सचिन - याद भरी पुरवाई (Sachin - A Billion Dreams)

Submitted by रसप on 1 June, 2017 - 05:48

'रॅग्स टू रिचेस' कहाण्या अनेक आहेत. संघर्षमय यशस्वी वाटचालही अनेकांची आहे. क्रिकेटेतरही अनेक खेळाडूंच्या कहाण्या स्तिमित करणाऱ्या आहेत. पण ह्या सगळ्यांमध्ये 'स्पेशल' आहे, सचिन तेंडूलकर.
का ?

तसं पाहिलं, तर २००१ ची ती इडन गार्डन्सची ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट असो, जिच्यानंतर भारतीय क्रिकेटने एक वेगळाच आत्मविश्वास मिळवला होता किंवा २००२ च्या नॅटवेस्ट सिरीजची फायनल असो, जिच्यात पहिल्यांदाच तब्बल ३२५ धावा चेस करून इतिहास घडवला होता किंवा ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, साउथ आफ्रिका वगैरेंतले ऐतिहासिक टेस्ट सिरीज विजय असो किंवा 'द मदर ऑफ ऑल' २०११ चा वर्ल्ड कप असो, भारतीय क्रिकेट संघाच्या प्रवासातल्या ह्या व अश्या वेगवेगळ्या महत्वाच्या टप्प्यांवरचे यशाचे शिल्पकार वेगवेगळे लोक होते. असं अजिबातच नाही सच्याने हे सगळं एकहाती घडवून आणलं किंवा ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या विजयांत त्याने मोलाचा वाटा उचलला होता.
खरं तर, सच्याने एकहाती जिंकून दिलेले सामने म्हटल्यावर मला फक्त १९९७-९८ चा शारजा कप आठवतो. एरव्ही भारताचे 'बिग मॅच प्लेयर्स' वेगळेच राहिलेले आहेत.

पण तरी सच्या 'स्पेशल' का आहे ?

सचिनच्या आजवरच्या लौकिकानुसार, 'सचिन - अ बिलियन ड्रीम्स' ह्या 'डॉक्यु-ड्रामा' मध्येसुद्धा कुठल्याही स्फोटक विषयाला हात घातलेला नाही. भले मग मॅच फिक्सिंग प्रकरण असो, खळबळ माजवणारा 'प्रशिक्षक ग्रेग चॅपेल' कालखंड असो, विनोद कांबळीबरोबरचे वाद असोत, 'मंकीगेट' प्रकरण असो की असे अजूनही लहान-मोठे अनेक किस्से (साउथ आफ्रिकेत सामनाधिकारी माईक प्रॉक्टरनी घातलेल्या बंदीविरुद्धचं बंड, वगैरे) असोत, ह्या फिल्ममधून असं काहीही हाती लागत नाही, जे कधी उघड झालं नाही.
म्हणूनच ही फिल्म निव्वळ एक 'डॉक्यु-ड्रामा' म्हणून मला फारशी आवडली नाही. तरी, वारंवार मी रोमांचित का होत होतो ? पुन्हा पुन्हा माझ्या पापण्या ओलसर का होत होत्या ? आणि सगळ्यात शेवटी, फिल्म संपल्यावर डोळे पुसताना मला लोकांनी का पाहिलं होतं ?
कारण फिल्म सच्याबद्दल होती आणि सच्या स्पेशल आहे.

पण तो का स्पेशल आहे ?

कारण -

सच्या माझा चेहरा आहे. मी.. एक खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय.
गेल्या काही वर्षांत समाजातल्या ह्या 'मध्यमवर्गीय' प्रकारातही काही उपप्रकार झाले आहेत. निम्न मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग वगैरे. मी ह्यांपैकी कशात येतो ? माहित नाही. पण 'आहे रे' आणि 'नाही रे' ह्या दरम्यानचा जो वर्ग, त्या खऱ्या मध्यमवर्गातला मी. सुशिक्षित आई-बाप, स्वत:चं घर, कशाचीही ददात नसणं आणि तरी उधळत जावं असंही काही नसणं, असा मध्यमवर्ग.
ह्या वर्गाचा चेहरा म्हणजे सच्या. म्हणून त्याच्याशी आमची नाळ जुळते.

सच्या मिसरूड फुटण्याच्या वयातही निरागस दिसायचा आणि चाळीसाव्या वर्षी जेव्हा तो आपल्या निवृत्तीचं भाषण देत होता, तेव्हाही निरागसच दिसत होता. त्याच्या त्या निरागसपणात देशभरातल्या तमाम स्त्रियांना आपला मुलगा दिसायचा, अजूनही दिसतो. सच्या तरुण मुलींच्या 'दिल की धडकन' जितका होता, त्याहून कैक पटींनी जास्त तो करोडो स्त्रियांच्या पोटचा गोळाच होता. मुली द्रविड, गांगुली, (फिक्सिंगमध्ये अडकण्यापूर्वीचा) जडेजा वगैरेंवर जास्त मरत असाव्यात. पण त्यांच्या आयांची त्यांच्या मुलींसाठी 'सचिन' हीच पसंती असावी. सच्या अख्ख्या देशाचा सुपुत्र म्हणूनच होता.

