आठवणींच्या हिंदोळ्यावर! (पुरवणी लेख)

Submitted by सचिन काळे on 19 June, 2017 - 08:17

मला बऱ्याच वाचकांकडून मी जुन्या मुंबईचे लिहिलेले वर्णन कोणत्या सालातील आहे, याची विचारणा होत होती. मी आपणांस सांगू इच्छितो, की हे सर्व वर्णन अंदाजे १९७५-७७ सालाच्या दरम्यानचे आहे.

हे सांगण्याकरिता मी मूळ धाग्यावर उत्साहाने प्रतिसाद लिहावयास सुरवात केली. पण माझा प्रतिसादच एवढा मोठा झाला, की मला त्याचा हा पुरवणी धागा काढण्याचा विचार करावा लागला.

<<< त्या कोपऱ्यात बसून मी अवघ्या ५५ पैशात साधा डोसा आणि त्याबरोबर एक्स्ट्रा चार्ज न लावता मिळणारी चटणी चक्क पाच सहा वाट्या चापलेली आहे >>> हे सर्व अंदाजे १९७५-७७ सालाच्या दरम्यानचे वर्णन आहे. तेव्हा मी ६-८ वीत असेन. आमच्या बिल्डिंगमध्ये माझ्याच वयाचा माझा मित्र होता. बऱ्याचवेळा त्याच्याबरोबर मी आमच्या घराजवळील उडूप्याच्या हॉटेलमध्ये डोसा खायला जात असे. त्याकाळात आणि त्यावयात तीच आमची छानछौकीची कल्पना होती. त्यावेळी डोश्याबरोबर मिळणारा सांबार आणि चटणी पुन्हा मागितली असता त्याला एक्सट्रा चार्ज लागत नसे. पण सांबारची वाटी चमचा बुडेल इतपतच छोटी असायची. तसेच चटणीची वाटीसुद्धा छोटी आणि चपटी असे. पुन्हा सांबार मागितला असता मोठ्या भांड्यातून आपल्या टेबलावर असलेल्या वाटीतच चमच्याने सांबार दिला जाई. पण चटणीची वाटी प्रत्येकवेळी नवीन दिली जाई. साहजिकच चटणी आमची आवडती असल्याने आम्ही सहा सात वाट्या सहजच चापायचो. आणि टेबलावर बाजूला वाट्यांची चळत उभी करायचो. जितक्यावेळा चटणी मागवू तितक्यावेळा बिचाऱ्या वेटरला हेलपाटे पडत. त्यामुळे तो काही न बोलता आमच्याकडे खुन्नसने पाही. नाहीतर बोलवूनसुद्धा दुसरीकडे बघत आमच्याकडे दुर्लक्ष करी. आजही मला त्याचा रागाने भरलेला चेहरा आठवतोय. बरं! चूक की बरोबर हे समजण्याचं आमचं तेव्हा वयही नव्हतं. कदाचित आमच्यासारख्यांच्या त्रासानेच पुढील एकदोन वर्षातच हॉटेल असोसिएशनने एक्सट्रा सांबार आणि चटणीचा जादा चार्ज घ्यायला सुरुवात केली. खी:, खी:, खी:,

