अमावस्येची रात्र- भाग-१ (सुरूवात)

Submitted by र।हुल on 10 June, 2017 - 04:24

आज पुन्हा रात्रपाळीला त्या भक्कास midc तील कंपनीत राखणाला जावं लागणार म्हणून संध्याकाळ पासूनच माझी चिडचिड होत होती. त्यात आजची अमावस्येची रात्र पुन्हा पोटात भितीचा गोळा आणत होती. या असल्या सिक्यूरिटी गार्ड्स च्या नोकरीला मी जाम वैतागलो होतो पण करणार तरी काय?..दररोजचे खर्च तर भागलेच पाहिजेत ना. माझी होणारी चिडचिड पाहून पल्लवी अस्वस्थ होताना दिसली. तिला तसं बघून खरं म्हणजे मीच मनोमन खजील झालो परंतु झाल्या गोष्टीला आम्ही दोघंही सारखेच जबाबदार होतो. चांगल्या सुखवस्तू कुटुंबातील आम्ही दोघांनी, दोघांच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला केलेल्या प्रखर विरोधामुळे पळून जाऊन लग्नं केलं होतं आणि आता ह्या आडबाजूच्या दुर्गम गावात रहायला आलो होतो. उद्देश्य एकच, काही दिवस कोणाला दृष्टि पडायला नको; नंतर पुढचं पुढं बघू असा त्यावेळी केलेला विचार!

किती गैरसोय होती ईकडे सगळ्याच गोष्टींची पण तरीही आमचा नाईलाज होता. झाल्या प्रकारानं कॉलेज मधूनच सोडावं लागल्याने अर्धवट शिक्षणामुळं चांगली नोकरी मिळण्याची तशी मारामारच होती म्हणून हाती मिळेल ते काम करणं स्विकारलं होतं आणि त्यात ही सिक्यूरिटी गार्डची नोकरी! हा दुसराच महिना होता. महिन्याकाठी मिळणारे सहा हजार रुपयेच पण जगण्याशिवाय इतर दुसरे कोणतेही खर्च नसल्याने आमचं जेमतेम कसंतरी भागत होत. तिच्याकडे बघून मला एकदम जाणवलं की आपणच चिडचिड केली तर हि खचूनच जाईल म्हणून मी जरा शांत झालो. काहीही झालं तरी हिम्मत हारून चालणार नव्हतंच. जेवढ्या निष्ठेनं दोघांनी मिळून सोबतीनं घरं सोडली होती तेवढ्याच निश्चयतेनं दोघांनीही एकमेकांना सांभाळून घेणं गरजेचं होत. त्यातल्या त्यात आम्ही आमच्या दृष्टीनं एक चांगलं काम केलं होतं ते म्हणजे आमचं सध्याचं रहायचं ठिकाण म्हणून एका चांगल्या आणि सुसंस्कृत कुटुंबाकडून भाड्याने घेतलेली पक्की आणि मजबूत रूम. त्यामुळेच तर मला रात्रपाळीला कामाला जावं लागत असूनही पल्लवीची विशेष काळजी वाटायची नाही.

सगळं आवरून, जेवणाचा डबा घेऊन मी जायला निघणार तेव्हढ्यात पल्लवीनं मला थांबवलं. मी प्रश्नार्थक भुवया उंचावल्या. ती माझ्या जवळ आली आणि माझा उजवा हात आपल्या दोन्ही नाजूक हातांत घेऊन ती, माझ्या हातात तिनं आणलेला धागा बांधू लागली. मी ते बघतच राहीलो. तोच तो केशरीपिवळा नाथांचा धागा. मला एकदम आठवलं, आम्ही घरं सोडली तेव्हा नाथांच्या दर्शनाला गेलेलो असताना तिनं विकत घेतलेला आणि समाधीमंदिरात दर्शन घेताना हट्टानं समाधीला स्पर्श करायला लावलेला जेमतेम विस रूपयांचा धागा ज्यावरून तिला मी त्यावेळी बोललो होतो कारण आमची दोघांची त्याक्षणी परीस्थितीच तशी होती.आमच्याकडं जरासुद्धा पैसे नव्हते. याक्षणी मात्र ती गोष्ट आठवून माझे डोळे पाण्यानं गच्च भरून आले. हातात धागा बांधून होताच मी माझ्या दोन्ही हातांच्या ओंजळीत तिचा गोल चेहरा घेतला आणि तिच्या डोळ्यांत आश्वासक बघून हलकेच ओठ तिच्या कपाळावर टेकवले. 'सगळं ठिक होईल' म्हणालो आणि प्रेमभरल्या नजरेनं तिचा निरोप घेतला.

