कथुकल्या १०

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 3 June, 2017 - 06:12

१. अपघात

रात्रीचे अकरा वाजले होते. अशोक पानसे त्याच्या अंधाऱ्या बेडरुममध्ये बसलेला. झोपणे तर दूर, गेल्या एक तासापासून तो जागचा हललाही नव्हता. तो अॅक्सीडंट राहून राहून त्याच्या नजरेसमोर येत होता.

सिग्नलचा दिवा लाल झाला पण तो घाईगडबडीत होता, दिव्याकडे लक्ष न देता त्याने गाडी सुसाट पुढे पळवली. त्याच्या उजव्या बाजूचा सिग्नल केशरी झाला. पुढच्याच क्षणाला वाहनांचा लोंढा अन त्याच्या अग्रभागी असलेला बाईकवाला वेगात समोर आला. ब्रेक दाबायचं कुणालाच जमलं नाही. धडक बसली अन बाईकवाला दूरवर फेकला गेला.

हॉर्न वाजत होते, लोक ओरडत होते.पण अशोकची दृष्टी बधिर झाली होती. त्याचा पाय आपोआप अॅक्सलेटरवर दाबला गेला. एकदाही वळून न बघता तो वाट फुटेल तिकडे सुसाट धावत निघाला.

गाडी गॅरेजमध्ये लपवून तो घरात आला तेव्हा त्याचं अंग घामाने चिंब झालं होतं, ह्रुदयाची धडधड प्रचंड वाढली होती. आतापर्यंत त्याने कोणताच गुन्हा केला नव्हता, पोलीस स्टेशनचं तोंडही पाहिलं नव्हतं. कुणीतरी नक्कीच गाडीचा नंबर नोट केला असेल, पोलीस आपल्याला शोधून काढतीलच. अशावेळी सगळ्यात सुरक्षित जागा म्हणजे आपल्या बेडरुममधला अंधारी कोपरा. पण हा अंधार त्याला वाचवू शकत होता का ? अजिबात नाही.
पोलीसांना कळाल्यास करीअर, इज्जत सगळं काही क्षणात धूळीस मिळणार होतं. त्याने जेलात चक्की पिसतानाचं चित्र डोळ्यांसमोर उभं केलं.

दरवाजावर ठकठक झाली अन त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. त्याची हिंमतच होत नव्हती दरवाजापर्यंत जाण्याची. पोलीस असतील तर ! परत एकदा ठकठक झाली. आता इलाजच नव्हता. तो दबत दबत खिडकीपर्यंत आला. पडदा जरासा बाजूला करून बाहेर पाहिलं. अन... त्याचा श्वास छातीतच अडकला. बाहेर पोलीसांची गाडी उभी होती.

त्याने मनातल्या मनात देवाचा धावा सुरू केला.
पळून जावं का ? पण त्यामुळे गोष्टी अजूनच बिघडल्या असत्या. नको त्यापेक्षा चांगला वकील लावता आला असता. पैसे दिले की सगळे निर्णय आपल्या दिशेने फिरवता येतात.

ठक ठक ठक

जे होईल ते होईल. मनाचा निश्चय करून त्याने दरवाजा उघडला.

बाहेर पोलीस इन्स्पेक्टर उभे.

"अशोक पानसे तुम्हीच का ?"

त्याने एक उसासा सोडला अन होकारार्थी मान हलवली.

"मला ही बातमी सांगताना अतिशय वाईट वाटतंय. तुमच्या मुलाच्या बाईकला एका कारवाल्याने धडक दिली. तो जागीच गतप्राण झाला.
--------------------------------------------------

२. काळचक्र

सागराच्या शांत लाटांकडे बघत ती एकटीच बसून होती. लालतांबूस सूर्य अस्ताला जायची तयारी करत होता. तिच्या आयुष्यातला सूर्य मात्र केव्हाच मावळला होता. तिचं एकमेव प्रेम असलेला तो, आयुष्यभर ज्याच्यासोबत चालण्याची शपथ घेतली होती असा तो बघता बघता निघून गेला. लष्करी अधिकारी असल्याने त्याच्या आयुष्याची दोर तशी कमजोरच होती. पण मृत्यू आलाच तर तो रणांगणावर यावा अशी कुठल्याही सैनिकाची इच्छा असते. तो असा अनपेक्षितपणे आल्यामुळे हे दुःख जास्त सलणारं होतं.

