फॅमिली क्रॉनिकल्स ६ : Blame it on Neilson!

Submitted by रायगड on 15 June, 2017 - 11:51

आधीचे भाग :

फॅमिली क्रॉनिकल्स १ : लग्नाचा वाढदिवस - आमचं सेलिब्रेशन!
फॅमिली क्रॉनिकल्स २ : श्रीगणेशा - अर्थातच सुरुवात!
फॅमिली क्रॉनिकल्स ३ : कौटुंबिक मिटींग
फॅमिली क्रॉनिकल्स ४ : अभ्यास आणि उपद्व्याप
फॅमिली क्रॉनिकल्स ५ : आमचे घर रिमॉडेलिंगचे प्रयोग!

ही आहे घर-घर की कहानी. माझ्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

नेल्सन हा आमचा क्लीनर( घर सफाईला येणारा मदतनीस) ! पंधरवड्यातून एकदा असा गेली  ७-८ वर्ष  तो आमच्याकडे  येतोय   -  यावरूनच  हा माणूस किती चिवट असावा याचा अंदाज येतो!  दर वेळी तो यायच्या आधीची  माझी भीती....एखादं मोठ्ठं वादळ नुकतंच धडकून गेल्यासारखा घराचा अवतार बघून हा  त्याचं चंबू-गबाळं आवरून नक्कीच त्याच्या  मूळदेशी - होंडुरसला पळून जाणार!  नेल्सन काही  परत आपल्याकडे येत नाहीये.  पण तो येतो. परत परत येतो...पोटापाण्याकरीता माणसाला काय-काय करावं लागतं नाही...? 
तो येऊन गेला की  घराचं जे काही 'रूप पाहता लोचनी' होतं ना, ते पाहून माझा दरवेळचा फतवा असतो - आता आपण सगळ्यांनी बॅग्ज पॅक करून पुढचे १५ दिवस हॉटेलमध्ये रहायला जाऊया...हे घर असंच लख्ख राहू देत. त्याच्या पुढील फेरीच्या आदल्या दिवशी परत येऊ  आणि मग घाला घरात काय हैदोस घालायचाय तो - एक आख्खा दिवस! हे स्वप्न तर काही साकार होत नाही. उलट तो गेल्यावर सुमारे दोन तासात दोन्ही युवराज (आणि राजा-राणीसुद्धा) घर मूळपदाला आणण्यात यशस्वी  होतात -  इतके की प्रत्यक्ष नेल्सन २ तासांत परत आला तर त्याचा पण विश्वास बसणार नाही - आपण आजच, दोन तासापूर्वी हे घर साफ करून गेलोय यावर!
त्याच्या एका वेळच्या सफाई खेपेनंतर त्याच संध्याकाळी आम्ही व्हेकेशनला भारतात गेलो - ३ आठवड्याकरीता. नेल्सनला आता २ आठवड्याने तू येऊ नकोस हे सांगायला आम्ही अर्थातच विसरलो...चालायचंच . तो पुढल्या वेळी हजर झाला (तो कित्येकदा आम्ही घरी नसताना येतो आणि त्याला दिलेल्या कोडने घरात प्रवेश मिळवतो) तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले असणार नक्की.... ऑलमोस्ट चक्कर येऊन पडला होता - असे खात्रीलायक सोर्सेसकडून (म्हणजे त्याच्या बरोबर येणार्‍या मदतनीसाकडून) समजले.
तर हा असा आमचा तारणहार! तो तारणहार असला तरी काही बाबतीत मात्र नको  करून सोडतो.
आळशीपणात आमचा नंबर फार वरती लागतो  हे मी आधीच  सांगितलं आहे. आणि गलथानपणात - त्याही वर... खरं तर काही लोकं त्याला गलथानपणा म्हणतात पण  आम्ही कश्या सगळ्या  वस्तू अगदी हाताशी लागतील अश्या ठेवतो. म्हणजे कश्या - conveniently placed. आता घरातल्या प्रत्येकाचा स्वतःचा असा एक स्वतंत्र convenience असल्याने त्या वस्तूंची जागा सदैव बदलत असते आणि घरात आमचं मुख्य काम सदैव एक-ना-एक  वस्तू शोधत रहाणे हे असतं. पण यात एक नक्की की ती वस्तू तिच्या मूळ (ज्या जागेवर आमच्या घरात आलेली वस्तू सुमारे  पहिले साडे-तीन तास असते.)जागी नसते कधी हे आम्हाला पक्कं ठाऊन असल्याने तिथे कोणी एरव्ही शोधायला जात नाही.
नेल्सन  येतो आणि दणादण ड्रॉव्हर्स, कप्पे उघडून वस्तू  त्यांच्या -त्यांच्या जागी कोंबतो हो! कश्या  सापडाव्या मग त्या आम्हा पामरांना? एरव्हीही एकही गोष्ट जाग्यावर सापडत नाही  म्हणून एकमेकांवर डाफरणारे आम्ही,  नेल्सन येऊन गेला की (त्याच्या पश्चात) पुढले २-३ दिवस  त्याच्या नावाने- त्याच्यावर डाफरून घेतो. मग त्यात चपलांपासून - चेकबुकपर्यंत का ही ही असू शकतं. 