रात्रीच्या सव्वाआठ वाजता मी त्या बंद पडलेल्या भव्य कंपनीच्या आवारात पोहोचलो. त्या जुनाट करकर आवाज करत उघडणार्या गेटला जोर लावून उघडत मी आतमध्ये जळमटं लागलेल्या सिक्युरिटी गार्ड्ससाठी असलेल्या केबीनमध्ये शिरलो. तिथं ठेवलेल्या कळकटलेल्या पाईपच्या जुन्या मोडक्या खुर्चीत तीच्यावरील धूळ झटकत बसलो आणि जरा स्वस्थ झालो.
बराच वेळ मी बसूनच होतो. गेल्या दोन महिन्यातील घडलेल्या सगळ्या गोष्टींचा पुन:पुन्हा विचार करत होतो. काय चुकलं होतं बरं आमच्या दोघांचं? मामाची मुलगी होती पल्लवी परंतु दोन्ही घरांमध्ये जमिनीवरून निर्माण झालेल्या वादामुळे घरातल्यांनी एकमेकांवरचा राग आमच्या प्रेमावर काढून दोघांनाही धमकावलं होतं. कोणीच आम्हाला थोडंसंही समजून घेतलं नाही. ना इकडल्यांनी ना तिकडल्यांनी. घर सोडताना घरातून पैसे वा सोनं वैगरे घेऊन थोडक्यात चोरी करून पळून येणं आम्हां दोघांच्याही बुद्धीला पटण्यासारखं नव्हतं म्हणूनच तर अगदीच कफल्लक अवस्थेत आम्ही इथं आलो होतो. जर नसतोच आलो तर?...तर एव्हाना पल्लवीचं लग्नं तिच्या घरच्यांनी बळजबरीनं दुसर्याबरोबर लावून दिलेलं असतं.

बराच वेळ झाला म्हणून मी घड्याळात पाहीलं. रात्रीचे दहा वाजत आलेले. त्या खोलीत प्रचंड उकडत असल्यानं मी खुर्ची घेऊन बाहेर झाडाखाली आलो, जेवण केलं आणि तिथंच शून्यात नजर लावून बसून राहीलो. आता डोळ्यांवर झोपेची धुंदी येत होती. एकाएकी मला डुकली लागली आणि काही वेळाने मी तिथंच गाढ झोपेच्या स्वाधिन झालो.

