कथा आणि व्यथा

Submitted by Prshuram sondge on 23 April, 2017 - 11:09
ठिकाण/पत्ता: 
बीड . . महाराष्ट्र

कथा आणि व्यथा
**************
**एका माणसाची गोष्ट **
शेवटची बस चुकली. आता खाजगी वाहना शिवाय पर्याय नव्हता. पाण्याची बाटली घेतली. ढसा ढसा पाणी प्यायलो. आता खाजगी वाहन जिथं लागतात तिकडं निघालो.थोड पुढं चलत गेलो की एक पोरगा पळत पळत आडवा आला. तो पण ओरडतचं," साहेब, पाटोदा ना ?"
" हो, तुला कसं कळलं ?"
" असं कसं ? तुम्हाला कोण ओळख नाही? " अशी स्तुती केली की मला थोड मूठभर मांस अंगावर चढल्यासारखं वाटलं.
" बरं तुझी गाडी कोणती ?'
" मॅक्स आहे साहेब "
" टेप ?"
" आताच नवा कोरा बसविला ...सांऊड सिस्टीम पण.."
" पण ड्रायवर चांगला का ?"
" एकच नंबर ? त्याच्या ड्रायव्हींगला तोड नाय. लय हात साप त्याचा"
" अरे...! तो दारू वगैरे ?"
" आता साहेब धंदाच असलाय ? पण स्टेरिंग हातात तोपर्यंत थेंबाला पण शिवत नाही. लयं तात्वीक माणूस .त्याच्या इतकं या लाईनीत शिकलेलं नाही कुणी "
तो फार कॅान्फीडन्शली बोलत होता.त्यानं माझ्या हातातली बॅग घेतली व चालू लागला. मी ही अटी मान्य करूनचं घेतल्या. खाजगी जीपनं प्रवास करत असाल तर तुमचा रूबाब असतो. रूबाब गाजवण्याची तशी संधी तर नक्कीचं मिळते.
जीप जवळ आल्या नंतर त्यांन पुढची सीट रिकामी करून दिली कारण मी डायरेक्ट होतो. डायरेक्ट सीटाचा वेगळाच वट असतो. दोन पोट्टयांना त्यांनी उठवून मला जागा दिली.ते पोट्टे फारच खुनशी नजरेने पहात होते. त्यांना राग येणं स्वभाविक आहे.
गाणी लावून देऊन तो पुन्हा स्टॅंडकडे गेला.गाडी भरण्यासाठी अजून पाचेक माणसाची गरज होती.
पलीकडं एका वेडया बाभळीच्या चिमूटभर सावलीत पत्यांचा चांगलाच डाव रंगला होता. बहुतेक ते सारे ड्रायव्हर असावेत. ते ओरडायचे. हासायचे.अलीकडं जिपडयाच्या सावलीत दोनं पेताड चेकाळली होती. ते काय पण बोलायचे. ना शेंडा ना
बुडखा..." कमालीचं बोर झालं होतं.
थोडावेळ गेला की ते पोट्टं पाच सहा सीट घेऊन आलं . ते सीट पाहून माझा जीव भांडयात पडला. आता गाडी हाऊस फुल्ल झाली. ड्रायव्हर आला . मध्ये दोन महिला आणि दोन पोरी बसल्या . मागं ते पोरं नि दोन म्हतारे बसले. गाडी हलवायची की एक साहेब आला. तो धिप्पाड तर होताचं पण त्याच्या शरीराला विशिष्ट अकार नव्हता. तो अमिबा सारखा बहू आकृती दिसत होता. ते हळूहळू चालत आला.
'फटयार्यंत येतो'" त्याच्या तोंडात मोठा तोबरा होता. त्याच्या त्या विशाल मुखातून शब्द बाहेर पडतानी द्रव्याचे
काही थेंब इतरत्र उडाले. ती स्वारी एकदम माझ्या पाशी येऊन उभी राहिली. त्याला माझी जागा हवी होती.त्याच्या बरोबर अजुन दोघे होते. ते पण पुढंच बसणाऱ होते. मी माझी जागा देण्याचा प्रश्नच नव्हता. मी उठत नाही हे ड्रायव्वरच्या लक्षात आलं.तो शिताफीनं पुढं आला.
. . . मला विनंती करू लागला. मला बाजूला बोलावून घेतलं. मी बाजूला झालो की ते तिथं बसले. माझ्यासमोर माझ्या जागेवर ते लोक विराजमान झाले. मला त्यांनं हळूचं कानात सांगितलं,
" ते पोलिस .त्यांना फटयापर्यंत यायचं.त्यांना जागा दयावीचं लागेलं.तुम्ही सर अहात समजून घ्या.नसेल तर उतरा . मी मजबूर...उग तमाशा करू नका ."
त्याच्या या शब्दांचा मला राग आला. मी रागानं जाग्यावरचं तडफडू लागलो.
त्या पोट्टयाकडं बघितलं. मी रागातच होतो.ते लांबूनचं म्हणालं
," जाऊ दया सर. थोडा अॅडजेस्ट करो. बडा सायब है."
आता मला तर काहीचं पर्याय नव्हता.
मागे ही जागा नव्हती. तसाच लटकलो. गाडी सुरू झाली. मागे बसलेली पोट्टे नुसती हसायची.डोकायची. रागाचा पण पारा असतो का? रागाचा सर्वेच्च बिंदू मी गाठला होता.हे सर्वांनाच कळतं होतं. मी जाग्यावरचं फणफण करत होतो.
