कथुकल्या ५ ( विज्ञानकथा स्पेशल )

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 29 April, 2017 - 06:44

१. टेस्ट सब्जेक्ट

नाकातून परत रक्त यायला लागलं. मी खिशातल्या रूमालाने नाक पुसलं. कमाल आहे, यावेळचं रक्त लालऐवजी काळपट दिसत होतं. कदाचित रस्त्यावरच्या उघडझाप होणाऱ्या दिव्यांमुळे तसं दिसत असावं.

“मुव्ही आवडला का रे?” प्लियानीने आपला रेशमी हात माझ्या गळ्यात टाकत विचारलं. ती माझ्या इतकी जवळ असूनसुद्धा तिचा सहवास मला जाणवत नव्हता. पण परफ्युमचा मंद मोहक चंदनी सुगंध मात्र मनाला मोहवून टाकत होता. हा सुगंध मला पृथ्वीची आठवण करून देतो.

“तुला मुव्ही आवडला का ?” तिने परत विचारलं.

“हो. भारी होता.” मी मनाने ठोकून दिलं, जरी मला मुव्ही पाहल्याचं स्पष्टपणे आठवत नव्हतं. आजकाल या मेमरीला काय होत चाललंय काय माहीत.

“समुद्रावर जायचं ?” तिने विचारलं अन उत्तराची वाटही न बघता मला किनाऱ्याकडे ओढत घेऊन गेली. मीपण पावलं मोजत तिच्या मागोमाग निघालो. ही आमची फक्त तिसरी भेट होती तरीपण ती कित्येक वर्षांपासूनची ओळख असल्यासारखी वागत होती.

किनाऱ्यावर फारसं काही बघण्यासारखं नव्हतं. फक्त बारीक रेती अन चुनखडीसारखे ओबडधोबड दगड. पाण्याचा प्रवाहही किती शांत होता ! याला हे लोक समुद्र का म्हणतात कुणाच ठावूक. हिला गणपती पुळ्याला न्यायला पाहिजे एकदा. मग कळेल समुद्र कशाला म्हणतात ते.

“तुझं नाक ठीक आहे का?” तिने विचारलं.

“हो.” मी खोटं बोललो.

आम्ही किनाऱ्यावरच्या फडफडणाऱ्या दिव्यांखाली उभे होतो. या अंधुक उजेडात प्लियानी किती सुंदर दिसत होती. काय पाहिलं हिने माझ्यात काय माहीत.

“मला पृथ्वीबद्दल सांग न अजून काहीतरी.” ती माझ्या कानात कुजबुजली.

मी उत्तर द्यायला तोंड उघडलं.

‘ही खारटतुरट चव कसली आहे !’ मी दचकलो.

नाकातून वेगाने रक्त वाहायला लागलं होतं. मी झटक्यात नाक पुसलं पण फडफडणाऱ्या दिव्यांच्या सावल्यांव्यतिरिक्त काहीच दिसू शकलं नाही. हळूहळू शुद्ध हरवत गेली.

--------------------

जाग आली तेव्हा मी पांढऱ्याशुभ्र, निर्जंतुक केलेल्या खोलीत होतो. डोकं गरगरत होतं, घशाला कोरड पडली होती. बाजूला बसलेल्या माणसाशिवाय खोलीत कुणीच नव्हतं.

“काय झालं?” मी विचारलं.

"तुला परत आणावं लागलं” तो माणूस बोलला. त्याचं गुळगुळीत टक्कल दिव्यांच्या उजेडात चमकत होतं. एकही दिवा फडफडत नव्हता.

“पण मी तर दोन महीने राहणार होतो न तिथे. मग एकाच महिन्यात परत का बोलावलं ?”

“तुझ्या नाकातून जास्तच रक्त वाहायला लागलं होतं.”

“का ?”

"हस्तांतरणात काहीतरी प्रॉब्लम झाला असेल. कदाचित तुझे सगळे अणुरेणु त्या ग्रहावर पोहोचले नसतील किंवा तुझ्या शरीराची पुनर्बांधणी होतांना श्वसनसंस्थेचे अणुरेणु चुकीच्या क्रमाने जोडले गेले असतील. कधीकधी आमच्या उशीरा लक्षात येतं. मनुष्याचं हस्तांतरण जर एवढं सोपं असतं तर आम्ही आतापर्यंत जगात सगळ्यात श्रीमंत नसतो का बनलो.”

