गप्पा रंगवणे- एक कला

Submitted by डॉ अशोक on 5 May, 2017 - 05:28

गप्पा रंगवणे- एक कला

गप्पा रंगवायला थॊडेसे तानसेन आणि खूपसे कानसेन हवेत. सगळेच कानसेन किंवा सगळेच तानसेन असले तर गप्पा रंगत नाहीत. "मी", "माझं" ऐवजी "असं कां?", "अरे व्वा!", "यंव रे पठ्ठे!", "वा रं माझ्या गब्रू" हे शब्द आले पाहिजेत. भिंतीवर घड्याळा ऐवजी कॅलेंडर असावे लागते. घरी बायको वाट पहातेय, उद्या सकाळीच मिटींग आहे अशा सबबी चालत नाहीत. एकाच विषयात पीएचडी ऐवजी किमान दहा विषयात किमान सर्टीफिकेट कोर्स केलेला असावा! निव्वळ पुलंच्या विनोदांवर आजकाल गप्पांचे फड रंगत नाहीत. त्यांच्या स्मृतीदिनी त्यांचे आणि त्यांच्या नावावर खपवलेले विनोद व्हाटस अप, फेसबूक वर टवाळांसारखे हिंडत असतात. सन्ता बन्ताचे जोक्स कुठं हाणावेत, किशोरी आमोणकरांच्या गाण्यावर कुठं बोलावं ह्याचं तारतम्य पाहिजे. हिंदुस्थानी क्रिकेटचा इतिहास, सचिनच्या सेंचुऱ्या, मी युएस ला गेलो होतो तेंव्हाचा हा किस्सा (असं म्हणून किमान दहा किस्से), भारतीय राजकारण, आजकालची सामाजिक परिस्थिती, हल्लीची तरुण पिढी, घरकामाला येणाऱ्या बायांचे प्रश्न, उन्हाळी भूईमूग, सरकारी दवाखाने आणि खासगी दवाखाने एक तौलनिक अभ्यास, आज कालचे पुणे, सवाई गंधर्व महोत्सव, पाण्याचं दुर्भिक्ष आणि त्यावरचे उपाय अशा बहुविध विषयावर अधिकारवाणीनं नाही पण स्वत:च्या वाणीनं बोलता आलं पाहिजे.
अर्थात यावर तुमची मास्टरी असली पाहिजे असं नाही. हिंदुस्थानी क्रिकेट म्हणजे भारतीय लोक खेळत असलेले क्रिकेट, सचिनची ९९ वी सेंच्युरी आणि १०० वी सेंच्युरी यात असलेला कालावधी, सवाई गंधर्व महोत्सव पुण्यात डिसेंबर मधे होतो अशी जुजबी माहिती असली तरी पुरे. कुणी सचिन बद्दल बोलायला लागलं तर "हे पहा दोस्त! सचिन ग्रेटच. पण मला त्यापेक्षा लक्ष्मणनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध कलकत्त्याला काढलेली ड्बल सेंच्युरी जास्त महत्वाची वाटते. सचीनच्या शंभर सेंच्युऱ्या मी ओवाळून टाकीन त्याच्यावर!" हे वाक्य तुमच्या तोंडून आलं पाहिजे. भीमसेन जोशींच्या दरबारी कानडावर कुणी बोलू लागला की तुम्ही बोलणाराला विचारवं: "तू पंडीत वामनराव मिर्खेलकरांचं नाव ऐकलं आहेस कां? " असं विचारावं. तो "हो" म्हणतोय की "नाही" हे ऐकण्या अगोदर आपण सुरू करावं: "अरे, त्यांनी परवा नागपूरात काय मालकंस गायलाय म्हणून सांगू!" इथं मालकंस राग, त्याचा थाट, आरोह , अवरोह ह्याची जुजबी माहिती असेल तर तुम्ही अर्धा एक तास किल्ला लढवू शकता. रणजित देसाईंच्या "स्वामी"वर कुणी गडी बोलायला लागला तर तो/ किंवा ती कच्चा/ कच्ची भिडू आहे हे समजून घ्यावं आणि आपण त्याला विचारावं: "तू नाच गं घूमा" वाचलीएस? माधवी देसाईंची? . तो / ती "नाही" म्हणाला/ म्हणाली, तर: "वाटलंच मला" म्हणावं आणि "हो" म्हणाला / म्ह्णाली तर "तरीही तू असं बोलतोयस/ बोलतेयस असं म्हणून: नाच गं घूमावर दोन मिनीटं बोलून घ्यावं, पंधरा-पंधरा सेकंद अशा चार हप्त्यात!

