स्त्री-भृणहत्या.. प्रकाशाकडुन विनाशाकडे

Submitted by स्मिता द on 5 June, 2017 - 12:15

स्त्री-भृणहत्या.. प्रकाशाकडुन विनाशाकडे

" अग काही झाल तरी वंशाला दिवा पाहिजेच बघ" आशाकाकू म्हणाल्या.

"हे बघ मुलगा, मुलगी मी नाही मानत, पण समाजात रहायचे तर मुलगा नाही यावरुन टोमणे नको ऐकुन घ्यायला. त्यासाठी पाहिजे मुलगा " पल्लवी अगदी अगतिकतेने सांगत होती.

"मुलगी आवडते पण मुलगी म्हणजे पदरात निखारा, परत हुंडा द्या. लग्न करून दिल तरी संपल अस नाहीच ना?" सारिकाचा प्रतिप्रश्न आला.

" माझ्या लेकाला मुलगा पाहिजेच घराण पुढ चालल पाहिजे आणि अग्नी द्यायला मुलगा नको का?" अंताकाका अगदी हुज्जत घालायच्या पवित्र्यात होते.
या अन अशा प्रतिक्रिया मला " स्त्रीभृणहत्या का होतात? मुली का नकोशा झाल्या या प्रश्नाची उकल करताना साधलेल्या संवादात मिळाल्या. गेल्या तीन दशकात भारतात १ कोटी २० लाख स्त्रीभृणहत्या झाल्या आहेत. सेंटर फॊर ग्लोबल हेल्थ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही आकडेवारी जाहिर केली गेली. समाजामध्ये स्त्री पुरुष गुणोत्तराचे प्रमाण( दर हजार मुलांमागे असलेली मुलींची संख्या) हे ९४०- ९६५ असावयास हवे. पण सन २०११च्या जनगणेमध्ये आपल्या देशात ०-६ वयोगटात लिंग गुणोत्तर प्रमाण ९१४ आहे तर पुरोगामी म्हणवुन घेणाया आपल्या महाराष्ट्रात ते ८८३ आहे. कमी प्रमाण असणाया राज्यांच्या क्रमवारीत आपला नंबर पाचवा लागतो. ही बाब अतिशय गंभीरपणे विचार करायला लावणारी आहे. गार्गी, सीता, सावित्री , झाशीची राणी, इंदिरा गांधी, कल्पना चावला अशी अनेक उत्तुंग शिखरावर पोचलेली नाव पाहिली कि एका पारड्यात ही शिखरावरची नावे तर दुसरीकडे रोज होत असलेल्या स्त्री-भृणहत्या.. विशेष म्हणजे २०११ च्या जनगणेच्या कडेवारीवर नजर टाकली की दिसून येते गडचिरोलीसारख्या अविकसित भागात लिंग गुणोत्तर ९५६ आहे. कारण त्या समाजात स्त्रियांचा आदर केला जातो, त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा दिली जाते..तर विकसित म्हणवुन घेणाया राज्यात लिंग गुणोत्तर प्रमाण कमी..असे मन विषण्ण करणारे हे वास्तव! स्त्रीभ्रूण हत्या करु नका हेही आता गुळगुळीत झालेलेल वाक्य आहे कि काय अशी शंका यायला लागते. खुपदा चावुन चोथा झालेल्या या वाक्याचे लोकांना काही गांभीर्य वाटेनासे झाले आहे. कारण त्याचा वाढत चाललेला वेग पाहिला की समाज आता आपली संवेदनशीलता अन सारासाराविचार हरवत चाललाय असे प्रकर्षाने वाटते. " स्त्री-भृणहत्या" ही मला आता एक विकृती वाटते. अन या विकृतीचे समूळ उच्चाटन करायचे तर रोगाच्या मुळाशी जायलाच हवे. का घडते हे असे? खरेतर स्त्री अन पुरुष ही दोन्ही ईश्वराची निर्मिती. एक लिंगभेद सोडला तर त्या निर्मिकाने देखील कुठलाही भेदभाव केला नाहिये. मग हा मानवनिर्मित भेद का निर्माण झाला? विश्वाच्यानिर्मिती नंतर मानवजातीची सुरुवातीला हे विचारसरणीतले भेद नव्हतेच. हजारो वर्षांपुर्वीचा इतिहास उलटला तर हे भेद जाणवत नाहीत. उलट अपत्य निर्मिती करणारी स्त्री ही पुजनीयच होती.