लॉटरी

Submitted by आनन्दिनी on 12 July, 2017 - 04:59

लिफ्टमधून बाहेर पडेपर्यंत तिच्या हातावरची त्याची पकड घट्ट झाली होती. तिचं काळीज धडधडू लागलं. घरी गेल्यावर आपली धडगत नाही हे तिला कळलं होतं. “मी खरच कधीच बोलले नाही तिच्याशी. लिफ्टमधे तिने hi केलं तेव्हा मी फक्त हसले” घरात शिरल्या शिरल्या तिने घाबरून सांगितलं. “खरंच?” संजयने उपहासाने विचारलं. “तू क्वीन एलिझाबेथ आहेस ना! की तू बोलत नाहीस आणि लोकंच आपण होऊन तुझ्याशी बोलायला येतात.... इतकं, इतकं कठीण आहे एक सांगितलेली गोष्ट पाळणं? लोकांशी बोलू नको, बोलू नको कित्ती वेळा सांगितलंय!” चिडून तिच्या अंगावर ओरडत तो पुढे सरकला. तिच्या केसांना हिसका देऊन त्याने तिचं डोकं, केसांना धरून घट्ट पकडलं. “परत कोणाशी बोलताना दिसलीस तर तुला सोडणार नाही मी.” हिस्र श्वापदाच्या तावडीत सापडलेल्या हरणासारखी कांचन थरथरू लागली. तिचं ते घाबरण बघून खुनशी हसत त्याने तिला जमिनीवर ढकलून दिलं. तिला तसं लोटून तो दार लावून एकटा घराबाहेर निघून गेला.

या महिन्यातली त्याच्या आक्रस्ताळेपणाची ही चवथी वेळ होती. तिच्या हातावरचे सिगरेटच्या चटक्यांचे डाग अजून फिकेही झाले नव्हते. कांचन कपड्यांनी अंगावरचे ठिकठिकाणचे वळ झाकत असे. झाकायचेही कोणापासून म्हणा! एकटीने बाहेर जायला तर तिला मज्जावच होता. संजय कामाला जाताना बाहेरून दार लॉक करत असे. भाजीपाला, किराणामाल आणायला तो तिच्या सोबत जात असे. कांचनच्या मनात विचार आला, लग्नाची बेडी आपल्यासाठी खरोखरीची बेडीच आहे. कोणत्या चुकीची शिक्षा भोगतोय आपण? आईवडलांनी ठरवलेल्या ठिकाणी लग्न करायला मुकाट्याने हो म्हटलं, लांब अनोळखी माणसाबरोबर लग्न नको असा विरोध नाही केला या चुकीची की आपले आईवडील भोळे आहेत, संजयची काही चौकशी न करताच त्यांनी विश्वास ठेवला या चुकीची! काय म्हणायचे बाबा नेहेमी “तो परमेश्वर नेहेमी वरून आपल्याला बघत असतो. लक्ष ठेवत असतो, काळजी घेत असतो.....” तिने मान वर करून बघितलं. वर घराच्या पांढर्या छताशिवाय काहीच दिसलं नाही. तिची नजर खिडकीकडे गेली. पंधराव्या मजल्यावरून खालचा रस्ता, त्यावरच्या गाडया खेळण्यांसारख्या दिसत होत्या. ‘नाही हो बाबा तो नाहीये वर. आणि असलाच तर त्याचं लक्षच नाहीये माझ्याकडे. त्याचं आकाश फार दूर आहे माझ्यापासून आणि माझी जमीनही सुटली.’ तिच्या गालांवरून आसवं वाहू लागली. पण पुसणारं कोणीच नव्हतं.

महाराष्ट्राच्या नकाशावरही नसलेल्या छोट्याश्या गावात कांचन लहानाची मोठी झाली. वडिलोपार्जित जमिनीचा छोटासा तुकडा, त्यावर पिकवून त्यांचं कसंबसं चाले. गरिबी तिच्या घराच्या पाचवीलाच पुजलेली होती. पण तिचे आईवडील आहे त्यात संतुष्ट असत. चटणी भाकरी खाऊन आला दिवस साजरा करत. त्यांच्या गावात डांबरी रस्ता बांधण्याचं काम सुरु झालं. कंत्राटदार गावात आला. त्याने संजयचं स्थळ तिच्या वडलांना सांगितलं. ‘फॉरेन’चा मुलगा ! नाते वाईक वगैरे काहीच लटांबर नाही. तुमची मुलगी राणी होईल, त्याने तिच्या वडलांना स्वप्नं रंगवून दाखवलं. आणि एरवी कदाचित ते इतक्या चटकन फसलेही नसते पण तो फकीर..... किती वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ती.......

