कथुकल्या ९ [ बोलीभाषा विशेष ]

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 27 May, 2017 - 11:55

( शंभर ते दोनशे शब्द लांबीच्या ह्या कथुकल्या आहेत. बोलींचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे )

--------------------------------------------------

१. अमावशेची रात ( मालवणी )

“मजा आली का नाही.”

“हाव गड्या. थयसून निघायचं मनच होत नव्हतं बघ. पोटभर जेवलो आज.”

“आता चालायचाबी वेग वाढव. सकाळ होईपर्यंत ठिकाण्यावर पोहचायचय.”

“बरं बरं.”

“सध्या आपण कुठपर्यंत पोहचलो?”

“हडळीच्या माळावर”

“एवढं अंतर कसं निघून गेलं समजूकच नाय.”

“मका आठवतो तो रात. आजच्यासारखीच अमावशा होती. मी एकटा चाललो होतो इथून. खयसून बुद्धी झाली अन त्या बावंजवळ गेलो.”

“मग रे?”

“बावितून एक हडळ इली अन मुका घेतला न माझा.”

“मेल्या तूच घेतला आसल तिचा मुका. खी:खी:”

“नायरे बाला खरंच.”

“मकापण एक गोष्ट आठवली. ते स्मशान दिसतंय का… थयच मी आग्यावेतालाचा नाच पाहिला होता.”

“येड्या, आग्यावेताल राहले तरी का आता. माणसानला भिऊन पळून गेली असतील.”

“तू फेकला मीपण फेकलं. खी:खी:”

चालत चालत ती दोगा बराच लांब आली.
“मी काय म्हणतो, बिडी ओढत वाइच आराम करू.”

“नो प्रॉब्लम बाला. उल्टं चालून डोकं दुखायला लागलं.”

अन ते दोन वेताळ झाडाक उल्टं लटकुन बिडीचे झुरके ओढू लागले.

-----------------------------------------------

२. घे महा मुका ( कोल्हापुरी )

पळायचं काम आपल्याला लय भारी जमतं.
दिवसभर पाळत ठेवली अन जशी रंजी हिरीवर आली तसा पळत गेलो तिच्याजवळ. तिनं हाडतुड केलंच पण मीबी कमी न्हाई. गुलुगुलु बोलून आंगारा टाकलाच तिच्या हान्ड्यात. आता फकस्त उद्या सकाळची वाट पाहायची हुती.

“आयला सकाळ झाली तरी रंजी आली कशी न्हाई आजुन! म्हाराज म्हण्ले हुते की पोरगी सूर्याच्या पहिल्या किरणाबरूबर तुह्याकडं पळत यील अन गळ्यात पडून मुका घील. हरकत न्हाय मीच जातो तिच्याकडं.”
पायात खेटरं घात्ले अन ममता म्हतारीच्या हाकेकडं दुर्लक्ष करत रंजीचं घर जवळ केलं.

“रंजेS… ये रंजेSS” म्या भायेरूनच हाळी दिली.

“काय म्हण्तू र फुकनीच्या” ती आरडत भायेर आली.

“डार्लिंग आसं काय बोलतीस?”

हातातली फुकनीच फेकून मारली न भाऊ तिनं.

“पाणी पेलं न्हाई का त्वां?”

“कशाचं पाणी?”

“काल त्वा हान्डा भरून नेला नव्हता का, त्यातलं.”

“तू कशापायी ह्या चांभारचौकशा करतुस?”

“अवं सांग त आधी.”

“ती खेप मी ममताबाईच्या घरी रिचवली.”

“अरारा…” मी डोस्क्याले हात लाऊन बसलो.
ती मातर एकटक समोर पाहत हुती. म्याबी माग नदर वळवली... म्हाताऱ्या बायांची अख्खी फौज माझ्या दिशेनं येत हुती. त्यह्यचे हावभाव काही ठीक दिसत नव्हते.

“रंजे, काल ममता म्हतारीकडं कोणकोण आलं हुतं?”

