहेत. आणि तसे पहाता २० च्या वर आहेत. रूढ अर्थाने जी गाणी आहेत ती ६ आहेत. त्या पैकी गलती से मिस्टेक आणि उल्लू का पठ्ठा आधीच हीट झालेली आहेत. ती गाणी आणि त्यांची कोरीयोग्राफी मस्त आहेच , सब खाना खाके दारू पिके चले गये हे गाणे अगदी भन्नाट जमून आले आहे. बाकी २० म्हणजे सगळ्यांनी र्‍हाईम्स मध्ये म्हटलेले संवाद आहेत. हा हिंदी चित्रपटांकरता नविन प्रयत्न आहे. ही काही नॉर्मल गाणी नाहीत. त्यामुळे काही लोकांना विचित्र वाटू शकते. पण जर एंजॉय करत पाहिले तर मात्र अगदी मज्जा येईल. मला स्वतःला गाणी असलेले चित्रपट पहायला आवडतात. आता रिसेंटली बेबी ड्रायव्हर पाहिलेला आणि तो सुद्धा खुप आवडलेला त्यामुळे जग्गा पण खुप आवडला. एक वाईट गोष्ट म्हणजे काही ठिकाणी म्युझीक त्या डायलॉग्ज वर भारी पडते आणि मग आपल्याला डायलॉग्स ऐकू येत नाहीत. ते म्युझीक थोडे लाऊड नसते तर अजून चांगले वाटले असते.

मला असे वाटते की लहान मुलांना तर अगदी आवडून जाईल हा चित्रपट आणि मोठ्यांनाही आवडायला हरकत नाही. बाकी स्टोरी काय आहे ते लिहीत नाही कारण हा एक गुप्तहेराचा पिक्चर आहे आणि तो पडद्यावर बघूनच मज्जा येईल. एक वेगळा प्रयत्न म्हणून नक्की बघा पण बघायला जाताना सगळ्या गोष्टी एंजॉय करायचा विचार करून गेलात तर या चित्रपटातून बरेच काही हाताला लागेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संगीतक आहे हे रसप यांच्या धाग्यावर समजले. चित्रपट कसाही असो रणबीर आवडीचा आणि काहीतरी ईण्टरेस्टींग म्हणून नक्की बघणार...
मात्र ते शीर्षकात लिहिलाय त्या फ्रेश शब्दाचा बर्फीपासून धसका घेतलाय.. ईथे सुद्धा तीच टीम आहे ना.. कुठून काय उचललेय हे आता हळूहळूच समजेल.

शक्य आहे. ट्रेलर पाहून मात्र वाटला नाही. मी ईण्ग्लिश पिक्चर मोजकेच बघत असूनही मला तसलाच फिल आला. खुद्द रणबीर काही दृश्यात हॅरी पॉटर वाटला. आता त्याला हरी पुत्तर किंवा हरी कुंभार बोलणे हे आपलेच समाधान.
अर्थात चित्रपट चांगलाही असेल. किंबहुना बर्फीचेच उदाहरण घ्या. मला अफाट आवडलेला. म्हणूनच जेव्हा नंतर त्यातली उचलेगिरी समजली तेव्हा जास्त त्रास झाला. एक ती असते ना, फसवले गेल्याची भावना. हा जर आधीच तसे असणार हे गृहीत धरून गेलो तर मात्र निखळ आनंद घेता येईल.

तेच म्हणतो आहे की उचलेगिरी आहे की नाही हे माहिती नाही पण मजा मात्र आली पिक्चर बघताना. आपल्याकडचाच वाटतो म्हणजे त्याचा फिल आपल्याकडचा आहे. बाप - मुलगा, मग बॉइज होस्टेल, कलकत्ता. सगळे असे भारतातलेच वाटतात.

नक्की काय ते सांगा. तिकडे त्यानी तर लै चंपी केलीय या पिक्चरची.... >> Lol बाबा अहो तुम्हाला काय आवडतं ते ठरवून बघायला जायचं. त्यांना नसेल आवडला. मला आवडला. आता प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते.

