अस्सल पुणेकरांसाठी अभयारण्य

Submitted by डॉ अशोक on 27 May, 2017 - 00:26

अस्सल पुणेकरांसाठी अभयारण्य
--------------------------------------
अस्सल पुणेकर आता अल्पसंख्य होत असून काही दिवसांनी नामशेष होईल अशी बातमी ऐकली आणि खरं सांगतो, तोंडातलं पान देखिल रंगेनासं झालंय! काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दुपारी दीड-दोनची वेळ असावी. मी चितळेंच्या दुकानात गेलो आणि "बाकरवड्या हव्यात" अशी तोंडी ऑर्डर दिली. "दुपारची सुट्टी आहे, दिसत नाही कां?" असं त्यानं पुणेकरच ज्याला "नम्रपणे" म्ह्णतील अशा भाषेत सुनावलं. यावर मी "अर्धाकिलो घ्यायच्या होत्या" अशी लालूच दाखवली. यावर तो अधिकच नम्रपणे (?!) म्हणाला: "एक क्वींटल घ्या हो, पण दुकान उघड्ल्यावर!" दुपारी दुकान बंद असल्याची पाटी कुठं दिसत नाही हे त्याला सुनावल्यावर: "अहो, सगळ्या जगाला माहित आहे आमचं दुकान दुपारी १-४ बंद असतं. पौडाचं काय तुम्ही?" अशी सस्मित विचारणा केली. "मी औरंगाबादहून आलोय" असं त्याला सांगितलं तर " तुम्ही लंडनहून आला असाल हो ! पण दुकान उघडल्यावर या!" असा निरोपाचा सल्ला मिळाला. मी अस्सल पुणेकर दिसला आणि आपल्याशी बोलला देखिल या समाधानात तिथून निघालो. नंतर हा पुणेकर अनेक ठिकाणी भेटत गेला. बस मधे पूढच्या दारातून शिरलो असता उतरवून देणाऱ्या कंडक्टरच्या रुपात, वस्सकन अंगावर येणाऱ्या रिक्शावाल्याच्या रूपात, लाल सिग्नल असल्यामुळे स्कूटर थांबवली तर माझ्या कडे रागारागानं पहाणाऱ्या ललनेच्या रूपात, लागूंच्यानंतर मराठीत दखल घ्यावी असा नटच निर्माण झाला नाही असं म्हणणाऱ्या माझ्या शेजारच्या प्रेक्षकाच्या रूपात, मी आयपीएल क्रिकेट पहात असतांना "तुम्ही त्यापेक्षा कबड्डी कां बघत नाही?" असं विचारणाऱ्या शेजाऱ्याच्या रुपात, दसऱ्याला सुनेनं घरीच केलेल्या चक्क्याच्या श्रीखंडाला नाकं मुरडत "चितळ्यांच्या श्रीखंडासारखं श्रीखंड त्रिखंडात नाही" असं म्हणणाऱ्या पाहूण्याच्या रुपात, गणपती उत्सवात औरंगाबादच्या मेळ्याबद्दल सांगायाला लागलो तर "कुठं पुण्याचा गणपती, आणि कुठं तुमच्या औरंगाबादचा" असं म्ह्णणारा सोसायटी सदस्य अशा अनेक रुपात तो भेटत गेला. त्यातून एखादी गोष्ट पुण्यात मिळत नसेल तर ती जगात कुठेच मिळत नाही, पुण्यात मिळते तशी क्वालिटी जगात कुठेच नाही, एखादा कार्यक्रम पुण्यात नावाजला गेला नाही किंवा झालाच नाही तर तो टुकार, पुण्यातलं हवामान म्ह्णजे जगात बेस्ट इत्यादी द्न्यानाचे कण पण मेंदूत गोळा झाले.

