तळ्याकाठी

Submitted by आनन्दिनी on 3 July, 2017 - 06:15

तळ्याच्या.png

“तू तर नेहेमी त्याचीच बाजू घेणार. तुला सांगण्याचाही काय उपयोग ! तरी तुला बजावतोय मी, माझ्या करीअरमधे तो ढवळाढवळ करतो तेवढी पुरे, पण आता माझ्या पर्सनल लाईफमध्ये जर त्याने नाक खुपसलं तर मोठा भाऊबिऊ सगळं मी विसरून जाईन.” त्याने आईला निक्षून सांगितलं.
“अरे पण चिंटू,” आई समजावणीच्या स्वरात सांगू लागली. “चिंटू म्हणू नको मला, हजारदा सांगितलाय, राजस म्हण. ओजसला कसं बरोबर ओजस म्हणतेस. मी काय आयुष्यभर चिंटूच रहायचं का?” राजसने चवताळून विचारलं.
“बरं, बरं, चुकलंच माझं! पण राजस, दादा नव्हता गेला त्यांच्याकडे. तुझ्या मैत्रिणीचे वडीलच येऊन बोलले त्याच्याशी, तुझ्याबद्दल. ते विचारत होते की तूसुद्धा दादाला जॉईन होणार आहेस का म्हणून. सगळे तुझ्या चांगल्याचाच विचार करतायत. ओजस तुला मदतच करतोय. तुला कळत कसं नाही!”
“आई, तुला कसं कळत नाही की मला सतत त्याच्या हाताखाली, त्याच्या छायेत नाही रहायचंय. मला नकोय त्याची मदत. माहितीये तो खूप मोठाय आणि तुला केवढा अभिमान आहे त्याचा. आणि मी हा असा. पण तरीही मला त्याची मदत नकोय, तो नकोय आणि तूही नकोयस” तिरमिरीत दार धाडकन आपटून राजस घराबाहेर पडला. त्याने बाईक स्टार्ट केली. दोनतीनदा किक मारली पण ती स्टार्ट होईना. वैतागून त्याने बाईकला एक लाथ मारली. “तूसुद्धा त्यांच्यासारखीच! दादाने किक मारली की बरोबर स्टार्ट होशील” असं म्हणत चिडून त्याने जोरात परत एक किक दिली. नशिबाने या वेळी ती स्टार्ट झाली. तो भन्नाट वेगाने निघाला. दिशा नव्हती, कुठे जायचं ठरवलं नव्हतं. फक्त इथून लांब... खूप लांब... तो जातच राहिला.

