माझ्या तोंडी परीक्षा - १

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 July, 2017 - 16:05

मी डिप्लोमाला असतानाची गोष्ट. अंतिम वर्षाला आम्हाला ग्रूप प्रोजेक्ट असायचा. त्याचे तब्बल शंभर गुण असायचे. ५० गुण प्रोजेक्टला आणि ५० गुणांसाठी तोंडी परीक्षा घेतली जायची. तेव्हाचा हा किस्सा !

तर आमच्या प्रोजेक्टचा विषय होता, हिमयुगात नष्ट झालेले अग्नीजन्य खडक. आम्ही एकूण आठ जणांनी मिळून हा प्रोजेक्ट बनवला होता. डिप्लोमा लेवलचा प्रोजेक्ट म्हणजे काहीही शोध प्रयोगाच्या भानगडीत न पडता इथून तिथून अर्थातच आंतरजालावरून कॉपीपेस्ट करून बनवलेले एक जाडजूड सचित्र पुस्तक. त्यात कुठून काय कॉपी करायचे याला थोडीफार अक्कल लागत असल्याने तुलनेत कमी अक्कलेचे पेस्ट करायचे काम माझ्या वाटणीला आले होते. ते अर्थातच डोळे झाकून केले होते. त्यामुळे तोंडी परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत मला आमच्या प्रोजेक्टचे नाव आणि पृष्टसंख्या यापलीकडे काहीही माहीत नव्हते. पण आतली खबर लागून बाह्य परीक्षकाचे नाव तेवढे समजले होते, त्यामुळे सारी भिस्त आता त्यांच्यावरच होती. अर्थात ते नाव ईथे सांगणार नाही, पण एका लोकप्रिय मराठी वर्तमानपत्रात लिखाण करणारे ते एक नावाजलेले व्यक्तीमत्व होते. क्रिकेट, राजकारण, चित्रपट, ललित, असे लिखाणाच्या कित्येक अंगांना त्यांनी स्पर्श केला असला तरी क्रिकेट समीक्षण आणि चित्रपट परीक्षण यासाठी ते प्रसिद्ध होते. आमच्या घरी सुदैवाने तेच वर्तमानपत्र येत असल्याने आणि क्रिकेट, चित्रपट या सामाईक आवडीमुळे त्यांचे लेख मी आवर्जून वाचत असल्याने आता आपल्याला प्रोजेक्टबद्दल काहीच माहीत नसले तरी चालेल याच भ्रमात मी होतो.

तर.... लेखाच्या सोयीकरता आपण त्यांना "रणगाडे सर" बोलूया, जेणेकरून लेखात अध्येमध्ये तोफेच्या तोंडी सारखे रणगाड्याच्या तोंडी अश्या कोट्या करता येतील.

एका ईंजिनीअरने ठरवले तर तो एका रात्रीत अख्खा सिलॅबस संपवू शकतो. हा भ्रम बरेच जणांना असतो. तसेच मलाही होताच. प्रत्यक्षात जेवढे जमते तेवढेच करून उरलेले सारे ऑप्शनला टाकून सिलॅबस संपवला जातो हे ईंजिनीअरींगचे वास्तव आहे. तरी आदल्या रात्री केवळ अणुक्रमणिका चाळायचे ठरवले होते. कारण रद्दीच्या भावात ६ रुपये किलोने विकले तरी १०० ची नोट कुठे जात नाही एवढे जाडजूड प्रोजेक्ट एका रात्रीत अभ्यासायचे म्हटल्यास त्यातील चित्रेही बघून होणार नव्हती. पण रात्रभर तेच केले, जमेल तितकी चित्रे बघितली आणि शेवटी त्याचीच डोक्याखाली उशी करून झोपलो.

