वूडलँडचे सँडल आणि BMW 1300S

Submitted by अतरंगी on 12 July, 2017 - 08:23

" बाबा, मला वूडलँडचे सँडल घ्यायचेत"

"अरे आत्ताच कॉलेज चालू व्हायच्या आधी सँडल घेतले होतेस ना?"

"हो पण ते साधे आहेत, मला वूडलँडचे हवेत"

" का ?"

"तेच चांगलेत, सॉफ्ट असतात, त्या साध्या सँडल ने मला चालताना त्रास होतो...." उगाच काहीच्या काही कारणे द्या मोड मध्ये मी.

"बरं बरं घेऊ "

"कधी?"

"दिवाळीला...."

"नाही नाही मला आत्ताच पाहिजेत"

वडिलांनी किती समजूत काढली पण तरी मी तो सँडल घ्यायला लावलाच. का ? तर आमच्या वर्गातली मोजकी श्रीमंत टाळकी तेव्हा वूडलँडचे सँडल वापरायची आणि मला पण त्यामुळे तोच हवा होता...

वीस बावीस वर्षांपूर्वी मुलाच्या हौसेसाठी इतका महाग सँडल घेताना वडिलांना काय वाटलं असेल? आपली परिस्थिती काय? आपण काय मागतोय ? याची अजिबात जाणीव मला नव्हती....

--------------------------------------------------------------
फास्ट फॉरवर्ड वीस वर्षे.....

"बाबा मला अर्जुन सारखी BMW ची बाईक घ्यायची" आमचे सुपुत्र या आठवड्यात तिसऱ्यांदा...

"आँ? BMW? " बऱ्याच दिवसांनी घरी आमचे संवाद ऐकत असलेले त्याचे आजोबा उर्फ आमचे पिताश्री.

" अहो खेळण्यातली म्हणतोय तो."

"अरे मग द्या की आणून, काय शंभर सव्वाशेच्या गोष्टी साठी पोराचा हिरमोड करायचा"

"शंभर सव्वाशे ??? अहो खेलियाड मध्ये दहा हजार रुपयाला आहे, ऑनलाईन घेतली तरी साडे आठ हजाराच्या खाली मिळणार नाही. बॅटरी वर चालते ती. त्यावर बसून चालवायची असते. "

"इतकी महाग खेळणी मिळतात ? "

"हो, साधी मागितली असती तर मी नाही म्हणालो असतो का त्याला ?"

--------------------------------------------------------------

"अरे या विकेंडला तुझी बऱ्याच दिवसाची पेंडिंग शॉपिंग संपवून टाकू.......वूडलँडमध्ये मॉन्सून सेल पण चालू आहे. " इति बायको.

" नको जाऊ दे, आजच बाळराजांसाठी बाईक ऑर्डर केली मी. सध्याचा सँडल पिदडतो अजून दोन चार महिने आणि जीन्स पण घ्यायलाच पाहिजे असं काही नाही... तसंही कोण बघतेय आता या वयात माझ्याकडे....मागच्या महिन्यातल्या कामाचे पैसे येतील मग बघू"
------------------------------------------------------------

एक पिढी सरली तरी बापाच्या गरजा आणि मुलांची हौस एक वेळी कशी पूर्ण करता येईल याचे गणित काही सुटेना, कदाचित ते न सुटणं यातच मध्यमवर्गीय असण्याचे सुख लपले आहे.....

Group content visibility: 
Use group defaults

मध्यमवर्ग काहीसा लोप पावत चालला आहे. त्याची जागा नवमध्यमवर्गाने घेतली आहे. जुन्या काळच्या मध्यमवर्गीय गरजेच्या फूटपट्ट्या लावल्या तर मासिक सत्तर ते ऐंशी हजार रुपये प्राप्ती असणार्‍या आजच्या या नवमध्यमवर्गाला कुठेही आर्थिक तडजोड करायची वेळ येणार नाही. पण दहा लाखाची कार, टू / थ्री बीएचके फ्लॅट, दोघांना दर दोन वर्षाला पंचवीस हजारांचे स्मार्ट फोन्स, दर वीकेंडला मल्टीप्लेक्स मध्ये सहकुटूंब सिनेमा, मुलांकरिता वार्षिक लाख / दीड लाख फीची शाळा, वर्षातून एक डोमेस्टीक आणि दोन तीन वर्षातून एक इंटरनॅशनल हॉलिडे ही या वर्गाची लक्सरी नव्हे तर इसेन्शिअल नीड बनत चालली असेल तर मात्र यांना आर्थिक तडजोड करावी लागेल यात वादच नाही. त्यातही मुले प्रचंड हट्टी आणि आईबापांना न जुमानणारी असल्याने त्यांच्या खर्चाला (तो कितीही अनाठायी वाटला तरीही) कात्री न लावता स्वतःच्याच आवश्यक गरजांना कात्री लावावी लागत असणार.