दुरवरून कुठल्यातरी कंपनीचा बारा वाजल्याचा भोंगा ऐकू आला आणि माझी झोपमोड झाली म्हणून मी तसाच पेंगुळलेल्या अवस्थेत डोळे चोळत उठलो. जवळ असलेली पाण्याची अर्धी बाटली पोटात रिकामी केली आणि गेटपर्यंत जाऊन एक चक्कर मारून पुन्हा माघारी खुर्चीकडं आलो. आता बर्यापैकी थंडी जाणवत होती म्हणून मी स्वत: ला शोलेतला कांबळं पांघरलेला 'ठाकूर' बनवलं आणि बसून राहीलो. आता परत काही केल्यानं निद्रादेवी प्रसन्न होण्याची चिन्हे दिसेनात म्हणून मी आजूबाजूचं जाणिवपूर्वक निरिक्षण करू लागलो. सहज माझी नजर दूरवर असलेल्या त्या फोर्जिंगच्या भव्य शेडकडं गेली आणि काळजात धस्स झालं दररोज कुलूपबंद असलेलं आणि आज आल्यानंतरही तसंच बंद बघितलेलं ते शेडचं गेट आत्ता मात्र सताड उघडं होतं. चोर! माझ्या मनात आलेला पहीला विचार. मी जागचा उठलो हातात संरक्षणासाठी असलेली काठी घेतली खिशातली शिट्टी तोंडात पकडली आणि battery चमकावत तिकडं जाऊ लागलो. शे-दिडशे फुट चाललो असेन नसेन तोच मनात संध्याकाळचा 'आज आमावस्या' हा दुसरा विचार आला आणि मी जागीच थबकलो. काहीच क्षण गेले असावेत आणि एकाएकी सुरू झाला फोर्जिंग चा hammer आपटण्याचा जोरदार आवाज. एकामागून एक बसणारे ते दणके कानांना बधिर करत होते. घडल्या प्रकारानं माझी तर्कबुद्धी काम करेनाशी झाली आणि म्हणून मी प्रचंड घाबरून जागीच थिजल्यागत उभा राहीलो.. कितीतरी वेळ..बर्याच वेळानं तो आवाज यायचा थांबला तसा मी भानावर आलो. मी माघारी फिरणार तोच माझ्या डाव्या बाजूनं विजेरीच्या प्रकाशात एक चकाकणारी मण्यार सळसळत गवतात जाताना दिसली आणि अंगावर शहारा आला. एकाएकी वेगानं वारा सुरू झाला आणि वातावरणात असह्य करणारा गारवा पसरला. माझी श्वासांची गती वाढू लागली. एक एक क्षण मला तासाप्रमाणे भासू लागला. दुरवरून सुर लावून कुत्री ओरडण्याचे आवाज येऊ लागले. जे घडतंय ते अगदी वेगानं पण नक्की का आणि कसं घडतंय हे मात्र कळत नव्हतं. काहीही झालं तरी आल्या प्रसंगाला तोंड देणं गरजेचं होतं. घशाला कोरड पडली होती. आता आपलं काहीच खरं नाहीये अशी जाणिव होऊ लागली. माझ्या डोळ्यांसमोर पल्लवीचा निरागस चेहरा आला. तिच्या आठवणीनं डोळ्यांत पाणी तरळलं. मी भावूक होऊन रडायलाच लागलो आणि पुन्हा तेव्हढ्यात पाठिमागे शेडकडून 'बSSचाव' अशी स्पष्ट स्त्रीच्या आवाजातली किंकाळी ऐकू आली. मी पाठीमागे वळून बघणार तोच माझ्या पायातलं सगळं त्राण एकाएकी निघून गेलं. शरीर जड होऊन मी खाली जमिनीवर कोसळलो. आता अंगातली सगळी ताकद संपली होती. माझ्या छातीवर जोरानं दाब येतं होता. कुणीतरी गळा आवळून माझा जिव घेतंय असं वाटत होतं आणि अचानक माझ्यात होती-नव्हती ती सगळी ताकद एकवटली जावून माझ्या तोंडातून "बाSSबाSS" अशी जोराची हाक बाहेर पडली आणि मी बेशुद्ध झालो.

आता मी एकदम शांत होतो..कुणा मागून तरी चालत निघालो होतो. समोरची व्यक्ती अंधारामुळं स्पष्ट दिसत नव्हती पण मी अंदाजानं तिच्यामागनं चाल्लो होतो. आमच्या चालण्याने जमिनीवरचं गवत आणि झाडांचा वाळलेला पाचोळा आवाज करत होता. मनात थोडीफार भिती होती मात्र दुसरा काहीच आधार नसल्याने कितीतरी वेळ मी नुसता त्या मनुष्याकृती मागून चालतच होतो.