तोंडी परीक्षेचा दिवस उजाडला आणि आठवले सरांच्या तोंडी मलाच पहिल्यांदा जायचे होते हे मला केवळ आठ मिनिटे आधी समजले. आता तुम्ही म्हणाल रणगाडे सरांचे आठवले कसे झाले? तर आठवले हे आमचे कॉलेजचे सर होते. ते परीक्षेला कॉलेजतर्फे उपस्थित राहणार होते. अर्थात या सरांचे नाव देखील बदलले आहे. जे पहिले आठवले तेच ठेवले आहे. यांच्याबद्दल काय बोलावे. वर्णनात्मक नाव ठेवायचे झाल्यास बदडले सरच जास्त शोभले असते. अर्थात कॉलेजच्या पोरांना तसे कोणी शब्दश: मारत नाही. पण हे शब्दांनीच मारायचे. अगदी घायाळ करायचे. मला एकदा कुठल्याश्या संदर्भात म्हणाले होते, तुझ्यासारखी पोरे लवकर मरतही नाहीत.
असो,

तर आम्हा बारा जणांचा प्रोजेक्ट ग्रूप असला तरी एकावेळी दोघा दोघांनाच बोलवणार होते. सुरुवातीलाच आम्ही जे दोघे जाणार होतो त्यात दुसरा माझा सौथेंडियन ख्रिश्चन मित्र होता, ज्याला आमच्यात राहून तोडके मोडके मराठी बोलता यायचे. समजायचे तर लख्खपणे. मातृभाषा त्याची जी काय होती ती होती, पण ईंग्लिश टॉल्किंगमध्ये मास्टर होता. याऊलट माझी ईंग्लिशची बोंब हे आता पुन्हा नव्याने कोणाला सांगायची गरज नाही. जी स्थिती आज आहे, ती अर्थात तेव्हाही होतीच. त्यातल्या त्यात एक चांगले की डिप्लोमा लेवलला आमच्या ईंटर्नल वायवा थोड्याफार मराठीतच चालायच्या कारण आमच्या कॉलेजचा बहुतांश स्टाफ मराठी होता. पण एक्स्टर्नलच्या वेळी मात्र बाह्य परीक्षक कोण कसा येतो आणि त्याला मराठी येत असले तरी त्याला मराठी भाषेचा अभिमान कितपत आहे यावर सारे अवलंबून असायचे.

आज समोरची व्यक्ती मराठी आहे हे माहीत होते. लेखक असल्याने मराठी भाषाप्रेमी असेल अशी शंकाही होती. पण काही लोकांना शायनिंग मारायच्या हेतूनेही ईंग्लिश बोलायला आवडत असल्याने आजची वायवा मराठीतच होईल याची शंभर टक्के खात्री नव्हती. त्यामुळे मी बरोबरच्या साऊथ ईंडियन ख्रिस्ती मित्राला दम भरला, जर आम्ही दोघे (म्हणजे मी आणि रणगाडे सर) जर मराठीत सुरू झालो तर तू स्वत:चा शहाणपणा करून ईंग्लिश सुरू करू नकोस. तसेही तुझाही काही अभ्यास झाला नाही, तर ईंग्लिशमध्ये बोलता येत असले तरी काय बोलायचेय हे तुलाही माहीत नाही. पण मराठी सुरू झाल्यास मी काहीतरी बोलीबच्चन देऊन त्यांना गुंडाळेनच..... माझ्या या गुणांवर त्याचा विश्वास असल्याने त्याने गुमान मुंडी हलवली आणि आम्ही मान खाली घालून आत दाखल झालो.

वृत्तपत्रांतच आजवर ज्यांचा छोट्याश्या चौकटीत फोटो पाहिला होता ते प्रत्यक्षात समोर पाहताना थोडाफार फरक भासणे अपेक्षितच होते. त्यातही परीक्षकाच्या भुमिकेत असल्याने शत्रूपक्षाच्या गोटात असल्याची भावनाही मनात उत्पन्न होणे स्वाभाविकच होते. मात्र त्यांनी आल्याआल्याच सुहास्यवदनाने जे स्वागत केले ते पाहता सारे प्रेशर गळून पडले. हे देखील कमी म्हणून "सुप्रभात, या बसा" असे म्हणत शुद्ध मराठीत सुरुवात केली. त्यांच्यासमोरच टेबलवर सर्व ग्रूप्सच्या प्रोजेक्टच्या एकेक कॉपी गीता-बायबल-कुराणासारख्या एकावर एक रचून ठेवल्या होत्या. त्यात एक गीत रामायण आमचेही होते. त्यांनी ते कितपत चाळले हे माहीत नव्हते, पण प्रोजेक्टचा विषय त्यांना आधीच समजला असल्याने त्यांनी थेट मुद्द्यालाच हात घातला. माझ्याकडे पाहून, जणू काही मीच त्या पुर्ण प्रोजेक्टचा लीडर आहे असे गृहीत पकडून मला प्रोजेक्टबद्दल चार शब्द बोलायची विनंती केली.