पुरोगामी म्हणवणाया आपल्यामध्ये मात्र लेकी नकोश्या झालेल्या दिसतात. कदाचित मुलगा हा वंश चालवतो, आपल्या घराण्याचे नाव चालवतो, म्हातारपणी आपला आधार होतो हा स्वार्थ त्याच्या मुळाशी आहेच. अन लग्नात हुंडा घेण्याची अनिष्ट प्रथा यामुळे ही किड अजुन फोफावत चालली आहे. मुलगी जन्माला घाला अन तिच्या लग्नात मात्र अगदी कर्ज काढुन हुंडा द्या. त्यापेक्षा नकोच मुलगी असा विचार बळावत चालला. पण हा अभद्र विचार म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे का? कि इतका इलाज नसलेला आहे ? की पोटच्या गोळ्याचा जीव घ्यायला मायबाप मागेपुढे बघत नाही. कुठे जाते यावेळेस अपत्याची ओढ अन प्रेम . केवळ गर्भ मुलीचा आहे म्हटल्यावर खुडुन टाकण्या इतके निर्दयाचा कळस केला जातो. एकवार तरी मनात प्रश्न नाही निर्माण होत" अरे ही मुलगी.म्हणजे ही निर्मिक, उद्याची आई. अन आईच नसेल तर? तुम्हा, आम्हाला जन्माला घालणारी आईच नसेल तर माणुसच नसेल ना." आपले त्या गोष्टीतल्या माणसासारखे झाले आहे. ज्या फांदीवर बसायचे तीच फांदी तोडुन टाकायची.अरे, त्यात हानी आपलीच आहे. आपणच आपली हानी केवळ एखाद्या विकृत विचारापायी करुन टकायची. त्याऐवजी ही जी "सो कॊल्ड कारण" या स्त्री भृणहत्येच्या मुळाशी आहेत तीच बदलायला हवी. ते विचार बदलायला हवे. अन हे विचार बदलणे ही जरी व्यक्तीनिष्ठ गोष्ट असली तरी त्या विचारांना समाजाच्या बदलत्या विचारसरणीच्या पाठबळाची गरज आहे. हा प्रश्न सामाजिक मानसिक अन कायदेशीररित्या सोडवला गेला पाहिजे. म्हणजे कसे असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. त्यासाठी स्त्री भृणहत्येपाठीमागील कारणे त्याचे परिणाम व त्यावरचे उपाय बघावयास हवे.
कारणे
साधारण सत्तर साली लोकसंख्या वाढीला आळा बसावा म्हणुन गर्भजल परिक्षण अशी सरकारी इस्पितळात याची सुरूवात झाली. कारण तोवर मुलगा हवाच या हट्टापायी अनेक अपत्यांना जन्म दिला जातो असे सर्वेक्षणामधे दिसुन आले होते. परंतु कालांतराने शासकीय इस्पितळा्तुन ही योजना बंद केली परंतु खाजगी इस्पितळात मात्र सुरुच होती. नंतर तर काय सोनोग्राफी यंत्रामुळे हा प्रकार अजुनच सुलभ अन सहज होत गेला. नमुद करायला वाईटही वाटते की देशातले सर्वात जास्त सोनोग्राफी केंद्र असलेले राज्य महाराष्ट्र आहे. आज राज्यात जवळपास सात हजारावर केंद्र आहेत. गेल्या सात वर्षात ही केंद्रे ८० टक्क्यांनी वाढली आहेत असे तज्न्यांचे मत आहेत. अन जिथे सोनोग्राफी केंद्रांची संख्या जास्त आहे त्या भागात स्त्री-भृणहत्यांचे प्रमाण देखील जास्तच आहे. तर आपण प्रथम स्त्री-भृणहत्या याचा मागोवा घेतल्यावर यापाठीमागे सामाजिक, धार्मिक, रुढी परंपरा, आर्थिक कारणे आहेत
• मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. त्याच्यामुळे आपला वंश चालु राहतो.
• मुलगा म्हणजे म्हा्तारपणची काठी. मुलगी काय परक्याचे धन. ती लग्न करुन सासरी जाते पण मुलगाच सांभाळतो.
• लग्नात द्यावा लागणारा हुंडा. हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेमुळे गरीब श्रीमंत अशा सगळ्याच स्तरावरचा पालक मुलगीच नको या विचारापर्यंत आला. याखेरिज मुलाने अग्नी दिल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही हा रुढीवादी विचारही मुलगे नकोच या विचारापाठीमागे असल्याचे जाणवतो
• मुलगी म्हणजे पदरात निखारा. पुरुषप्रधानसंस्कृतीमधे मुलींवर होणारे वाढते अत्याचार बघितले की नकोच मुलगी, नकोच ही जोखीम ही भावना होते.
• मुलगा असणं म्हणजे भाग्यवान, ’ ज्याच्या पदरी पाप त्याला पोरी आपोआप ’ ही भावना मुलगी नको या विचाराला खतपाणी घालते.
• कुटुंब छोटी हवीत ही काळाची गरज. मग अशा छोट्या कुटुंबात एक किंवा दोन अपत्ये, मग ते अपत्य म्हणजे मुलगाच हवा या हट्टापोटी स्त्री-भृणहत्या वाढीस लागल्या.

