दररोज एक वादळ दारावरून जाते

Submitted by सुप्रिया जाधव. on 30 May, 2017 - 06:55

शाकारल्या मनाचे छप्पर उडून जाते
दररोज एक वादळ दारावरून जाते

भेटायचे ठरवतो ना भेटता परततो
माझ्याकडून तो ...मी त्याच्याकडून जाते

उघडीप होत असता झाकोळते अचानक !
बावनकशी खरेही अफवा ठरून जाते

कोत्या मनस्थितीची निर्भेळ भेट घेते
तीही हसून जाते मीही हसून जाते

पृथ्वीवरील हटके माझे शहर असे की
छाया जिथे स्वतःची परके करून जाते

उत्कट जिणे जिण्याचे पिक घ्यायचे ठरवते
नैराश्य जोम धरता इच्छा मरून जाते

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>उघडीप होत असता झाकोळते अचानक !
बावनकशी खरेही अफवा ठरून जाते

कोत्या मनस्थितीची निर्भेळ भेट घेते
तीही हसून जाते मीही हसून जाते>>>क्या बात!क्या बात!

शेवटचा शेरही लाजवाब! त्यातही दुसरा मिसरा अप्रतिम!

>>>दररोज एक वादळ दारावरून जाते>>>हा मिसराही खूप आवडला! कृृपया,आपली परवानगी असेल,तर हा मिसरा तरहीसाठी घ्यावा,असे वाटते आहे!

अवांतर—मतल्यातिल,शाकारल्या मनाचे छप्पर,उडून जाईलसे वाटता-वाटता तगून गेले असते,टिकून राहिले असते,तर त्या वादळाची 'नजाकत' अधोरेखित झाली असती,असे वाटले!

उघडीप होत असता झाकोळते अचानक !
बावनकशी खरेही अफवा ठरून जाते

कोत्या मनस्थितीची निर्भेळ भेट घेते
तीही हसून जाते मीही हसून जाते ............. सुरेऽऽऽऽऽख !!