हस्तलेखन कला नष्ट होईल का?

Submitted by टोच्या on 29 May, 2017 - 07:59

शाळेत जाण्याआधीपासूनच हातात पेन्सिल घेऊन पाटीवर, भिंतींवर रेघोट्या ओढणे, वर्तुळे, चित्रे काढण्यापासून ते हस्तलिखाणाची एक विशिष्ट ढब आत्मसात करण्यापर्यंतचा प्रवास आपणा सर्वांनीच केलेला असतो. त्यात काहींचे अक्षर मोत्यांसारखे सुंदर असते तर काहींचे अगदीच गोंधळात टाकणारे. डॉक्टरांच्या हस्तलिखित प्रिस्क्रिप्शन्स तर सामान्यांना कळणे अवघडच. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा हस्ताक्षर हा अविभाज्य भाग. पण गेल्या दहा-बारा वर्षांत तंत्रज्ञानात इतके झपाट्याने बदल झालेत की, आता नोकरी, व्यवसाय करताना हाताने लिहिण्याचे काम अतिशय मोजक्या ठिकाणी आहे. शाळा आणि सरकारी कार्यालये सोडली तर बहुतांश ठिकाणी कॉम्प्युटरवरच काम चालते. त्यात आता अँड्रॉइड फोन्समुळे सगळ्यांनाच टायपिंग ही कला आत्मसात होऊ लागली आहे. हस्तलिखितापेक्षा टायपिंग केलेले अधिक सुटसुटीत आणि कमी वेळेत, कमी त्रासात होणारे काम आहे. शाळांमधूनही हल्ली ई-बुक्स, टॅब, लॅपटॉपवर विद्यार्थी अभ्यास करतात. आज बहुतांश लोक केवळ सहीपुरता पेन हातात घेतात. लिहिण्याचे काम फारसे पडतच नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत, वर्षांत हस्तलेखनाची कला नष्ट होईल की काय, अशी साधार भीती वाटू लागली आहे. माबोकरांना याबाबत काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय येत्या ३०-४० वर्षात (म्हणजे दोन -तीन वर्षापुर्वी जन्मलेली बालकांपासूनची पिढी) हस्तलेखन संपुष्टात येईल. ज्यांना लिहिता येत असेल त्यांचे अक्षर फार फार वाईट असेल किंबहूना डॉक्टरलिपीची पुढच्या आवृतीत अक्षरे असतील आज जसे कॅलिग्राफीला आदराचे स्थान आहे तसे त्यावेळी हस्ताक्षर सुंदर असणार्‍यांना असेल. कॅलिग्राफीवाल्यांना तर त्यावेळी विशेष पुरस्कार पद्मश्री वगैरे पुरस्कार देण्यात आले तर नवल वाटणार नाही.

आधी सगळे हाताने बनवले जात होते. त्यावस्तूंची किंमत कमी होती. जस जसे मशिन्स आले तस तसे हस्तकलेच्या वस्तूंची किंमत वाढत गेली. हार्ले डेव्हिन्सन या बाईक्सची किंमत फक्त त्या हाताने बनवल्या जातात म्हणून जास्त आहे. हे आताच्या काळाचे उदाहरण आहे. हाताने बनवलेली पैठणी १५-२५ हजाराच्या घरात सहज असते. उलट यंत्रमागावर बनवलेली पैठणी २०००-३००० पर्यंत मिळते.

हस्तलेखन कला नष्ट होईल पण डार्विन च्या थेअरी नुसार पुढच्या पिढ्यांचे अंगठे टाईप करून करून लांब होतील का ?????? जेणे करून मोठ्या मोठ्या स्मार्ट फोन वर टाइपिंग सोप्पे होईल Happy

लेखाशी सहमत.
माझ्या खालील लेखात मी असाच विचार मांडला होता :
http://www.maayboli.com/node/59966
त्यातील काही भाग :
म्हणजे हळूहळू माणूस आपल्या हाताने लिहिण्याची एक सुंदर कला विसरून जाईल की काय ? या कल्पनेने मात्र खूप अस्वस्थ वाटतेय. नको रे बाबा, इतक्या टोकाचे यांत्रिकीकरण नको. आपल्या हाताच्या बोटांना जरा वाकवूयात अन वळवूयात. स्वतःच्या हाताने लिहीण्यातसुद्धा जो वेगळाच आनंद असतो तो अनुभवूयात.

सर्वांचे धन्यवाद.