परिणाम
सामाजिक आरोग्य उत्तम रहावे यासाठी मुलांची व मुलींची संख्या एकमेकांना पुरक अशी म्हणजे समसमान असावी. पण या वाढत्या स्त्रीभृणहत्येंमुळे हा समतोल ढासाळत चालला आहे. एक स्त्रीजीव आपण जन्माला यायच्या आतच संपवतो म्हणजे एक पिढी आपण संपवतो हे कोणी लक्षात कसे घेत नाही. विनाशाच्या अतिशय भयावह अशा परिणामांना आपण सामोरे जात आहोत.
• मुलीच कमी राहिल्या तर विवाहयोग्य पुरुषांना आपली नैसर्गिक लैंगिक भुक कशी भागवायची हा प्रश्न निर्माण होईल अन मग त्यातुनच पुढे उदभवणाया लग्न संस्थेचे स्वरुप कसे असेल? एका स्त्रीला एका पेक्षा जास्त पुरुषांशी लग्न करावी लागतील.
• पुरुषांना जर हक्काची बायकोच मिळाली नाही उद्याची स्त्री किती सुरक्षित राहु शकेल ही बाब ही गंभीरपणे विचार करायला लावणारी आहे. मुलींचे अपहरण, बलात्कार अशा विघातक गुन्ह्यांचे प्रमाण वाढीस लागेल व एकंरदच समाजजीवन डळमळीत होईल.
• सर्वात महत्वाचे म्हणजे जर स्त्रीच राहिली नाही तर मानववंश कसा चालू राहणार. एकुणच मानवजातीच्या अस्तित्वच धोक्यात येईल हे भयाण वास्तव स्त्रीभृणहत्या करणारे लक्षात कसे घेत नाहीत.