कडक उन्हाळ्यातली ती दुपार होती. कांचन, आई, वडील आणि दोन बहिणींबरोबर जेवायला बसली होती. इतक्यात दारातून आवाज आला. “क्या भूखे फकीर को थोडा खाना मिलेगा?” वडलांनी त्यांच्या ताटातल्या एका भाकरीचे दोन तुकडे केले, एक तुकडा आणि त्यावर चटणी, हातांत घेऊन ते दारापाशी आले. वडलांच्या मागे शेपटासारखी तीसुद्धा दाराकडे आली. तिच्या वडलांनी फकिराला ती भाकरी दिली आणि विचारलं, “पानी चाहिये बाबा?” फकिराने मान डोलावली. “कांचन, बाबांना पाणी आण” त्यांनी कांचनला सांगितलं. कांचन आत जायला वळणार तोच त्या फकिराने तिच्याकडे बोट करून तिच्या वडलांना विचारलं, “आपकी बेटी है?” वडलांनी हो म्हणून मान हलवली. तिच्या चेहर्याकडे निरखून बघत फकीर म्हणाला, “इसकी तो लॉटरी आनेवाली है, बहुत पैसा आएगा, बहुत पैसा !!” कांचन तिथेच थबकली. तिच्या वडलांनाही हे अगदीच अनपेक्षित होतं. “आप ज्योतिष जानते हो बाबा?” त्यांनी फकिराला विचारलं. आणि लगेच तिला म्हणाले, “कांचन पाया पड त्यांच्या” आपण पाया पडलो तेव्हा काय बरं म्हणाला तो फकीर, अर्थही नीटसा कळला नव्हता....

त्या दिवसापासून बाबांना मात्र खरंच वाटायला लागलं की लॉटरी लागणार आहे. दर वेळी तालुक्याच्या गावी गेले की ते कांचनच्या हाताने एक लॉटरीचं तिकीट घेत. पण कधी बक्षीस लागलं नाही. संजयचं हे फॉरेनचं स्थळ आलं तेव्हा ते खूष होऊन ज्याला त्याला सांगायचे “बघा तो फकीर म्हणाला होता ती लॉटरी हीच. आमच्या सात पिढ्यांत कोणी मुंबईसुद्धा बघितली नाही. आणि आता आमची कांचन फॉरेनला जाणार. लॉटरी नाहीतर काय म्हणायचं याला ! नक्की हीच ती लॉटरी होती आणि मी वेड्यासारखा तिकीटं घेत बसलो”

“ही लॉटरी?” हातावरच्या वळांवरून अलगद दुसरा हात फिरवून तिने स्वतःला विचारलं. बाबा कसे हो तुम्ही एवढे भोळे. तो फकीर वेडा, की मला एवढं लांब असं पाठवून देणारे तुम्ही वेडे, की काहीही कारण नसताना माझा असा छळ करणारा हा माझा नवरा वेडा, की हे सगळं चुपचाप सहन करणारी मी वेडी....

बर्याच उशिरापर्यंत संजय आला नाही तेव्हा कांचन झोपून गेली. रात्री बर्याच वेळाने, चावीने दार उघडल्याचा आवाज आला. त्याचबरोबर दारूचा उग्र दर्प. संजय लडखडत खोलीत आला. देवा, आज नको...... आज नको..... कांचनने मनात देवाचा धावा सुरु केला. ती झोपल्याचं नाटक करून अंग चोरून तशीच पडून राहिली. तिच्या सुदैवाने तो बिछान्यात पडला आणि पुढच्याच क्षणाला घोरू लागला. तिची झोप मात्र मोडली ती मोडलीच. जुन्या गोष्टी तिला आठवू लागल्या. तिचं लग्नं ठरलं तेव्हा डॉक्टरकाका आणि प्रमिलाताई तिच्या घरी आले होते. हे पतीपत्नी म्हणजे सीतारामाची जोडी होती. ते गावात धर्मदाय दवाखाना चालवत. शिवाय गावात शिक्षणाबद्दल जागरूकता आणण्यासाठीही काहीनाकाही करत असत. प्रमिलाताई घरोघरी जाऊन बायकांशी बोलायच्या. त्यांना आहार, आरोग्य, स्वच्छता, कुटुंबनियोजन सगळ्याबद्दल नीट समजावून सांगायच्या. गावातली एक अनाथ मुलगी यांनी दत्तक घेतली होती. तर डॉक्टरकाका बाबांना सांगत होते, “तुम्ही मुलाची अजून माहिती काढायला हवी. त्याशिवायच कांचनला असं पाठवायचं म्हणजे..... त्यात तिला इंग्रजीही फारसं येत नाही. देव न करो पण तिला मदत लागली तर परक्या देशात ती कसं काय करणार?” “आपले कॉन्ट्रॅक्टर मिश्रा त्यांना ओळखतात ना. आणि आम्ही गरीब माणसं, परदेशात चौकशी करायला आमचं तिथे आहे कोण ! आज कांचन गेली तर उद्या पुढच्या पिढीचं सोनं होईल.....” बाबांनी त्यांचं ऐकलं असतं तर..... पण परदेशाच्या लॉटरीने त्यांना आंधळं केलं होतं.