च्रप्स..
खरे आहे. अनेक जुने लेखकही कॉम्प्युटरवरच टाइप करत आहेत. त्यामुळे एडिटींग सोपे होण्याबरोबरच बाहेरून टाइप करून घ्यायचा खर्चही वाचतो.
>>
श्री… >> हल्ली लिखाण (कधीतरी ) करताना हात तेवढा सफाईदार चालत नाही. सही पण कधी कधी चुकते.>> अनेकांचा हाच अनुभव आहे. हात थरथरतात जास्त लिहायला किंवा दुखतात.
>>

गजोधर>> होय येत्या ३०-४० वर्षात (म्हणजे दोन -तीन वर्षापुर्वी जन्मलेली बालकांपासूनची पिढी) हस्तलेखन संपुष्टात येईल.>> पण याचे परिणाम चांगले होतील की वाईट?
>>

अतरंगी>> हस्तलेखन कला नष्ट होईल पण डार्विन च्या थेअरी नुसार पुढच्या पिढ्यांचे अंगठे टाईप करून करून लांब होतील का ?????? जेणे करून मोठ्या मोठ्या स्मार्ट फोन वर टाइपिंग सोप्पे होईल >> कदाचित, येत्या दहा वर्षांत आवाजावरूनच आपोआप टायपिंग होईल. आताही ते आहेच, पण तंतोतंत नाही. त्यामुळे अंगठ्यांचीही गरज पडणार नाही कदाचित.

कुमार >> म्हणजे हळूहळू माणूस आपल्या हाताने लिहिण्याची एक सुंदर कला विसरून जाईल की काय ? या कल्पनेने मात्र खूप अस्वस्थ वाटतेय. नको रे बाबा, इतक्या टोकाचे यांत्रिकीकरण नको. आपल्या हाताच्या बोटांना जरा वाकवूयात अन वळवूयात. स्वतःच्या हाताने लिहीण्यातसुद्धा जो वेगळाच आनंद असतो तो अनुभवूयात.>>
खरंय, हाताने लिहिण्यात जो जीवंतपणा असतो, तो टायपिंगमध्ये नाही.

मला नाही वाटत असे होईल.
आजही लहान मुलांना अक्षरओळख लिहूनच होते. कुठे टाईप करून नाही.
लहान मुलांना रेघोट्या मारायचा, काहीतरी गिरवण्याचा शौक असतो. ते गिरगटवणे एंजॉय करतात. जी गोष्ट माणसाला भले लहान वयात का असेना आनंद देते, ती कधी लोप पावणार नाही.
आता जर कोणाला लिहायची गरज पडत नसेल म्हणून सराव सुटला असेल तर तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रॉब्लेम.
पण एक ईंजिनीअर म्हणून मी एक ईंजिनीअरींग डायरी सतत सोबत बाळगतो आणि तिच्यात सतत काही ना काही खरडले जातेच. नेहमीच लॅपटॉप वा टॅब वापरणे सोयीचे पडेल असे नसते. तसेच काही महत्वाच्या नोंदी डायरीत सेफ राहतात, हवे तेव्हा रेकॉर्ड पटकन मिळतात हा माझा अनुभव. बाकी दिवसाला किमान चार पाने लेखन झाले पाहिजे वगैरे अपेक्षा असतील तर त्या फार झाल्या Happy

जिथे माइंड रीडिंग विकसित करण्याचा खटाटोप चालू आहे त्यात प्रत्यक्ष लिहावे किंवा बोलावे फार कमीच लागणार भविष्यात त्यामुळे आता सारखे कदाचित निबंध लिहिण्याची गरज लागणारच नाही पण काही न काही प्रकारे हस्त लिखित हे ठेवले जाणारच एवढे मात्र नक्की.

काही वर्षांनी हस्त लिखिते नामशेष होतील असं नेहमीच वाटत मला . पूर्वी भूर्जपत्रावर लिहीत असत हे आपण मोठ्या नवलाने आज सांगतो तसेच पुढची पिढी कागदावर हाताने लिहिण्याबद्दल सांगेल . हे घडायला कदाचित दोन तीन पिढ्या जातील पण हे घडण अटळ आहे . ह्यात चूक की बरोबर चांगलं की वाईट हा प्रश्नच नाही . मानवाच्या उत्क्रांतीत इतके बदल घडलेत त्यात हा आणखी एक . संवाद, व्यक्त होणे राहणारच , फक्त त्याची पद्धत बदलेल .

