" सिंडिकेट "

Submitted by अदित्य श्रीपद on 7 July, 2017 - 01:28

व्हाट्स अँप वर श्री हर्षवर्धन निमखेडकर म्हणून माझे वरिष्ठ स्नेही आहेत. त्यांनी पाठवलेला लेख. अत्यंत उद्बोधक आणि रंजक ....

(हा लेख श्री किरण चव्हाण ह्यांनी लिहिलेला आहे. श्री निमखेडकर ह्यांच्या व्हाट्स अँप पोस्ट वर त्यांचे नाव नसल्याने लेखक म्हणून किरण चव्हाण ह्यांचे नाव लिहायचे राहून गेले पण लेख उत्तमच आहे हे नि:संशय ... )

नक्की वाचा आणि विचार करा ....

" सिंडिकेट "

धंद्यामधे सिंडीकेटस असतात, रॅकेट्स असतात तसेच जातीय ग्रुप्ससुद्धा असतात फक्त त्याला चेंबर ऑफ कॉमर्स असे नाव नसते. ते पृष्ठभागावर देखील नसते. ही सिस्टीम इतकी स्मूथ बसली आहे कि आपल्याला रोज पाहून सुद्धा त्यातला जातीय कोन लक्षात येत नाही. ते वाईटच आहे असे म्हणता येईल का याबद्दल वेगवेगळी मतं येतील.

यांचे काम कसे चालते ?

माझे अनेक पटेल मित्र आहेत. गुजरातेत तर त्यांचे वर्चस्व आहेच. मी काही दिवस इन्श्युरन्स एजंट म्हणून काम केलं. इन्शुरन्स एजंटला अनेक गोष्टी माहीत होतात. मी फर्ग्युसन रस्त्यावरच्या एका पटेलाकडून नियमित स्टेशनरी विकत घ्यायचो. माझ्या व्यवसायासाठी लागणारी काही रजिस्टर्स मी डिझाईन केली होती. ती हा बनवून द्यायचा. पुण्यात सर्वात पहिल्यांदा त्याच्याकडे जंबो कलर झेरॉक्स मशीन आले होते. छोट्या जागेतून त्याने व्यवसाय वाढवला. त्या कष्टाचे कौतुक आणि अभिमान दोन्ही आहेच. माझ्या ब्रॅंचचा धंदा सुद्धा त्याला दिल्याने मला तो चांगला मानायचा. या विश्वासावर त्याला माझ्याकडून पॉलिसी घेण्याबद्दल विचारले. ही पॉलिसी घेतली तर भांडवलवृद्धी होणार होती आणि ती हिट जाणार याबद्दल तज्ञांना विश्वास होता. एलआयसीच्या निवडक चांगल्या पॉलिसीमधली एक होती ती. त्यालाही ते मान्य होते. मैत्रीसुद्धा मान्य होती. पण त्याने जे सांगितले ते चक्रावून टाकणारे होते.

या पटेलांचे एक मासिक (काय म्हणायचं त्याला ?) निघते. त्या मासिकात कुठला पटेल काय धंदा करतो याची माहिती, फोन नंबर वगैरे तपशील दिलेला असतो. एक पटेल औरंगाबादला आहे. त्याच्याकडे कसल्या तरी स्टील प्लेट्स बनतात. तर मग ठाण्यातल्या पटेलाला त्या प्लेट्स त्याच्याकडून घ्याव्या लागतात. मुंबईतल्या पटेलाकडे जर त्या प्लेट्स मिळत असतील तर मग तो घेऊ शकतो. पण पटेलाव्यतिरिक्त दुस-याकडून चुकूनही घ्यायचे नाही असा दंडक आहे.

इन्श्युरन्स साठी राजस्थानातून तीन पटेल पुण्यात येतात. पॉलिसी त्यांच्याकडून काढून घ्यायची हा नियम आहे. शेजारी इन्श्युरन्स एजंट राहत असेल आणि तो पटेल नसेल तर त्याच्याकडून पॉलिसी घेता येत नाही. मुंबईत सुद्धा बरेच पटेल इन्श्युरन्स एजंट्स आहेत. त्यांचे ग्राहक ठरले आहेत. थोडक्यात पटेल व्यावसायिकांनी आपसातच स्पर्धा करायची. एकाचा ग्राहक दुस-याने पळवायचा नाही. जर तो ग्राहक स्वत:हून वळाला तरच.

हे अलिखित नियम जर तोडले गेले तर समुदायाकडून त्या पटेलाला अगदी छोटासा दंड लावला जातो. त्या काळी २१ रू होता. आताचे माहीत नाही. पण अमक्या तमक्या पटेलाने २१ रू. दंडापोटी भरले हे त्यांच्या त्या पुस्तिकेत प्रकाशित झाले रे झाले की तो पटेल आयुष्यातून उठतो. त्याच्याशी सर्व प्रकारचा धंदा समुदायाकडून बंद केला जातो. त्याला समाजाच्या ब्यांका देखील कर्ज देत नाहीत. भिशीतून त्याला बाहेर काढले जाते.