क्रिकेटबद्दल म्हणायचं झालं, तर १६ व्या वर्षी एक कोवळं पोरगं वसीम अक्रम, वकार युनुस वगैरेंसारख्या धिप्पाड लोकांसमोर येतं काय, नाक फुटल्यावरही खेळतं काय, एका प्रदर्शनीय सामन्यातल्या फटकेबाजीमुळे अब्दुल कादिरसारख्या व्हेटरनचं करियरच संपवतं काय.. हे सगळं अद्भुतच होतं.
त्यानंतरची तब्बल २४ वर्षं हा माणूस क्रिकेटविश्वात झळकत राहिला. माझ्यासारख्या अनेक लोकांनी 'क्रिकेट'च्या आधी 'सचिन' हे नाव ऐकलं आहे. त्याची ही २४ वर्षं आमच्यासाठी आमचं संपूर्ण बालपण आणि नंतरची उमेदीची वर्षं आहेत. त्याच्या प्रत्येक शतकामागे आमच्यासाठी आमची एखादी परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा कंपनीतली एखादी मीटिंग वगैरे आठवणी आहेत. कधी कधी काही लग्नं वगैरेही आहेत ! इतरांची कशाला आम्ही आमच्या स्वत:च्या लग्न-मुंजीतही 'सचिन आउट झाला नसेल ना' च्या काळजीत राहिलो आहोत.

'सचिन आउट झाला की बाकीच्यांची सुरु झालेली घसरगुंडी' ह्या आठवणीच्या भळभळत्या जखमा आम्ही आजपर्यंत जपलेल्या आहेत. त्यांतली सगळ्यात खोल जखम १३ मार्च १९९६ ह्या दिवशी आम्हाला श्रीलंकेने दिली होती, हे आम्ही कधीच विसरणार नाही. २००७ च्या वर्ल्ड कपमधल्या मानहानीनंतर आम्ही रात्री बऱ्याच उशीरापर्यंत तळमळत फक्त कूस बदलत राहिलो आहोत. २०११ च्या दिग्विजयानंतर 'We did it for Sachin' म्हणणाऱ्या युवराजने टच्चकन् आमच्याही डोळ्यांत पाणी आणलं होतं. सच्याला खांद्यावर बसवून त्याची वानखेडेवर काढलेली मिरवणूक, त्यातही एकट्या युसुफ पठाणने त्याला खांद्यावर बसवणं.. मग कोहलीने म्हणणं की, 'He has carried the nation on his shoulders for years, its time we carry him on ours' हे सगळं पाहताना आम्हाला अक्षरश: गहिवरून आलं होतं.

- ह्या सगळ्यामुळे सच्या स्पेशल आहे. सच्या हा 'नॉस्टॅल्जिया' ला असलेल्या काही समानार्थी शब्दांपैकी एक आहे. माझ्यासाठी तरी इथे द्रविड, दादा, लक्ष्मण, धोनी असे क्रिकेटमधले इतरही काही समानार्थी शब्द आहेत. पण सच्या स्पेशल आहे, कारण तो माझा चेहरा आहे.

'सचिन - अ बिलियन ड्रीम्स' ह्या सगळ्या कडू-गोड आठवणींना उजाळा देतो. मला पुन्हा एकदा माझा चेहरा दाखवतो, जो आजकालच्या भपकेबाज क्रिकेटमुळे झाकोळला गेला आहे. जो आता ह्या खेळाबाबत बऱ्याच अंशी भावनाहीन झाला आहे.
सच्याच्या सिनेमाने मला रडवलं, हसवलं, गहिवरवलं ह्याचं कारण सिनेमा नसून खुद्द 'सच्या' आहे. तो पुन्हा भेटला. काही खपल्या उघडल्या आणि काही मोरपिसं नव्याने फिरली.

यादों की बौछारों से जब पलकें भीगने लगती हैं
कितनी सौंधी लगती है तब माज़ी की रुसवाई भी
एक पुराना मौसम लौटा याद भरी पुरवाई भी
ऐसा तो कम ही होता है वो भी हों तनहाई भी

- गुलजार

बस्.. इतकंच.

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/06/sachin-billion-dreams.html
Sachin_A_Billion_Dreams_Poster.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसलं भारी लिहिलयं Happy
वाक्यावाक्यातून तुमचं सचिन बद्दलच प्रेम्,आदर्,हेवा सगळ जाणवत होतं....

छान परिक्षण !
अतिशय सुंदर सिनेमा, इथे आंध्रातही तेलगु व्हर्जनला तुफान गर्दी होतेय पब्लिकची.