चर्चा मध्यमवर्गाच्या व्याख्येवर घसरलीच आहे तर बेकरीवर धनि बरोबरची चर्चा ईथे डकवतो.
अंतरंगींच्य पोस्टी बघता त्यांना हे अवांतर वाटणार नाही असे गृहीत धरतो.

बर्ग तिकडे विषयांतर होईल अशी भिती वाटते म्हणून इथे या दोन लिंक देतो:
https://www.brookings.edu/book/dream-hoarders/
http://www.npr.org/2017/05/31/530843665/top-20-percent-of-americans-hoar...
तसेही मी ज्या वातावरणात वाढलो, किंवा जे काही साहित्य वाचले त्या दोन्हींमध्ये मध्यमवर्गाची व्याख्या ही गरजेच्या गोष्टींना प्राधान्य देणारा वर्ग अशीच होती. त्यामुळे मला तो लेख विचित्र वाटला. प्लस मला सध्या आपण श्रीमंत / उच्च मध्यमवर्गीय असलो तरी मध्यमवर्गीय आहोत आणि हे आमचे प्रॉब्लेम्स आहेत असा जो गळेकाढू सूर निघतो आहे तो पटत नाही. आपण उच्च वर्गीय आहोत हे मान्य करा ना. ते का नाही करायचे. आपण आधीच होतो किंवा आपल्या पालकांच्या योग्य निर्णयांमुळे झालो उच्चवर्गीय तरीही आम्ही मध्यमवर्गीय आहोत असे म्हणून खर्‍या मध्यमवर्गावर अन्याय होतो आहे असे वाटते.
आता हे माझे वैयक्तीक मत असू शकते.
Submitted by धनि on 13 July, 2017 - 09:54

तू 'क्लास' हा 'स्टेटस ऑफ लिविंग' ने डिफाईन करत आहेस की 'लेवल ऑफ ईन्कम' ने ते सांगितलेस तर कदाचित आपल्या पर्स्पेक्टिवमधला फरक ओळखायला सोपे जाईल
Submitted by हायझेनबर्ग on 13 July, 2017 - 09:59
संपादन

मध्यमवर्ग कशाला म्हणतात तोच महत्त्वाचा प्रश्न आहे ना.
मला असे वाटते की ज्यांचे लेव्हल ऑफ इन्कम हे मिडल असते म्हणजे ४०% ते ८०% च्या दरम्यान. अशा वेळेस आपल्याला आपल्या गरजेलाच प्राधान्य द्यावे लागते लग्झरी ला नाही. जेव्हा आपण लग्झरीला प्राधान्य द्यायला सुरूवात करतो तेव्हा आपण आपोआपच एक फायनाशियल बॅकिंग असलेल्या वर्गात असतो असे मला वाटते. त्यामुळे तो मध्यमवर्ग म्हणता येईल का हे मला माहिती नाही.
Submitted by धनि on 13 July, 2017 - 10:14