अंधारात चकाकणारे घड्याळाचे काटे बारा वाजल्याच दाखवत होते पण कांचनला झोप कशी ती नव्हती. कुठूनतरी विचित्र वास येत होता, ती उठून स्वयंपाकघरात गेली. तिथे सगळं ठीक होतं. वास कुठून येतोय कळेना. तिने खिडकीतून खाली बघितलं. रस्त्यावर बरीच गर्दी होती. लोक हातवारे करून काही सांगत होते पण काही ऐकू येत नव्हतं. घराचं दार उघडून बघावं का काय झालंय. पण तिची हिम्मत होईना. घाबरत, दबकत तिने हॉलची खिडकी थोडीशी उघडून ऐकण्याचा प्रयत्न केला. आता किंचाळ्याचे आवाज यायला लागले होते. फायर फायर.... म्हणून लोकांच्या ओरडण्याचे आवाज येत होते. ती पुरी गोंधळली. काय करावं, काय करावं, जळका वास वाढला होता. फार विचार करायला वेळ नव्हता. ती बेडरूम कडे वळली. संजय अजूनही घोरत होता. आजूबाजूच्या गोंधळाचा त्याला पत्ताच नव्हता. त्याला उठवायला तिने हात पुढे केला तशी तिच्या कुडत्याची बाही जराशी वर सरकली. त्याने दिलेला सिगरेटचा चटका त्या मंद प्रकाशातही दिसत होता. तिने एक वार आपल्या हातावरच्या वळांकडे पाहिलं, आणि मग झोपलेल्या संजयकडे. एक क्षण विचार करून ती उलट्या पावली मागे फिरली. बेडरूमचं दार तिने लावून घेतलं, आणि निघणार इतक्यात ती पुन्हा वळली, नुसतं आड असलेलं दार तिने घट्ट लावून घेतलं आणि त्याला बाहेरून कडी लावली. बंद दाराच्या या बाजूला असण्याची तिची ही पहिलीच वेळ होती.

संजय कामाची कागदपत्रं बाहेरच्या कपाटातल्या कप्प्यात ठेवायचा हे तिने पाहिलं होत, तिने तो कप्पा उघडला, त्यात तिचा पासपोर्ट समोरच होता तो उचलला आणि ती घराबाहेर जिन्याकडे धावत सुटली. किंचाळ्या, आरडाओरडा, रडणं, कुंथण कसकसले आवाज येत होते पण ती पळत सुटली. आपण आगीपासून पळतोय की संजयपासून.... कुठे जायचं, कसं जायचं, पण पहिल्यांदी या इमारतीतून बाहेर पडायला हवं. मग पुन्हा भारतात जाऊ. आई बाबांकडे. ते कधीच आपल्याला टाकणार नाहीत. आपण निघतानाही ते आपल्याला म्हणाले होते “हे घर नेहेमी तुझंच आहे. काही काळजी करू नकोस, ‘तो’ वरून बघतो आहे, ‘तो’ सगळी काळजी घेईल.” एव्हाना ती तीन माजले खाली आली होती. ‘तो’ वरून बघतो आहे.... ‘तो’ वरून बघतो आहे.... म्हणजे मी आत्ता संजयला वर कोंडून आले तेसुद्धा त्याने बघितलं का? त्याला खरच सगळं दिसतं का? मग माझे हाल होतात तेव्हा?.... तो काहीच कसा करत नाही.... धूर वाढत होता, तिच्या नाकातोंडात धूर जात होता, तिला काही कळेनासं झालं..... फक्त वडलांचं “’तो’ बघतो आहे..... ‘तो’ बघतो आहे.....” वाक्य तिच्या डोक्यात ठाण ठाण वाजू लागलं. असह्य हौऊन तिने दोन्ही हातानी कान दाबले आणि ती उलट पुन्हा वर तिच्या फ्लॅटच्या दिशेने धावू लागली. पळत पळत ती घरात आली. बाहेरचा दरवाजा तिने उघडाच टाकला होता. ती धावत बेडरूमकडे गेली. आतून संजय जोरजोरात ओरडत होता. “दार उघड हरामखोर...... दार उघड, मरेन मी......” तिने कडी काढली त्याबरोबर तो पिसाळलेल्या जनावरासारखा बाहेर आला. बाहेर येऊन खाडकन त्याने तिच्या गालवर जोरदार थप्पड दिली आणि तो दरवाज्याकडे धावला. ती त्याच्या मागे. आता धूर चांगलाच वाढला होता, ते जिन्याच्या दिशेने निघाले एवढ्यात अग्निशमन दलाचा एक फायर फायटर वर आला. त्याने संजयला सांगितलं की आगीने जिन्याचा रस्ता बंद झाला होता, फायर एस्केप (आपत्कालीन मार्ग) म्हणून बिल्डींगच्या मागच्या बाजूला शिडीसारख्या पायर्या होत्या त्यावरून खाली जावं लागणार होतं. ते तिघे बिल्डींगच्या मागच्या बाजूच्या शिड्यांवरून खाली जाऊ लागले. पुढे तो फायर फायटर , मधे ती आणि मागे संजय. आग आता चांगलीच पसरली होती. इमारतीत ठिकठिकाणी आगीने पेट घेतला होता. इथल्या घरांच्या बांधकामात लाकूड खूप वापरतात त्यामुळे आगीचा धोका असतो हे कांचनने ऐकलं होतं पण त्याचं एवढं रौद्र रूप बघायची वेळ येईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आता ते दहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. संजय अजूनही खवळलेलाच होता. “मला कोंडून काय पळून चालली होतीस, you...xxxxx” असं म्हणून त्याने पुढे शिडी उतरणार्या कांचनला एक सणसणीत लाथ मारली. कांचन भेलकांडत पुढे असणार्या फायर फायटर वर जाऊन आदळली. त्या दोघांनीही दचकून मागे पाहिलं. इतक्यात वरच्या मजल्यावरून आगीने पेटलेला एक मोठा लाकडी खांब खाली कोसळला आणि त्यांच्या डोळ्यांसमोरच संजयच्या अंगावर पडून त्याच्यासकट खाली गेला.