साधारण संवाद असे घडतात :  अरे,  माझा लॅपटॉप  कुठे गेला? काल तर इथेच ठेवलेला ना?  नाही, मी  सकाळी खालच्या टेबलवर बघितलेला, नाही-नाही तो सोफ्यावर होता मघाशी, अगं तू त्यादिवशी ऑफिसला घेऊन गेलेलीस तो आणलाच नाहीस परत...अश्या सगळ्या राउंडसनंतर एकदम सगळ्यांना साक्षात्कार होतो - नेल्सन!! हा नेल्सन ना कुठेही (पक्षी: त्या वस्तूच्या  अतिमूळ नेमलेल्या जागी!) काहीही कोंबतो... मग त्या लॅपटॉप करीता म्हणून पौरातन काळी आणलेले एक टेबल बेडरूमच्या एक कोपर्‍यात  आहे याची आम्हाला स्वतःला आठवण करून द्यावी लागते.(एरव्ही ते आठवतच नाही कारण त्यावरच्या पसार्‍यामुळे  त्याचं दर्शन होतंच नसतं!  नेल्सन येऊन गेला की त्या दिवशीच अश्या गोष्टी डोळे भरून डोळ्यात साठवून ठेवायच्या असतात...नंतरचे चौदा दिवस त्यांचे  दर्शन  दुर्मिळ होते. ) त्या टेबलावर त्याच्या मूळ जागी विराजमान  झालेला लॅपटॉप बघणे ही हृद्य घटना असते!  त्याची तुलना केवळ मखरात बसवलेल्या गणपतीचं रूपडं बघताना होणार्‍या आनंदाशी  होऊ शकते. 
तर काय, नेल्सन येऊन गेल्यानंतर पुढचे चौदा दिवस आम्हाला  बिलं फाडायला एक हक्काचा माणूस मिळतो.  गेल्या खेपेस नेल्सन आला त्याच दिवशी  नवर्‍याने सकाळी ऑफिसला गाडी नेली पण संध्याकाळी मी त्याला ऑफिसमधून पिक अप करून कुठेशी कामं उरकून मग  घरी आणले.  त्याची गाडी ऑफिसलाच  ठेवली. तर दुसर्‍या दिवशी सकाळी गाडी कुठे - हा नेल्सन  ना कुठेही ठेवतो गोष्टी...असा विचार करत असलेला नवरा आढळला.... आता बोला!...ब्लेम  इट ऑन नेल्सन! 
 आदल्या दिवशी डब्यात  पूर्ण भरलेले   शेंगदाणे,  चकल्या - हे डबे  दुसर्‍या दिवशी रिकामे दिसले की - नेल्सनने चकल्या-शेंगदाणे दुसरीकडे कुठेतरी ठेवल्या - हे बिनदिक्कत सांगायला  आमच्याकडची मंडळी डगमगत नाहीत (नशिब नेल्सनने खाल्या सांगर नाहीत!)... ब्लेम इट ऑन नेल्सन!
इतकंच काय, हल्ली  ज्यु. मंडळी शाळेत होमवर्क न्यायला   विसरली,  की त्यांनी  टीचरला काही सांगण्या आधी, टीचरच  विचारते - काय नेल्सन येऊन गेला की काय...तुम्ही अभ्यास केलेला असणारच आहे, याची मला खात्रीच आहे पण तो अभ्यास जागेवर सापडला नसेल ना!!    शिक्षक  मंडळींनाही कळलंय- ब्लेम इट ऑन नेल्सन!!! 
तर असा हा नेल्सन!  तो येऊन गेल्यावर केवळ २  तास घर स्वच्छ रहाते, तर एवढा खर्च करून आपण त्याला का  ठेवले आहे, यावर अधून-मधून आम्ही चर्चा करतो. पण मग लक्षात येते, की घर साफ होते, हा तर साईड फायदा आहे, मुख्य  फायदा म्हणजे बिनदिक्कत डाफरायला एक बकरा हवाय आपल्याला... घरात  सततच  न सापडणार्‍या गोष्टींची जबाबदारी घरच्या मंडळींनी  एकमेकांवर  ढकलून हाणामार्‍या करण्यापेक्षा एका  थर्ड पार्टीवर ढकलायला मिळते हा मुख्य फायदा - म्हणून आपण ते पैसे मोजतोय!!  कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडता ही है! 

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हाहा मस्त लिहिलय!
आमच्या घरी उलट असतं. क्लिनिंग लेडीज येणार त्या दिवशी आम्हीच घर आवरून त्यांना साफ करायला सज्ज ठेवतो. मला ओसीडी मुळे त्यांनी घर आवरलेलं चालणार नाही!

हाहा मस्त
आमच्या घरी उलट असतं. क्लिनिंग लेडीज येणार त्या दिवशी आम्हीच घर आवरून त्यांना साफ करायला सज्ज ठेवतो << आमच्या कडेही. .. इतक आवरुन होत की अस वाटत की आता फक्त झाडल पुसल की झाल.! आमच्या घरच्या बर्याच पार्ट्या त्यांच्या व्हिसीट ल अलाईन केलेल्या असतात. कार्यक्रम ठरवतांनाच ह्या शनिवारी जमेल का?नाहीतर मग नेक्ट वीक नको त्याच्या पुढच्या शनिवारी...
खरतर लेख वाचायला सुरुवात केली तेव्हा मला वाटल की आवरण्यावरच असेल...