आयुष्यात एक इरफान खान हवा

Submitted by विद्या भुतकर on 11 July, 2017 - 18:56

काही दिवसांपूर्वी 'हिंदी मिडीयम' पाहिला. खूप आवडला. त्याचा शेवट कसा असला पाहिजे वगैरे मुद्दे सोडून अगदी नुसत्या इरफान खान साठी आवडला. त्यातला तो बारका पोरगा होता ना सुरुवातीला त्या मुलीसाठी तिच्या आवडीचा ड्रेस शिवणारा तोही आवडला. आजकाल होतं काय? कुठलेही चित्रपट पाहिले तरी त्यात तो व्यक्ती दिसत राहतो. म्हणजे शाहरुख खान, सलमान किंवा अक्षय कुमार वगैरे. कथा कशीही असो त्यात कथेतला नायक दिसत नाही, फक्त 'हिरो' दिसत राहतो. आणि त्या गोष्टीचा मला भयंकर कंटाळा आला आहे.
तर या हिंदी मिडीयम मध्ये इरफान आवडला तो त्याच्या ऍक्टिंग पेक्षा एक व्यक्ती म्हणून. एक सामान्य माणूस आपल्या बायकोच्या खुशीसाठी अगदी जमेल ते करायला तयार आहे. आणि ते दाखवण्यासाठी कुठेही एक्सट्रा प्रयत्न करून शॉट्स घेतले नाहीयेत. म्हणजे याच मूव्हीमध्ये शारुख असता तर त्याचे गट्टे पडलेले हात एकदम झूम करून, मग हिरोईन त्याच्या हातावर फुंकर मारणार, मग तो तिच्याकडे प्रेमाने बघणार, तेही एकदम झूम करून. किंवा सलमान असता तर हिरोईन ला त्रास होतोय म्हणून उगाच तिला उचलून वगैरे धरणार, हे सगळं अतिरंजित बघायला लागलं असतं. नवरा संडासातून ओरडत आहे म्हणून पाणी शोधणारी ती आणि दमलेला पाय तिच्या पायावर टाकून झोपणारा तो, किती साधे तरीही गोड. उगाच त्यासाठी तिने त्याचे पाय चेपलेच पाहिजेत असं नाही.
तर मला वाटतं आपल्यासारख्या सामान्य आयुष्यातही हे असे सामान्यच प्रसंग घडत असतात. त्यात कुठेही झूम करायला किंवा पाय चेपायला, उचलून धरायला कुणी नसतं. १४ फेब ला गुलाबाची फुलं देऊन त्याचे फोटो 'विथ माय लव्ह' असे टायटल टाकून अपलोड करणारा नवराच हवा असं नाही. पाहुणे गेल्यावर तीही दमलीय तर स्वतःच पटापट आवरून घेणारा किंवा अगदी वाढदिवसाला हॉटेलमध्ये जाणं परवडत नसलं तरीही घरी येताना फॅमिली पॅक आईस्क्रीम आणणारा पाहिजे. 'मी बसतो नंतर, तू आधी खाऊन घे' म्हणत पोराला हातात धरणारा पाहिजे. तसंच मंगळसूत्र, जोडव्या घातल्या नाहीत तरी पदोपदी त्याच्यासोबत उभी राहणारी बायको हवी.प्रेम अनेक गोष्टीतून दाखवता येतं आणि दिसणाऱ्याला ते कळतंही. रोजचं आयुष्य इतकं सामान्य असतं की त्यात या अनेक छोट्या गोष्टीही एकदम हिरो सारख्या वाटू लागतात.
आता ही केवळ उदाहरणं आहेत. अशी अनेक सांगता येतील. पण उगाच 'मदर्स डे' किंवा 'ऍनिव्हर्सरी' लाच प्रेम उफाळून येणाऱ्या लोकांपेक्षा रोज कुठेही नोंद न करता आपल्या वाट्याचं काम मन लावून करणाऱ्या साऱ्या नवऱ्यांना माझा सलाम. मला तरी दिखाव्याच्या शाहरुखपेक्षा तो इरफानच आवडला बाबा. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरुख आणि इरफान तुलना चे कारण कळले नाही.