दुसरे उदाहरण सोमवंशीय क्षत्रिय समाजाचं. अनेकदा लिहीले आहे त्याबद्दल.
पूर्वी या समाजाचं ऑफीस स्वारगेटला होतं. आता नारायण पेठेत आहे. मिठाईची, हार्डवेअरची, सायकल्सची, मेडीकलची, गिफ्ट आर्टिकलची दुकाने चालवणारे राजस्थानी लोक ही त्यांची ओळख आहे. पुण्यात, मुंबईत सर्वत्रच यांची दुकाने लक्षणीय आहेत. गुजराथी समाज पूर्वी जो किरकोळीचा व्यवसाय करायचा तो आता यांच्याकडे आहे. गुजराथी समाज होलसेल मधे गेला आहे.

राजस्थानी दुकानदार गावाकडून एक मुलगा आणतो. त्याला राबवून घेतो. त्याचा पगार समाजाच्या ऑफीसकडे जमा करतो. मुलगा मोठा झाल्यावर जेव्हढे पैसे पगाराचे जमा झाले असतील तेव्हढेच दुकानदार भर घालून देतो. या मुलाला मग समाज दोन लाख रूपये उचल देतो (आकडे जुने आहेत). त्यातून त्याचा मालक त्याने हेरून ठेवलेले दुकान भाड्याने मिळवून देतो. दोन लाखात पागडी आणि दोन वर्षाचे भाडे असते. पगार जमा झालेला असतो. त्यातून तो वस्तू आणतो. कमी पडलेले पैसे समाजाकडून कर्ज म्हणून मिळतात. मग त्याचं दुकान चालू लागते. (दुकान चालेल का हा प्रश्नच नसतो). मग तो गावाकडून एक मुलगा आणतो. पुढे हे सायकल रिपीट होते. अशा पद्धतीने एकाची दोन, दोनाची तीन दुकाने होत जातात. हळू हळू सगळीकडे राजस्थानीच दिसू लागले आहेत. आता या दुकानांना लागणारा माल सुद्धा राजस्थानीच पुरवणार. यांचेही विमे त्यांचा समाजातला प्रतिनिधीच उतरवणार.

आजपर्यंत समाजाकडून मिळालेल्या उचल आणि कर्जाला कुणी बुडवलेले नाही. धंदा चालला नाही असे झालेले नाही. यांना ब्यांकेची आवश्यकता नाही. कायदेशीर बाबींसाठी एखादे अकाउंट असते फक्त. यांच्यातही दंड लागतो.

तिसरे उदाहरण अग्रवाल समाजाचे. हा वेगळा समाज आहे. यांचे जैन, शहांशी सख्य असते. यांची किराणा मालाची दुकाने असतात. मार्केट यार्डातल्या अग्रवालाकडे ते माल भरतात. अग्रवाल नसेल तर मग शहा, जैन. साधारण २०, २१ तारखेला हे महिन्याचा माल भरायला येतात. त्या वेळी त्यांना पैसे द्यायचे नसतात. पैसे कधी हे शेठ विचारत नाहीत. हेच सांगतात ३ तारखेला हिसाब चुकता करेंगे. बाजूचा मराठी दुकानदारही त्य़ाच शेठकडे माल भरायला आलेला असतो. पण त्याच्या आणि अग्रवालच्या दुकानात हटकून पाच पैशाचा फरक असतो. कारण हे शेठकडे रडतात. बाजूमे पाटील का दुकान है. साब मराठी माणूस उधरच जायेंगे. मग तो याला वेगळा दर लावतो. शिवाय खरेदी रोख नाही.

याच्याकडे एखाद रूपयाचा फरक असला की सगळी गर्दी त्याच्याकडे लोटते. एक तारखेला जास्तीत जास्त जोर असतो. जवळपास सगळा माल संपलेला असतो. दोन तारखेला माणूस पाठवला जातो. शेठचा हिशेब क्लोज.

अजून बरीच उदाहरणे आहेत. विस्तारभयास्तव इथे तीनच नमुने दिले आहेत.
भारतातली बाजारपेठ अशीही चालते आणि खुलीही चालते. पण ही बारीक कलाकुसर माहीत नसलेले जेव्हां वाद घालायला येतात तेव्हां त्यांच्याशी काय बोलायचे ?