माझासुद्धा दिवसभर मोबाईल पकडून आणि त्यावर टाईपकरून हात आणि बोटं आखडतात. आणि मग पेनाने काही लिहायची वेळ आली तर अक्षरं फारच वेडीवाकडी येतायत. मला फार वाईट वाटते, किती छान मोत्यासारखे अक्षर होते माझे!! शाळेत असताना गिरवून गिरवून कमावले होते. सगळ्याची वाट लागली. :रडकी बाहुली:

@ मनिमोहोर, आपल्या विधानाला पूर्णतः (माझ्या अक्षराच्या आठवणीने रडत रडत) अनुमोदन. (+७८६)

किती छान मोत्यासारखे अक्षर होते माझे!! शाळेत असताना गिरवून गिरवून कमावले होते. सगळ्याची वाट लागली. :रडकी बाहुली:>>>>>> Sad

डिजिटल सिग्नेचर्स सर्वच क्षेत्रात चालतील का? >> डिजिटल सिग्नेचर आता सुध्दा आहे टेंडर्स वगैरे घेताना ती डिजिटल की वापरली जातो.
बहुदा पुढे ही तशाच प्रकारच्या चाव्या वापरल्या जातील

हस्ताक्षरावरून मनुष्य स्वभाव, त्याचे आचारविचार ओळखण्याचे एक पुरातन शास्त्र आहे. ते पूर्णतया लयास जाईल.
>>
अवांतर -
त्यात खरंच किती तथ्य आहे? माझी बहिण शिकायचं म्हणतेय Uhoh

मला नाही वाटत असे होईल.
आजही लहान मुलांना अक्षरओळख लिहूनच होते. कुठे टाईप करून नाही.
लहान मुलांना रेघोट्या मारायचा, काहीतरी गिरवण्याचा शौक असतो. ते गिरगटवणे एंजॉय करतात. जी गोष्ट माणसाला भले लहान वयात का असेना आनंद देते, ती कधी लोप पावणार नाही.>>>+१

मला फार वाईट वाटते, किती छान मोत्यासारखे अक्षर होते माझे!! शाळेत असताना गिरवून गिरवून कमावले होते. सगळ्याची वाट लागली.>>>
कधी कधी केवळ लिहायचे म्हणून एखादा छानसा परिच्छेद लिहून टाका. छान वाटेल. मी तसेच करते Happy

मला फार वाईट वाटते, किती छान मोत्यासारखे अक्षर होते माझे!! शाळेत असताना गिरवून गिरवून कमावले होते. सगळ्याची वाट लागली.>>> >>> कधी कधी केवळ लिहायचे म्हणून एखादा छानसा परिच्छेद लिहून टाका. छान वाटेल. मी तसेच करते>>> +१
मी तर बहिनींच्या नोटबूकच्या मागच्या पानांवरती चक्क गाणं लिहून काढते...मूड येईल तेव्हा ....पाहिल्यावर जाम चिडतात Lol

श्रद्धावान मंडळी परमेश्वराचे स्मरण करताना जो काही नामजप करत असतील तो जप लिहून काढण्याचा नेम केला तर लिखाण होईल आणि आध्यात्मिक फायदासुद्धा मिळेल.

ज्याना जप करणेच मान्य नसेल त्यांनी रोज आपली डायरी किंवा दिवस भरात अनेक फॉरवर्ड्स मधून आवडलेला एखादा विचार आपल्या वहीत नोंद करायची सवय ठेवली तरी लिहिण्याचा नेम शाबूत राहु शकतो.

वरील प्रकार अनेक जण अंमलात आणत असतील ह्याची खात्री आहे त्यामुळे हस्तलेखन कला कधी नामशेष होऊ शकत नाही असे प्रामाणिकपणे वाटते.

माझ्या बहिणीची नातवंडे २री/३री/चौथीत आहेत.. पिंगुळी नावाच्या एका छोट्या गावात शेटकर वाडी मधे, मराठी शाळेत. ती यावर्षी पासून डिजीटल शाळा होते आहे म्हणे. छोट्या छोट्या गावात देखील हे होते आहे तर शहरांचा विचारच करायला नको..

तेव्हा यापुढे हस्ताक्षर वगैरे विसरायचे हे दिसतेच आहे.