वाघ नामशेष व्हायला लागले तर त्यांच्यासाठी अभयारण्ये उभारली जातात, मग अस्सल पुणेकरासाठी असं अभयारण्य कां असू नये असं मी माझ्या मते अस्सल पुणेकर असलेल्या पुणेकराला विचारलं. त्यानं आश्चर्यकारकरित्या माझ्या कल्पनेला पाठिंबा दिला. खरं तर ही धोक्याची सूचना होती. कारण बऱ्याचदा पुणेकर संपूर्णपणे नाही तर तत्वत: पाठिंबा देतात आणि तेच खरं ठरलं. शिवाय त्यांची एखादी मूलभूत शंका असतेच. इथं एक सांगून ठेवतो की पुणेकराची शंका ही नेहेमीच मूलभूत अशी असते! "अस्सल पुणेकर कुणाला म्हणावं?" त्यानं त्याची शंका (पक्षी: मूलभूत शंका) बोलून दाखवली. मी म्ह्टलं, "त्यात काय अवघड आहे? पुलंनी त्यांच्या ’तुम्हाला कोण व्हायचंय? पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर?’ या लेखात पुणेकराची व्यवछेदक लक्षणं सांगून ठेवलीत की!" "कोण पुलं? अच्छा, तुम्ही पीयल म्हणताय तर? अहो, तो लेख घाईत लिहिलेला. बहूतेक सुनीताबाई मागे लागल्या म्हणून पुलंनी हा लेख घाईघाईत लिहिलाय. आता मला सांगा पुण्यात न जन्मलेल्या टिळकांना तुम्ही पुणेकर म्हणाल? नाही ना! मग उगाच आपलं इथं पन्नास वर्ष राहिला म्हणून आम्ही नाही बरं कुणाला पुणेकर म्ह्णणार!" च्यायला! म्ह्णजे ही भानगड माझ्या लक्षात आलीच नव्हती. मग मला सिंगापूरला भेटलेला एक पुणेकर आठवला. तो पुण्यातच जन्मला होता, पण "पूर्वीचं पुणं आता राहिलं नाही" ह्या थीमवर तो माझ्याशी तासभर बोलत होता. आता ह्या गृहस्थाला पुणेकर म्हणावं की नाही असा प्रश्न मी मूलभूत पुणेकराला विचारला. त्यावर त्यानं चांगला दोन मिनिटं पॉज घेतला, डोळे गरागरा फिरवले. त्याला आकडी आली की काय या संशयानं मी त्याला चप्पल हुंगवायला द्यावी म्हणून चप्पल काढली तर तो म्ह्णाला: "अहो, एव्हड्याश्शा गोष्टीसाठी लागली चप्पल काय काढताय? नाही, सिंगापूरकर म्हणाला ते बरोबरच आहे. मग ही पुणेकराचा तिसरा प्रकार झाला!" "तिसरा?" मी विचारलं. "हो, तिसरा. पहिला म्हणजे पुण्यात जन्मलेला आणि पुण्यातच असलेला. दुसरा म्ह्णजे पुण्यात न जन्मलेला आणि बाहेरून इथं आलेला आणि तिसरा म्हणजे पुण्यात जन्मूनही पुण्या बाहेर रहात असलेला !!" बापरे! आता कुठं कुठं अभयारण्य़ं काढावी लागणार ह्या कल्पनेनं मी काळजीत पडलो, तर मूलभूत पुणेकरानं आणखी एक बॉंब गोळा टाकला. त्यानं मला विचारलं: "पुण्यात कुठं जन्म झाला तर त्याला अस्सल पुणेकर म्हणावं?" मी म्हणालो: "अहो पुण्याच्या हद्दीत कुठंही!" ह्यावर त्यानं कशी जिरवली असा माझ्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला आणि म्हणाला "छ्छ्या! अहो, आपण अस्सल पुणेकराबद्दल बोलतोय नाही कां? आणि पुणे-४० मधे जन्म झाला नाही तर तो कसला अस्सल पुणेकर!" पुणे-४० बद्दल पोष्टात चौकशी केली तेंव्हा पुणे-४० म्हणजे सदाशिव पेठ ही माहिती कळाली.

सद्ध्या आम्ही अस्सल पुणेकर कुणाला म्हणावं याबाबत अस्सल पुणेकर, कम-अस्सल पुणेकर, पुण्यात स्थलांतरीत झालेला पुणेकर आणि पुण्या बाहेर गेलेला पुणेकर यांचा एक ओपीनीअन पोल घेत आहोत. पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाबाबत नक्की निर्णय झाला की त्याच सुमारास आमचाही निर्णय होईल. दरम्यान हे अभयारण्य पुण्यात काढणार की पुण्याबाहेर, पुण्यात काढणार तर कुठे आणि कां? आणि बाहेर काढणार तर कुठे आणि कां? हे आणखी काही मूलभूत उप-प्रश्न त्या मूलभूत पुणेकरानं उपस्थित केले आहेत. त्याला काहीतरी मुलभूत उत्तर द्यावं असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?
-अशोक

Group content visibility: 
Public - accessible to all site users