हल्ली बिल्डरांच्या पण संघटना आहेत. त्यांच्यातही सिंडीकेट्स निर्माण झालेत. जातीच्याच बिल्डराला जमिनी द्यायचे करार होताहेत. कुठल्याही रिअल इस्टेट एजंटला नवे ट्रेण्ड्स विचारा. गुजरातमधे तर मुस्लीमांना व्यापारातून हाकलण्य़ासाठी दंगल घडवली गेली असेही म्हटले जाते. दंगलीत त्यांचे खूप नुकसान झाले.

खाण्यापिंयाच्या बाबतीत आजही अंधश्रद्धा, रुढी आहेत. त्या नाहीतच असे म्हणणा-यांना कोपरापासून नमस्कार. असे महानुभाव मला देवासमान आहेत. त्यामुळे त्यांचेच मत प्रमाण.

मग आपण कुठे आहोत?-
बहुजन समाज कधी असा विचार करणार.
व्यवसायात एकमेकांना मदत कधी करणार.
आता तरी आपल्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी यावर विचार मंथन करावे.
Business Help Group करून तालुकावर मदत केंद्रे स्थापन करावीत.
आपला समाज मागास राहिला याला दुसरे कोणीही जबाबदार नाही तर आपणच जबाबदार आहोत.
समाजाला मदत होईल असे उपक्रम न राबविता आपण फक्त राजकारण करीत राहिलो.
राजकारण कराच पण राजकारणाचा फायदा समाजाला होईल असे उपक्रम सर्वांनी सुरु करावेत.
धन्यवाद.

काहीच्या काही...
खेकड्यासारखे पाय ओढणे हा आमचा रक्ताचा गुण आहे.आम्ही जर सुधरलो तर ... राजकारणाच्या कुटाळक्या कोण करणार..नेत्यांच्या मागे कोण हिंडणार....? फ्लैक्सवर मुंडकी कोणाची लावणार.. मित्रांच्या वरातीत कोण नाचणार.. गावच्या चौकात टवाळक्या कोण करणार....?

Group content visibility: 
Use group defaults

मग आपण कुठे आहोत?-
बहुजन समाज कधी असा विचार करणार.
व्यवसायात एकमेकांना मदत कधी करणार.>>> हा प्रश्न तर कायम डोक्यात असतो माझ्या ????

वास्तव आहे हा लेख. Sad

व्हाट्स अँप वर श्री हर्षवर्धन निमखेडकर >>>अच्छा,, ह्यांनी लेख पाठवला आहे आनि मुळ लेखक चव्हाण आहेत.

मूळ लेखकाचे नाव टाकल्याबद्दल धन्यवाद!
-----------------
सहज भोचकपणासाठी क्षमस्व: निमखेडकरांचा लेख लिहिण्यात वगैरे कुठे काही संबंध नाही, तरी उगाच दोन वेळा त्यांच्या उल्लेखाचे कारण नाही कळले. असे दुसर्‍याच कुणीतरी लिहिलेले छान छान लेख, कविता लाखो लोकांना लाखो लोक रोजच पाठवतच असतात, त्यात काय मोठंसं असा भोचक प्रश्न पडला.

काय लिहीले यापेक्षा कुणि लिहीले, स्वतः की इतरांनी कुणि हे प्रश्न मायबोलीवर महत्वाचे. नि कुणाचे नाव इथे का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
हे असे प्रश्न विचारण्यापलीकडे इथे मायबोलीवर काही होईल अशी अपेक्षा नाही.
इथे काहीहि लिहा, अणूशास्त्र, वैद्यकशास्त्र, समाजशास्त्र, राजकारण काहीहि, आमचे प्रश्न हेच.
Proud

नन्द्या४३, हा लेख फेसबुक व्हॉट्सपवर फिरुन फिरुनच आता जमाना झालाय,

फेसबुकवर लिहिलेले, व्हॉट्सपवर फिरलेले लेखच आता माबोवर वाचावेत का हा प्रश्न यानिमित्ताने पडलाय.

मला माहित नव्हते.
पूर्वी मायबोलीकर स्वतंत्र प्रतिभा असणारे लोक असे कुठलेतरी इकडून तिकडून चोरून आणलेले लिहित नसत. मी वाचले तसे अनेकांनी वाचले असणार असे समजून स्वतःची मते लिहीत.
आता काय, तसे लोक गेले मायबोलीवरून. उरले ते असे. आणि माझ्यासारखे रिकामटेकडे, स्वतःची प्रतिभा नसणारे नि कुठून चोरून आणलेले लिहीण्याचे न जमणारे. मग आपले उगीचच काही बाही खरडायचे.
तशी सिंडीकेट्स निरनिराळ्या कारणांनी सर्वत्र असतात. इथे जातीवरून असे घडते म्हणून जास्त वाईट वाटत असेल.
हजाराहून अधिक काळ जातपात अस्तित्वात आहे. अजून निदान पाचशे वर्षे तरी जाणार नाही.