कुणी उन्हाळी भूईमूग या विषयावर बोलायला लागला तर आपण: "टू टेल यू द ट्रुथ, माझी या विषयावरची मतं जगजाहीर आहेत!" असं म्हणून अटलजी भाषणात घ्यायचे तसा किंवा विक्रम गोखले नाटकात घेतात तसा पॉझ घ्यावा. जनरली यावर कुणी जास्त बोलत नाही. पण कुणी हट्टाला पेटलंच तर " उन्हाळी भूईमूग हा सगळ्या समस्येवर एकमेव उपाय आहे असं कुणी समजत असेल तर......" असं म्हणून हा विषय लट्कवत ठेवून "ए ! मला सांगा, कालची मॅच पाहिलीत कां?’ असं विचारून विषय बदलावा!

हिंदी चित्रपट आणि त्यातली गाणी हा तर खरं तर गप्पांसाठी एव्हर ग्रीन विषय. पण ह्या विषयावर गप्पा रंगवणं म्हणजे चित्रपटांच्या लग्नात करतात तशा याद्या करणं नव्हे. इथं प्रत्येक जण आपापल्या आवडत्या चित्रपटाशी, नट-नटीशी, संगीतकाराशी इमोशनली अटॅच्ड असा असतो. त्यामुळे आपण ही एखादी सोईस्कर भूमिका घेऊन तयार असलं पाहिजे. मग कुणी माधूरी किंवा ऐश्वर्याच्या सौंदर्यावर बोलायला लागलं की आपण "मधूबाला! हाय!" असं म्हणून सुस्कारे काढावेत. नौशाद/ शंकर जयकिसन च्या भक्ताला सी. रामचंद्र, खय्याम किंवा ओपी नय्यर हे चांगले उतारे आहेत. मराठीत "फडक्यांच्या नंतर कुणी संगीतकार झाला नाही, आणि गदिमा लोकोत्तर गीतकार होते" ही भूमिका मजा आणते.

कधी कधी एखादा "आजकाल च्या टीव्ही वरच्या सिरीअल मधे दम राहिला नाही" असं म्हणू लागला तर आपण "I agree to disagree with you" किंवा "I disagree to agree with you" असं म्हणून गोंधळ उडवून द्यावा. म्हणजे होतं काय की तुम्हाला काय म्हणायचंय हेच आधी कुणालाच कळत नाही. मग आपण त्याची समजून काढाल्यागत "हो मला मान्य आहे, आता "खानदान", "ये जो है जिंदगी" सारख्या मालिका निघत नाहीत. पण परिस्थिती काही इतकी वाईट नाही" असं म्हणून नुकत्याच पाहिलेल्या नवेकोणत्याही सिरीअल ची भलावण सुरू करावी. चर्चा सुरू केली त्यानं ही मालिका पाहिली असण्याची शक्यता जवळपास नसतेच, त्यानं आपलं काम सोपं होऊन जातं.
काही वेळेस तर एखाद्या अजातशत्रू माणसाप्रमाणे गप्पांच्या काही विषयांना दुसरी बाजूच नसते, किंवा शोलेतल्या नाण्याप्रमाणे दोन्ही बाजूला एकच बाजू असते. उदाहरणार्थ: माझी बायको, माझा बॉस. इथं मात्र तुमची फारशी कसोटी लागत नाही. इथं तुम्ही कानसेनाची भूमिका केली तरी चालण्यासारखं असतं.

