हजारो रुपयाच्या नुकसानीचे काही वाटत नाही पण सातशे रुपये हातून गेल्याची रुखरुख आहे

Submitted by एक मित्र on 6 July, 2017 - 02:52

हि माझ्या बाबतीत जरा विचित्रच अशी मानसिक समस्या उद्भवली आहे. तुमच्यापैकी कुणाला असे काही अनुभवला आले असल्यास कृपया सल्ला द्यावा हि विनंती. मार्गदर्शनाची नितांत गरज आहे.

माझी एक सदनिका आहे जी मी भाडेतत्वावर वापरायला देतो. मागच्या महिन्यात एक भाडेकरू सोडून गेला. त्याची फायनल सेटलमेंट करून अनामत रक्कम (deposit) परत देताना सदनिकेतील किरकोळ नुकसानी, मागच्या महिन्यात आलेले वीज बिल (जे त्याने भरले नव्हते), बिल आल्यानंतरच्या काळात त्याने वापरलेल्या विजेचे अंदाजे बिल इत्यादी सगळ्या गोष्टी वजा करून deposit परत द्यायचे ठरले होते. पण तो पैसे घ्यायला दरवाजात आला तेंव्हा ऐनवेळी आकडेमोड करताना बाकीच्या सर्व गोष्टीचे पैसे वजा केले. पण मागच्या महिन्यातील वीज बिल त्यात मी चुकून पकडायचेच विसरलो व अनामत रक्कम त्यास परत देऊन टाकली. माझ्याकडून हे गडबडीत व चुकून झाले. ती वीजबिलाची रक्कम काहीतरी सातशे रुपयेच्या आसपास असेल.

त्यानंतर त्याच दिवशी माझ्या ते लक्षात आल्यावर लगेचच त्याला फोन करून मी हि गोष्ट त्याच्या निदर्शनास आणून दिली. पण त्याने आपण ड्रायविंग करत असल्याची सबब सांगून नंतर फोन करतो म्हणाला. पण नंतर त्याने फोन करायचे दूरच, मी केलेल्या फोनला सुद्धा तो टाळाटाळ करू लागला. उडवाउडवीची उत्तरे देणे किंवा फोन न घेणे असे प्रकार. माझ्या एस एम एस ला सुद्धा नीट उत्तरे देत नव्हता. मला कळून चुकले हि रक्कम केवळ माझ्या चुकीमुळे मी गमावली आहे आणि ती आता काही केल्या मला परत मिळणार नाही. पण हि रुखरुख मला मनाला खूप लागून राहिली आहे. माझ्या हातून असे झालेच कसे असे वाटणे इत्यादी.

दुसरीकडे, तो माझी सदनिका सोडून जाऊन आज आठ दिवसाहून अधिक काळ झाला. सदनिकेत अजून कोणीही राहायला आलेले नाही. सदनिकेचे महिन्याचे एकूण भाडे विचारात घेता तसे मला हे दिवसाकाठी शेकडो रुपयांचे नुकसानच आहे. म्हणजे आजवर मला काही हजार रुपयांचे तसे नुकसानच झाले आहे. पण गमतीचा भाग असा कि मला त्याची फारशी चिंता वाटत नाही. आज ना उद्या नवीन भाडेकरू येईल त्यात काय एवढे असा विचार मी करतो. पण चुकून हातचे गेलेले सातशे रुपये मात्र खूप बोचत आहेत. मी अजूनही तिरमिरीत त्याला फोन करतो. देत कसा नाही बघू असे विचार माझ्या मनात येतात. पण तो आता माझे फोन घेत नाही. आणि मग फक्त मनाची चरफड होऊन मी पुन्हा काही काळापुरता शांत बसतो.

हजारो रुपयाच्या नुकसानीचे काही वाटत नाही पण सातशे रुपये हातून गेल्याची रुखरुख असे तुमच्यापैकी कुणाला अनुभवास आलेय का? काय करावे यावर?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सातशे रुपये गेल्याचं दु:ख नाहीये हे. आपल्याला कुणी दुसरा बनवून गेला त्याचं आहे. आता हे वाटणं स्वतःचं स्वतःलाच आहे. त्रास स्वतःचा स्वतःला, तो तिक्डे आरामात तंगड्या पसरुन झोपलाय आणि आपलं मन आपल्याल खातंय.... का?