उपाय
स्त्री-भृणहत्या घडु नये म्हणुन काय उपाय करता येईल असा विचार केला तर वरवरच्या मलमपट्ट्यांचा उपयोग होणार नाही त्यासाठी सामाजिक, प्रशासकीय, कायदेशीर अशा सर्वच स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. कठोर उपाययोजना अन कठो्र अंमलबजावणी करण्याशिवाय पर्याय नाही. माहिती, द्न्यान, संवाद, कायदे याद्वारे हा बदल घडवुन आणता येईल.
• पहिली गोष्ट म्हणजे सामाजिक चौकटीत जन्मत:च होणारे मुलगा अन मुलगी हे भेद नष्ट केले पाहिजे. मुलगा व मुलगी हे समान मानायला हवेत.
• प्रत्येक आईने अगदी निग्रहाने मी स्त्री भृणहत्या करणार नाही, त्यासाठी मला कायद्याची मदत घ्यावी लागली तरी मी ती घेईल पण स्त्री भृणहत्या करणार नाही व ती होऊ देणार नाही अशी शपथ घ्यायला हवी. स्त्रियांनीच जागृत होऊन याचा विरोध करायला हवा कारण त्यांचा अंश असा गर्भातच खुडला जातोय. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे ही खुणगाठ प्रत्येकीने मनाशी बांधायला हवी व संघटित व्हायला हवे. महिला संघटना, सामाजिक संस्थांनी या बाबत झंझावाती प्रबोधन करायला हवे.
• मुलगा घराण्याचे नाव चालवतो हा विचार असेल तर मग ती घराणेशाहीच घालवुन टाका. म्हणजे मग फक्त आई बापाचे नाव त्या अपत्याने म्हणजे मुलगा असो कि मुलगी त्याने लावले की बस. म्हणजे मग घराण्याचे नाव ही संकल्पना मोडीत निघेल.
• अनेक भ्रामक रुढी व विचारांची अडगळ लोकांच्या डोक्यातुन साफ करुन टाकायला हवी. व्यापक पातळीवर विचार प्रबोधन व विचारमंथन घडवुन आणायला हवे त्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा.
• एकदा का घराणेशाही गेली कि मग जातीयतेलाही मुठमाती मिळायला हवी. जातीतच लग्न करायला हवे त्यासाठी हवा तितका हुंडा देऊन मी जातीतलाच मुलगा बघेल ही प्रवृत्ती आपसुकच कमी होईले. मी हुंडा देणार नाही अन घेणार नाही असा समाजविचार पुढे आला तर या कुप्रथेला आळा बसेल.
• आर्थिकदृष्ट्या परांवलंबी असणाया स्त्रियांवर स्त्री-भृणहत्या करण्यासाठी दबाव अणला जातो त्यासाठी ती अर्थिकदृष्ट्या सक्षम असायलाच हवी. आई- वडिलाच्या मिळकतीत, संपत्तीत जी अपत्ये असतील त्यांचा समान वाटा असावा. २००५ मध्ये हालेल्या हिंदु वारसा कायद्यानुसार वडिलोपार्जित मिळकतीत आता मुलींना देखील समान वाटा मिळायला हवा . अन याची अंमलबजावणी प्रभावीपणे व सक्तीने व्हायला हवी. त्यासाठी सामाजिक तसेच प्रशासकीय यंत्रणेने यशस्वीपणे हा कायदा अंमलात आणावयास प्रोत्साहन द्यायला हवे.
• नुसता संपत्तीतच समान वाटा नको तर म्हातारपणी आई वडिलांची जबाबदारी एकट्या मुलाची किंवा मुलीची नको तर दोघांचीही समान असावी.
• पालकांनी मुलींना हुंडा देण्या ऐवजी शिक्षण देऊन सक्षम बनवावे. ती कोणावर अवलंबुन रहाणार नाही याची काळजी घ्यावी.
