शेक्सपिअरचे “यक्ष”गान"

Submitted by अनन्त्_यात्री on 18 July, 2017 - 02:17

"द टेम्पेस्ट –(झंझावात)".
=================
भाषाप्रभू शेक्सपिअरच्या साहित्यिक कारकिर्दीतले त्याचं (बहुधा) हे शेवटचं नाटक.
त्याच्या इतर प्रत्येक कलाकृती सारखंच - मानवी जीवनाची व्यामिश्रता अन सद्-असद भाव-भावनांचे कंगोरे अलगद उलगडून दाखवणारं.
त्याची प्रत्येक कलाकृती त्रिपुरीच्या दीपमाळेसारखी उजळलेली,भुरळ घालणारी.
त्या दीपमाळेतला मला भुरळ घालणारा एक छोटासा दीप म्हणजे हे “यक्ष”गान.
या नाटकात “एरियल” नावाचा एक यक्ष आहे. समुद्री झंजावातात नष्ट झालेल्या जहाजात आपला पिता मृत्यू पावलाय अशी समजूत झालेल्या नेपल्सच्या राजपुत्राचे सांत्वन करताना हा यक्ष ही कविता म्हणतो.
ही कविता म्हणजे केवळ सांत्वन नाही. मृत्यू म्हणजे भरून न येणारे नुकसान नव्हे तर पार्थिवाच्या उन्नयनाचे ते एक विलोभनीय रूप आहे हा एक वेगळाच पैलू मनावर बिंबविणारी शेक्सपिअरची ही एक छोटीशी कविता
……….अन तिच्या स्वैर अनुवादाचा माझा प्रयत्न ......

मूळ कविता
=========
Full fathom five thy father lies;
Of his bones are coral made;
Those are pearls that were his eyes:
Nothing of him that doth fade,
But doth suffer a sea-change
Into something rich and strange.
Sea-nymphs hourly ring his knell:
Ding-dong.
Hark! now I hear them—Ding-dong, bell.

स्वैर अनुवाद
=====
पाच पुरुष पाण्यात पहुडला पिता तुझा,बाळ
अस्थी-पंजरा मधुनी तयाच्या फुलले प्रवाळ
तेजस्वी नयनांतुनी त्याच्या मोती बघ घडले
नश्वर देहातील तयाच्या काहीच नच विटले
अलौकिकाचे रूप घेऊनि पुनश्च बघ नटले
पार्थिव त्याचे अद्भूताशी एक-रूप होता
सागरतळीचे नाद अचान‌क‌ झंकारतआले !

Group content visibility: 
Use group defaults

साधना, धन्यवाद.
टेम्पेस्ट जरूर वाचा. अद्भुतरम्य आहे.