तोंडी परीक्षेला माझी सुरुवात नेहमीच तयार असायची. प्रस्तावनेची चार वाक्ये ईंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये मी नेहमीच तोंडपाठ करून जायचो. त्यांनी मराठीत केलेली सुरुवात मी मराठीतच पुढे खेचत मोजून चार वाक्यांतच आमच्या प्रोजेक्टचा विषय त्यांना समजावला आणि पाचव्या वाक्याच्या सुरुवातीला अलगद एक पिल्लू सोडले, "सर मी तुम्हाला ओळखतो. तुमचे क्रिकेट आणि चित्रपटविषयक लिखाण मला खूप आवडते..."
रणगाडे सरांना हे अपेक्षित होते वा अनपेक्षित हे त्यांनाच ठाऊक. त्यांनी आधी माझ्याकडे रोखून पाहिले, मग आमच्या सरांकडे बघत गूढ स्मित केले.
तरीही मी हिंमतीने पुढे रेटले, "सर खरेच, मी नेहमीच वाचतो तुमचा कॉलम. तसेही सिनेमांवर आणि मुख्यत्वे क्रिकेटवर वर्तमानपत्रात आलेला कुठलाही लेख मी सोडत नाही. पण तुमचे नाव बघितले की तेच आधी वाचायला घेतो. तर कधी नाव न बघताच वाचायला घेतले तरी लिखाणशैलीवरून ओळखतोच, अरे हे तर आपले रणगाडेच असणार ..... आणि खरंच तुम्हीच निघतात सर"

बस्स..! स्तुती कोणाला आवडत नाही. (खरी वा खोटी हा मुद्दा इथे गौण) पण परीणामी, त्यांचा मूड जो आधीच हलकाफुलका होता तो आणखी जगात आरामात झाला आणि ते खळखळून हसायला लागले..
पण तेव्हा मला कल्पना नव्हती, की तो निव्वळ वादळापूर्वीचा ढगांचा गडगडाट होता.. अन् पाउस अजून बरसायचा होता..

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका ईंजिनीअरने ठरवले तर तो एका रात्रीत अख्खा सिलॅबस संपवू शकतो. हा भ्रम बरेच जणांना असतो. तसेच मलाही होताच. प्रत्यक्षात जेवढे जमते तेवढेच करून उरलेले सारे ऑप्शनला टाकून सिलॅबस संपवला जातो हे ईंजिनीअरींगचे वास्तव आहे.

Hahahaha...एक नंबर

कोण आपले द्वारकानाथ का? ते सुद्धा जातात का परीक्षक म्हणून की क्रिकेट सिनेमा यावरूनच बांधलेला अंदाज आहे.

आमच्या कॉलेज ला एक्सटर्नल आला की आधी त्याला मस्त जेवायला घेऊन जायचे.. फुल्ल करायचे खाऊन पिऊन,म्हणजे पास करेल सगळ्यांना

बाबारे का आमच्या कल्पना शक्तीला चालना देतोस? 8 जणांच्या प्रोजेक्ट ग्रुपमधे ऐनवेळेस 4 जण अॅड करून 12 करतोस? आता ते 4 जण तुझ्या परवानगीशिवाय मी गेस करू का?
1 सायबर कॅफेवाला मालक ज्याने तुम्हाला जुन्या प्रोजेक्टची साॅफ्टकाॅपी दिली
2 कॅफेवाला पोरगा ज्याला पटवून प्रिंटीग बिल निम्म्याहून कमी करून घेतले
3 बुक बाईंडर ज्याला रात्री 3वाजता उठवून बाईंडींग करून घेतले.
4 काॅलेजचा शिपाई, ज्याच्यामुळे 8 दिवस लेट सबमिटेड प्रोजेक्ट मागच्या दाराने सबमिट झाला.