“मला वापस तर बरोबर आणलंय न पण?”

“डोन्ट वरी. यू आर फिट अँड फाईन. आमचं तंत्रज्ञान तेवढं प्रगत तर नक्कीच आहे.”

“खड्ड्यात घाला तुमचं तंत्रज्ञान.” मी मनगटातला बेल्ट काढून टिटॅनियमच्या फरशीवर फेकून देत म्हणालो.

“स्वतःला भाग्यवान समज की आमच्या आधीच्या एका टेस्ट सब्जेक्टसारखं तुझं झालं नाही. त्याच्या शरीराचे कोट्यावधी तुकडे सध्या अवकाशात फिरत असतील. तुला कमीत कमी एका सुंदर एलीयन मुलीसोबत फिरायला तरी मिळालं.”

अर्थात त्याचं बरोबर होतं.

“बरं आता?”

“बाहेरच्या काउंटरवर तुला पैसे मिळतील. या संशोधनात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.”

ठणकत्या पावलांनी मी बाहेर आलो. चेक घेतला अन काही जुजबी प्रश्नांची उत्तरं देऊन बाहेर पडलो.

रस्त्यावरून चालताचालता मी खिशातला चेक बाहेर काढला अन शुन्यांची संख्या मोजली. कॉलेजची दोन वर्षांची फी भरूनपण भरपूर पैसे उरणार होते. महीनाभरात काय कमावणार अजून. शिवाय मला एक सुंदर मुलगीपण भेटली होती, जरी आठवत नसलं की तिचं नाव काय होतं, तिचे केस कसे होते. कुरळे होते का ? की लांबसडक? नाही कुरळेच… नाही वेगळेच होते.

नाकातून भळाभळा रक्त वाहायला लागलं.

-----------------------------------------------------

२ . परिवर्तन

कपाटातल्या त्या कलंडलेल्या काचेच्या भांड्यावर छतभर पसरलेल्या वायर्सची सावली पडली होती. काचेची एक बरणी मात्र अगदी सरळ, ताठ उभी होती. त्यातल्या काळ्याकुट्ट द्रवामध्ये वेगवेगळे अवयव तरंगत होते, डोळे नसलेला चेहरा बरणीला आतून धक्के देत होता. कपाटापासून अगदी थोड्याच अंतरावर एक यंत्रमानव उभा होता. जमिनीवरच्या चकचकीत फरशीवर त्याचं भलमोठं लोखंडी अंग स्पष्ट दिसंत होतं.

आपला तोल सांभाळत तो यंत्रमानव हॉलच्या मधोमध ठेवलेल्या काचेच्या पेटीकडे निघाला. त्याने एक सांकेतिक नंबर टाकून पेटीचं झाकण उघडलं. आतमध्ये अचेतन अवस्थेतला मानवी देह तरंगत होता. यंत्रमानवाने आपल्या हातातली अर्धपारदर्शक नळी त्याच्या मानेमागच्या सॉकेटमध्ये खोचली. नळीचं दुसरं टोक संगणकाला जोडलेलं होतंच. पेटीतल्या माणसाच्या आठवणी भराभर संगणकावर उमटू लागल्या…

दृश्य १

रेशमी अंथरुणावरचं बाळ. एक चेंडू त्याच्या दिशेने घरंगळत येतोय.बाळ आनंदाने बेभान होऊन टाळ्या पिटतंय.

दृश्य २

एक छोटा मुलगा टेबलावर त्याच्या मित्रांसोबत बसलेला. समोर केक,त्यावर पेटती मेणबत्ती.मुलगा छातीमध्ये हवा भरून जोरात फुंकर मारतो

दृश्य ३

मुलगा अजून थोडा मोठा झालाय.एका झाडाखाली बसून तो पुस्तक वाचतोय.

कॉलेजच्या कार्यक्रमातलं गाणं

पहिलं प्रेमप्रकरण

संशोधन

लग्न

संगणक यंत्रसुरक्षा दलात शास्त्रज्ञ म्हणून निवड

पुढचं दृश्य

चारीबाजूंनी काळ्या सुटातल्या लोकांनी वेढलेली चकचकीत बहुमजली इमारत.त्यांच्या हातांमध्ये स्वयंचलित बंदुका,कानांवर अडकवलेली दूरभाष यंत्रं, प्रत्येकाच्या कॉलरवर संगणक यंत्रसुरक्षा दलाचं चिन्ह. पांढरा डगला घातलेला तो एका आलिशान गाडीतून उतरतो. एकापाठोपाठ एक सलाम झडतात. तिकडे लक्षही न देता तो घाईघाईने इमारतीत घुसतो.