मस्त लिहिलंय.
सिनेमा आवडला आहेच ! हे परीक्षण पण आवडलं. ते मध्यमवर्गीय व सुपुत्र वाले दोन्ही परिच्छेद विशेष आवडले.

छान लिहलय!!
सिनेमा आवडला आहेच ! हे परीक्षण पण आवडलं. ते मध्यमवर्गीय व सुपुत्र वाले दोन्ही परिच्छेद विशेष आवडले.>+११

सच्या हा 'नॉस्टॅल्जिया' ला असलेल्या काही समानार्थी शब्दांपैकी एक आहे. >>बस! हेच सत्य आहे.... छान लेख रसप.
वाचतांनाही डोळ्यात पाणी आले... जियो सच्या!
(ता. क. जियो म्हणजे रिलायंस नव्हे;) )

लेख आवडला रसप ... Happy

पण मला परीक्षणही हवे होते.. अर्थात अजून बघायचा बाकी असल्याने त्याच्या शोधात आहे.. एकदा पाहिला की मीच जिथे तिथे लिहीत सुटेन हे नक्की Happy

लेख आवडला.

त्यांतली सगळ्यात खोल जखम १३ मार्च १९९६ ह्या दिवशी आम्हाला श्रीलंकेने दिली होती, हे आम्ही कधीच विसरणार नाही >> +१

त्या सामन्याला कलकत्याची खेळपट्टी आपले रंग दाखवू लागली होती. तिथून जिंकणे तसे फारच अवघड होते. त्यामुळे मागचे फलंदाज चांगले खेळले असते तरी जिंकण्याचे मार्जिन कमी झाले असते ईतकेच. असे मला वाटते. तरी आपण २०११ ला लंकेलाच हरवत बदला घेतलाच ! असे समजून मी खुश होतो. आणि त्यात धोनी चमकला. म्हणून डबल खुश होतो ... Happy

"तरी आपण २०११ ला लंकेलाच हरवत बदला घेतलाच" - २००३ ला लंकेचा कचरा केला होता इंडिया ने. सचिन-सेहवाग-गांगुली आणी नंतर झहीर, नेहरा आणी श्रीनाथ जबरदस्त खेळले होते.

लंकेला तर १९९९ ला सुद्धा दादा द्रविडने विक्रमी भागीदारी रचत स्टेडीयमच्या पार भिरकावून दिला होता. बाहेरच्या कंडीशनमध्ये आपली टीम लंकेला नेहमीच सरसच होती. असो, ती गोष्ट वेगळी. २०११ ला आपण अंतिम सामन्यात त्यांना मात देत विश्वचषक पटकावला म्हणून ते स्पेशल Happy

अरे हो, २००७ ला विंडीजच्या संथ खेळपट्टीवर आधी बांग्लादेशने आणि मग लंकेने आपल्याला साखळीमध्येच बाहेर काढले होते..

छान लिहीले आहे. यातील इमोशन्/नॉस्टॅल्जिया फॅक्टर शी एकदम सहमत. वरती त्याच्या कारकीर्दीबद्दल जे लिहीले आहे त्याबद्दल वाद इथे अवांतर होईल, पण बराचसा सहमत नाही इतकेच लिहीतो. पण लेख आवडला.

छान लिहीले आहे. यातील इमोशन्/नॉस्टॅल्जिया फॅक्टर शी एकदम सहमत. वरती त्याच्या कारकीर्दीबद्दल जे लिहीले आहे त्याबद्दल वाद इथे अवांतर होईल, पण बराचसा सहमत नाही इतकेच लिहीतो. पण लेख आवडला.
>> + १

या धाग्यावर वाद नकोत , पण पहिला परिच्छेद थोडा ज्यादा हो गया Happy

पाहिला विकेंडला. सचिन खुप जेन्युइन दिसलाय, बोललाय. कांबळी आणि अझरचे रेफरन्सेस खुपच त्रोटक वाटले.

रणजित,
एकूण एक वाक्य खरयं !!
एकदम को-रिलेट करता आलं सगळ्याशीच..."पण सच्या स्पेशल आहे, कारण तो माझा चेहरा आहे." ह्यातच सगळं आलं

- प्रसन्न

पाहिला पिक्चर आणि आवडला. यात फारसे नवीन काही नव्हते, कारण यातील अनेक क्लिप्स व बातम्यांच्या लिन्क्स माझ्याकडे सेव्ह केलेल्या आहेत (माबोवरच्या लेखांमधेही वापरलेल्या आहेत). पण हे सगळे अनेकदा पुन्हा पाहायला कधीही कंटाळा येत नाही.

२००७ चा वर्ल्ड कप पराभव आणि "एण्डुलकर" बद्दलच्या घटना उलट्या क्रमाने दाखवल्या आहेत. पण ते इम्पॅक्ट करता असेल. तसेच सुरूवातीला क्लब क्रिकेट वरून थेट कसोटी संघातच उडी दाखवली आहे. ते मधले रणजी, इराणी वगैरे स्किप केले आहे.