शहरापासून तो बराच लांब आला होता. मधेच भलतच वळण घेतलं बहुतेक कारण डांबरी रस्ता संपून आता कच्चा रस्ता लागला होता आणि आजूबाजूला गर्द झाडी. आपण कुठे आलो कुणास ठाऊक, एवढं लांब असं जंगलात यायला नको होतं असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला. हः घाबरण्यासारखं काय आहे, वाघ सिंह आजकाल असतात कुठे! खरी भीती तर माणसांचीच आहे. लोकांपासून दूर असलं तर काय घाबरायचं. उलटसुलट विचार करत तो थकून थांबला. हेल्मेट काढलं. बाईक उभी करून तो आसपास पाहू लागला. थोड्याच अंतरावर मोठमोठ्या वृक्षांनी लपवून ठेवल्यासारखं एक छानसं तळ होतं. मस्त पिकनिक स्पॉट आहे की हा! मुग्धाला घेऊन इथे यायला हवं. राजसच्या मनात विचार आला. पण लगेचच आपल्या भावाकडे गेलेले मुग्धाचे बाबा त्याच्या डोळ्यासमोर आले. “म्हणे मी दादाला जॉईन करणार आहे का! नाही केलं तर काय मुलगी देणार नाही का मला! मी काय कमी आहे का? वेळ तर द्या मला सेटल व्हायला. घाई काय आहे एव्हढी... मुग्धाने त्यांना दादाकडे जाऊच कसं दिलं. सांगायचं ना नका जाऊ म्हणून. घाबरट आहे नुसती!”
मुग्धाचे विचार झटकून तो तळ्याकडे गेला. तळ्याच्या पाण्यात हातपाय धुऊन फ्रेश होऊन तो परत बाईक कडे आला. हेल्मेट घालत त्याने बाईकला किक मारली. पुन्हा तेच. बाईक स्टार्ट होईना. त्याने खिशातून मोबाईल काढला पण नेटवर्क नव्हतं. सगळ्या जगाने आपल्या विरुद्ध कट केलाय असं त्याला वाटू लागलं. त्याने हेल्मेट भिरकावून दिलं, बाईकला एक लाथ मारली, बाईक खाली पडली. वैतागून तणतणत तो तळ्याकाठी जाऊन बसला. बसल्याबसल्या त्याने पाण्यात खडे टाकायला सुरुवात केली. पाण्यात असंख्य तरंग उठत होते तसेच त्याच्या मनातही असंख्य विचार येत होते. “काय आयुष्य आहे हे. सक्सेसफुल मोठा भाऊ असणं म्हणजे शापच आहे. आईचं त्याच्यावरच जास्त प्रेम आहे. त्याचाच तिला अभिमान वाटतो. नेहेमी कशी म्हणते, ‘ओजस कसा वाढला मला कळलं सुद्धा नाही, राजसने मात्र खूप त्रास दिला. जागरणं काय, आजारपणं काय....’ म्हणजे मी आजारी पडायचो हीसुद्धा माझीच चूक आहे!! सारखं आपलं ओजस, ओजस, ओजस, ओजस.... आणि आता तर कहरच. माझ्या गर्ल फ्रेन्डचा बाप सुद्धा ओजसला जाऊन विचारतो की मी त्याची लॉ फर्म जॉईन करणार का! अरे नाही करत जा.... त्याच्याशीच लग्न लाऊन दे तुझ्या मुलीचं...” वैतागून त्याने एक खडा तणतणून पाण्यात टाकला. तो पाण्यात पडतोय एवढ्यात अजून एक दगड पाण्यात खूप आत, दूरवर जाऊन पडला. हा कोणी टाकला म्हणून राजसने चमकून मागे बघितलं. त्याच्या मागे काही अंतरावर एक जण उभा होता. उंचपुरा, एखाद्या अॅथलीट सारख्या शारीर यष्टीचा, काळ्या सावळ्या रंगाचा तो मनुष्य हसत हसत पुढे आला. एवढ्या दुरून याचा दगड पाण्यात एवढ्या लांबवर कसा गेला असा आश्चर्याचा भाव राजसच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. “अरे मी रोजच दगड फेकत असतो. प्रॅक्टिस आहे मला” राजसच्या चेहऱ्यावरचं प्रश्न चिन्ह पाहून तो उत्तरला आणि येऊन राजसच्या बाजूला थोड्या अन्तरावर बसला.
“मी श्याम” त्याने हात मिळवण्यासाठी पुढे केला.
“मी राजस” राजासने हात मिळवला आणि खरं तर अनिच्छेनेच उत्तर दिलं. त्याला इथे ओळख वाढवून गप्पा मारत बसायची जराही इच्छा नव्हती.
