हास्यधारा - ‘अशोक नायगावकर’ आणि ‘रामदास फुटाणे’

Submitted by BMM2017 on 25 May, 2017 - 22:28
ठिकाण/पत्ता: 
ग्रँड रॅपिड्स,

Phutane_2.jpg

वात्रटिका म्हणजे काय हो? तर वात्रटिका म्हणजे अशी हास्यकविता ज्यात अतिशयोक्ती असते, विडंबन असतं, मिस्किलपणा, थट्टेखोरपणा असतो, मर्मांवर बोट ठेवण्याची वृत्ती असते आणि दांभिकतेवर प्रहार केलेला असतो. या वात्रटिकेत शब्दांना जितकं महत्व असतं तितकंच महत्व त्याच्या सादरीकरणाला असतं. आज वात्रटिका म्हटलं की दोन नावं प्रामुख्याने डोळ्यांसमोर येतात. ‘अशोक नायगावकर’ आणि ‘रामदास फुटाणे’.. हे दोन वात्रटिकावीर येणार आहेत BMM 2017 ला!

प्रेमकविता, ग्रामीण कविता, पर्यावरण जाणीवेच्या कविता, सामाजिक, राजकीय कविता.. त्या सादर करताना “वगैरे वगैरे” म्हणायची पद्धत आणि पल्लेदार मिशा म्हणजे अशोक नायगावकर! “टिळक तुम्ही मंडालेला काला खट्टा प्यायला गेला होतात का?!” असं उपहासात्मक म्हणणारे कवी म्हणजे अशोक नायगावकर…
हास्यातून बरोबर मर्मावर बोट ठेवत ते म्हणतात,

“टिळक,तुम्ही चौपाटीवर इथे
कशासाठी उभे आहात ?
अहो, पाणीपुरी भेळपुरी खाणं
हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि आम्ही तो रोज मिळवणारच!
तुमचे डोके ठिकाणावर आहे काय टिळक ?
तुम्ही डॉलर मिळवा
लोक बघा किती आनंदात
बिअरच्या ग्लासासारखे फेसाळलेत
तुम्ही स्वदेशी बार टाका, मस्त जगा ..”

कवितेतून कोपरखळ्या मारणारे महाराष्ट्राचे लाडके कवी रामदास फुटाणे यांची ओळख त्यांच्याच ह्या कवितेतून करून देता येईल:

“मला माझ्याच स्वप्नांची तहान आहे
या देशापेक्षा मीच महान आहे
मी माझ्याचसाठी जगतो
मी माझ्याचसाठी मरतो
आरशात पाहून
मी मलाच नमस्कार करतो
तेव्हा —
माझा जयजयकार असो
माझ्या धर्माचा जयजयकार असो
माझ्या पंथाचा जयजयकार असो
माझ्या प्रांताचा जयजयकार असो
झालंच तर
कधी कधी
माझ्या देशाचासुद्धा
जय-जय-कार असो
भारत कधी कधी माझा देश आहे…!”

आणि शेवटी अंतर्मुख करणाऱ्या अशोक नायगावकरांच्या कवितेतली ही दोन कडवी..

“पारोशाने नदी म्हणाली
किती दिसात गं न्हाले नाही
मरता मरता झाड म्हणाले
दोन थेंब तरी पाणी द्या हो

शाहाणपटीने धारण बांधले
अभियंत्यांना मुता म्हणालो
गाळ म्हणाला धरणाचीया
किती उंचवर बांधू समाधी?”

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, July 7, 2017 - 22:15 to रविवार, July 9, 2017 - 22:15
Group content visibility: 
Use group defaults