कांचन दवाखान्यात प्रमिलाताईच्या समोर बसली होती. तिच्या हातात एक लिफाफा होता बाहेरून आलेला. तिने तो ताईपुढे केला. “हे काय आहे?” त्यांनी विचारलं. “लॉटरी.... संजयच्या कंपनीने त्यांच्या सगळ्या लोकांचा विमा काढला होता. एक लाख पौंडांचा चेक आलाय माझ्या नावाने. आगीत खूप जणं गेली, सगळ्यांच्या बॉडी सापडल्या नाहीत, ओळखता आल्या नाहीत. पण संजयची बॉडी सापडली आणि फायर फायटरने साक्ष दिली म्हणून माझा चेक लवकर आला.” प्रमिलाताईनी कांचनच्या हातावर थोपटलं. “कांचन, तू खूप हिंमतीची आहेस. ह्या पैशांसाठी तालुक्याच्या बँकेत खातं उघडून देऊ तुला?” “नाही ताई, एवढ्या पैशांची आम्हांला गरजच नाही. आईबाबांना म्हातारपणासाठी पुरतील एवढे पैसे ठेवीन मी पण बाकी सगळे पैसे चांगल्या कामाला वापरले जाऊदेत. बाबासुद्धा हो म्हणालेत. तुम्ही सांगा कसं करायचं ते” प्रमिलाताई अवाक झाल्या. त्या म्हणाल्या, “हे बघ बाळा, आत्ता, तुला धक्का बसलाय. अशा वेळी मोठे निर्णय न घेणं चांगलं. थोडा वेळ जाऊदे. मग शांत चित्ताने ठरव.”

“शांत?.... शांत कधी वाटणार मला ताई? झोप लागत नाही, लागली तरी कधी मला मारणारा, छळ करणारा संजय डोळ्यांसमोर येतो. कधी आग डोळ्यांसमोर येते, ती जळकी प्रेतं, ते कळवळणारे, रडणारे लोक डोळ्यांसमोर येतात. आगीने पेटलेला, दहाव्या मजल्यावरून खाली पडणारा संजय डोळ्यासमोर येतो आणि आठवतं की मी त्याला तिथे जळून जायला कडी लावून जाणार होते” कांचन उद्रेकाने थरथरत होती. “पण माझी चूक नाहीये, ‘तो’ वरून बघत होता, मी कडी काढली, मी कडी काढली.....” ती हमसाहमशी रडू लागली. “तुझी चूक नाहीये बाळा, तुझी चूक नाहीये, उलट तू किती भोगलयस.” प्रमिलाताई हळवं होऊन म्हणाल्या.
“मग आता संपूदे ताई. मला शांती मिळू दे. तुम्ही माणसांपासून प्राण्यांपर्यंत सगळ्या गावाची काळजी घेता. तुमच्या कामात मला देव दिसतो. माहितीये ताई, त्या फकिराला पाया पडले तेव्हा तो मला काय म्हणाला होता...”
“ते लॉटरीचं?”
“हो लॉटरीचं, पण नंतर अगदी हलक्या आवजात त्याने मला सांगितलं लॉटरी तो लगेगी, बहोत पैसा मिलेगा, लेकीन बेटा सुकून पैसेसे नही, इबादत से मिलेगा”

डॉ. माधुरी ठाकुर (* इबादत = उपासना)
http://drmadhurithakur.blogspot.co.uk/

Group content visibility: 
Use group defaults

हा या कथेचा गाभा आहे. तो जर कळला नसेल तर तीसुद्धा खेदाचीच गोष्ट आहे .>>> गाभा व्यवस्थित कळतोय. आशय व्यवस्थित पोचतोय आनंदिनी.
आवडली कथा. तुम्ही छान लिहिता. साधं सोपं सुंदर वाटतं. मोहनाच्याही कथा आवडतात मला.