खरंच किती चांगला आहेस तू. आमच्या बुध्दीला चालना देण्यासाठी असे धागे काढतोस ना आणि आम्हाला गाळलेल्या जागा भरायला लावतोस. मनापासून खुप खुप थांक्कू.

ताक (प्यायला नाही ) : खुप दिवस झाले धाग्यावर सई आली नाही रे. ओढून ताणून आणलीस तर ऋ तुझा ऋऽऽऽऽणी राहीन.

बदाम खाऊन पुढील भागाच्या आणी सईच्या प्रतीक्षेत
आपला कृपाभिलाशी
पाथफाईण्डर

क्रिकेट-सिनेमा-एंजिनियरिंग (विजेटिआय) यावरून <<< हा व्हि़एटीआय चा लेख आहे?? व्हिजेटीआय चे स्टॅन्डर्ड चांगल असेल अस वाटल होत...

वीजेटीआय कुठून आले मध्येच? द्वारकानाथ विजेटीआयचे आहेत का? पण मुळात विजेटीआयला डिप्लोमा आहे का?

पाथ, तो आठ बाराचा गोंधळ मस्त पकडलात. एवढे प्रोजेक्ट केलेत या ईंजिनीअरीण्गच्या सहा सात वर्षात की कश्याचे काय जरा गोंधळायलाच होते.

च्रप्स, आमच्याकडे याच कारणासाठी एक्सट्रनल कोण आहे याची खबर कोणाला लागू द्यायचे नाहीत.. म्हणून तिला आतली खबर म्हटले आहे

ऋ सहा की सात वर्षे? पोस्ट ग्रॅज्युएशन केलेत का? नसेल तर तोही धागा होईल.
ते सईच प्लिज जमवा बुवा

ऋ, मस्त विषय निवडलास लिहायला...मला अपेक्षित होतंच. यावेळी खरंच तुला एका स्पेशल हिटची गरज आहे..सगळे, काही स्पेशल तुला माबोवरून संपविण्याची सुपारी घेतल्यागत उठसुठ टिका करत सुटलेले अशावेळेस तु कसलेल्या खेळाडूप्रमाणे काहीतरी नविन चाल खेळणार ही खात्रीच होती..
डिप्लोमा/इंजिनियरिंग चा लास्ट इयर चा प्रोजेक्ट म्हणजे मनाच्या कोपर्यात त्याची एक स्पेशल जागा असते! जेव्हा कधी तो, त्याचा विषय निघतो तेव्हा आपण त्या काळात जाऊन एक आठवणींच्या जगात फेरफटका मारून येतोच.. बर्याच जणांचे बरेच अनुभव कॉमन असतात तरीही ते शेअर करूशी वाटतात.
माझा डिप्लोमा लास्ट इअरचा प्रोजेक्ट/प्रोजेक्ट गृप हा एक संस्मरणिय आठवणींचा ठेवा आहे.. पुढे सांगेलच..
आता फक्त हे क्रमशः लिहून २६ प्रपोज प्रमाणे कल्टी न मारता लेख मालिका पुर्ण करा.
सहज आणि ओघवतं लिहीलेलं आहे.. वाचताना आम्ही तुमच्या सोबतीनं तेथे वावरतो असं नक्की वाटतं.... पुभाप्र

१ नंबर लिहिलय.. Happy
आता पुढचा भाग लवकर येऊ द्या.. प्लिज....

बायदवे,माझ्या आणि मैत्रिणीच्या बाबतीत असाच मिळता-जुळता प्रसंग झालेला ..मी पण लिहीणार होते यावर्,विचार करतच होते.... Happy

सस्मित मेघा राहुल धन्यवाद

पाथ, मी पीएचडी केलीय

च्रप्स, या ऋन्मेषने कॉलेजमध्ये चिक्कार माती खाल्लीय पण कधी केटी नाही खाल्ली. जेवढे पास होण्यास गरजेचे तेवढे मार्क्स मिळवण्यापुरता अभ्यास करून उर्वरीत वेळात मी आयुष्याची मजा लुटायचो.