• म्हातारपणाची जबाबदारी परदेशाप्रमाणे सरकारने उचलली तर मुलगाच हवा हा हट्ट कमी होईल अन आपोआप स्त्रीभृणहत्या संपतील.
• मुलगी असणे हे भाग्याचे लक्षण. " Son is son till comes his wife, daughter is always daughter for whole life या म्हणीनुसार मुलगी असण्यासंबंधी सकारात्मक मानसिकता तयार व्हावी म्हणुन फक्त मुलगी असलेल्या परिवाराचा सन्मान करणे, मुलीच्या जन्माचा आनंदसोहळा करणे.
• नवविवाहित जोडपी, गरोदर मातांचे मेळावे घेऊन त्यांचे समुपदेशन करणे
• समाजसेवी संघटनानी प्रत्येक विभाग पातळी वर आपले स्वयंसेवक नियोजित करुन पहिली मुलगी असणाया मातापित्यांचे जन्मनोंदणी रेकॊर्ड काढुन त्यांना भेटणे, त्यांचे समुपदेशन करणे.
• मुलींसाठी असणाया सगळ्या योजना व कायदे यांची माहिती सेवाभावी संस्थांनी मेळावे घेऊन, वैयक्तिक भेटीगाठी घेऊन तळागाळापर्यंत पोहोचवावे.
• सोनोग्राफी यंत्राची संख्या कमी हवी. रुग्णांच्या सोयीकरता केवळ शासकीय इस्पितळात ही सोय असावी. सोनोग्राफी यंत्रांचे व्यवस्थित मॊनिटरिंग केले जावे. सोनोग्राफीयंत्राचे डाटाबेस आवश्यक असावे. सोनोग्राफी सेंटर व गर्भपात सेंटरची नियमित तपासणी केले जावी.
• स्त्री-भृण हत्येविरोधी केवळ डोक्टर जबाबदार नसुन पती, नातेवाईक यांनाही जबाबदार धरण्यात यावे.
• स्त्री-भृणहत्या हा वध मानण्यात येऊन कठोरात कठोर शिक्षा व्ह्यावी अशी मागणी विधानसभेमध्ये सदस्यांनी केले आहे. या कामी समाजाबरोबरच प्रशासकीय यंत्रणाही सक्षम व भ्रष्टाचारविरोधी असावी. प्रशासकीय स्तरावर याची कठोर अंमलबजावणी व्हावी. त्यासाठी पोलीसखाते अन आरोग्यखाते यांचा समन्वय आवश्यक आहे.
हे विचार कदाचित क्रांतीकारी वाटतीलही. पण अशक्य नाही. मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टीकोन तयार व्यायला हवासमाजाने एकदा मनावर घेतले तर हे परिवर्तन अशक्य नाही. अन मग स्त्री भृणहत्येच्या मुळ कारणाचे उच्चाटन झाले की स्त्री-भृणहत्या हा प्रकारही थांबेल. मुठभर लोकांनी आक्रोश करुन किंवा मोठे मोर्चे काढुन, निषेध करुन हे प्रकार फारमोठ्या प्रमाणावर बंद होतील असे वाटत नाही. कारण भ्रष्टआचार अन विचाराने समाज इतका पोखरलाय कि मुर्दाड मनांवरची कातडी काही सहजी गळुन पडणार नाही. सगळा समाज ढवळुन आणणारे परिवर्तन आवश्यक आहे. तळागाळापासुन सगळा समाज ढवळुन निघायला हवा. अपप्रवृतींच्या, अनिष्ट प्रथांच्या शृंखला घालुन बसलेल्या समाजाने त्या बेड्या मोठ्या ताकदीनिशी तोडुन टाकायला हव्या. आमिर खानच्या " सत्यमेव जयते" च्या स्त्री-भ्रूणहत्ये वरील कार्यक्रमाने बय़ाच लोकांना याची दाहकता जाणवायला लागली, विनाशाच्या दिशेने आपण चाललोय हे उमगायला लागलेय.अर्थात हे ही सगळ्यांनाच समाजायला हवे अन नसेल अजुनही समजले तर टोकदारपणे त्याही जाणिव करुन द्यायला हवी. परवाच पुण्या्तल्या बातम्या वाचल्या एका कृर मातेने जन्मत:च मुलगी आहे असे बघीतल्यावर पती यायच्या आता त्या जन्मलेल्या मुलीची विल्हेवाट लावली तर दुसया आईने दुसरी मुलगीच झाली मग सासरचे लोक काय म्हणतील या विचाराने नवजात मुलीला कचरापेटीत टाकुन दिले.