<<<<<<बायकोला अशी फडतूस वागणूक देणारे नवरे कथेतच नाही तर प्रत्यक्ष जगातही कैक असतात.. आहेत..
अश्या नवर्‍याच्या खूनाचा विचार तिच्या मनात आला म्हणून तिला दोषी ठरवणारे प्रतिसाद वर आलेले बघून खरेच आश्चर्य वाटले..
कारण मी कथा वाचत असताना जेव्हा तिने दाराला बाहेरून कडी लावली हे वाचले तेव्हा मनात "है शाब्बास, मस्त केले" असेच आले.. तर त्याउलट जेव्हा तिचे मन खाताच तिने पुन्हा कडी उघडली तेव्हा काय मुर्खपणा करतेय असे आले.. पण शेवटी तिच्या याच चांगुलपणाचे बक्षीस तिला मिळाले समजूया जे त्यामुळेच क्लेम लवकर सेटल होत पैसे मिळाले. पण शेवटी पैसेही भोगलेल्या यातनांची भरपाई करू शकत नाहीच..>>>> ऋ +७८६ Happy
सिम्पल कथा दिसली की सगलयांच्या अंगात डिटेक्टिव्ह घुसायल लागतो...>>>>>> +१

सुरेख कथा! आवडली

कायद्याची मदत का घेतली नाही?? इथे भारतात सुध्दा कायद्याची मदत इतक्या सहजपणे मिळत नाही तर परदेशात असणार्‍या एका निराधार मुलीची काय बात!

कथा आवडली.
>>कायद्याची मदत का घेतली नाही?> हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न. अशा नात्यात पिडीत व्यक्तीचे झालेले मानसिक खच्चीकरण लक्षात घ्यावे. सशक्त शरीर आणि मन असताना, मनात कुणाची दहशत नसताना बोलणे फार सोपे .

कायद्याची मदत का घेतली नाही?? इथे भारतात सुध्दा कायद्याची मदत इतक्या सहजपणे मिळत नाही तर परदेशात असणार्‍या एका निराधार मुलीची काय बात! >>>>>>>+11111

हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न. अशा नात्यात पिडीत व्यक्तीचे झालेले मानसिक खच्चीकरण लक्षात घ्यावे. सशक्त शरीर आणि मन असताना, मनात कुणाची दहशत नसताना बोलणे फार सोपे . >>>>>>+111111

कथा आवडली. खुनाचा प्रयत्न गुन्हा नक्कीच पण स्वसंरक्षणासाठी खून करणं कायद्याने गुन्हा नाही. इथे नेमकं स्पष्ट नाहीये पण सिग्रेट्सचे चटके, लैंगिक अत्याचार, मारहाण या संदर्भांवरून कल्पना येते की तिने स्वतःला वाचवण्यासाठी हा प्रयत्न केला असावा. तिने काय केलंय हे सिद्ध होऊन केस उभी राहिली असती तरी तिची तपासणी होऊन चटके, बलात्काराचे पुरावे मिळून तिला शिक्षा सौम्यच झाली असती किंवा माफ झाली असती.

कायद्याची मदत का घेतली नाही?? इथे भारतात सुध्दा कायद्याची मदत इतक्या सहजपणे मिळत नाही तर परदेशात असणार्‍या एका निराधार मुलीची काय बात!
>>>>>>>

+786
ती हिंमत दाखवल्यावरही तो कायदा किती मदत करतो आणि त्यात किती लूपहोल्स असतात हे देखील आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे बरेचदा अश्या प्रसंगी सारासार विचार करत स्वत:च काय नैतिक आणि काय अनैतिक हे ठरवून निर्णय घ्यावे लागतात..
बस्स याच चर्चेसाठी त्यांना कायद्याच्या धाग्यावर आमंत्रण दिले होते. .. पण असो,

अगदी आजच्या तारखेलाही लैंगिक शोषण, हुण्डाबळी ईत्यादी केसेसचे रेकॉर्ड काढले आणि त्या सारयाजणी पाणी नाकापर्यंत येईस्तोवर का थांबतात, कायद्याची मदत का घेत नाहीत याची कारणे शोधली तरी वरील प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल..

तरी तिची तपासणी होऊन चटके, बलात्काराचे पुरावे मिळून ...

>>>>

आपल्याकडे नवरयाने सिगारटचे चटके देत ओरबाडलेले शरीरसुख बलात्कारात धरले जाते का?
जर ते सिगारेटचे चटके बघून नवरयाच्या दोन थोबाडीत मारून रात्रभर कोठडीत टाकण्यात येणार असेल तर अवघड आहे अश्या कायद्याची मदत घेणे.

कायद्याच्या मदतीवर आक्षेप घेणार्‍या आणि खुनाच्या प्रयत्नांची भलामण करणार्‍या सगळ्यांना आणि लेखिकेला सुद्धा माझा एक प्रश्नं आहे.