<<< मी मुद्दाम इराण्यांची हॉटेलं कुठे दिसतात का ते बघत होतो. त्या हॉटेलांमध्ये असलेली पैसे टाकून गाण्यांची रेकॉर्ड ऐकायची मशीन मला आठवली >>> त्याकाळी, १९७५-७७ साली मुंबईत सर्व नाक्या नाक्यांवर इराण्यांची हॉटेलं होती. ती चांगलीच ऐसपैस असायची. गिर्हाईकांना कितीही वेळ हॉटेलात बसायची मुभा असायची. त्या हॉटेलमध्ये एका कोपऱ्यात एक मोठ्ठा रेकॉर्डप्लेयर ठेवलेला असे. तुम्ही कृष्णधवल सिनेमामधील गाण्यांमध्ये मोठ्ठा पियानो बघितला असेलच ना!! ज्यावर नायक किंवा नायिका विरहगीत आळवताना दिसत. अगदी तसाच तो रेकॉर्डप्लेयर असे. ज्यावर वरील काचेमध्ये साधारण पन्नासएक काळ्या रंगाच्या रेकॉर्ड लायनीत खोचलेल्या असत. त्याखाली त्या रेकॉर्डवरील गाण्याची माहिती आणि नंबर चिकटवलेला एक रोलर असे. आपल्या आवडीच्या गाण्याच्या नंबर आपण बाजूला असलेल्या बटनावर दाबायचा आणि बाजूला असलेल्या खाचेत चार आण्याचे नाणे टाकायचे. की लगेच रेकॉर्डप्लेयरची मशीन त्या नंबरची रेकॉर्ड बरोबर शोधून गाणे वाजवत असे. त्या रेकॉर्डप्लेयरमध्येच आतमध्ये मोठ्ठे स्पीकर बसवलेले असत. गाण्याचा आवाज पूर्ण हॉटेलमध्ये आणि रस्त्यावरपर्यंत पोहचे. आम्ही लहान मुलं रस्त्यावर उभे राहून हॉटेलात वाकून वाकून रेकॉर्डप्लेयरच्या मशीनची कारागिरी पहात आणि फुकटची गाणी ऐकत असू. त्याकाळी इराण्यांच्या हॉटेलातील हा रेकॉर्डप्लेयर गिर्हाईक खेचण्याकरीता एक मोठाच आकर्षणाचा भाग होता.

<<< जुनी थिएटरं पाहून तिथे तिथे अवघ्या तीन रुपये तिकिटात पाहिलेले पिक्चर मला आठवत होते. पिक्चरची तिकिटे काढायला मी तिथे लावलेल्या रांगा आणि दबलेल्या आवाजात तीन का चार म्हणत फिरणारे ब्लॅकवाले आठवत होते. >>> १९७५-७७ साली आमच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एक थिएटर होते. त्याकाळी थिएटरमध्ये स्टॉल, अप्परस्टॉल आणि बाल्कनी अशी रचना असे. माझ्या आठवणीप्रमाणे त्यांचे दर अनुक्रमे तीन रुपये, तीन रुपये तीस पैसे आणि तीन रुपये साठ पैसे असे असत. बाल्कनीत बसणारा प्रेक्षक उच्चभ्रू समजला जाई. त्यावेळच्या सर्व लहानथोरांप्रमाणे मलाही सिनेमाचा नाद होता. मी बऱ्याचदा ऍडव्हान्स बुकींग करून सिनेमा पाही. दोन दिवसांनंतरचं तिकिट मिळालेले असेल तरी ते दोन दिवस सिनेमा पहायच्या उत्सुकतेने आणि गोड हुरहुरीने निघत. कोणीही पुढे घुसू नये म्हणून तिकीट काढण्याकरिता असलेली रांग तिन्ही बाजूने लोखंडाची जाळी लावून बंद केलेली असे. तरीही रोजचे ब्लॅक करणारे जबरदस्तीने जाळीवर उलटे लटकून रांग मोडून पुढे जाऊन तिकीट काढत. एकदा आठवते मी जाळीच्या आत रांगेत उभा असतेवेळी ब्लॅकवाल्यांची थिएटर मॅनेजरशी काहीतरी बाचाबाची झाली आणि त्यांनी लांबून रांगेवर जोरात दगडफेक करायला सुरवात केली. मी रांगेत जाळीच्या आत अडकलो होतो. मला कुठेही पळता येत नव्हते आणि वरून जाळीवर दणादण मोठमोठे दगड पडत होते. तेव्हा नशिबानेच मी थोडक्यात बचावलो होतो.

वरील विवेचनासंबंधीचा मूळ लेख आपणांस पुढील लिंकवर टिचकी मारून वाचता येईल.

http://www.maayboli.com/node/62850

माझा ब्लॉग  :  http://sachinkale763.blogspot.in

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

{{{ शुभ्रधवल }}} ऐवजी कृष्णधवल असा बदल कराल का? तसेच तुम्ही जे इराण्याच्या रेकॉर्ड प्लेयर विषयी लिहिले आहे त्याला ज्युकबॉक्स म्हणतात. बाकी वर्णन उत्तम.

@ बिपीन चन्द्र, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

दुरुस्ती सुचविल्याकरीता धन्यवाद. योग्य तो बदल केला आहे.