तुम्हाला नाही म्हणालो हो ☺️
आणि atkt किंवा वायडी झाला म्हणजे माती खाल्ली थोडीच आहे, असे लोक पण खूप यशस्वी होतात लाईफ मदे

>>वीजेटीआय कुठून आले मध्येच? द्वारकानाथ विजेटीआयचे आहेत का? <<
हो, पण तु असशील याची खात्री नाहि. विजेटिआयचे अलम्नाय इतर कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी/मॉडरेटर म्हणुन गेल्याचं पहाण्यात आहे.

>>पण मुळात विजेटीआयला डिप्लोमा आहे का?<<
आय्ला, तु मुंबईचाच आहेस ना?

हो, पण तु असशील याची खात्री नाहि. विजेटिआयचे अलम्नाय इतर कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी/मॉडरेटर म्हणुन गेल्याचं पहाण्यात आहे. >> मागे त्याने त्याच्या डीप्लोमा कॉलेजमधे entrance नि जिन्याचे वर्णन टाकले होते होते जे VJTI शी तंतोतंत मॅच होत होते म्हणून मी त्याला विचारल्यावर गडी बापरे म्हणून पळून गेला होता Happy

च्रप्स, माझ्या वाक्याचा अर्थ नापास होणे म्हणजे माती खाणे असा होत नाही. मी स्वत:बोर्डात नापास आहे.

राज, उद्या मुंबईत राहणारया प्रत्येकाला शाहरूखच्या घरात किती बाथरूम आहेत हे माहीत पाहिजे अशी अपेक्षा ठेवाल.. असे कसे चालेल

असामी, एकेकाळी म्हणजे डिग्रीला जाईपर्यंत मला वीजेटीआयचे नेमके नावही माहीत नव्हते. बीजीटीआय BGTI करायचो Happy

च्रप्स, माझ्या वाक्याचा अर्थ नापास होणे म्हणजे माती खाणे असा होत नाही. मी स्वत:बोर्डात नापास आहे.
राज, उद्या मुंबईत राहणारया प्रत्येकाला शाहरूखच्या घरात किती बाथरूम आहेत हे माहीत पाहिजे अशी अपेक्षा ठेवाल.. असे कसे चालेल
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 14 July, 2017 - 22:50

भाऊ तुम्ही ओढून ताणून शाखा आणाताय धाग्यावर. सईला नाही आणत. छोटीसी डिमांड है ना.
ऐसे बडे बडे देशो मे छोटी छोटी डिमांड पुरो करनी चाहीये सेनोरीटा (सई)

>>उद्या मुंबईत राहणारया प्रत्येकाला शाहरूखच्या घरात किती बाथरूम आहेत हे माहीत पाहिजे अशी अपेक्षा ठेवाल.. <<

अरे विषय काय आणि तुझं काउंटर आर्ग्युमेंट काय? मला तुझ्यासारख्या ६-७ वर्षं एंजिनियरिंग मध्ये घालवलेल्या मध्यमवर्गिय माणसाला विजेटिआय सारख्या नावाजलेल्या संस्थेत डिप्लोमा आहे कि नाहि तेच माहित नाहि याचंच नवल वाटतंय.

सिरियस्ली, तुम अलिबाग से तो नहि आया है ना?

राज, विजेटीआय नावाजलेले आहे म्हणून तुम्हाला तसे वाटत असेल. मात्र बरेच कॉलेजात डिप्लोमा वा डिग्री पैकी एकच असते. निदान ईंजिनीअरींगच्या काही शाखांबद्दल तरी लागू होते..

येनीवेज, जोक्स द अपार्ट..
मी विजेटीआयचाच आहे.
पण हे सांगितल्यावर कोणी विश्वास ठेवत नाही म्हणून मीच लोकांना नाही बोलत कन्फ्यूज करून सोडतो Happy

असाम्या, तो (खोटं बोलून) लोकांना कन्फ्युज करून सोडतो हे त्याने एकदा सांगितल्यावर तुला अजूनही हे असे फॅक्चुअल प्रश्न का बरं पडतायत?

Pages