“मग....” श्यामने प्रश्नार्थक नजरेने राजस कडे पाहात विचारलं.
“मग काय?” राजसने वैतागून विचारलं.
“अरे प्रॉब्लेम काय आहे?”
ह्याच्या आगाऊ पणावर चिडावं की हसावं राजसला कळेना. वरवर तो फक्त “कसला प्रॉब्लेम” एवढंच म्हणाला.
“तू तिथे हेल्मेट फेकलयस, बाईक पाडलीयेस आणि इथे एकटा पाण्यात खडे टाकत बसलायस. तुझा रोजचा कार्यक्रम हाच असेल असं तर वाटत नाही. काहीतरी बिनसलं असेल म्हणून इथे येऊन असा बसला असशील.” श्याम म्हणाला.
“असं काही नाहीये. रस्ता चुकलोय मी. आणि समजा असताही काही प्रॉब्लेम तरी मी तुला कशाला सांगेन?” राजसने विचारलं.
“अरे, ओळखीच्यांपेक्षा अनोळखी माणसाला प्रॉब्लेम सांगणं सोपं असतं. कारण ते आपल्याला judge करतील अशी धास्ती नसते. मन हलकं होतं आणि कधी कधी तटस्थ भूमिकेतून परिस्थिती पाहिली की ती जास्त व्यवस्थित समजते, अॅनलाइज करता येते, उपायही सापडतो.”
“तू काय सायकियाट्रिस्ट आहेस का?” राजसने विचारलं.
“नाही रे. माझा दुधाचा बिझनेस आहे. जवळच फार्म आहे माझं. माझं जाऊदे. तू बोल. मन मोकळं कर, तुला बरं वाटेल. मग मी तुला इथून बाहेर पडायचा रस्ताही दाखवतो.”
भलताच आगाऊ आहे हा पण रस्ता माहितीये याला, आणि काय हरकत आहे बोलायला, राजस विचार करू लागला, साधारण ओजस च्याच वयाचा वाटतो. कदाचित थोडासा मोठा. आणि डोळे तर अगदी आईच्या सारखेच आहेत. आश्वासक, हा चांगला माणूस आहे असं सांगणारे. छ्याः आई आणि दादा कितीही दूर असले तरी आपल्या डोक्यातून जातच नाहीत. जाऊदे, बोलावं याच्याशी. नाहीतरी दुसरं काय काम आहे. बाईक बंद पडलीये. मदत तर हवीच आहे आपल्याला असा विचार करून राजसने बोलायला सुरुवात केली. “प्रॉब्लेम असा काही नाहीये. म्हणजे बाईक बंद पडलीये ते आहेच पण खरा त्रास वेगळाच आहे. आमच्या घरी मी, आई आणि दादा. मी जुनिअर कॉलेजला असताना बाबा गेले. मी लॉ करतोय. मोठा भाऊ ओजस माझ्यापेक्षा आठ वर्ष मोठा आहे. त्याची मोठी एस्टॅब्लिश्ड लॉ फर्म आहे. तो सगळ्या दृष्टीने चांगला, अगदी सरस आहे. लहानपणा पासूनच. शाळेत हुषार. कॉलेजमध्ये टॉपर आणि आतासुद्धा अगदी व्यवस्थित सेटल्ड! आणि मी आपला साधारण. सहाजिकच आईला तोच जास्त आवडतो. ती त्याचच सगळं ऐकते, त्याचीच बाजू घेते. मला हे असं सेकंड रहायचा अगदी कंटाळा येतो, वैताग येतो, संताप येतो....” राजसचा आवाज चढत गेला होता.
“असं आहे तर” श्याम लक्षपूर्वक ऐकत होता.
“ओजस खरच चांगला आहे. तसा मला आवडतो. तो जास्त हुषार आहे, मेहेनती आहे पण आईचं मुलांवरचं प्रेम हे irrespective ऑफ these things असलं पाहिजे ना! सारखी काय त्याचीच बाजू घ्यायची? तो जास्तच लाडका आहे तिचा” राजस निराश होऊन म्हणाला.
“बरेचदा काय होतं माहितीये राजस, आपण आईवडलांकडून परफेक्ट वागण्याची अपेक्षा करतो. आई म्हटलं की तिला न बोलता समजलं पाहिजे वगैरे. त्या घोळात आई, वडील हेसुद्धा हाडामासाची माणसंच आहेत हे आपण विसरतो. तू अजून लहान आहेस म्हणून तुला कळायला थोडं कठीण आहे. पण स्वतःला मुलं झाली की आपण त्यांच्या बाबतीत किती क्षमाशील असतो. त्यांच्या किती गोष्टी पोटात घालतो. वाईट वाटून घेत नाही, राग धरत नाही. पण तेच आपण, आपल्याशी अश्याच वागणार्या आईवडलांशी मात्र तसे वागत नाही. त्यांची प्रत्येक चूक, आपल्या दृष्टीने असलेली चूक आपण मनात धरून ठेवतो. आता तुझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर दोन शक्यता आहेत. एक म्हणजे खरोखरीच तू म्हणतोस तसं तुझा भाऊ तुझ्या आईचा जास्त लाडका आहे आणि दुसरी शक्यता म्हणजे खरं तर असं नाहीये पण तुला असं वाटतंय”