त्यांनी रोज आपली डायरी किंवा दिवस भरात अनेक फॉरवर्ड्स मधून आवडलेला एखादा विचार आपल्या वहीत नोंद करायची सवय ठेवली तरी लिहिण्याचा नेम शाबूत राहु शकतो.
>>>
मला होती ही सवय.. एखादी घटना डायरीनोंद करून ठेवायची.. अगदी कालपरवा पर्यंत जपलेली.. आताही सोडली नाही तर जरा ब्रेक आहे समजूया.. कधी काही धागा काढावासा वाटला पण पटकन काही डोक्यात नसले तरी चाळली डायरी आणि लिहिला त्यातला एखादा किस्सा फुलवून असे बरेचदा घडलेय

पण डार्विन च्या थेअरी नुसार पुढच्या पिढ्यांचे अंगठे टाईप करून करून लांब होतील का ????
>>
डार्विनची की लॅमार्कची ?

आमच्या घरात पण सध्या हा फारच कळीचा प्रश्न आहे. माझी मुलगी इयत्ता पहिलीत शिकते. लेखन-वाचन शिकण्याची सुरवात आहे तिची. वाचन करायला/ शिकायला तिची कधीच ना नसते. वाचलेल्या पुस्तकांबद्दल तोंडी प्रश्न विचारले तर ती व्यवस्थित उत्तर देते. पण लिखाणाचा अतिशय कंटाळा करते. तिला जेव्हा सक्तीने लिखाण करायला मी बसवते तेव्हा वाटतं की खरच ह्या सक्तीची तिला गरज आहे का? ती मोठी होईल तेव्हा असा कोणता व्यवसाय (profession) असेल जिथे हाताने लिहील्याखेरीज कामच करता येणार नाही?

हाताने लिहीता आले नाही तर कुतूबमिनार किंवा तत्सम ऐतिहासिक वास्तूवर "वासू <3 सपना" असलं काही चिरखडणार कशी ही पिढी??? Wink

मी बघितलेले सगळेच्या सगळे व्हाईट बोर्ड/ पब्लिक ठिकाणचे ब्लॅक बोर्ड ओसंडून वाहतानाच कायम बघितलेत.
आपला अंगठा अपोसेबल लिहायला नाही तर वस्तू पकडायला झाला आहे. लिहिणे हे काही बेसिक सर्व्हायव्हल स्किल नाही.
इव्होल्युशन असं चटकन होत नाही. माणसाच्या बुद्धीमत्तेने इव्होल्युशनचा वेग त्याने मंद केलाच आहे.
बाकी लिहिण्याची प्रोफेशनला गरज आहे का बघुन मुलांना इयत्ता पहिलीत काय शिकवायचं हे ठरवणे फारच मनोरंजक आहे. शाळा कितीही डिजिटल असली तरी न लिहिता येणारी शाळा मी तरी अजुन कुठे बघितलेली नाही. आणि मला अजिबात वाटत नाही की बेसिक लिखाण नजिकच्या काळात बंद पडेल. कागदाच्या वह्या जाउन मायक्रोवेव्ह इरेजेबल इलेक्ट्रॉनिक वह्या / पेनं वापरायचं प्रमाण वाढेल, पण लेखन, चित्र काढणे हे हाताच्या स्किलनेच केलं जाईल.

>>>> आज बहुतांश लोक केवळ सहीपुरता पेन हातात घेतात. <<<<<
येत्या काही वर्षात सही ऐवजी "ई-अंगठा" उमटविण्याची सोय झाली की सहीकरता पेन घेणेही उरणार नाही.

>>> हस्ताक्षरावरून मनुष्य स्वभाव, त्याचे आचारविचार ओळखण्याचे एक पुरातन शास्त्र आहे. ते पूर्णतया लयास जाईल. >>
अवांतर - त्यात खरंच किती तथ्य आहे? माझी बहिण शिकायचं म्हणतेय <<<<<
रिया, त्या शास्त्रात तथ्य आहेच, पण ते लयास जाईल, याबाबतही शंका नाही. किंबहुना, आत्ताच, हस्ताक्षरा ऐवजी केवळ स्वाक्षरी (सही) संदर्भुनच काही एक सांगायला लागते, कारण हस्ताक्षर "घटलेले" असतच नाही. सही मात्र परत परत करुन घटलेली असते.
अर्थात, हस्ताक्षर ही मनुष्याच्या व्यक्त होण्याच्या इतर असंख्य बाबींमधिल केवळ एक बाब आहे. त्या त्या काळात तो ज्या पद्धतीने व्यक्त होत जाईल, तिथे तिथे त्याच्या स्वभावाबरहुकुम तो व्यक्त होईलच हे निश्चित. मग ते चालणे, बोलणे, हातवारे करणे असो, की कपडे परिधान करण्याच्या तर्‍हा असोत. तो व्यक्त होणारच !

Pages