थोड्यावेळानं समोरची ती चालणारी व्यक्ती एकदम जागेवर थांबली आणि मागे वळली. मी नुसता बघतच राहीलो. तोंडातून शब्दही निघेना..सभोवतालचं सगळं जग थांबल्यासारखं वाटू लागलं..माझी अवस्था, 'अजी म्यां ब्रम्ह पाहीले.' अशी झाली होती. समोर बाबा उभे होते. मंद हसत होते. अंगावर भगवी कफनी, खांद्यावर झोळी आणि एका हातात चिमटा होता..मी घाबरून पाठीमागे सरकू लागलो. "चलो बेटे, घबराना नहीं।" हात पुढं करत समोरून शब्द आले. मला कसलंही भान उरलं नाही. जे चाल्लंय ते स्वप्नं आहे की प्रत्यक्षात घडतंय, मला काहीच कळत नव्हतं. स्वत:च्या नकळत मी त्यांच्या हातात हात देता झालो..त्या हाताचा उबदार स्पर्श होताच माझ्या सगळ्या अंगात एक चैतन्याची लहर पसरली. सभोवताली वातावरणात दवण्याचा मंद सुगंध दरवळला. जे घडत होतं ते नक्कीच अविश्वसनिय होतं मात्र मी तो गंध, स्पर्श सगळं अनुभवत होतो. आम्ही दोघं पुन्हा चालू लागलो..आता मी पुर्णपणे शांत झालो होतो. ना कसली भिती होती ना कुठलं दडपण ना कुठली आठवण.. होती फक्त एक निरव शांतता आणि तीला भंग करणारा, चालत असताना बाबांच्या हातामधील चिमट्याला असलेल्या कड्याचा होणारा लयबद्ध किणकिण असला आवाज..

आम्ही ज्या दिशेनं जात होतो त्या बाजूचा अंधार विरळ होत होता म्हणजे नक्कीच ती पुर्व दिशा होती. पण अजून तांबडं फुटायचं बाकी होतं. आम्ही चालत असलेली वाट बर्यापैकी चढणीची होती. समोर डोंगरवजा टेकडी दिसत होती तिच्या पल्याडचं आकाश आता अंधुकस लालपिवळं दिसू लागलेलं. खुपच सुंदर असा निसर्गाचा तो नजराणा बघत आम्ही चालतच राहीलो..चालताचालता बाबांनी एकदम माझा पकडलेला हात आपल्या उजव्या हातातून सोडला आणि समोर उगवतीकडं बोटानं इशारा करत ते म्हणाले,
"बस यही पहाड़ी पार करना हैं। थोड़ा कठिन जरूर हैं मगर नामुमकिन तो नहीं। उसके बाद जिवन में कोई कठिनाइयां नहीं रहेंगी। बस चलना हैं और अपनोंको चलाना हैं। जिवनमें कभी भी किसीसे डरना नहीं। कभी भी भागना नहीं।".....

डोक्याला गरम उन्हाच्या झळा लागल्या म्हणून मी वरती बघीतलं आणि मला एकाएकी जाणिव झाली की मी तर तिथंच त्या केबिनमध्ये टेबलाजवळ होतो मनगटांवर डोकं ठेऊन झोपलेलो. म्हणजे जे अनुभवलं ते एक स्वप्नं होतं तर! आणि एकदम ध्यानात आलं, 'तोच तो पल्लवीनं माझ्या हातात काल संध्याकाळी बांधलेला समाधीवरचा केशरी पिवळा धागा ज्याचा स्पर्श भ्रूमध्यात झालेल्या अवस्थेत हातांवर कपाळ टेकवून मी रात्रभर गाढ झोपलो होतो...'