तिने गालावर ओघळणारा अश्रू तसाच वाहू दिला. त्याची शेवटची आठवण असलेलं साखळीचं घड्याळ अजूनही तिच्या मुठीत बंद होतं. हे घड्याळ त्याला खूप प्रिय होतं; ही वस्तू तो कुलुपबंद ठेवायचा अन कुणालाच हात लावू द्यायचा नाही. कारण विचारण्याचा तिनेही कधी प्रयत्न केला नव्हता अन आज तेच घड्याळ तिच्या हातात होतं... सोन्यासारखं चमचम चमकणारं साखळीबंद घड्याळ.

तिने घड्याळाचं वरचं झाकण उघडलं. आत अगदी साधं डायल होतं. पांढरट काळी भस्माच्या रंगाची युद्धभूमी अन त्याभोवती घिरट्या घालणारे तीन सैनिक... असं काहीसं वाटून गेलं तिला.

तो विचार तिने बाजूला झटकला अन सहज म्हणून चाबी बाहेर ओढली... तीनही काटे निमुटपणे एकाजागी थांबले. तिचंही आयुष्य असंच, स्थिर झालं होतं जणू. बराचवेळ ती घड्याळाकडे बघत होती. पण तिच्या लक्षात आलंच एका क्षणाला की आजूबाजूचे आवाज थांबलेत... मुलांच्या गोंधळाचा, फेरीवाल्यांचा अन समुद्राचाही ! नजर वर करून तिने बघितलं अन आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले गेले, अवघड दुःख ती काहीक्षण विसरली. आसपासची प्रत्येक कृती थिजली होती, गोठली होती, बधिर झाली होती. हवेत झेप घेतलेला कुत्रा, बाळामागे धावत असलेली आई अन तिचं मूल, हातांत हात गुंफुन चालत असलेलं प्रेमीयुगुल, आजुबाजुची प्रत्येक गोष्ट जिथल्यातिथेच स्थिर झाली होती, काळ थांबला होता !

तिने चाबी आत दाबली. लगेचच घड्याळ अन तिचं भोवताल जिवंत झालं, गतिमान झालं. कुत्र्याची उडी जमिनीवर पडली, आईने बाळाला पकडलं, प्रेमीयुगुल परत चालू लागलं, मध्ये काही झालंय याची कुणाला जाणीवही नव्हती. तिने पुन्हा एकदा चाबी बाहेर ओढली, पुन्हा सगळं थांबलं. ती घाबरुन जागेवरुन उठली, त्याच्या घड्याळाकडे अविश्वासाने पाहू लागली. चाबी बाहेर ओढण्याची तिची हिंमत होत नव्हती. तरीही तिने थरथरणारा हात घड्याळाजवळ नेला अन चाबी मागे फिरवायला सुरुवात केली.

तिच्या भोवतालचा काळही त्याच वेगाने उलट फिरू लागला !

परत चाबी समोर फिरवली अन सगळं भरभर पुढे जाऊ लागलं... चित्रपटातल्या फास्ट फॉरवर्ड दृश्यासारखं. वर्तमानकाळापर्यंत वेळ आणून तिने सोडून दिला. काटे परत एकदा नेहमीच्या गतीने चालू लागले.

थोडावेळ ती बधिर पावलांनी सुन्नपणे उभी होती अन अचानक तिच्या डोक्यात तो विचार चमकला. बऱ्याच दिवसांत पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. ती त्याला वाचवू शकत होती !