सोडा, नथिंग इज पर्मनंट... जेवढं ओझं वागवाल तितकं वजन वाढत जाईल. आपल्या मनातला एक कोपरा मोकळा करा.

०००० घर रिकामं राहणे हे नुकसान आहे, थांबलेली आवक नव्हे. भाडं म्हणजे वेळेचा पैसा असतो. येणार्‍या भाडेकरुकडून रिकामं राहिलेल्या दिवसांचे भाडे घेता येत नसते. ०००००

>> सातशे रुपये गेल्याचं दु:ख नाहीये हे. आपल्याला कुणी दुसरा बनवून गेला त्याचं आहे.

त्याने बनवले असे वाटत नाही. चूक यांचीच आहे. अर्थात चुकून ज्यादा आलेले पैसे परत देणे हे त्याचे कर्तव्य होते.

>> घर रिकामं राहणे हे नुकसान आहे, थांबलेली आवक नव्हे.

अगदी सहमत. ते नुकसानच आहे.

त्यापेक्षा स्वत:चे एखादे व्यसन (असल्यास) त्यावर 700 रुपये खर्च होतात ईतक्या काळापर्यंत सोडा.>>> generally me too adopt this solution.......

फक्त एक लक्षात ठेवा, त्याला असे फोन करून पिडल्यावर तुम्हाला खरेच मजा आली पाहिजे.

>>

ही कमेंट ऋ कडूनच अपेक्षित होती. चित्र विचित्र धागे काढून त्यावर चित्र विचित्र प्रकारे कमेंट देणे, प्रतिवाद करणाऱ्याला अचाट लाॅजिक मध्ये गुंतवण्यात त्याला मजा येते.
Happy

<<अत्यंत किरकोळ बाबीसाठी अमूल्य असे मन:स्वस्थ्य घालवू नका.>>
----------- सहमत... छान प्रतिसाद.

तुमचे दु:ख रु. ७०० गेल्याचे नाही आहे, तर तो आता प्रतिसादच देत नाही आणि आपण नाहक फसवले गेलो याचे आहे. त्याने चार दिवस आधी घर सोडले आहे असे समजायचे. फरफट रु ७०० साठी परवडणारी नाही आहे.

तूम्ही कधीही कोणाचेच पैसे बुडवले नाही का ? अगदी एखाद्या गोष्टीवर किंवा कमाईवर असणारा टॅक्स वगैरे
आपण अगदीच राजा हरिचंद्राप्रमाणे आजवर वागला असाल तरच त्या ७०० रुपयांचा विचार करा अन्यथा एका महिन्याचे भाड्यातून तूम्ही त्याला सूट दिली असे समजा .
एरवी घरमालक आणि भाडेकरु यांचे संबंध फार चांगले अथवा घनिष्ट असल्याचे माझ्या ऐकीवात नाही. हे संबंध फक्त व्यावहारिक असतात आणि व्यवहार तूम्ही संपवल्यानंतर पुन्हा अपेक्षा कसल्या घेवून बसताय.

तूम्हाला हजारो रुपयांच्या नुकसानीचे काही वाटत नसेल तर देवाने सधन ठेवले आहे यातच देवाचे आभार माना आणि विसरा सगळे.. ........

त्रास विश्वास टाकल्याचाच होतो
मी एका दुकानदारा कडून गेले दीडवर्ष ड्रेस घेतले. खुप वेळा .मात्र या वेळी त्यांच्याकडून एक ड्रेस घेतला ७५० ला आणि तो आजीबातच फिटिंग येईना म्हणून चेंज करायला गेले तर ड्रेस ठेवून जा मी दोन दिवसात नविन माल आणतोय आता माल नाही असे सांगितले आणि मीही विश्वास ठेवला
२ दिवसानि गेले तर दुकान बंद
शेजारच्या दु.दार ने संगितले की २ दिवसापूर्वीच त्याने दुकान बंद केलेय आणि सगळा माल पण घेऊन गेलाय
त्याला खुप वेळा फोन लावले तर फोन पण बन्द आहे
७५० रु गेल्या पेक्षा त्याने फसविले ही सल जास्त आहे

Pages