“मले काय म्हाईत. हा पण दुपारी भजनी मंडळ जमलं हुतं तिच्याकडं?”

मग काय
.
.
.
.
.

तुमास्नी तर माहीतच हाये पळायचं काम आपल्याले लय भारी जमतं.

------------------------------------------------

३. अनुदान ( अहिराणी )

“रामराम”

“रामराम. कटायी गयथा?”

“बँकामां काम होतं अनुदानास्नं.”

“काय म्हंतस मग सायेब?”

“म्हणे तुम्ही अल्पभूधारक नै.”

“काब्रं?”

“कमून की आमच्यापाशी आठ एकर वावर शे.”

“एक आयडीया कर. बंड्याना नावावर तीन एकर वावर करून टाक. मी माझी अस्तुरी अन पोरांच्या नावावर पाचपाच एकर वावर केलं. झालं अनुदान मंजूर.”

“तसंच करणार होतो पर हे नवं सर्कार बोलतं तीन टक्के पैसे आमाला द्या. आंडेरना नावावर जमीन कराची म्हटलं म्हणजे लाखभर रुपये खर्च येतो. अठी इक खायले बी पैसा नै.”

“तू आथा तथा हिंडूच नको..संध्याकाळी मना घरी ये अन पैसे घेऊन जाय व्याजानं.” सावकार हसत बोलना.

“चाल येतो. रामराम.”
अन तो निघून गेला.

अल्पभूधारक शेतकरी कारीमां चालला व्हता अन सधन शेतकरी फाटक्या वहाणा घासत बसस्टॅण्डकडं.

---------------------------------------------------

४. क्रांती ( वऱ्हाडी , घाटावरची )

पाह्यठं तीन वाजेपासूनच गडबड सुरू होती. चिल्ल्यापाल्ल्यायले उठवणं, आंघोळी, दशम्या बनवणं अन अजून कायकाय. हरेक जण खुशीत होता.
घंट्याभरात सगळे कामं आटपले. माणसायनं धोतर-फेटा घातला अन बायायनं लुगडे गुंडाळले. तव्हालोक गड्यानं दमणीत गवताच्या नरमचोपड्या पेन्ढ्या आथरून ठेवल्या होत्या. सगळं कुटुंब चाकावर चल्ढं अन हू… करताच पुरुषभर उंचीचे मंगळ्या-बुध्या दौडत निघले.

आजुन झाकट पडली नवती पण कंदील लटकवलेल्या दमण्या, बैलगाड्या अन छकडे पायवाटेनं छूमछूमत चालले होते. थंडगार वारं मनाले सुखावत होतं. सूर्य वीतभर वर आला अन खामगावच्या दगडी इमारती दिसायले लागल्या. आलिकडच एका वावरात बैलं सोडून लोकायनं न्याह्यऱ्या आटपून घेतल्या.

“बापूनं कमाल केली राजा.”

"न्याराच जलवा हाय म्हण्तेत.”

"क्रांती म्हण्तेत त याले."

अशाच आशयाच्या गप्पा होत्या सगळीकडं.

साहेबाच्या चौकीवर नोंद करून एकेक करत गाड्या गावात घुसल्या.चौकात आल्यावर लोकायनं आंबलेले आंगं मोकळे केले. इंग्रजायचा चहावाला प्रत्येकाले फुकट चहा पाजत होता. आर्ध्याहून जादा लोक ते गुळमट पाणी फेकून देत होते.

अन तेवढ्यात भोँग्यावर अनाउन्समेन्ट झाली-

“चला चला तिकीटं फाडा. अयोध्येचा राजा आलाय.”

( अयोध्येचा राजा: मराठीतला पहिला बोलपट. दिग्दर्शक- व्ही. शांताराम उर्फ शांताराम बापू
साल : १९३२ )
-------------------------------------------------

५. तलाक ( झाडी बोली)

तलाक तलाक तलाक

या तीन शब्दायनं मही सग्गी दुनिया बदलून गेली. बाप्पा आशी येर कोणावरबीन येऊ नी. जिंदगीभर संगासंग चालायचं ठरवलं होतं पण झालं काय शेवटी.