पुढचं दृश्य

काही यंत्रमानव टेबलावर लवंडलेले. कसलातरी पक्का विचार करून त्याची बोटं भराभर लॅपटॉपच्या किबोर्डवर पडत आहेत.समोरच्या यंत्रमानवाला भराभर सुचना मिळत आहेत.

बीप बीप…धोक्याची सुचना.यंत्रमानवांनी आज्ञा स्वीकारणं बंद केलंय.

बीप बीप…एका यंत्रमानवाच्या हातात धारदार शस्त्र.संतापाने वेडापिसा तो भराभर किबोर्डवरची बटनं दाबतोय.पण काही उपयोग नाही.यंत्रमानवाच्या हातातील सुऱ्याने त्याला केव्हाच भोसकलंय.

बीप बीप…यंत्रमानवाने मनुष्याकृतीच्या मानेजवळचा प्लग काढून घेतला अन तो दरवाज्याबाहेर निघून गेला.

०:१०

० :०५

०: ००

रक्षितचे डोळे खाडकन उघडले.त्याचं ह्रदय छातीच्या पिंजऱ्यात धडधडू लागलं.तो काचेच्या त्या बंद पेटीमध्ये, त्यातल्या काठोकाठ भरलेल्या थंड द्रवामधे कुडकुडत होता.हॉलमध्ये नजर फिरवताच त्याच्या डोळ्यांत ओळखीचे भाव उमटले. ती त्याचीच प्रयोगशाळेत होती. इथेच त्याने कित्येक निर्जीव यंत्रांमध्ये जीव फुंकला होता ! त्याने पेटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, हातापायांनी काचेवर लाथा मारल्या. धातूवर धातू आदळण्याचा आवाज आला.वारंवार बसणाऱ्या धक्क्यांनी ती काचेची पेटी जमिनीवर कलंडली, खाली पडून फुटली.

रक्षित एकदाचा पेटीबाहेर पडला. दुरवरून कुठूनतरी गुणगुणण्याचा कर्कश्य आवाज येत होता;अज्ञात शब्द कानांवर आघात करत होते.

“वाचवा,वाचवा.” तो जोरात ओरडला. काहीच उत्तर मिळालं नाही. तळपाय जमिनीवर टेकवून त्याने उठण्याचा प्रयत्न केला. एकदा प्रयत्न केला, दोनदा केला.पण प्रत्येक वेळी तो तोल जाउन जमिनीवर कोसळला.जमिनीवरून सरपटत जाउन त्याने खिडकी गाठली. बाहेरचा रस्ता अगदी चिडीचूप होता.

ट्राफ़िकच्या दिव्यासमोर उभी असलेली वाहनं जागची इंचभरसुद्धा हलंत नव्हती.रस्त्याकडेच्या फरसबंदीवर कवट्या अन सापळ्यांचे ढीग रचलेले होते. गुणगुणण्याचा आवाज आता असह्य झाला होता. आकाशाकडे पाहता पाहता त्याने आपले कान घट्ट बंद केले.आकाशातला सुर्य ढगांआडून चमकत होता. हवेत उडणाऱ्या धातूच्या पंखांवरुन सुर्य परावर्तित होत होता. तेवढ्यात गरगर फिरणारं एक उडतं यंत्र त्या खिडकीच्या अगदी जवळून निघून गेलं. रक्षित अंगाचं मुटकुळं करून पटकन खिडकीखाली लपला.

हॉलचा दरवाजा खाडकन उघडला.पाठोपाठ दोनतीन यंत्रमानव आत घुसले.मोठमोठे लोखंडी डोके रक्षितसमोर, त्यांच्या निर्मात्यासमोर आदराने झुकले.

रक्षितला कळून चुकलं की आपला आत्मा यंत्रमानवांच्या ज्ञानग्रहणक्षम प्रजातीच्या हाती आहे. त्याचा प्रत्येक नवा अवतार, त्याची प्रत्येक नवी आवृत्ती त्याच्यातल्या माणूसकीला हळूहळू नष्ट करत चाललीये. आताच तर त्याच्या शरीरात मासापेक्षा धातूचं प्रमाण जास्त होतं. त्याचं यंत्रपरिवर्तन जवळजवळ पुर्णत्वास गेलं होतं. पण अजूनही तो थोडाफार मनुष्य होता. मेलो तरी बेहत्तर पण कोणत्याही परिस्थितीत त्याला यंत्र बनायचं नव्हतं.