नक्की काय ते सांगा. तिकडे त्यानी तर लै चंपी केलीय या पिक्चरची.... >> Lol बाबा अहो तुम्हाला काय आवडतं ते ठरवून बघायला जायचं. त्यांना नसेल आवडला. मला आवडला. आता प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते.
नवीन Submitted by धनि on 20 July, 2017 - 01:54

>>
निमिष,

आम्हीसुद्धा सिनेमा एन्जॉय केलाच. रणबीर अतिशय आवडता असल्याने खूप सहज एन्जॉय करू शकलो. मी मुव्हीचा रिव्ह्यू लिहिलेला नाहीय. ना तसं शीर्षकात दिलंय, ना रेटिंग वगैरे दिलं. मला त्यातलं म्युझिक अतिशय खटकलं. 'संगीतिका' म्हणून एक सिनेमा प्रेझेंट होतो आणि एकसुद्धा गाणं दखलपात्र असू नये, हे लाजिरवाणं आहे. जी गाणी हिट झालेली म्हणून तुम्ही उल्लेख केला आहे, त्या गाण्यांत काही म्हणजे काही विशेष वाटत नाही. आजकालची अर्धी गाणी साधारण अश्याच बांधणीत आणि ह्याच सुरांत असतात.
पावणे तीस तास म्युझिक वाजवायचं असताना त्यातून भरपूर 'टेक अवे' मिळेलच, अशी व्यवस्था केलेली नाहीय, हे कमालीचं दारिद्र्य आहे. त्याचं फार वाईट वाटलं.

जी गाणी हिट झालेली म्हणून तुम्ही उल्लेख केला आहे, त्या गाण्यांत काही म्हणजे काही विशेष वाटत नाही.
>>>>>
+786
दुसरे काही ऐकायला चांगले नसले की लोकं आहे त्यात बरं शोधून समाधान मानतात. त्यामुळे अशी गाणी हिट होतात. संगीतापेक्षाही जग्गाची गाणी बघायला बरी वाटतात एक असेही असू शकेल.

बाकी चार सहा महिने वर्षभराने समजतेच कुठले गाणे काय दर्ज्याचे आहे. सध्या आपल्याला लेटेस्ट गाणी ऐकायची भूक असते त्यात ती खपलेली असतात.

आपल्याकडचाच वाटतो म्हणजे त्याचा फिल आपल्याकडचा आहे.
>>>>
मलाही एक्झॅक्टली हेच बोलायचे आहे. पण मला ट्रेलर बघून हा फिल नाही आला.
असो, पण चित्रपट वेगळा असू शकतो. आणि तो आपण पुर्ण पाहिला असल्याने मी चित्रपटावर मत नोण्दवणे चुकीचे.

आजकालची अर्धी गाणी साधारण अश्याच बांधणीत आणि ह्याच सुरांत असतात >>
त्या गाण्यांत काही म्हणजे काही विशेष वाटत नाही >> इ. इ.
विशेष म्हणजे काय ?
आपल्याला जर सगळीच गाणी दर्जेदार आणि दीर्घकाळ स्मरणात राहणारी
असावी अशी अपेक्षा आहे तर ती चुकीची आहे अस मला वाटतं
आजच्या युझ अँड थ्रो च्या जमान्यात जर काही गाण्यांनी तुम्हाला काही काळ का होईना
आनंद दिला तरी ते त्यांचे निर्विदाद यशच आहे..
व्हा ना रिलॅक्स.. गाण्याचा आणि डान्सचा आनंद घ्या Happy
आणि आपलं मनही नव्या जमान्यासोबत ठेवा ... प्रवाही

मी देखिल आत्ताच हा चित्रपट पाहून आले. पूर्ण लेखाला + १००००००००००

मी देखिल मुख्य स्टोरी सुरू होताच चित्रपटाच्या प्रेमात पडले. एक वेगळाच अनुभव आहे हा चित्रपट.