एक आई म्हनूनही विचार करते तेव्हा मला त्याच्या कृतीचे समर्थन करता येत नाही, या राक्षसीकृत्यापाठीमागची मनोवृत्ती कळत नाही. इतकी हीन पातळी, क्रौर्य एखादी माता आपल्या पोटच्या गोळ्या बाबत दाखवु शकते? असे मुलगा काय अन मुलगी काय दोन्ही तुमचीच निर्मिती असते ना. मग त्या जीवाचा काय दोष अन त्याचा काय अपराध की तुम्ही गर्भातला जीव मुलगी आहे असे समजताच तीचा जीव घ्यायला निघता? मग गर्भातला जीव कोण आहे हे कळायला नको. पण केवळ तिथपर्यंतच जाउन चालणार नाही. कारण जरी कळाले तरी माणसाच्या मनात हा कुविचार यायलाच नको. पाश्चिमात्यांच अधांनुकरण करणारे आपण पश्चिमी देशात स्त्रीभृणहत्या नाहीत हे लक्षात घेतच नाही. तिथे मात्र आपल्या समाजात असे चालत नाही हा भाग सुरु होतो. हा डोळसपणे विचारच कोणी करत नाही. माणुस हा समाजशील प्राणी असे आपण मानतो. समाजाच्या विचारप्रणालीनुसार तो घडतो , वागतो. लोक काय म्हणतील या फिकिरीतही सर्वसामान्य मानुस सतत असतो. मुलगी झाली तर घराण्याला वंशाचा दिवा नाही, म्हातारपणाची काठी नाही. इतर लोकांची किव व सहानुभुती घेत जगण्यापेक्षा मग मलाच मुलगा का नको हा अट्टाहास माणसाच्या मनात वाढत जातो. नपेक्षा मुलगीच नको या विचारापर्यंतही मग तो येऊन ठेपतो. तर हे विचार का येतात त्याची कारणे शोधुन त्यावर इलाज करायला हवा . म्हणजेच रोग का आहे अन त्यावरचा योग्य इलाज काय आहे हे पाहिले तर मग त्यावर उपचार करुन रोगमुक्त होणे शक्य होते. कदाचित ही विषवल्ली इतकी फोफावली आही की एक दोन महिन्यात संपुर्ण रोगाचे उच्चाटन होईल असे नाही. देवीचा रोग, पोलीओ इ रोगांचे समुळ उच्चाटन व्हायला जसा कालावधी गेला तसा थोडा कालावधी या रोगावर पण जाईल. त्यासाठी प्रथम कठोर कायदे अन त्या कायद्यांची कठोर अंमलबजावणी यामुळे या अपप्रवृतीला अळा बसेल. त्याशिवाय स्त्री भृणहत्या हत्या करणायाला जेव्हा समाजच वाळित टाकेल तेव्हा
हे झाले आशावादी भविष्य. त्यासाठी समाजपरिवर्तन आवश्यक आहेच. पण केवळ भावनिक आव्हाने करुन हे शक्य नाही. अगदी कायदे केले तरी या प्रवृत्तींना आळा बसत नाहीये. केवळ भावनिक आव्हाहने अन कायदे करुन ही प्रवृत्ती बदलणार नाही तर त्यासाठी विचारप्रणालीत परिवर्तन करायला हवे. मुलीला जन्म दिलेल्या पालकांचा गौरव व्ह्यायला हवा. अरे रे मुलगी झाली ! अशी संभावना मुलीच्या जन्मानंतर व्हायला नको तर " अरे वा ! मुलगी झाली" असे परिवर्तन ज्या वेळेस घडेल तेव्हाच ह्या अनिष्ट प्रवृत्तीला पायबंद बसेल.शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते
ती सृष्टी..
ती विश्वजननी,
ती जन्मभुमी.
संपलीच ती तर
उरेल अंधार पोकळी !!