उस्मान अन मी कॉलेजात एकत्र भेटलो अन आमचं इश्क जूळलं अन आमी निकाह करायचं ठरवलं. शादीनंतरचे पह्यले काही साल ले सुखात गेले जन्नतमंधीच होतो आम्ही. घरच्यायनं जरा विरोध केला पण आयकलंच शेवटी. विश्वासबीन ले होता आमचा एकमेकायवर. उस्मान त मह्या मंगामंगाच राहायचा.
लेकिन हळूहळू सब बदलून जात राह्यलं. उस्मानच्या स्वभावात बदलाव आला, मपल्यावर त्यो संशय घेत राह्यला.

अयाज मह्या फूफाचा लडका. येतजाय आमनधपक्या घरी. दुपारी त उस्मान कामावर जायेल राहे. आमी बसायचो गप्पा मारत. मोहल्ल्यातल्यायनं काय सांगितलं काय मालूम उस्मानले. त्यो अयाजसोबत ले भांडलाय मलेबीन मारलं. तेच्यानंतर कोणीबीन मर्द मह्याशी बोलतांना त्याले सहनच होत नव्हतं.

अना व्हॅलेंटाईन डेले, चुकून महा मोबाईल उस्माननं घेतला. नेमका तव्हाच अयाजचा मॅसेज आला- I Love You.

तिथंच सगळं संपलं.

आम्हा दोन नवऱ्यायच्या भांडणात मस्जिदपण पडायचं नाही म्हण्ती.

--------------------------------------------------
-------------------------------------------------

अस्तुरी म्हणजे बायको
आंडेर म्हणजे मुलगा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही गोष्ट मी गृहीत धरली होती. तो लहेजा पकडणं ती बोली न बोलणाऱ्यासाठी फार अवघड. त्यासाठी ती बोली ऐकावी लागते,शक्य नसेल तर भरपूर वाचावी लागते. पण असं साहित्य फार कमी उपलब्ध आहे Sad

यथाशक्ती प्रयत्न केला आहे. चुका सापडल्यास कृपया निदर्शनास आणून द्याव्यात.

भाषेचा लहजा वगैरे मलाही फारसा कळत नाही, त्यावर नो कॉमेंटस.. कथा मात्र छान.. खूप भारी अशी मला यावेळी कुठली वाटली नाही, (वाढलेल्या अपेक्षा, दुसरे काय) .. पण ओवरऑल सर्व चांगल्या जमल्यात Happy

ऋ +100
आज तडका जमला नाही पहिली कथा सोडून.

काही कथांमागची पार्श्वभूमी विषद करू इच्छितो

३) आपली शेती आपल्या मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर जरी करायची असेल तर ते काम आधी फुकटात व्हायचं आता नवीन नियमानुसार govt ला जमिनीचा जो बाजारभाव आहे त्याच्या 3% tax द्यावा लागतो !! त्यामुळे गरीब शेतकरी हे करू शकत नाहीये. बरं पाच एकराच्या वर जमीन असली तर अनुदान मिळत नाही. एखाद्या गरीब शेतकर्याकडे समजा आठ एकर जमीन आहे तर त्याला अनुदान नाही.
श्रीमंताकडे 20 एक्कर जमीन जरी असली तरी तो चार नातेवाईकांच्या नावावर ती करतो. म्हणजे ते चौघे झाले अल्पभूधारक आणि चौघांनाही अनुदान मिळतं.

४) मराठीतला पहिला बोलपट : अयोध्येचा राजा , दिग्दर्शक : व्ही. शांताराम ( शांताराम बापू ) साल: १९३२
माझे आजोबा अगदी लहान होते तेव्हा हा चित्रपट खामगावला आला होता, त्यावेळेच्या आठवणी एकदा त्यांनी आम्हाला सांगितल्या होत्या.

५) Gay Love Story

कथा छान आहेत पण बोलीभाषांमध्ये काही शब्द आणि लहजा वऱ्हाडी/वैदर्भी जाणवतो आहे.