बेसिकली कास्टिंग डायरेक्टर चे कौतुक आहे म्हनू शकतो...

तुमचं म्हणणं कळलं आणि पटलं. हिंदी मिडीयम खूप दिवसांपासून पहायचा आहे.
पण तुम्ही ब्याडवर्ड 'शाहरुख' आणायला नको होतात ह्यात. आता पुढे काय होईल ह्या लेखाचं ते तुम्हीच बघा. Wink

पण तुम्ही ब्याडवर्ड 'शाहरुख' आणायला नको होतात ह्यात. आता पुढे काय होईल ह्या लेखाचं ते तुम्हीच बघा. Wink
Submitted by सायो on 12 July, 2017 - 05:37

काहीही वाईट होणार नाही या धाग्याचे. त्यासाठी वेगळे धागे आहेत.

हिंदी मिडीयमचा पूर्वाध चांगला आहे.उत्तरार्ध तुलनेने पसरट वाटतो। तो अजून चांगला खुलवता आला असता. इरफान बद्दल प्रश्नच नाही .चांगली acting केलीये .

बाकी सायो +१

आयुष्यात एक इरफान खान हवा......
मला वाटते आयुष्यात एक ईरफान खान असतोच...
फक्त तो चमकत नाही. तो भुरळ पाडत नाही. त्याचे आपल्या आयुष्यात असणे आपण गृहीत पकडले असते. म्हणून तो उठून दिसत नाही.. आणि मग कधीतरी अचानक जाणवते की त्याचे असणेही आपल्या आयुष्याला अर्थ देते.

आपण चित्रपटाला जातो किंवा आपण लग्नाला वा हॉटेलात जेवायला जातो यात फारसा फरक नसतो. घरच्या डाळभाताला काय पुन्हा तिथे खायचे, भले त्यात बासमती तांदूळ का वापरला असेना, भले त्यावर साजूक तूपाची धार का सोडली असेना.. आपण चमचमीत दिसणारया खाद्यपदार्थांवर ताव मारतो जे आपल्या घरी वरचेवर बनत नाहीत, वा काही तर बनवताही येत नाहीत. त्या पदार्थांची चव अफाटच असली पाहिजे असे नेहमी गरजेचे नसते, ठिकठाक असले तरी आपण त्यांच्यावरच ताव मारतो कारण वर दिलेले कारण.. आणि मग जेव्हा वरचेवर हॉटेलात जाणे होते. आपल्याला त्याचे अप्रूप वाटेनासे होते. जास्त चमचमीत खाल्याने एसिडीटी जळजळ वाटू लागण्यापर्यंतही वेळ जाते आणि मग एके दिवशी आपली पावले डाळभाताच्या स्टॉलकडे वळतात.. त्यावेळी आपण त्या चमचमीत पदार्थांना नावे ठेवतो, पण एकेकाळी आपणच डाळभाताला तितके भाव देत नसतो हे आपणच विसरतो..
मॉरल ऑफ द स्टोरी काय, तर आयुष्याने समोर ताटात सर्व प्रकारचे पदार्थ सजवून ठेवले असतात. आपण आपल्या प्रकृतीनुसार काय किती प्रमाणात खावे हे ठरवायचे असते. जसे जेवनात सर्व घटक असल्याशिवाय त्याला अर्थ येत नाही तेच जीवनालाही लागू.

१४ फेब ला गुलाबाची फुलं देऊन त्याचे फोटो 'विथ माय लव्ह' असे टायटल टाकून अपलोड करणारा नवराच हवा असं नाही. पाहुणे गेल्यावर तीही दमलीय तर स्वतःच पटापट आवरून घेणारा किंवा अगदी वाढदिवसाला हॉटेलमध्ये जाणं परवडत नसलं तरीही घरी येताना फॅमिली पॅक आईस्क्रीम आणणारा पाहिजे. 'मी बसतो नंतर, तू आधी खाऊन घे' म्हणत पोराला हातात धरणारा पाहिजे. >>>>> +11111

छान लेख, आवडला!