“मला वाटतंय म्हणजे? मी काय वेडा आहे का उगीचच काहीही वाटून घ्यायला?” राजसने वैतागून विचारलं.
“तसं नाही रे मित्रा. आता बघ, जेवताना आई मोठ्या मुलाला दोन पोळ्या वाढते आणि छोट्याला एक. यात काही मोठ्यावर प्रेम जास्त आहे असं काही नसतं. त्यांची भूक जेवढी आहे असं तिला वाटतं त्याप्रमाणे ती देत असते. इक्वॅलिटी (सर्वांना सारखंच) आणि इक्विटी (सर्वांना पण प्रत्येकाला त्याच्या गरजेइतकं) असं कॉलेजमधे शिकल्याचं आठवतं का?” श्याम हसून पुढे बोलत राहिला, “आणि शिवाय यात ‘तिला वाटतं त्याप्रमाणे’ हेसुद्धा महत्वाचं आहे. ती तिच्या अंदाजाप्रमाणे हे आडाखे बांधत असते की याला कशाची किती गरज आहे आणि त्याला किती. पण मनुष्य म्हटला की अंदाज चुकण्याची शक्यता आहेच ना! पण या गोंधळात धाकट्याला असं वाटू शकतं की मला आई एकाच पोळी देते आणि दादाला दोन, दादा जास्त लाडका आहे.”
“तसं नाहीये रे” राजस आता अगदी मोकळेपणाने बोलू लागला होता, “आम्हाला दोघांनाही सर्व गोष्टी व्यवस्थित मिळतात. दादा तर स्वतःच कमावतो पण मलाही सगळं भरभरून मिळतं. प्रॉब्लेम गोष्टी मिळण्याचा नाहीये. आई त्याचंच सगळं ऐकते. तो म्हणेल ती पूर्व दिशा. आता बघ, त्याची लॉ फर्म आहे. तो कॉर्पोरेट लॉयर आहे. मला क्रिमिनल लॉ मधे इंटरेस्ट आहे. पण हा सांगतोय मला जॉईन हो. आईसुद्धा त्याचंच ऐकते आणि तेच सांगते. माझ्या म्हणण्याला कोणी भावच देत नाही. त्याच्या प्रत्येक म्हणण्याला करते तसा सपोर्ट तिने मला करावा, तसा रिसपेक्ट तिने मलासुद्धा द्यावा असं मला वाटतं आणि तो मला मिळत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे”
“हुषार आहेस तू. किमान आपला प्रॉब्लेम काय आहे हे तरी तुला नीट समजलंय. अनेकांचं आयुष्य जातं पण त्यांना स्वतःला काय हवय नि काय खुपतंय हेच त्यांचं त्यांना कळत नाही. पण मित्रा हे सपोर्ट आणि रिसपेक्ट जे म्हणालास ना त्या फार कठीण गोष्टी आहेत. मागून मिळत नाहीत. कमवाव्या, अर्न कराव्या लागतात.”
“कमवेनच रे मी. पंचविशीसुद्धा नाही झाली अजून माझी. पण तोपर्यंत? असाच भांडत राहू का सगळ्यांशी?” राजसने विचारलं.
“तो ढग बघ” श्यामने वर आभाळाकडे बोट केलं. राजसही वर बघू लागला. “समजा तू मुग्धाला भेटायला चालत निघालायस आणि असा मोठा काळा ढग आकाशात आला तर तू काय करशील?”
“मी जॅकेट किंवा छत्री घेईन.”
“का तू छत्रीने ढगाशी मारामारी करणार का?” श्यामने हसून विचारलं.
“काय रे तुला भेटलं नाही का कोणी सकाळपासून! ढगाशी मारामारी म्हणे! माझं डोकं भिजू नये म्हणून माझ्या डोक्यावर धरायला छत्री”
“तेच तर राजस!! बाकीचे आपल्याशी कसे वागतात, काय म्हणतात हे त्या काळ्या ढगासारखंच आहे. आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. तो ढग, त्याला वाटलं तर बरसेल नाहीतर वार्याने दुसरीकडे कुठे जाईल आणि तिथे बरसेल. आपल्याकडे आपली छत्री हवी. आपली छत्री म्हणजे काय सांग?”