अतिशय सुंदर आणि वेगळ्याच धाटणीचं एकदम सकस दिग्दर्शन आहे. संवाद गाण्यातला कोरस, नाचातली कोरीओग्राफी अतिशयच आवडलीये. कॉलेजच्या कॉरीडोरमध्ये लेक्चर सुरू होण्याआधी केवळ एक मिनिटाचा रणबीर आणि त्याच्या मित्रांचा नाच अतिशय उत्फुल्ल आहे. जबरी स्टेप्स आहेत. मला गाणी देखिल आवडली.

अगदी रणबीर अडखळतो तेव्हा जे चित्रविचित्र उच्चार करतो ते ही अफलातून आहे. ते उच्चार धमाल आहेत. टिनटिन सारखे केस आणि साहसं, हॅरि पॉटर सारखाच जिन्याखाली झोपणारा आणि झाडूवर बसण्याच्या पोझमध्ये बसून एक चक्करछाप गाडी फिरवणारा रणबीर एकदम छा गया है. अतिशय मनापासून आणि समरसून काम केलंय त्यानं. मुख्य म्हणजे त्यानं अगदी एंजॉय केलाय हा रोल. बोलताना अडखळत असल्यानं आणि सिनेमा सांगितिक असल्यानं रणबीरला संवाद कमी आहेत पण तो अतिशय बोलक्या अभिनयातून सगळं आपल्यापर्यंत पोहोचवतो. मला कत्रिना जरा मिसफिटच वाटली मात्र.

मणिपूरचं कल्चर, तिथल्या छोट्या वस्त्या, तिथला निसर्ग खूप सुंदर दाखवलाय आणि मुख्य म्हणजे चित्रपटाच्या अनुषंगानं येतो. टूटीफुटी आणि श्रुती मधलं धडपड-साम्य मज्जा आणतं.

हा सिनेमा पाहताना आपण एक कॉमिक्स वाचतोय असंच वाटत राहतं आणि खूप मजा येते. अशा दृष्टीकोनातून पाहिलं तर नक्की आवडेल हा सिनेमा. मी तर म्हणेन बघाच एकदा अनुभुती घेऊन.

रसप, संवाद यमकांत असणे म्हणजे गाणी नव्हेत. नेहमीचे साधे सुधे संवादच पण ते यमक जुळणारे. मस्त आहेत संवादही.

रसप, संवाद यमकांत असणे म्हणजे गाणी नव्हेत. नेहमीचे साधे सुधे संवादच पण ते यमक जुळणारे. मस्त आहेत संवादही. >> +१

मी तेच लिहीले आहे की तसे पहायला गेलो तर ६ च गाणी आहेत. बाकी सगळे यमकातले संवाद आहेत. त्यातले काही संवादही खुप मस्त जमलेत. "तुक्का लगा तुक्का लगा" हा ट्रेलर मध्ये पण दाखवलेला संवाद तर अगदी मजा आणतो. आणि मला तरी गाणी / संवाद हे वेगळे स्टँड अलोन गोष्ट न वाटता ती चित्रपटाचा भाग आहे असे वाटले. त्यामुळे ते तसे ५० वर्षांपूर्वीची असतात तशी क्लासिक वगैरे नसतानाही त्यांच्यामुळे चित्रपट एक खुमारदार झाला आणि गाणी म्हणजे एक रिलीफ न वाटता त्यातून गोष्ट पुढे गेली. पूर्वी होते तसे गाणे आले की आपण उठून काही तरी करून यायचे असे काही केले तर चित्रपटाची कहाणीच सुटून जाईल आणि काही कळणारच नाही.

रसप, मी आधीच म्हटले की आवड वेगवेगळी असू शकते - ती चित्रपटांच्या बाबतीत असेल किंवा गाण्यांच्या बाबतीत असेल. एखाद्याला नाही आवडली तरी दुसर्‍या एकाला ती आवडूही शकतात.