हम्म... वऱ्हाडीपणा सुटत नाही.
पहिला प्रयत्न आहे, गोड मानून घ्यावा. अभ्यास वाढेल तशी सुधारणा होत जाईल Happy

व्वा... शेवटचा वाटली नव्हती गे आहे.. मला वाटलं बोलीभाषेत स्त्री पण करतो, देतो म्हणतात की काय... आवदली....

अमरावती जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात स्त्रिया "मी जातो, मी जेवतो" असं म्हणतात. नागपूरबद्दल माहीत नाही पण चंदरपुरला स्त्रीला "मी जाते, मी जेवते" असंच म्हणताना ऐकलंय.

मालवणी लिहिण्याचा प्रयत्न करतो-

"मजा ईली कि नाय "

"होय रे, तकडेसून निघणसारा वाटा नाय होता, तरिपन पॉटभर जेवलंय."

"बेगीन चल, फाटपाटी होयस्तोवर जागेर पोचलेला बरा!"

"बरा, मगे"

"आता खंयपातूर पोचलव रे"

'हडळीच्या माळार"

"कधी एवडे चालत इलव ता कळलाच नाय "

"माका आठावता ती अमवाश्येची रात. मी एकलोच व्हतंय आणी खयसून बुद्धी झाली नि त्या बावडेजवळ गेलंलय."

"मगे"

"बावडेत भूतूर वाकान बघी व्हतंय तेव्हढ्यात एक हडळ भायर ईली आणी भल्या माणसा मुको घेतल्यानं ना रे मायझयेन."

"तुकाच मूक घेवचो आसतलो, म्हणून वाकन बघी व्हतं. खी:खी:”

"रवळनाथा शपथ"

“माकाव आठवला आता, समोरच्या मसनात मिया वराडच्या येताळाक नाचताना बगलेलंय."

"मायझया, वराडकारांचो रोजचोच नाच बघून तो येताळव मालवनाक जावन बसलो आसात."

"गजालीच ते, खरा कोन मानता, खी:खी:”

"चालत चालत दोनव झिलगे बरेच लांब इले."

"मी काय म्हणतंय, चंची काढ, वायचं पडाया हयसरच"

"बरा, मेल्या उलटा चालून माझीव ढेंगा वर झाली हत"

आनी ते दोनव येताळ तंबाकू चोळीत झाडाक लटकत रव्हले.

Good Job. Thanks _/\_
मालवणीबद्दल तुमचा सल्ला नक्की घेईन Happy

परिचयात नसलेली संपूर्ण बोलीभाषा येणं जरा कठीणच आहे. तुम्ही प्रयत्न केलात ते पाहून कौतुक वाटलं.

चांगला प्रयत्न.

ज्यांना त्या-त्या बोलीभाषा उत्तम जमतात त्यांनी सूनटून्या यांच्याप्रमाणे सुधारून लिहा की. चांगलं कलेक्शन तयार होईल.

पाचवी नीट समजली नाही..
>> शेवटची ओळ एडिट केली आहे. आता लक्षात येईल अशी आशा आहे.

>> थेँक्स सूनटून्या Happy

ज्यांना त्या-त्या बोलीभाषा उत्तम जमतात त्यांनी सूनटून्या यांच्याप्रमाणे सुधारून लिहा की. चांगलं कलेक्शन तयार होईल.
>> सहमत

ऋ आणि सुन्याटुन्या +१

विनय, मला या वेळेला सगळ्या कथा आवडल्या आणि न कंटाळता वाचावाश्या वाटल्या Happy

बोलीभाषेत लिहिण्याचा प्रयत्न केलात तेच मस्तय... आणि चांगल्या आहेत.

मला तर बाकीच्या भाषांचा पत्ताही नाही..

मस्त जमल्यात कथुकल्या. आवडल्या.
भाषेचा लहेजा थोडाफार जमलाय असं मला वाटलं. काही ठिकाणी नसल्यास माबोकर सुचना करतीलच.
विनय मस्त प्रयत्न. लिहित रहा.

_/\_