“काय”
“आपली छत्री म्हणजे आपला स्वतःवरचा ठाम विश्वास. तो असेल आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल तर अशा पावसाचा मारासुद्धा तुझं डोकं भिजवू शकणार नाही. आईशी, भावाशी जरूर मोकळेपणाने बोल, तुला कसं वाटतं ते त्यांना मोकळेपणाने सांग, त्यांची बाजूसुद्धा समजून घे. नात्यांमध्ये मोकळेपणा, संवाद, सुसंवाद हवाच पण फक्त त्याने तुझा प्रश्न सुटेल अशी आशा मात्र ठेऊ नकोस. आपल्या बर्याच प्रश्नांचं मूळ हे आपल्या मनाच्या आतच असतं. म्हणून खरा संवाद हा आपला स्वतःचा स्वतःशीच असला पाहिजे. आईचा लाडका ही नंतरची गोष्ट झाली, तू स्वतः स्वतःचा लाडका आहेस का? असशील तर इतरांचा लाडका आहेस की नाही याने फारसा फरक पडता कामा नये. इतरांच्या बोलण्यामुळे तू स्वतः स्वतःवर शंका घेत नाहीयेस ना? सगळ्या कोलाहलात आपला आतला आवाज हरवूनच जातो. आपण स्वतःशी संवाद करतच नाही. तसा केलास तर तुला कळेल की आईची, भावाची पद्धत चुकीची असेलही, कदाचित त्यांचा सल्लाही चुकीचा असेल पण त्यांचा हेतू मात्र चांगलाच आहे, तुझं हित हाच आहे. तुझ्या ध्येयासाठी भरपूर प्रयत्न कर, यशस्वी हो पण त्यांना धडा शिकवण्यासाठी नाही तर तुझी तेव्हढी क्षमता आहे म्हणून. कारण राजस चुकीच्या पद्धतीने का होईना ते तुला मदत करण्याचाच प्रयत्न करताहेत.”
“हे असं इथे जंगलात तळ्याकाठी बसून असं बोलणं सोपं आहे. पण प्रत्यक्षात कोणी तुमच्या मनाविरुद्ध वागलं, राग येईल, वैताग येईल असं बोललं की हे छत्रीवालं तत्वज्ञान सुचत नाही.” राजस सहजा सहजी बधणार्यांतला नव्हता.
“सराव राजस, प्रॅक्टिस!! माझा खडा पाण्यात लांब का गेला? सराव.... जाणीवपूर्वक मनाला ताब्यात ठेवण्याचा सराव कर. राग करण्यात मनाची जी शक्ती वाया घालवतोस ती प्रयत्न करण्याकडे वळाव. Let your actions speak for you.”
राजसने हसून मान डोलावली.
“चल रस्ता दाखवतो तुला” दोघे चालत बाईक कडे आले.
“अरे यार..... ही तर बंद पडली आहे” राजस आठवून म्हणाला.
“बघू, चावी दे”
राजसला आठवलं, वैतागून सगळी फेकाफेक करताना चावीसुद्धा फेकली असणार. तो जमिनीवर पाल्यापाचोळ्यात चावी पडलीये का बघू लागला.
“पुन्हा तेच, सगळा शोध बाहेर! आत बघ!! सगळी फेकाफेक करण्या आधी तू सवयीने चावी जीन्सच्या खिशातच टाकली होतीस ना?”
राजसने बघितलं तर खरच चावी खिशातच टाकली होती की! हायसं वाटून त्याने चावी श्यामला दिली. श्यामने एक किक मारली आणि बाईक चालूही झाली.
“भारीच टेम्परामेन्टल झालीये ही” राजस उद्गारला.
“तुझीच बाईक!” श्यामने हसून म्हटलं, “ऐक, ते समोर मोठ्ठं झाड दिसतंय ना तिथून डावीकडे वळलास की कच्चा रस्ता लागेल. त्यावर साधारण पाच मिनिटं गेलास की पक्का रस्ता दिसेल. त्यावर उजवीकडे वळ की तुझ्या शहराकडे जाशील.
“तुला सोडू तुझ्या फार्मवर?”
“तू हो पुढे. मी थोडा वेळ थांबणार आहे” म्हणून श्यामने राजसच्या खांद्यावर थाप दिली.
“थॅंक्स श्याम, बरं वाटलं तुझ्याशी बोलून.”
“काळे ढग आले तर लक्षात ठेवशील ना?” श्यामने हसून विचारलं.
“नक्की!!” राजस हसून उत्तरला. दोघांनी हात मिळवले आणि राजस निघाला.