हो मस्त आहे ते. ते ऐकताना आम्हाला बेबी ड्रायव्हर मध्ये तो एक संवादांना घेऊन रिमीक्स करतो "was he slow" त्याचीच आठवण येतो होती. Lol

https://www.youtube.com/watch?v=3igDZrG3DTQ

आत्ता पाहून आली जबरदस्ती..
खुप ढापाढाप वाटली मला..रणबीर आवडता म्हणुन जमल नाही तर कठीण होतं..
हॉलीवुडचे काही म्युझिकल्स बघीतले आहे..
आपण प्रयत्न केलाय तो भारीच पण निदान जरा स्वतःच काही ठेवायला हवं होतं अस मला वाटते.. टिनटिन पासुन सगळे हॉलीपट अधिक आपले इतर सारे प्रयत्न एकत्र साधून बनवलेला वाटतोय..
बेबी ड्रायव्हर आणि याची तुलना तर नकोच..दोन्ही खुप वेगळ्या धर्तीवरचे चित्रपट आहे..

तटी : हॉलीपटात बरेचदा अभिनेतेच त्यांच ते गातात..इथे दुसर्‍यांनी गायलय का? संवाद म्हणजे त्यांचे..?

मिक्स प्रतिसाद येताहेत..
नजर ठेवून आहे..
येत्या विकेण्डल्ला हा जल्ला मेला जग्गा जासूस प्लान करायचा...
की एखादी पावसाळी सहल काढायची..
हे ठरत नाहीये अजून..
चित्रपट संगीताच्या वाटेने गेला की असे मिक्स प्रतिसाद येतातच वाटते.. कट्यार कलेजेमे उदाहरण आहेच !

येत्या विकेण्डल्ला हा जल्ला मेला जग्गा जासूस प्लान करायचा... >> सिनेमा न बघताच एव्हढ्या पोस्ट तर पाहिल्यावर किती असतील ? धरा बोटे, मोजा बोटे Wink

मी बर्फी अजिबात पूर्ण बघू शकले नव्हते. अतिषय कंटाळा येत होता. या सिनेमात देखिल तसाच रोल आहे म्हणजे रणबीर जरासा बावळट, भोळाभाबडा, केविलवाणा, गरीब बिचारा आहे का? तसं असेल तर कठिण जाइल बघायला. पण ऑनलाइन यिल तेव्हा पाहीन

सिनेमा न बघताच एव्हढ्या पोस्ट तर पाहिल्यावर किती असतील ?
>>>>>

चित्रपट आणि क्रिकेट हे माझे दोन छण्द आहेत. माझ्या दोन नाकपुड्या आहेत ज्यांनी मी श्वास घेतो, माझी ती फुप्फुसे आहेत ज्यातून माझ्या शरीराला प्राणवायूचा पुरवठा होतो.. या दोन विषयांवर मी कितीही न थकता लिहू शकतो.

तसेच रणबीर हा माझा फार आवडता कलाकार आहे. आजच्या तारखेला शाहरूख नंतर किंवा त्या ईतकीच एनर्जी आणि उत्स्फुर्तता कोणात असेल तर ते रणबीर कपूरमध्ये. अर्थात त्याला एक आब हवा नाहीतर त्याचा रणवीर सिण्ग व्हायला वेळ लागत नाही ..

बाकी जग्गा जासूस मी पहिल्यांदा झलक पाहिलेली तेव्हाच मला ते काहीतरी वेगळे आणि ईण्टरेस्टींग वाटलेले. माबोवर माझा एक धागा आहे बघा, चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला. तो मला जग्गा वरूनच सुचलेला. पहिली पोस्ट चेक करून घ्या त्याची. विश्वास नसेल तर. ..

तर सांगायचा मुद्दा हा की मी आधीपासूनच जग्गाबाबत उत्सुक होतो.. पण फायनली पिकनिकला जायचे ठरलेय. कारण या विकांताला गटारी आहे.. त्यामुळे माझे मित्र कमीत कमी पितील हे मला बघायचेय
. Happy

पण फायनली पिकनिकला जायचे ठरलेय. कारण या विकांताला गटारी आहे.>> एवढ्या वर्षांनंतर मायबोलीवर विकांताला दोन दिवसांचा श्रावण येतो आहे म्हणजे. Wink

Pages