पुर्वप्रसिध्दी उर्ध्वाधार दिवाळी अंक 2012

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल हा माझा लेख २०१२ साली लिहिलेला, पुन्हा वाचनात आला. चार वर्षे होऊन गेली पण या परिस्थितीत फार लक्षणीय असा फरक पडलाय असे जाणवत नाही.
पुरुषप्रधान नाही आणि स्त्रीप्रधान नाही तर मानव्यप्रधान संस्कृती यायला हवी. सर्वस्तरातून त्यासाठी जागृती व बदल व्हायला हवा असे वाटते, आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सामान्य माणसांनी स्वतः: पासून प्रयत्न करायला हवे असे मनापासून वाटते.

स्मिताताई थोडक्यात पण खूप प्रभावशाली लेख लिहिलाय तुम्ही... जवळजवळ सगळेच मुद्दे घेतले आहेत... Happy

मी असे कितीतरी लोकं पाहिले आहेत्/अजून पहातिये(२१व्या शतकात सुद्धा) ज्यांना मुलगी नकोय...अस म्हणण्यापेक्षा पहिली नंतर दुसरी मुलगी नकोय..एकतरी मुलगा हा हवाच ... खूप चीड येते अश्या विचारसरणीची..

सविस्तर नंतर लिहिन...

मेघा धन्यवाद ! प्रथम आभार लेख वाचल्या बद्दल.
एकतरी मुलगा हवाच हे तुझे विधान अगदी खरंय, अजूनही हा विचार आपल्या सभोत्ताली कुठें कुठे दिसतोच. हे क्लेशकारक आहेच पण घृणास्पद ही. अर्थात कुठेतरी परिवर्तनाची सुरुवात आपण आपल्या पासून करायला हवी, अगदी नाव कसे लावावे इथपासून, नाही का?

ताई,मला स्वत:ला भाऊ नाही...आम्ही सगळ्या बहिणीच आहोत , पण माझ्या वडीलांनी कधीही आम्हाला कमी लेखलं नाही... त्यांच्या परीने जे जे करता येईल्/जे ते देउ शकले ते सर्वच दिलं/देतात अजूनही...

पण अश्या विचारसरनीचे खूप लोकं पाहिलेत मी...
उदाहरणच द्यायच झालं तर,
१) आमच्या शेजारी १ ग्रुहस्थ आहेत ,अगदी वारकरी सांप्रदायतले...आता कोणालाही वातेल किती उच्च विचार असतील या व्यक्तीचे..पण त्यांच्या मुलाला जेव्हा ३रि हि मुलगी झाली ना हा मानून अक्षरश : रडत होता..काय तर म्हणे ३रि हि नातच का?
२) माझ्या चुलत बहीनीला २ मुली आहेत ,माझे वडील बोलले तु ऑपरेशन कर आता,ह्या दोघीं नाच चांगल शिक्षण दे, त्यांच्या पायावर उभ कर..मुलगा काय नि मुलगी काय...त्यावर तिने केलही...पण आता बोलते तुम्हाला वाटतच नव्हत मला मुलगा व्हावा म्हणुन अस सांगितल मला.... आता यावर काय बोलाव?
३) अशीच सेम केस अजून एक : २मुली आहेत ऑलरेडी,मुलिं ची आई बोलते बस आता,तर नवरा आणी सासु बोलते
नाही यावेलेस होईल मुलगा Uhoh नको करूया ऑपरेशन... परिस्थिती एवढी काही चांगली नाही, कष्ट करून्च जगतात...तरीही असं,
सासू बोलते त्यात काय तेव्हा,नाही शिक्षणाचा खर्च झेपला तर मराठी मेडीयम मधे शिकतिल ...पण मुलगा हवाच..वंशाला दिवा म्हणे.. सुनेला काय वातत काही देण-घेण नाही..
४) दुसर्यांचीच कशाला उदाहरणं...
आमचच सांगते,
माझी बहीन प्रेगनेंट आहे...आई बोलते देवा पहिल्यावेळेस मुलगाच होउदे,मग दुसरंकाही का होईना ...पहा आता,काय करणार?
अवांतर : मि नेहमी बोलते,आज इथेही सांगायला आवडेल...पण सगळे हसतात मला अस म्हतल्यावर, मला एकतरी मुलगी हवीच २ मुले नको बाबा, मला विचित्रच वातत बाई ते ,देवाकडे ऑलरेडी सेटींग लावून ठेवलीये मी Lol