मग ती थांबली नाही. धावत गेली टॅक्सीपर्यंत, लोकलने जाण्याचा धीर धरवत नव्हता. टॅक्सीवाल्याला मागेल ती किंमत देऊन तिने शक्य तेवढ्या वेगात जायला सांगितलं. पंचविसाव्या मिनिटाला ती तिथे पोहोचली. एव्हाना सूर्य अस्ताला गेला होता, काळोख दाटू लागला होता. त्याच अंधाऱ्या बोळीच्या टोकाशी ती उभी होती जिणे उत्कर्षला मरतांना पाहिलं होतं. ती रात्र तिला लख्ख आठवत होती. जवळच्याच दुकानात उत्कर्ष तिच्या आवडीचं आईस्क्रीम आणण्यासाठी गेलेला, घरातल्याच कपड्यांवर... बंदुकीविना. याच ठिकाणी त्याला त्या आतंकवाद्याने गाठलं अन...

तिने घड्याळ बाहेर काढलं अन चाबी उलट दिशेने फिरवायला सुरुवात केली. आधी हळूहळू, नंतर वेगाने. सेकंद मिनीटं तास भराभर हरवत चालले. दिवसांमागून दिवस मागे पडू लागले. दुपार झाली वर्दळ वाढली, सकाळ झाली सगळं शांत, बाजार बसले उठले, रणरणतं ऊन पडलं मध्ये एक दिवस पाऊस पडून गेला. अन थोड्याच वेळात पंचवीस दिवसांपूर्वीची ती रात्र उगवलीच.

गल्लीच्या दुसऱ्या टोकाकडून अॅम्बुलंस निळाशार उजेड फेकत आली, त्यातून भराभर वार्डबॉय उतरले अन त्याची डेडबॉडी.... हे दृश्य ती बघू शकत नव्हती. परत थोडावेळ ती मागे गेली अन थांबली.

हातामध्ये छोटीशी बॅग घेऊन उत्कर्ष चालत येत होता... आपल्याच धुंदीत स्वतःशी गुणगुणत. खराखुरा जिवंत असलेला तो. एक क्षण तिला वाटलं की धावत जावं अन त्याला घट्ट मिठी मारावी, सांगावं त्याला की जा इथून निघून पण... ऐनवेळी तिने स्वतःला रोखलं. तीपण एका शूर सैनिकाची पत्नी होती. त्या आतंकवाद्याला धडा शिकवल्याशिवाय ती शांत बसणार नव्हती, तेसुद्धा तिच्या नवऱ्याच्या हातून. त्याच्या नजरेस पडणार नाही अशा पद्धतीने ती लपून बसली.

उत्कर्ष त्या ठिकाणापर्यंत आला अन अचानक, कुठून कोण जाणे एका माणसाने त्याच्या अंगावर झडप मारली. हाच तो आतंकवादी असणार, आडदांड दिसणारा. लढण्याच्या बाबतीत दोघंही तुल्यबळ होते, थोडावेळ भयंकर हाणामारी झाली अन एका गफील क्षणी शत्रूने खिशातली पिस्तुल काढली. उत्कर्ष झडप घेणार त्याच्या आतच बंदुकीतून गोळी सुटली होती.

तिने चाबी बाहेर ओढली, थोडावेळ मागे फिरवली अन परत आत दाबली.

दोघांमध्ये झटापट झाली, शत्रूने बंदूक बाहेर काढली, गोळी सुटली अन त्याचक्षणी तिने चाबी खेचली. पण उशीर झाला, गोळीने तिचं काम केलंच.

परत एक प्रयत्न, दुसरा प्रयत्न.

दोघांमध्ये झटापट झाली, शत्रूने बंदूक बाहेर काढली अन ट्रिगरवरचं बोट दबणार त्याचक्षणी तिने चाबी बाहेर ओढली. चाबी ओढायला सेकंदापेक्षाही बराच कमी वेळ लागलेला पण तेवढ्या वेळात बंदुकीतून गोळी सुटली. पण लक्षाचा वेध घेण्याच्या आधीच काळ थांबला होता... उत्कर्षअन शत्रुच्या मध्ये ती गोळी हवेतच स्थिर झाली होती !!

ती चालत चालत दोघांपर्यंत गेली अन बंदुकीची गोळी चिमटीत पकडून जमिनीवर फेकून दिली. चार पावलं मागे येऊन तिने घड्याळ समोर धरलं अन चाबी आत दाबली.