अमेरिकेतल्या क्लासच्या डेफिनिशन्स सध्या पुरत्या जरा बाजूला ठेवू.
भारतात समजा एकाच कंपनीत्/बँकेत एकाच हुद्द्यावर, सारख्याच पगारावर काम करणारे, एकाच बिल्डिंग मध्ये राहणारे, डब्यामध्ये सारखेच जेवण जेवणारे, सारखेच सणवार साजरे करणारे दोघे जण आहेत.
एकाला एकंच मुलगा आहे बाकी काही व्यवधानं नाहीत वेल-टू-डू म्हणतो तसे कुटुंब, पण एकाच्या नोकरीशिवाय दुसरे ईन्कम नाही.
दुसर्‍याला तीन मुले आहेत, लवकरंच लग्नाला येईल अश्या मुलीसाठी सेविंग करणे चालू आहे, आजारी आई-वडिलांचा खर्च आहे थोडक्यात हँड-टू-माऊथ नाही पण अवांतर खर्च करू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि एकाच्या नोकरीशिवाय दुसरे ईन्कम नाही.
आता दोन्ही कुटुंबातल्या मुलाने २००० चा वुडलँडचा शू मागितला पहिल्या कुटुंबातल्या मुलाला तो मिळाला दुसर्‍या कुटुंबातल्या मुलाला मिळाला नाही कारण दोन्ही कुटुंबांची २००० रुपयांची युटिलिटी वेगवेगळी आहे.
मग सेम ईन्कम सेम लाईफ स्टाईल असूनही एक कुटुंब मिडल क्लास आणि एक अपर क्लास असे तुला म्हणायचे आहे का?
Submitted by हायझेनबर्ग on 13 July, 2017 - 10:19
संपादन

मग सेम ईन्कम सेम लाईफ स्टाईल असूनही एक कुटुंब मिडल क्लास आणि एक अपर क्लास असे तुला म्हणायचे आहे का? >> हो कारण इन्कम बरोबरच तितके खर्च पण आहेत ना. त्यामुळेच माझा फायनान्शियल बॅकिंग / सेक्युरिटीचा मुद्दा मांडला होता मी.
Submitted by धनि on 13 July, 2017 - 10:24

मग आता पहिल्या कुटुंबाने मुलाला महागड्या शाळेत टाकले ज्याचा वर्षाचा खर्च दुसर्‍या कुटुंबाच्या तीन मुलांच्या शिक्षणाच्या वार्षिक खर्चाएवढा आहे. मुलाच्या ऊच्च शिक्षणासाठी सेविंग चालू केले ज्याचा खर्च दुसर्या कुटुंबाच्या मुलीच्या लग्नासाठीच्या सेविंग एवढा आहे.
नवरा-बायको दोघांसाठी योगा/जिम लावली ज्याचा खर्च दुसर्‍या कुटुंबाच्या आई-वडिलांच्या आजारपणाच्या खर्चाएवढा आहे.
मग आता ईन्कम आणि खर्च समसमान झाल्यावर दोन्ही कुटुंब एकाच क्लासमध्ये आले असे म्हणशील का?
Submitted by हायझेनबर्ग on 13 July, 2017 - 10:33
संपादन

नाही म्हणणार, परत महागडी शाळा = लक्झरी , जीम = लक्झरी
बर्ग , तू नीड्स आणि लक्झरी मध्ये गल्लत करत आहेस काय ?
Submitted by धनि on 13 July, 2017 - 10:36
तू नीड्स आणि लक्झरी मध्ये गल्लत करत आहेस काय ? >> Lol हाच प्रश्नं मी तुला विचारणार होतो.
परत महागडी शाळा = लक्झरी >> कसे काय? जर त्यांच्या शैक्षणिक दर्जामध्ये प्रिंस्न्टन युनि. आणि लोकल कम्युनिटी कॉलेजएवढा फरक असला तर? मुलाचे स्पेशलायझेशन ईतर शाळांमध्ये ऊपलब्धं नसले तर?
जीम = लक्झरी >> कसे काय? पुढचा ऊतारवयातला आजारपणाचा खर्च वाचवण्यासाठी आज जिम्/योगा करणे हा खर्च लक्झरी कसा होऊ शकतो?
Submitted by हायझेनबर्ग on 13 July, 2017 - 10:44
संपादन

मुलाचे स्पेशलायझेशन >> अरे हेच म्हणतो आहे ना की ही लक्झरी आहे !! आणि ज्यांच्याकडे डिस्पोजेबल इन्कम असेल तेच ती अ‍ॅफोर्ड करू शकतात.
जीम / योगा पैसे भरून करण्यापेक्षा घरच्या घरी करण्याची सुविधा असते अरे !!! तुम्ही व्यायामावर पैसे खर्च करत आहात हीच लक्झरी आहे.
Submitted by धनि on 13 July, 2017 - 10:49