कितीही उदाहरण घेतली तरी कमीच पदतील,गरज आहे विचार बदलण्याची, मी ,तुम्ही बदलून काहीही होणार नाही..
सर्वांनी बदलायला हवं..
काहीतरी चांगलं होईल Happy

मेघा .. Happy माझ्या वडीलांनी कधीही आम्हाला कमी लेखलं नाही... त्यांच्या परीने जे जे करता येईल्/जे ते देउ शकले ते सर्वच दिलं/देतात अजूनही...>>>>यासाठी वडिलांचे खरेच खूप कौतुकच आहे. असे सगळे लोक असतील तर हे घडणारच नाही ना

तु दिलेली उदाहरणे खरेच आजुबाजुला आहेतच. वंशाला दिवा पाहिजे हा एक समज इतका आहे ना की लोकांना ते सहजी पटत नाही. म्हातारपणची काठी ,वंशाला दिवा या खरच फक्त रम्य कल्पना झाल्या आहेत. आज पाहिले तर किती वंशाचे दिवे बाहेर दिवे पाजळतात आणि किती म्हातारपणाच्या काठ्या मोडुन पडल्यात...आज खेड्यापाड्यात काय आणि शहरात काय , वृध्दांची परिस्थिती थोड्याफार फरकाने सारखीच आहे. तसे नसते तर आज वृध्दांसाठी पाळणाघर आलेच नसते.
शहरात काय निम्म्याहून लोक असे आहेत की मुले नोकरीसाठी लांब गेली, काहींची परदेशात आहेत...फक्त त्याचे नाव सांगणे आणि कौतुक ऐकवणे या पलिकडे फारसा बंध उरला नाहीये. आपण म्हणत आलोय म्हातारपण म्हणजे दुसरे बालपणच ..मग त्या बाल असलेल्या म्हातारपणात मायेची, प्रेमाची माणसे हवीतच ना जवळ...असतात का? याचा शोध घेतला तर निम्म्यापेक्षा जास्त उत्तरे नकारार्थी येतील.
उलटपक्षी मुलागा परदेशात गेलेला असतो आणि बहुतेक मुली मग सासर सांभाळुन आई ,वडिलाना सोबत करत असतात. केवळ माझे आई ,बाबा आहेत , ते एक्टे आहेत ही भावना मुलींमध्ये अधिक असते. अर्थात सगळेच मुलगे असे आणि मुली अशाच असे मी म्हणतच नाही..

मला एकतरी मुलगी हवीच २ मुले नको बाबा, मला विचित्रच वातत बाई ते ,देवाकडे ऑलरेडी सेटींग लावून ठेवलीये मी Lol >>>>>> अशी अपेक्षा प्रत्येकीने केली ना मला मुलगी हवी , तरी मुलींमागचा हा वनवास नक्कीच संपेल. अभिनंदन तुझे असा विचार केल्या बद्दल Happy

केवळ विचार नाही तर अंमलबजावणी व्हायला हवी. मला जे बदल वाटले ते सुचविले, असे अ़नेक वेगळे विचार अन बदल या परिवर्तनाला अनुकुलच ठरतील..गरज आहे त्या दिशेने विचार करण्याची आणि एक तरी चिमुकले पाऊल उचलण्याची .:)