सकाळी चिडून निघून गेलेला राजस संध्याकाळ झाली तरी आला नव्हता. त्याच्या आईच्या डोळ्यांना धार लागली होती. देवघरासमोर बसून ती माऊली मनोमन आळवत होती, “कृष्णा, तुला देवकीचं प्रेम कळलं आणि यशोदेचंही. माझ्या बाळाला मात्र माझं प्रेम कळत नाहीये रे. त्याची काळजी घे. त्याला सुखरूप घरी आण”

राजस निघाला. त्याने वळण घेतलं. समोर खरंच डांबरी रस्ता होता आणि त्याच्या शहराच्या दिशेने जाणारी पाटी. श्यामने बरोबर रस्ता सांगितला होता तर... आईबद्दलही तो बरोबर म्हणाला. तिचं थोडसं चुकत असलं तरी तिचं प्रेम सारखंच आहे दोघांवर. मी नेहेमी उलटं धरून चालतो म्हणून.... मुग्धासुद्धा तेच म्हणते. आणि काय म्हणाला तो, मुग्धाला भेटायला जायचं असेल आणि काळा ढग आला तर..... wait a minute.... मुग्धबद्दल तर मी त्याला काही म्हटलंच नाही. मुग्धाचं नाव त्याला कसं कळलं! आणि चावी... चावी मी ठेवताना तर तो तिथे नव्हताच. त्याला कसं कळलं! कसं कळलं !! राजस चांगलाच गोंधळला. श्यामला शोधायला त्याने बाईक मागे वळवली. तो पुन्हा तळ्याकाठी आला. पण श्याम दिसला नाही. ते बसले होते त्या जागी एक मोरपीस मात्र होतं.