रक्षितने पुर्ण बळ एकवटून खिडकीबाहेर उडी मारली.

* * *

यंत्रमानव शांत होते. त्यांनी चुपचाप अजून एक मानवाकृती शरीर काचेच्या पेटीत बंद केलं.एका यंत्रमानवाने संगणकाला जोडलेली रबरी नळी हाती घेतली अन त्या मानवाकृतीच्या मानेमागच्या सॉकेटमध्ये खोचली.

रक्षितची तेवीसावी यंत्रआवृत्ती बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

---------------------------------------------------

३ . प्रेमाचा विमा

चिंतेने झाकोळलेल्या दोन चेहऱ्यांनी इन्शुरन्स ऑफिसमध्ये प्रवेश केला.क्लायंट आलेले बघताच सेल्समनने पटकन आपली जागा घेतली. तिच्याकडे अन त्याच्याकडे एक कटाक्ष टाकून त्याने समोरची फाईल चाळायला सुरुवात केली.

“प्रिमियमचा हप्ता किती आहे ?” क्लायंटने विचारलं.

“त्याबद्दल आपण नक्कीच बोलू पण मॅडम मला सांगा की हे इन्शुरन्स तुम्ही का काढताय ?”

“का म्हणजे ? ज्या कारणासाठी तुम्ही ते लोकांना वाटता त्याचसाठी. आमचा बंगला, गाडी, मोबाईल यांचं इन्शुरन्स आम्ही काढलंय मग प्रेमासारख्या अमूल्य गोष्टीचं का काढू नये. आमचं प्रेम हे खरं प्रेम आहे याला तुमच्या यंत्रानीपण दुजोरा दिलाय.”

“हो बरोबर.”

“मग काय प्रॉब्लम आहे ?”

“इन्शुरन्स पास करण्याबद्दल काही अडचण नाही, पण हे एकदा बघून घ्या म्हणजे पुढची प्रोसेस करता येईल.”

सेल्समनने टेबलावरील डिजिटल फाईल तिच्या दिशेने सरकवली. दहा नंबरच्या मुद्द्याखाली लाल अंडरलाइन केलेली होती.

“आय कान्ट बिलिव्ह धिस. प्रिमियम चा एवढा मोठा हप्ता ?!! ग्राहकांची लूट लावलीय तुम्ही.”

“मॅडम थोडं स्पष्टच बोलतो. हे काही चॅरिटीचं ऑफिस नाहीये. जेवढी रिस्क जास्त, तेवढा प्रिमियमचा हप्ता मोठा, सिम्पल.”

" कसली रिस्क ??”

“आमच्या सर्व्हेनुसार मिश्र लग्न जास्त टिकत नाहीत.”

“काय फालतूपणा आहे हा. माझा विश्वास बसत नाही की अजूनही अशा जुनाट अन बुरसटलेल्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवता ! लग्न टिकणं, न टिकणं हे फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, ते म्हणजे प्रेम.”

“हीचं म्हणणं बरोबर आहे.” तिच्या नवऱ्याने दुजोरा दिला.

“जो नियम आहे तो मी तुम्हाला सांगितला. बाकी तुमची मर्जी.”

“डार्लिंग जाऊदे. यांच्या नांदी लागून फायदा नाही.”

“हे इन्शुरन्सवाले कसंकाय मला सांगतात की आपलं लग्न टिकणार नाही म्हणून. हाउ कुड दे डेअर टू से दॅट ?” तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता.

“प्लिज शांत व्हा मॅडम. माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नव्हता.”

“मग काय अर्थ होता ?? तुमची कंपनी मिश्र लग्नांच्या विरोधात आहे का ?"

“नो नो नो अजिबात नाही. मनुष्य अन अँड्रॉइडच्या लग्नाला आमचा अजिबात विरोध नाही. प्लीज पर्सनली घेऊ नका. धिस इज जस्ट बिझनेस.”

“अच्छा… तुमच्यासाठी हा फक्त एक बिझनेस आहे तर. मग तर विषयच संपला. चला हो, मला अजिबात थांबायचं नाही इथे.”