मन प्रसन्न झालं. अगदीच प्रफुल्लित! घड्याळात सकाळचे साडेआठ वाजलेले. मी जागेवरनं उठलो. जेवनाचा रिकामा डब्बा हातात घेऊन केबिनच्या बाहेर पडलो. ते गंजलेलं गेट हलकेच उघडून मी कंपनीच्या बाहेर पाऊल टाकलं. गेट पुन्हा बंद करण्यासाठी परत माघारी वळलो आणि फोर्जिंगच्या शेडकडे आ वासून बघतच राहीलो...काल रात्री कामावर येताना बघितलेलं कुलूपबंद असलेलं शेडचं गेट आत्ता मात्र खरंच उघडं होतं.. काही क्षण स्तब्ध झालो. मग मात्र मनाशीच प्रसन्न हसलो. कंपनीचं गेट बंद करून घरांकडे निघालो..हो घरांकडेच ! शरीरानं इथल्या घराकडं मनानं मात्र आमच्या गावाकडच्या घरांकडे..कारण स्वप्नातील ते अमोघ शब्द कानात रूंजी घालत होते,
"बस यही पहाड़ी पार करना हैं। थोड़ा कठिन जरूर हैं मगर नामुमकिन तो नहीं। उसके बाद जिवन में कोई कठिनाइयां नहीं रहेंगी। बस चलना हैं और अपनोंको चलाना हैं। जिवनमें कभी भी किसीसे डरना नहीं। कभी भी भागना नहीं।".....

रूमवर येताच मी पल्लीला bags भरून आवरण्यास सांगितलं आणि मी आंघोळीला पळालो. तिला समजावून दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान आम्ही दोघं रेल्वेस्टेशन वरून 'विनातिकीट' परतीच्या प्रवासाला लागलो होतो. मनातल्या मनांत रात्री घडलेल्या घटनांची/स्वप्नांची उजळणी करत नव्यानं अर्थ लावत होतो.
―₹!हुल

क्रमशः

[त. टि. - एक लेखन म्हणूनच कथा वाचावी. यात समाविष्ट श्रद्धा वा अंधश्रद्धा यांचा वादप्रतिवाद प्रतिसादांमध्ये नको. Happy
लेखनात बर्याच चुका असू शकतात. प्रसंगांची धरसोड झालेली असू शकते किंवा कथानक भरकटलेले, रटाळ झालेले असू शकते. त्यामुळे प्रतिसाद देताना लेखनमुल्याबाबत चिरफाड केली तर स्वागतच. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान होती कथा...!!! पण त्या 'पहाडाच्या पलिकडे' काय होते..?? आणि घरी गेल्यानंतर तुम्ही दोघे रेल्वेने कुठे गेलात..?? पुढचा भाग येणार आहे का...???

धन्यवाद! Happy

छान होती कथा...!!! पण त्या 'पहाडाच्या पलिकडे' काय होते..?? आणि घरी गेल्यानंतर तुम्ही दोघे रेल्वेने कुठे गेलात..??
पहाडाच्या पलिकडे सुर्योदय होत होता. म्हणजे एक नविन सुरूवात होणार होती आणि स्वप्नात साकारलेल्या त्या योगीपुरूषानं सांगितल्यानुसार, पहाड ओलांडल्यानंतर काहीतरी आश्वासक, सकारात्मक असणार होतं पण ते बघण्यासाठी, जाणण्यासाठी मात्र ती टेकडी चढून जाणं म्हणजे अडथळा पार करणं गरजेचं होतं. म्हणूनच म्हटलंय की, 'बस चलना हैं और अपनोंको चलाना हैं।'
कथेतील नायकानं त्या बोलण्याचा अर्थ आपल्या सध्याच्या परीस्थितीनुसार लावला, आपल्याला अडथळे पार करायचेत पण कुणालाही न घाबरता आणि कुठंही न पळता. म्हणून त्या दोघांनी गावाकडं परत जावून घरच्यांना समजवायचं ठरवलं.

छान आहे कथा...
सुंदर मांडणी केलीत.. आवडली...

छान वाटली कथा.
याचा दुसरा भागही येऊ शकतो।

धन्यवाद!
याचा दुसरा भागही येऊ शकतो।

हो मी कथानकात जागा सोडलीये. आणखी दोन स्वतंत्र भाग लिहीता येतील. वेळ मिळाल्यानंतर लिहीलच. Happy