चांगले शिक्षण आणि जिम ही लक्झरी आहे आणि लग्नाचा, कार्यालयाचा , जेवणावळीचा , दागिन्यांचा खर्च ही लक्झरी नाही .... Lol
अजब न्याय आहे हा. तोही बिना खर्चाचा रजिस्टर्ड मॅरेज चा पर्याय ऊपलब्धं असतांना.
एकाच्या कमी लायबिलिटीज तू त्याच्या लक्झरी कसे म्हणू शकतोस?
माझ्या मते दोघांचा क्लास एकंच आहे 'मिडल क्लास'
ते आपल्या अवेलेबल ईन्कम आणि ऑप्शन्सवर 'सॅटिफाईस' कसे होतात ह्यावरून त्यांची युटिलिटी ठरते.
sat·is·fice (sacrifice + satisfaction )
accept an available option as satisfactory.
पहिल्या कुटुंबाला २००० रुपयांचे शूज घेणे बरोबर वाटले दुसर्याला ते पैसे मुलीच्या लग्नासाठी साठवून त्यातून दागिने विकत घेणे बरोबर वाटले ज्याची त्याची युटिलिटी वेगळी आहे रे धनि.
तू ईन्कमला बेस लाईन आखू शकतोस युटिलिटी आणि स्टॅऑलि ला नाही.
Submitted by हायझेनबर्ग on 13 July, 2017 - 11:15
संपादन

मला वाटते ह्या ऐवजी ते घेऊन वेळ मारून नेऊ ही मिडल क्लास ची व्याख्या आहे. जर विचार न करता दोन्ही घ्यायची ऐपत असती तर अप्पर क्लास मधे जातील.
Submitted by असामी on 13 July, 2017 - 12:11

लग्नाचा, कार्यालयाचा , जेवणावळीचा , दागिन्यांचा खर्च ही लक्झरी नाही >> ही सुद्धा लक्झरीच मानतो मी ! लग्नाचे पैसे ही कन्सेप्ट मी विचारातच घेत नाहीये. त्याऐवजी किती माणसं आहेत हा विचार आहे रे. तुझ्या तुलने मध्ये ३ माणसे विरूद्ध २ + ३ + २ = ७ माणसे अशी तुलना आहे.
३ माणसांसाठी १०० रूपये इन्कम हे ७ माणसांकरता १०० रूपये इन्कम बरोबर होत नाही !
Submitted by धनि on 13 July, 2017 - 12:14

जुन्या काळच्या मध्यमवर्गीय गरजेच्या फूटपट्ट्या लावल्या तर मासिक सत्तर ते ऐंशी हजार रुपये प्राप्ती असणार्‍या आजच्या या नवमध्यमवर्गाला कुठेही आर्थिक तडजोड करायची वेळ येणार नाही. >> हेच माझे म्हणणे आहे. की या नवमध्यमवर्गाने मान्य करावं की आम्ही उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत आहोत. कारण ते जसे वर चढले तसे काही गरीब सुद्धा मध्यमवर्गात आले असतील. मात्र जर आता मध्यमवर्ग म्हणजे " दहा लाखाची कार, टू / थ्री बीएचके फ्लॅट, दोघांना दर दोन वर्षाला पंचवीस हजारांचे स्मार्ट फोन्स, दर वीकेंडला मल्टीप्लेक्स मध्ये सहकुटूंब सिनेमा, मुलांकरिता वार्षिक लाख / दीड लाख फीची शाळा, वर्षातून एक डोमेस्टीक आणि दोन तीन वर्षातून एक इंटरनॅशनल हॉलिडे" अशी व्याख्या बनत चालली तर मात्र जे गरीब मध्यम वर्गात आलेले आहेत ते गरीबच बघीतले जातील आणि त्यांना त्या "मध्यमवर्गात" कधी जाताच येणार नाही. ही एक वेगळीच क्लास बेस्ड सिस्टीम बनेल.