कांचन साठी महत्वाचे काय होते? त्या घरातून, नवर्‍याच्या जाचातून सुटका करून घेणे की झालेल्या त्रासाचा बदला घेणे?

ती त्या रात्री पासपोर्ट घेवून पळाली तशी ती ईतर कुठल्याही रात्री पळू शकली असती. नवरा हाताला धरून का होईना बाहेर घेवून जात होता तेव्हा ती ईतरांशी बोलू शकत होती आणि मदत मागू शकली असती आपली सुटका करून घेवू शकली असती.

सगळे जण म्हणत आहेत तसे झालेल्या त्रासाचा बदला घेणे हा हेतू असेल तर ती खुनाच्या शिक्षेला पात्रं ठरली असती.

विक्टिम असले म्हणजे एखाद्याला प्लान करून जाळून मारण्याचा गुन्हा माफ होत नाही.

शेवटचा फायर एस्केपवरचा सीन तर अतिशय चुकला आहे. कुठलाही फायर फायटर विक्टिम लोकांच्या आधी खाली ऊतरण्याचा स्वार्थीपणा करत नाही .

आयुष्यभर साथ देतो असे सांगणारा नवरा हालहाल करू शकतो तर एखदा फायर फायटर स्वार्थीपणे वागला तर त्यात अविश्वसनीय काय..

हुप्पाहुय्या,
कथेत फायर एस्केप बाबत तांत्रीक चूक आहे हे मान्य. पण तुम्ही जो लॉजिकली विचार करताय तो परीघाबाहेरुन. अ‍ॅब्युझ सहन केलेल्या व्यक्तीची मानसिकता ही नॉर्मल व्यक्तीसारखी नसणार. एकीकडे पापभीरु मन, एकीकडे नवर्‍याबद्दल भीती आणि तिरस्कार, दाटून आलेला असहायपणा आणि आगीच्या घटनेत वीज चमकावी तसा सुचलेला आणि स्विकारलेला कायमच्या सुटकेचा मार्ग. काही काळापुरताच पडलेला मोह आहे, मात्र भानावर येवून 'देव बघतोय'' असे म्हणत तिथून परत फिरून झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्नही आहे. गुन्ह्याबद्दल बोलायचे तर झाल्या प्रकाराबद्दल नायिकाच स्वतःला माफ करु शकत नाहीये/ बहूधा कधीच माफ करु शकणार नाही. तो तिचा स्वभाव नाही. मात्र नवर्‍याच्या लाथेने ती खाली कोसळली असती तर तिच्या नवर्‍याने मात्र she deserved it असे म्हणून नक्कीच हात झटकले असते.

कथेतला अब्युझ एका रात्रीतून तर ऊगवलेला दिसत नाही तो प्रोग्रेशनमध्ये होत असतो- क्रेंद्राकडून परिघाकडे. मरण्या-मारण्यावर ऊतरण्याआधी व्यक्ती प्रसंगातून स्वतःची सुटका बघते. पापभीरू आणि नवर्‍याबद्दल भिती वाटणारी स्त्री तर नक्कीच सुटका करून घेण्याचा, मदत घेण्याचा प्रयत्न करेल आणि सुटका पासपोर्ट घेवून दरवाजा ऊघडून निघून जाणे एवढी सोपी असतांना ?
देव वगैरे ईमोशनल, लिहिण्या/वाचण्याची गोष्टं झाली ....ज्युरी बॉक्स मध्ये बसून ऐका जेव्हा आरोपीला वकील विचारतो, 'एवढा अब्युझ होतांना कधी मदत मागण्याचा, सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला होता का?
तुम्ही म्हणता तश्या एक्स्ट्रीम मरण्या-मारण्याच्या केसेस होऊ शकतात / झाल्या आहेत हे माहित आहे. कोर्टातून काय सिद्धं होऊ शकते ते ही माहित आहे. डोमेस्टिक वायलंस बद्दल भारत आणि ईतर युरोप्/अमेरिकेतल्या परिस्थितीत काय फरक आहे हे सुद्धा माहित आहे.
पण ह्या कथेतून 'प्रोवोक्ड' सारखी स्ट्राँग केस बनत नाही, खर्‍या जगात काय घडले आहे ह्याचा रेफरंस कथेत घेण्याची गरज वाटत नाही, म्हणून कथा फसलेली आहे असे मला वाटते.

हुप्पाहुय्या

जसं अनेकांनी दिलेलं 'कथा छान आहे' हे
कॉम्प्लिमेंट मी आनंदाने स्वीकार करते तसंच तुमचं
'कथा फसली आहे' हे verdict सुद्धा मी सादर स्वीकार करते. प्रत्येकाला आपापली आवड नावड आहेच.