" हे शिंदया ... जागा दिल्याचं लयीचं कुणाच्या जिव्हारी लागलं आसलं तर मी उतरतो खाली. बघतो उदया तुझी गाडी कशी चलती ते."
" तसं नाय साहेब. कुठं कुणाला राग आलाय? सर ते ! ते आमची माणसं . करत्यात अॅडजेष्ट . सर ..!! राग आलाय का तुम्हाला .?"
छे..!! मला कसला राग ?" कमी जास्त बोललो असतो तर त्यानी मला निम्याचं रस्त्यात उतरील असतं. मग काय करणार ?
लटकी राम करून तसाच माझा प्रवास सुरू झाला.
ते बिंलीदर गप्प ही बसतं नव्हतं. नुस्त्या गप्पा मारी. आपण कसं रिमांड काढतोत. कस एका एकाला गार करतोत. त्याच्या शौर्याच्या कथा ते सांग. ते अप्रत्यक्षपणे मला दमचं देत होतं. ड्रायव्हऱ नुसतं कोलदंडा घातलेला माणसावाणी हूँ...हूँ..हूँ... करी. बरं यांनी खाल्ला होता मावा .ते बसलं मध्ये. थुंकत भी नसे. तोंड बंद ही ठेवत नव्हतं.तोंडात तसचं मटेरिअल... झालं काय ?
कसा काय त्याचा ताबा सुटलान् कसा नाही.ते सारं द्रव्य... तिथं बसलेल्या पाहूण्यांच्या अंगावर उसळलं. सारे गंभीर झाले पण मला कुठं हसू आवरतं? मी तसच ओठ चावतं हसून घेतलं.मी हासतो हे आतल्य पोरीने पाहिलं नि तिचा बांध फुटला. मग काय सारेच हासले.ते बिलिंदर ही हासलं. मग काय करेल ?
" प्रवासात आसलं काही बाही नाही खायला पाहिजे...हा...हा..." पुन्हा दाताड काढत बसलं.
त्याच्या थोबाडात उरलं सुरलेलं मटेरिअल बाहेर पडलं. तेवढयातली तेवढयात अंकूचन पावले पण कुणी छी..!!छी... !! थू ...थू केली नाही.
शिरापूर फाटा आला. त्याचे दोन पाहूणे उतरले.त्यांनी भित भित खिशातचं हात घातले.
तेवढयात हे ओरडलं," काय करता ?गाडी काय लोकाची काय आपलीचं.ते तुमच्याकडून कसे पैसे घेतील?"
' सायबाचे पाहूणे तेचं आमची भी पाहूणेच की "
" येऊत का ड्रायव्हर साहेब ?"
" ड्रायव्हर नाहीत ते .ते मालक आहेत या गाडीचे"
गाडीचं मालक म्हटल्यावर तो खुश झाला.
"बरं मालक ...काही चहा पाणी?"
तसा तो मालक उतरला. जवळच्या हॉटेलवर गेले.चहा पाणी घेतलं. टपरीवर पुडी घेतली.
आला आणि गाडी सुरु केली. मला आत जागा झाली होती.बसलो.मी त्याच्याकडं बारकाईनं पहात होतो.
त्यानं आपलं मला एकदा सॉरी म्हणून घेतलं. त्याच्या गाडीचा वेग ही वाढला होता. त्याला रागच आला असावा.
आम्ही पाटोदयात उतरलो.त्याला पैसे दिले.सारे प्रवासी पांगले.माझा पाय ओढत नव्हता. त्याला वाटलं माझा रागचं गेला नाही.
" जाऊ दया सर .हे पोलिस लयं विचित्र असतात .त्यांच्या हातात आमचा धंदा .आमच्या धंदयावरचं घर चालतं. हा धंदा असला दोन नंबरचा "
"मला राग नाही आता. तुझा हा धंदा दोन नंबरचाय? मग तो पोलिस होता ना ! त्याची भिती नाही वाटतं तुला ?"
" छे..! भिती कसली.हप्ता देतो आपण ? वर पासून खाल पर्यंत सारे बरबटलेलेत साले.सारे भाडखाऊ आहेत."
" तुला राग येऊ देऊ नकोस .शिक्षण महत्त्वाचं."
" काय नाय सर.... एम ए बी.एड सर मी.ते पण इंग्लीश...."
" मग नोकरी ?"
" गरीबाला कसली नोकरी? शेत विकलं नि आता ही गाडी घेतली त्यात हे असले डोमकावळे ?आज सारं तोटयात गेलं. डिझेल पण नाय निघलं. पुन्हा पाचशे नेलं सर उतरतानी त्यांनी.
मुद्दलात खोटं... मरता येत नाय आणि जगता येत नाही . टू भी ऑर नाँट टू भी दॅट इज क्वशन "
त्यांन खिशातली पुडी काढली.अख्खी तोंडात सोडली. बाय केलं. मला उगचं त्या पोलिसाचं शिक्षण काय असेल असा प्रश्न पडला .या देशात ब-याचं चांगल्या खूर्च्या नालायकांनी बळकावल्या आहेत.
मी नुसतं तिथं पहात राहिलो.
परशुराम सोंडगे ,पाटोदा (बीड)

माहितीचा स्रोत: 
तारीख/वेळ: 
रविवार, April 23, 2017 - 11:04
Group content visibility: 
Public - accessible to all site users