हायझेनबर्ग तुम्ही जितक्या मुद्देसूद पणे लिहिले आहे तितक्या मुद्देसूदपणाने मलाच माझा मुद्दा मांडता आला नसता Wink

>>आता दोन्ही कुटुंबातल्या मुलाने २००० चा वुडलँडचा शू मागितला पहिल्या कुटुंबातल्या मुलाला तो मिळाला दुसर्‍या कुटुंबातल्या मुलाला मिळाला नाही कारण दोन्ही कुटुंबांची २००० रुपयांची युटिलिटी वेगवेगळी आहे.
मग सेम ईन्कम सेम लाईफ स्टाईल असूनही एक कुटुंब मिडल क्लास आणि एक अपर क्लास असे तुला म्हणायचे आहे का?>>
पण पहिल्या कुटुंबातील मुलाला शू मिळाला नाही आणि दुसर्‍या कुटुंबातील मुलाला मिळाला असेही होवू शकते ना? कारण आवक, गरजा, हौस, खर्च यापलिकडे मुळातच पैसे (मनी मॅटर) कसे हाताळायचे याबाबतची मानसिकता हा एक वेगळा पैलू आहे.

धनि तुम्ही फक्त वूडलँड आणि BMW ची बाईक, त्यांची किंमत/ ब्रँड व्हॅल्यू पाहत आहात का ?

जर या लेखात मी लखानी/बाटा ची चप्पल आणि रस्त्यावर मिळणारी शंभर सव्वाशे रुपयांची कार/बाईक हे उदाहरण घेतले असते तर तुमची प्रतिक्रिया अशीच असती का ?

स्केल/magnitude बदलला तरी मानसिकता तीच राह्यली ना?
So that's why middle-class is the state of mind......

बाकी ह्या लेखाचा मूळ शेवट मी आधी दोन वेगवेगळ्या प्रकारे लिहिला होता. सापडल्यास टाकतो परत. लेख पोस्ट करताना ऐन वेळेस मी शेवटची तीन वाक्ये बदलली आणि त्यात आलेल्या मध्यमवर्गीय शब्दाने इतका गदारोळ झाला.... Happy

पण आता मी तो एन्ड इथे टाकला तर हायझेनबर्ग घरी येऊन पोत्यात घालून मारेल मला .... Proud

कसं होतं ना, आपण कधी कधी काही लिहीतो आणि त्याचा इतर लोकांवर काय परिणाम होईल हे आपल्याला माहितीच नसते. आता तुम्ही तो मध्यमवर्गीय शब्द लिहीला नसता तर इतके काही झालेच नसते. पण जेव्हा असे जनरलायझेशन होते तेव्हा मग चर्चेला विषय मिळतो !

तुम्ही तो लिहिल्याने इतकी चर्चा तरी झाली Happy आता ते पोत्याचे काय ते तुम्ही आणि बर्ग पाहून घ्या Lol

पण पहिल्या कुटुंबातील मुलाला शू मिळाला नाही आणि दुसर्‍या कुटुंबातील मुलाला मिळाला असेही होवू शकते ना? कारण आवक, गरजा, हौस, खर्च यापलिकडे मुळातच पैसे (मनी मॅटर) कसे हाताळायचे याबाबतची मानसिकता हा एक वेगळा पैलू आहे. >> हो स्वाती. पण तुमचा मुद्दा नीट कळाला नाही. नेमके काय ईंप्लाय करायचे आहे.
पैशाचा विनियोग कसा केला गेला ह्यावरून क्लास ठरवता येत नाही असे मी म्हणतो. ईन्कम ही क्लास ठरवण्यासाठी मेझरेबल बेसलाईन होऊ शकते पण युटिलिटी किंवा स्टँडर्ड ऑफ लिविंग नाही.
वॉरन बफे दोन खोल्यांच्य अघरात राहतात, जुनी पुराणी कार चालवतात, गॅझेट्स विकत घेत नाहीत, एक्पेन्सिव लाईफ स्टाईल जगत नाहीत म्हणून ते मिडल क्लास मध्ये मोडतात असे आपण म्हणू शकत नाहीत.

मला सध्या आपण श्रीमंत / उच्च मध्यमवर्गीय असलो तरी मध्यमवर्गीय आहोत आणि हे आमचे प्रॉब्लेम्स आहेत असा जो गळेकाढू सूर निघतो आहे तो पटत नाही. >>>>

तुमच्या दुसरीकडे झालेल्या चर्चेवर खरे तर लिहिणार नव्हतो पण तुम्ही इथे जनरलायझेशन केले असे तुम्हाला नाही वाटत का ? गळेकाढू सूर माझ्या लेखात तरी नाही वाटत मला.
It is just that when it happened to me I could relate to it and feel it.