फक्त abused victim बद्दल थोडीशी सहानुभूती असावी असं मला वाटतं. तुमच्या ओळखीच्या कुठल्याही, अगदी कुठल्याही बाईला विचारा की पुरुषांनी अंगचटीला येण्याचा अनुभव आयुष्यात किती वेळा आला आहे. आणि मग विचारा की किती वेळा बायकांनी आवाज केला आहे . जरा गर्दी असली की मार धक्का असे पुरुष असंख्य आहेत.... आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला 'कांचन'च्या जागी कल्पना करून पाहिलं तर आपली reaction तशीच असेल का? तुम्ही स्वतः अशा नराधमाला मारायला धावून नाही जाणार ? आपण सगळे जज च्या खुर्चीवर बसून निकाल देण्यापेक्षा थोडे अधिक empathy ने विचार करू शकलो तर किती बरं होईल. सहन करावं लागतंय तो 'आपला' नसतो म्हणून आपण कठोर होतो ना?

मदत का घेतली नाही

* मदत मागण्याचीही हिम्मत नसणं हे abuse व्हिक्टिम्सच्या बाबतीत अतिशय कॉमन आहे.

* On average high-risk victims live with domestic abuse for 2.3 years before getting help म्हणजे बराच काळ या बायका मुकाट्याने सहन करतात हा fact आहे .

* Each year an estimated 1.9m people in the UK suffer some form of domestic abuse - of which  1.3 million victims are  female

* 7 women a month are killed by a current or former partner in England and Wales

तुम्ही ही माहिती सहज google करू शकता.

आनंदिनी, योग्य आकडे आणलेत. अर्थात या आकड्यांचीही गरज नाही. परीस्थिती काही लपलेली नाही. अश्या घटनांच्या प्रमाणाचा उल्लेख मी माझ्या आधीच्या एका पोस्टीतही केलेलाच.

कायदा हातात घेणे तसे चूकच., पण ईतिहास गवाह है, जेव्हा समाजात बदल घडवायची वेळ येते तेव्हा काही कायदे मोडावेच लागतात., असो, शुभरात्री

कथा फसली आहे' हे verdict सुद्धा मी सादर स्वीकार करते. >> मला गोलगोल, छान, गोड वगैरे बोलणं आणि लिहिणं जमत नाही हे लक्षात आलेच असेल. मी मुद्दाम हार्ष, मनाला लागेल असे बोलते असा अनेकांचा समज होतो आणि ते मला प्रतिसाद देण्याच्या भानगडीत पडत नाहीत, ज्याला माझा नाईलाज आहे. पण तुम्ही तसा विचार न करता प्रतिसाद दिलात ह्याबद्दल खरंच आदर आणि आनंद वाटला.

abused victim बद्दल सहानुभुती आहे, पर्व्ह लोकांचा अतिशय रागही येतो आणि तुम्ही दिलेले स्टॅट्सही माहित आहेत जे मी आधीही म्हणाले.
पण हे रिअल लाईफ स्टॅट्स आणि तुमची कथा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्टॅट्स खरे आहेत म्हणून कथा फुलप्रूफ होत नाही कारण मी कथा वाचतांना तुम्ही म्हणता आहात ते स्टॅट्स आणि ईमोशन्स माझ्या डोक्यात येत नाहीत.
कथेतल्या 'कांचनला' पहिल्याने सुटका जरूरी होती. 'एकटीने बाहेर जायला तर तिला मज्जावच होता. संजय कामाला जाताना बाहेरून दार लॉक करत असे.' असे लिहून तुम्ही ती ग्वांटानामो बे मधल्यासारखी हॉस्टेज होती असे सांगायचा प्रयत्न केला. पण बाकीची कथा वाचतांना ती तिच्या अब्यूजरपासून पळून जाऊ शकत होती असेच दिसले. मग सहजासहजी सुटका (तेही रोज) शक्य असतांना ती खुना-बिनाच्या भानगडीत का पडेल? तेवढा राग तिरस्कार 'कांचन' ह्या पात्राकडून दिसलाच नाही. खुनाची भावना बिल्ड व्हायला वेळ लागतो पण ईथून आपल्याला निघून जायचे आहे सुटका करून घ्यायची आहे ही सुरक्षिततेची भावना चटकन तयार होते.

On average high-risk victims live with domestic abuse for 2.3 years before getting help > On average high-risk victims live with domestic abuse for 2.3 years before trying to kill their abuser असे नाहीये, मी ही आधी हेल्प घेण्या बद्दलंच बोलले आहे. जे अब्यूजर बरोबर राहतात त्यांची मुले, आर्थिक पारतंत्र्य, आत्मविश्वासाचा अभाव, ईतर नातेवाईक नसणे अशी अनेक कारणे असू शकतात. तुमच्या कथेमध्ये तिला घरात/नात्यात बांधून ठेवणारे काहीच नवह्ते. वरतून "मग पुन्हा भारतात जाऊ. आई बाबांकडे. ते कधीच आपल्याला टाकणार नाहीत. आपण निघतानाही ते आपल्याला म्हणाले होते “हे घर नेहेमी तुझंच आहे. " तिला कुठे जायचे तेही माहित होते. सपोर्ट करू शकणारी लोकंही होती.