'मी बसतो नंतर, तू आधी खाऊन घे' म्हणत पोराला हातात धरणारा पाहिजे. >>>>>>> आमच्याकडे असचं होतं Happy

धनि धन्यवाद, हा मी मायबोलीवर मिळवलेला सतरावा प्रतिसाद आहे ज्यात कोणी म्हटलेय मी ऋन्मेषशी आज पहिल्यांदाच सहमत आहे....
म्हणजे तितकाही वाह्यात माणूस नाहीये मी Proud

ऑन ए सिरीअस नोट, आयुष्यात एक शाहरूख खान हवा असा लेख लिहायचा फार मोह झालेला सकाळी सकाळीच... ऑफिस असल्याने आवरला.
पण बरंय, कारण तो लेख शाहरूख या व्यक्तीबद्दल नसता हे समजून न घेता तिथे गदारोळ झाला असता Happy

आयुष्यात एक शाहरूख खान हवा >> अरे पाहिजेच रे !! तो हसताना कशा मस्त खळ्या पडतात - आयुष्यात तशा फुलबाज्या पाहिजेच. कधीही पहा तो एक एनर्जी घेऊन येतो. सगळीकडे मस्त माहौल होतो. सिनेमा असो की कुठले फंक्शन भारी मजा करतो आणि चैतन्याने भारून टाकतो.

लेख छान आहे. पण इरफान किंवा शाहरुख पडद्यावर साकारत असलेल्या व्यक्तिरेखांची तुलना गैरवाजवी वाटली. ॠन्मेषचा प्रतिसाद आवडला...

धनि, अगदी अगदी .. ऑन स्क्रीन रोमान्स असो वा ऑफ स्क्रीन ह्युमर.. युट्यूबवर त्याला थोडेसे चाळले तरी मूड फ्रेश होतो. अशी व्यक्ती हक्काची असेल तर क्या बात !

@ धागा, वॅलेण्टाईनला गुलाब देणे म्हणजेच प्रेम नाही. नक्कीच. पण वॅलेण्टाईनला गुलाब देणारे तेवढेच करतात असेही नाही.
हे जमलेच पाहिजे असे गरजेचे नाही. नक्कीच. पण जमणारयांचे प्रेम दिखावा असते असेही नाही.

तो आपला साधा सरळ इरफान सुद्धा आपली सादगी जपत कधीतरी शाहरूखसारखे हायली रोमॅटीक वागून बघावे आणि आपल्या तिला खुश करावे अशी ईच्छा मनाशी बाळगून असण्याची शक्यता असतेच.

मला ईरफान आवडतो.. अगदी ईतर कोणाला आवडतो तितकाच.. किंवा कांकणभर जास्तच.
न आवडून सांगतो कोणाला, .. कारण तो रिलेट होतो. त्याच्या व्यक्तीरेखांत स्वत:ला सहज बघता येते. आपणही असेच आहे हे जाणवते.
पण मग मला एका शाहरूखलाही पडद्यावर बघायला आवडते. माझ्यासारख्या कुठल्याही ईरफानला हे आवडते. कारण कधीतरी कुठेतरी थोड्यावेळासाठी का होईना आम्हालाही तसे वागावेसे वाटत असते. आणि कधी गर्लफ्रेंडसोबतच्या एखाद्या छोट्याश्या भेटीत तसे वागतोही.
खुद्द शाहरूखलाही प्रत्यक्ष आयुष्यात शाहरूखसारखे चोवीस तास वागणे कुठे जमत असेल. ते कोणालाच जमत नाही. आणि ते गरजेचेही नसते. पण जेव्हा वागायची लहर येईल तेव्हा... जर शाहरूख नसता तर माझ्यासारख्यांनी ती प्रेरणा कुठून घेतली असती. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात एक शाहरूख असावा. अगदी एकच शाहरूख देखील यासाठी कित्येकांना पुरावा..
खरंच, शाहरूख हा एक ब्याड वर्ड आहे.... पण दुसर्‍या क्रमांकाचा..
पहिल्या नंबरला आजही प्रेम आहे Happy