बर्ग,
इम्पाय काहीच करायचे नाहीये. उदाहरणात कमी जबाबदारी असलेल्या घरातील मुलाला शू मिळाला असे होते म्हणून म्हटले की त्याच्या उलटही घडेल ना. बाकी काही नाही.
>>पैशाचा विनियोग कसा केला गेला ह्यावरून क्लास ठरवता येत नाही असे मी म्हणतो. ईन्कम ही क्लास ठरवण्यासाठी मेझरेबल बेसलाईन होऊ शकते पण युटिलिटी किंवा स्टँडर्ड ऑफ लिविंग नाही.
वॉरन बफे दोन खोल्यांच्य अघरात राहतात, जुनी पुराणी कार चालवतात, गॅझेट्स विकत घेत नाहीत, एक्पेन्सिव लाईफ स्टाईल जगत नाहीत म्हणून ते मिडल क्लास मध्ये मोडतात असे आपण म्हणू शकत नाहीत.
>> बरोबर. अर्थात बफे यांची गोष्टच वेगळी. पैशानेही श्रीमंत आणि मनानेही.

middle-class is the state of mind ही अतरंगी यांना आवडलेली व्याख्या वापरली तर बफे देखील मध्यमवर्गीय ठरतात

गळेकाढू सूर आवडत नाही याच्याशी सहमत. आणि तो या लेखात दिसला नाही त्याच्याशीही सहमत,
वरच्या चर्चेतून बीएमडब्लू आणि woodland ही नावं वगळली असती तरीही चर्चा झाली नसती असं परत सुरुवातीचे प्रतिसाद वाचून वाटलं.

कळाले स्वाती Happy

middle-class is the state of mind ही अतरंगी यांना आवडलेली व्याख्या वापरली तर बफे देखील मध्यमवर्गीय ठरतात >>> तुमच्या आणि धनिच्या व्याखेनुसार काय ठरतात बफे मध्यम की ऊच्चवर्गीय ते पण सांगा Happy

आवडला लेख.
शेवटचा प्यारा अगदी पटला.
प्रतिसादात मध्यमवर्गावरून गोंधळ दिसला. मला तरी लेख वाचताना कुठे जाणवले नाही. आजही माझे माझ्या गर्लफ्रेण्डवर कितीही प्रेम असले तरी हॉटेलमध्ये गेल्यावर ती काय मागवतेय आणि माझे किती गमावतेय यावर बारीक लक्ष असते. आणि तिने कोणती महागडी डिश खायची ईच्छा व्यक्त करताच ते कॉम्पेनसेट करायला मी काहीतरी स्वस्तातले मागवून मोकळा होतो Happy

आज तुम्ही एखादी गरज नसणारी वस्तू विकत घेतली तर उद्या तुम्हाला गरजेची वस्तू घ्यायला पैसे कमी पडतील हा मध्यमवर्ग आणि असा विचार मनात येणे ही मध्यमवर्गीय मानसिकता.

ऋन्मेष, 'मध्यमवर्गीय घरात गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड चे स्थान - लक्झरी की नेसेसिटी' अशी एक चर्चा होउन जाउ द्या Happy पण ईथे नको वेगळा धागा काढा.

हायझेनबर्ग झरूर !
प्रत्येक जण अश्या धाग्यावर आपले वैयक्तिक पोराबाळांचे उदाहरण देतो, माझ्या आयुष्यात गर्लफ्रेंड आहे तर मी तिचे देतो. ईतकेच. अन्यथा प्रत्येक धाग्यात हट्टाने गर्लफ्रेंड आणायचीच असे काही नसते.
पण आपण सुचवलेल्या वा तत्सम विषयावर धागा जरूर काढूया लवकरच Happy

>>
आज तुम्ही एखादी गरज नसणारी वस्तू विकत घेतली तर उद्या तुम्हाला गरजेची वस्तू घ्यायला पैसे कमी पडतील हा मध्यमवर्ग आणि असा विचार मनात येणे ही मध्यमवर्गीय मानसिकता.<<

मग या न्यायाने "आमदनी अठ्ठणी, खर्चा रुपैया" वाले अतिश्रीमंत काय रे?..

नाही. त्यांच्यासाठी ऐय्याश शब्द आहे ना आपल्याकडे
श्रीमंती किती पैसे जमवले यावर ठरते, अय्याशी किती पैसे खर्च करतो त्यावर ठरते.

Pages