मला तरी कांचनच्या वागण्याचा 'कारण नसतांना सहन करणे (कारणं जी तुम्ही द्यायला हवी होती)', 'शक्य असतांना पळून न जाणे' (ह्याचीही कारणं द्यायला हवी होती) , 'नको तेव्हा खुनाचा प्लॅन करणे', 'सुटका समोर असतांना गिल्ट नको म्हणून पुन्हा जीव धोक्यात घालणे', 'ज्याचा तिरस्कारच केला त्याचे थोडेच का असेना पैसे घेणे' आणि 'पैशांची हाव नाही असे दाखवणे' काहीच ताळमेळ लागला नाही.

माझा 'कथा फसली आहे' हा प्रतिसाद स्वीकारतांना तुम्ही जेवढा आदर दाखवलात तेवढ्याच आदराने मी हा प्रतिसाद लिहिला आहे. मन दुखवण्याचा, मुद्दाम निगेटिव लिहिण्याचा प्रयत्न आजिबात नाही.

च्रप्स, जर कोणी मुद्दा धरून चर्चा करत असेल तर त्याला इग्नोरू नये किंवा कंटाळू नये. आपला मुद्दा योग्य असेल तर पटवून द्यावेच.
इग्नोर करायचे झाल्यास वैयक्तिक टिकेला करावे. ती समोरच्याचे मुद्दे जेव्हा संपतात किंवा आपला मुद्दा जेव्हा समोरच्याला पटतो पण त्याला मान्य करायचा नसतो तेव्हा सुरू होते. त्यामुळे तिथे आपले मत व्यवस्थित पोहोचले आणि चर्चा यशस्वी झाली समजून सोडून द्यावे.

कांचन ला इंग्लिश येत नाही हे आधीच सांगितलंय। ती मदत मागणार कशी आणि कुणाजवळ। दुसऱ्या देशात एकाकी पडल्यासारखे होत असेल आणि कधी ना कधी नवऱ्याचा त्रास संपेल या आशेवर ती राहत असणार। शिडीवरून जाताना संजय तिला लाथ मारतो। अशा खुनशी माणसाला कोंडले ते योग्य च केले । नन्तर माणुसकी म्हणून कडी उघडली हे पटण्यासारखे आहे

खुनाचा विचार आला यात काहीच वावगे नाहिए. इतका मानसिक व शाररिक त्रास सहन केल्यावर अशी भावना येणे सहाजिकच आहे. नंतर शिक्षा होइल हि नंतरची गोष्ट. आणि सर्वप्रथम हि एक कथा आहे. प्रत्येक मनुष्य हा वेगळा असतो आणि प्रत्येकाचे द्रुष्टीकोन परिस्थिती नुसार वेगाळे असणारच परदेशात पोलिस किंवा तत्सम कायद्यानुसार मदत मागणे सोपे सहज किंवा तोच सर्वोत्तम मार्ग असेल देखील पण प्रत्येकाची परिस्थिती ला सामोरे जायची आणि उपाय शोधण्याची पद्धत वेगळी असते. आणि या कथेतील व्यक्तिरेखेला नसेलही जमले म्हणून कथा जमलेली नाहि असे मला तरी नाही वाटत.

माणूस नको पण त्याचा पैसा हवा असे वाटते आहे>>>>या वाक्याचा खरच आश्चर्य वाटते निदान कथेचा संदर्भ बघता.

वाइट असला तरी नवरा हा स्ंसारी मनुष्य् होता. त्यामुळे पैसा पगार घर इन्शुरन्स ह्या त्याच्या जबाबदाऋया होत्या>>>>हि मानसिकता कधी बदलेल देव जाणो.

आणि वरती पैसे मिळाले तरी काय बिघडले? भोगलेल्या त्रासापुढे हे पैसे काहिच मोलाचे ठरत नाही. तिला संतपदी पोहचवण्याचा प्रयत्न असेल तरीही मान्य.

ही एक कथा आहे आणि कथे म्हणून वाचल्यास बरे. शेवटी प्रत्येकाची वागण्याची विचार करण्याची पद्धत वेगळी म्हणून एखाद्याला जज(judge) करणे बरोबर नाही.
आणि हे माझी मते आहेत मतभेत असू शकतत.

जेव्हा तिने दाराला बाहेरून कडी लावली हे वाचले तेव्हा मनात "है शाब्बास, मस्त केले" असेच आले.. तर त्याउलट जेव्हा तिचे मन खाताच तिने पुन्हा कडी उघडली तेव्हा काय मुर्खपणा करतेय असे आले.. >>> ऋन्मेऽऽष +१११११ मला देखिल हेच वाटलेले.

provoked movie kuthe baghaayalaa miLel?>>provoked मूवी डाउनलोड करून पाहू शकता ..हि कथा वाचली तेव्हा याच movie.ची आठवण झाली..

Pages