डॉ. माधुरी ठाकुर
http://drmadhurithakur.blogspot.co.uk/

Group content visibility: 
Use group defaults

बाकीचे आपल्याशी कसे वागतात, काय म्हणतात हे त्या काळ्या ढगासारखंच आहे. आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. तो ढग, त्याला वाटलं तर बरसेल नाहीतर वार्याने दुसरीकडे कुठे जाईल आणि तिथे बरसेल. आपल्याकडे आपली छत्री हवी. आपली छत्री म्हणजे काय सांग?”
“काय”
“आपली छत्री म्हणजे आपला स्वतःवरचा ठाम विश्वास. तो असेल आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल तर अशा पावसाचा मारासुद्धा तुझं डोकं भिजवू शकणार नाही. >>> प्रेरणादायी...

आवडली कथा.. Happy

ही कथा वाचून सानेगुरुजींच्या एका कथेची आठवण झाली.
आपल्या मुलाला जंगलातून एकटा जाताना भिती वाटते म्हणून आई सांगते की शामदादा तेथे रहातो,त्याला हाक मार.मुलाची शाळा येईपर्यंत शामदादा सोबत करतो.भाव तेथे देव असे बहुधा नाव आहे.

अंजु, सायुरी, स्वस्ति, अंबज्ञ, मिस्टर पंडित, मॅगी , अक्षय दुधाळ, बी एस, सनव , स्निग्धा , मेघा, सस्मित, आबासाहेब, रेणू, जाई , भुईकमळ , kratos आपल्या प्रतिक्रियांबद्दल खूप धन्यवाद.
देवकीताई कृष्णाची कल्पना कुठून 'उचललेली ' नाही हो! माझ्या बर्याच गोष्टींमध्ये मुख्य पात्राला कोणीतरी समजावत असतं. कधी आई , कधी आजी, कधी डॉ. दीक्षित , कधी मैत्रिणीचे कै. वडील ..... या कथेत आईच्या प्रेमाविषयीचा गैरसमज असल्याने 'सर्वांत लाडका बाळ' कोण म्हणून कृष्णाचा विचार केला. शिवाय कृष्णाचं पात्र घेतलं की खडे मारणं (मडक्यांना ), दुधाचा बिझनेस अश्या हिंट सुद्धा देता येणार होत्या .
kratos गोष्ट अपूर्ण वाटली का? क्रमशः नाही आहे Happy

आवडली . Happy

मस्त कथा लिहिली आहेस माधुरी. Very timely for me Happy

बाकीचे आपल्याशी कसे वागतात, काय म्हणतात हे त्या काळ्या ढगासारखंच आहे. आपल्या नियंत्रणाबाहेर आहे.
नात्यांमध्ये मोकळेपणा, संवाद, सुसंवाद हवाच पण फक्त त्याने तुझा प्रश्न सुटेल अशी आशा मात्र ठेऊ नकोस.
आपल्या बर्याच प्रश्नांचं मूळ हे आपल्या मनाच्या आतच असतं. म्हणून खरा संवाद हा आपला स्वतःचा स्वतःशीच असला पाहिजे.
तू स्वतः स्वतःचा लाडका आहेस का? असशील तर इतरांचा लाडका आहेस की नाही याने फारसा फरक पडता कामा नये.
सगळ्या कोलाहलात आपला आतला आवाज हरवूनच जातो. आपण स्वतःशी संवाद करतच नाही. >>> ह्या सगळ्याच वाक्यांना वाहवा. खूप छान. हे मी नक्की लक्षात ठेवेन Happy

देवकीताई कृष्णाची कल्पना कुठून 'उचललेली ' नाही हो!>>>>>>>> मला वाटलेच होते की त्रोटक प्रतिसादामुळे असा गैरसमज होईल म्हणून! अगं,तसे नाही ग.तुझी कथा वाचताना मनात ' ती' कथा झंकारत होती.तशीही मी कथा वाचली नाही.माझी आई माझ्या मुलाला गोष्ट सांगत असताना ऐकलीय.कोणाची गोष्ट म्हटल्यावर आईने सांगितले.असो. गैरसमज नसावा.

तू कथा खूप सुरेख फुलवलीय.

छान कथा.. आवडली..
हे असलं घरच्यांच बहुतांश वेळा अनुभवत असतो..आता नव्यानं प्रयत्न करेल, कथेतल्या शामनं सांगितल्याप्रमाणं! Happy

मयुरी, अंकु , मुक्ता, राहुल, शेखर , KRATOS , देवकी आपल्या प्रतिक्रियांमुळे लिहिण्याचा अधिक उत्साह येतो.
मुक्ता आपल्याला साऱ्यांनाच अश्या reminders ची गरज असते ना अधून मधून. तुझा आतला आवाज तुला दिशा दाखवेलच !
देवकीताई गैरसमज वेळेवर दूर झाले हे उत्तम झालं Happy

Pages