पाउस बारावाटा

Submitted by raajaa on 10 March, 2009 - 10:22

झाकळलेल्या ढगाळ सरत्या धूसर साय॑काळी,
आभाळाच्या घुमटाभवती काजळकिनार काळी.
पसार झाला प्रकाश सारा;जसा मुठीतुन पारा
को॑दटलेला अवघा परिसर आणि निश्चल वारा.
गदमदणारी जमीन होती, तगमगणारी राने
माळावरती घुसमटलेल्या भेगा॑चे गार्‍हाणे
दूर कुठे मग क्षितिजामागे उठले मेघघुमारे
अन वठलेल्या झाडा॑नाही फुटती नवे धुमारे.

सरकत आल्या अलीकडे त्या सजलघना॑च्या लाटा
आणि एका निमिषामध्ये..... पाउस बारावाटा!

गुलमोहर: 

धन्यवाद सर्व मित्र हो. ' मार्च महिन्याची सर्वोत्कृष्ट कवितांपैकी एक '; हे वाचून झाला त्याहीपेक्षा अधिक आनंद तुम्हां सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून झाला. हे सारे माझ्या अपेक्षेपलिकडचे आहे. धन्यवाद!

खरंच राजा तुमच्या कवितेला मृदगंधाची गोडी आहे

सुरेख कविता!
पसार झाला प्रकाश सारा;जसा मुठीतुन पारा >> अगदी चपखल वर्णन.
अभिनंदन !!

फार मस्त झाली आहे ही कविता. डोळ्यासमोर उभे राहते चित्र. अ‍ॅडमिन धन्यवाद मार्च साठी निवडल्याबद्दल, नाहीतर सापडलीच नसती ही.

पुरस्कार प्राप्त म्हणून वाचायला आले आणि कितीदा तरी वाचली. फार छान !>>>
खरच, पावसात भिजल्यासारख वाट्ल, अगदी चिंब !!!!!!!!!!!
Happy

---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

आईशप्पत !! शेवटची ओळ ...पाउस बारा वाटा!
अंगावर काटा आला वाचताना...थंड शिंतोड्यांनी! Happy

सुंदर कविता,मस्त वाटलं वाचून!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

सुंदर कविता आणि लय पण मस्त आहे एकदम. एक एक शब्द चपखल. एकही उगाच घुसडलेला नाही.
कवितांच्या पावसात भिजण्याच्या भितीनं इथं येणंच थांबवलं होतं.
हे एक अ‍ॅडमिननी बरं केलंय. त्यामुळं या पावसात भिजता आलं. Happy
खिडकीच्या तावदानांवरून पागोळ्या सरसराव्या तशी मनावरून कविता ओघळत जातेय. आणि झड चालूच आहे. Happy

सहीच कविता आहे...इतके दिवस वाचायची राहुन गेली होती, पण देर आये..दुरुस्त आये Happy
सुमेधा पुनकर Happy
**************************************
पतंग्यानेच का जावं आगीजवळ ?
ज्योतीला सांग, नमन कर ना एकदा
**************************************

वा, अतिशय सुंदर,
बाहेरच्या तापत्या कडाक्यात, एकदम ओल्या मातीचा गंध आला, तन मन त्या उबदार वळवात भिजायला अधीर झालय!

मस्त आहे कविता..
शब्द फार मस्त वापरलेत..
घुसमटलेल्या भेगांचे गार्‍हाणे आवडले..

राजा हार्दिक अभिनंदन
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

पाउस बारावाटा >> अप्रतिम!!!! फार फार सुंदर...

झकास..... चिब पाउस अन तुझि कविता खूप खूप बरसो आमचया अभिनन्दनाचया पाउस
महेश जोशि

वा वा वा! किती सुंदर कविता आहे!!!
अगदी बोरकरांच्या धरतीची.. शब्दसंपन्न, लयदार, प्रासादिक.. अप्रतिम.

पुरस्कार प्राप्त म्हणून कविता वाचली.सुन्दर . ना.धो.महानोरान्च्या कवितान्ची आठवण झाली.

आज पुन्हा वाचली. पुन्हा तितकीच आवडली. पहिल्या भागात पावसापूर्वीचे भरलेले वातावरण काय जबरदस्त उभे केले आहे, एखाद्या खेड्यातील अशा वातावरणाची कल्पना करण्यात आपण रेंगाळून राहतो तेथेच, आणि मग पाऊस पडल्याचा इफेक्टही मस्त!

पाऊस आवडतोच... अन असा शब्दांतून भेटला जसाच्या तसा की अधिकच दाटून येतो मनात... खूप आवडली! Happy

सुंदर....आज दिवसभर मनात हेच पाऊसगाणे चालू राहणार. कितीदा वाचतेय...
फारएण्ड, इतकी मस्त कविता खणून काढल्याबद्दल धन्यवाद. Happy

या कवितेची निवड मीच केल्यामुळे तेव्हा प्रत्यक्ष अभिप्राय दिला नव्हता. आज पुन्हा वाचतानाही तितकीच आवडली. Happy

Pages