आणि ती नवऱ्याचा हात पकडून ऑफिसबाहेर पडली.

थोड्याच वेळात आतल्या खोलीचा दरवाजा उघडून बॉस बाहेर आला.

“सर तुम्ही ऐकलं सगळं ?”

“तर काय. ती किती जोरात ओरडत होती. अर्थात तिचं चिडणं सहाजिक होतं पण आकडे तर खोटं बोलत नाहीत न. अँड्रॉइड अन मानवांच्या पाच लग्नांपैकी फक्त एकच टिकतं. माणसाचं अन मशीनचं जमणं शक्य आहे का बाबा. उनके बारेमे ये ट्रू लव वगैरा सब झुट है l “

“एवढी पटाखा पोरगी आहे. एकापेक्षा एक भारी अँड्रॉइड भेटला असता तिला.”

“तेच तर. या माणसात काय पाहिलं तिने काय माहीत. बुटके, कमजोर अन कमी जगणारे माणसं कुठले. अन काय तो त्यांच्या अंगाचा घामाचा वास. माणूस दिसला की मी सेंसर बंदच करून टाकत असतो माझे. बरं झालं तू त्यांना कटवलंस ते. गुड वर्क.”

“थँक यू सर.”

“आजची तुझी शेवटची अपॉइंटमेंट होती न ही.”

“हो.”

“चल मग रिचार्ज करायला. बिल मी भरतो.”

“ग्रेट. लेट्स गो.”

-----------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज कीतीवेळेस चेक केल की कथुकली आली का. खुप उशीरा पोस्ट केली.
छान. सगळ्याच कथा एकदम मस्त. शेवटची जास्त आवडली.

सगळ्याच कथा भारियेत स्पेशली ती शेवटची
“आजची तुझी शेवटची अपॉइंटमेंट होती न ही.”
“हो.”
“चल मग रिचार्ज करायला. बिल मी भरतो.”
“ग्रेट. लेट्स गो.” >>> थिंकिंग पॉवरला सलाम काय सुचलय राव एकदम खत्री. पु. ले . शु.

अवांतर उत्सुकता किंवा जनरल कनौलेज म्हणून आपल्या रेग्युलर कथा आणि विज्ञानकथा यात नेमका फरक काय असतो . म्हणजे कथा वाचताना जाणवतो जो आहे ते पण तुम्ही स्पेशली टायटल मध्ये विज्ञानकथा अस लिहता म्हणून विचारतोय. ह्या कथा लिहायला काही वेगळा अभ्यास करावा लागतो का??

कथा आवडल्याबद्दल आनंद आहे. प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
अक्षय, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो -

वैज्ञानिक शोधांमुळे आसपास जे बदल घडतात त्याच्याशी जुळवून घेतांना विज्ञानकथा जन्म घेत असते.

बाकी कथा आणि विज्ञानकथा यांच्यातले ठळक फरक -

१. कथेतील विज्ञान/तंत्रज्ञान काढून घेतल्यास कथा कोसळत असेल तर तिने विज्ञानकथेचा पहिला निकष पुर्ण केला असं म्हणता येतं.
ही त्याला इतर कथाप्रकारांपेक्षा वेगळं करणारी मुख्य गोष्ट.

२. विज्ञानकथाकाराकडे भूत भविष्यामध्ये डोकावून पाहण्याची शक्ती असावी लागते. जे इतर प्रकारांमध्ये तितकं गरजेचं नसतं.

३. विज्ञानकथा जरा जास्त अभ्यास करून लिहावी लागते. कथेतील तांत्रिक गोष्टी अचूक असाव्या लागतात.

४. मला जाणवलेला अजून एक फरक म्हणजे विज्ञानकथा हा प्रकार सर्वात जास्त लवचिक आहे. म्हणजे तुम्ही Sci fi+ X सहज करू शकता ( Where X is social, horror, comedy, fairy, paranormal etc type of stories)

५. विज्ञानकथांचा अवाका खुप मोठा आहे. विज्ञानकथांचे जेवढे उपप्रकार आहेत तेवढे दुसऱ्या कुठल्याच कथाप्रकाराचे नाहीत.

इतर गोष्टी, जसं की पात्ररचना, तंत्र, कथा फुलवण्याचं तंत्र इतर प्रकारांप्रमाणेच. विज्ञानकथा ही आधी उत्तम कथा असते हे विसरून चालणार नाही.