मात्र गप्पा करतांना काही पथ्य पाळावी लागतात. तुम्ही वयस्कर असाल आणि ग्रूप तरुणांचा असेल तर सैराट, भैताड, तुम्ही लोक्स म्हणजे किनई..., DDLJ (Dilawaale dulhaniyaa le jaaenge), पर्शा, आर्ची, झिंगाट ह्या आणि अशा शब्दांचा तुम्हाला परिचय करून घ्यावा लागेल. सद्ध्या तरुणांच्या मधे कशाची केझ आहे याचा तुम्हाला अंदाज असणे आवश्यक आहे. त्यासाठी व्हाट्स अप चे ग्रुप, फेस बूक किंवा तुमच्या कुटुंबातील तरुण मंडळींची मदत मोलाची ठरू शकते. वयस्कांच्या ग्रूप मधे "आजकाल कशातच काही राम राहिला नाही" ही बोलण्याची थीम असावी. मग कशात म्हणजे तरूण पिढी, नवे चित्रपट, आधुनिक संगीत, भाषा, वर्तमानपत्रं, नाटकं, कादंबऱ्या काहीही असू शकेल. कशाकशावर ही सरळ सरळ अद्न्यान दाखवणं टाळावं. म्हणजे "तू अमक्या-अमक्याचं तमकं-तमकं पुस्तक वाचलंस कां?" यावर "नाही" असं सरळ आणि भोचट उत्तर देवू नये. त्या ऐवजी " मी ब्रिटीश लायब्ररी पालथी घातली यार! मला नाही मिळाली तिथे!" हे उत्तर शोभून दिसतं. म्हणजे आपण ते पुस्तक वाचलं नाही यापेक्षा ब्रिटीश लायब्ररीच्या संपर्कात असतो हे दाखवून देता येतं. कुणाशीही मतभेद दर्शवतांना: " तुझा या विषयावरचा अधिकार सगळ्या जगाला (म्हणजे गप्पांना उपस्थित असलेल्या चौघांना) माहित आहे. तरीपण बरं कां..... " असं म्हणून आपली बाजू सौम्यपणे मांडावी आणि शेवटी " बरं कां दोस्त! हे आपलं माझं वैयक्तिक मत झालं बरं कां. याउप्पर ही आपली दोस्ती सगळ्या जगाला माहित आहे. चल, इस बात पे कॉफी मागव ना यार!" असं म्हणायला विसरू नये. "पुणेकर" या विषयावर आजकाल पुण्यातही अल्पसंख्य झालेला खरा-खुरा पुणेकर असेल तर मझा येते हा माझा वैयक्तिक अनुभव. मात्र हे करतांना "आपण तर काय बुवा! मराठवाडी/ वैदर्भी!" अशी सुरुवात करून आधी पुणेकराला चढवून मग खास आपले स्वत:चे अनुभव सांगितले की पुणेकरांचे चेहेरे पहाण्यासारखे/ किंवा खरं तर न पहाण्या सारखे होतात हा माझा वैयक्तिक अनुभव! एक पुणेकराला तर मी "काय हो? तुमच्या पुण्यात म्हणे सूर्य पूर्वेला उगवतो म्हणे खरं कां?" असं म्हणून झीट आणली होती!

असो. या जनरल गाईड लाईन्स झाल्या. शेवटी ज्याला त्याला आपल्या हिंमतीवर गप्पांचा फड रंगवायचा असतो. त्यात ह्या टीप्स ची मदत झाली तर चांगलंच आहे. ह्या विषयावर आपल्या गप्पा झाल्या पाहिजेत असं वाटतं. मग? कधी आणि कुठं भेटायचं?

-अशोक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users