ट्रिगर दबला पण गोळी समोरच्याला का लागली नाही यामुळे शत्रु गोंधळला, आवाज न आल्यामुळे ही गोष्ट उत्कर्षला मात्र माहीत नव्हती. तो लगेच सावरला अन झडप घालून शत्रुच्या हातातली बंदूक हिसकावुन घेतली. क्षणात बाजी पलटली होती, तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. पण शत्रु लवकर सावरला, बंदूक ओढायला बघू लागला. ती शांतपणे पाहत होती काय निर्णय लागतो याच्याकडे. काही बिघडलं असतं तरी चिंता नव्हती. काळचक्राला ती हव्या तितक्या वेळा मागे फिरवू शकत होती, आतंकवाद्याला मारण्याच्या कित्येक संधी उत्कर्षला देऊ शकत होती.

दोघेही प्राणपणाने बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न करत होते, समोरच्याला संपवायचं एवढंच फक्त उद्दिष्ट होतं प्रत्येकाचं. अन तेवढ्यात मिट्ट अंधाराला चिरत एक प्रकाशशलाका उमटली. तिच्या दिशेने वळालेल्या बंदुकीच्या नळीतून गोळी सुटली.

सरसरतआलेली ती गोळी तिच्या हातातल्या घड्याळावर येऊन आदळली.

Σ ( वर्तमानकाळ + भूतकाळ + भविष्यकाळ ) ^ infinity

--------------------------------------------------

३. दोन वैमानिक

डोळ्यांवर काळा चष्मा चढवलेले दोन वैमानिक विमानात शिरले, दोघांच्याही हातांत दोन काठ्या होत्या अन ते चाचपडत चालत होते.

त्यांना बघून सगळे प्रवासी घाबरले, काही पळून जायला लागले. एअर होस्टेसने दरवाजा लावून घेतला.

"सर्वांनी कृपया आपल्या जागेवर बसावे, दोन्ही वैमानिक अतिशय कुशल आहेत, तुम्हाला काहीच होणार नाही."

कुणालाच विश्वास बसला नाही पण इलाज नव्हता. विमानाचं इंजिन सुरू झालं अन थोड्याच वेळात धावपट्टीवरून पळू लागलं. धावपट्टी जिथे संपते तिथे एक उंच इमारत होती. विमान त्या इमारतीच्या जवळ, अगदी जवळ गेलं अन त्याचबरोबर खिडकीतून बाहेर बघत असणारे प्रवासी जोरात ओरडले. पण इमारतीच्या जवळ गेलेल्या विमानाने शिताफीने हवेत झेप घेतली. इमारतीच्या अगदी काही फूटांवरून विमान घोँघावत निघून गेलं.
प्रवासांच्या जिवात जिव आला, आंधळ्या वैमानिकांचं कौशल्य पाहून सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

(कॉकपिटमध्ये) एक वैमानिक दुसऱ्याला : जॉन्या, एखाददिवशी जर प्रवासी नाही ओरडले तर आपण मेलो बेट्या

----------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झक्कास
या सप्ताहांताची छान सुरुवात झाली तुमच्या कथुकल्या वाचून.

तिन्ही आवडल्या..

पहिली वाचताना अंदाज आलेला, कि त्याच्या परिचयाची एखादी व्यक्तीच असावी.

विनय - छान झाल्या ह्या कथा.. दुसरी कथा वाचतना वाटायला लागलं होतं कि उत्कर्षच आतंकवादी असेल कारण तो सुटकेस घेऊन गेला आणि झडप घालणारा कोणी सीक्रेट सर्व्हीस वाला असावा ज्याने उत्कर्षला मारुन स्फोट होऊ नये असा प्रयत्न केला पण तरिही स्फोट झालाच. त्यामुळे तिच्या कृतीने उत्कर्ष वाचला तरी स्फोट होईलच!! पण तुमचा शेवट जास्त आवडला. Happy

नाही, त्यापेक्षा व्यापक अर्थ आहे.
भूत, भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळांची सरमिसळ झालीये. ( Equation चा अर्थ )
तिच्यासाठीच नाही तर सर्वांसाठी काळ हरवलाय. विश्वात कुठलाच काळ स्थिर राहणार नाही.

Pages