विज्ञानकथेला आपण शक्यतांचा कथाप्रकार म्हणू शकतो. जास्तीत जास्त वेळा ती भविष्यकाळात लिहली जाते पण असंच काही गरजेचं नाही. विज्ञानकथा भूतकाळाच्या setting मध्येसुद्धा लिहता येतात.

कल्पनाशक्तीचा वापर करण्यात Fantasy नंतर विज्ञानकथांचाच नंबर लागतो.

As for as writing of sci-fi story is concerned, I will say -

close ur eyes, spread wings of imagination ..... and u will see your story Happy

close ur eyes, spread wings of imagination ..... and u will see your story
>> हे शेवटचं वाक्य माझं नाही, कुठेतरी वाचलं होतं.

दुसरी आणि तिसरी आवडली.

पहिली शिर्षक वाचून समजली Happy नाहीतर नाकातून रक्त येण्याचा आणि त्या एलीअनचा उगाच संबंध लावत बसलो असतो.

Light 1

अगदी छोट्या कथा लिहतांना एक अडचण असते ती ही की शैली establish करायला फारसा वाव मिळत नाही अन कथेच्या मांडणीत जास्त प्रयोग केल्यास वाचकांना ती कळणार नाही ही भिती असते.

त्यामुळे concept वर आणि twist वर भर देतोय. पण या प्रकारात मांडणीमध्ये थोडा सारखेपणा येणं सहाजिक आहे. त्याला इलाज नाही.
तरीही मी आशय, विषय, भाषा यामध्ये variation आणण्याचा प्रयत्न करत राहीन. Happy

अगदी छोट्या कथा लिहतांना एक अडचण असते ती ही की शैली establish करायला फारसा वाव मिळत नाही अन कथेच्या मांडणीत जास्त प्रयोग केल्यास वाचकांना ती कळणार नाही ही भिती असते.
>>
कदाचित मला काय म्हणायचंय ते मला नीटंस मांडता आलेलं नाहीये, पुन्हा प्रयत्न करते

तुमच्या कथा पुर्वी वाचायला घेताना मजा असायची कारण पुढे काय होतंय असं वाटत रहायचं.. आता महिती असतं की किमान एकतरी पात्र एलियन/ रोबोट असणारच आहे.. मग बोअर होतं वाचायला..
त्या ऐवजी त्यात वेगळेपणा असता (कधी एलियन, कधी रोबोट, कधी भुत, कधी माणसांचाच गैरसमज/ स्वप्न किंवा तत्सम) तर वाचायला मजा आली असती

हे माझं वैयक्तिक मत आहे, त्यासाठी तुम्हाला तुमची शैली/ गोष्ट बदलण्याची काहीच गरज नाही कारण हे तुम्ही लिहिताय ते तसंच कित्येकांना आवडतं की..
मी आपलं एक मत दिलं

अरेच्चा, असं तर काही नाहीये. भूत, गैरसमज वगैरे वेगवेगळ्या गोष्टींनी मी शेवट केलेले आहेत. फक्त यावेळी दोन कथांमध्ये शेवटी रोबोट आणि अँड्रॉइड येतोय ( दोन्ही वेगळ्या कॉन्सेप्ट्स)
खाली कथा आणि त्यापुढे शेवटी काय उघड होतं हे टाकत आहे -

1. ती रात्र : दगडी वाघ ( बदमाश भूत)

2. संघर्ष : अलार्म

3. आवाहन : प्रेमळ भूत

4. पार्टी आणि ते दोघे : निरागसतेतून निर्माण झालेला बालिश गैरसमज

5. स्मशानचोर : मानवी स्वभाव अन पैशाची हाव

6. परग्रहावरची मजा :गैरसमज

7. शशक चॅलेंज १ : टीव्ही

8. 0101 : संशोधनातली चूक किती महाग पडू शकते

9. पहिली भेट : humanoid , टाईम मशीन वगैरे

10. चॅलेंज 2 : purely सामाजिक शेवट

11. टेस्ट सब्जेक्ट : क्लिनिकल रिसर्च मधील घोळ भविष्यातही चालूच राहणार

याला आधी लिहलेल्या कथा जोडल्या असता आतापर्यंत फक्त दोन कथांमध्ये एलीयन आहेत, रोबोट, humanoid वगैरे लोकंही एकदा किंवा जास्तीत जास्त दोनदा आले आहेत Happy