BMM2017 - भोजन-समितीबरोबर गप्पा

Submitted by समीर on 21 April, 2017 - 01:44

एखादा घरगुती कार्यक्रम असो अथवा मोठे अधिवेशन, त्यात भोजनाचा मेन्यू काय आहे, याची सर्वांना उत्सुकता असते. जेवण उत्तम असेल तर कार्यक्रमाचे निम्मे यश निश्चित होते. यजमानांना ही व्यवस्था कशी करावी, याबद्दल बरीच तयारी करावी लागते. उत्तर अमेरिकेत होणारे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशनही याला अपवाद नाही. मायबोली टीमने २०१७च्या ग्रँड रॅपीड्स अधिवेशनाच्या भोजन समितीबरोबर या विषयावर सविस्तर चर्चा केली.

मायबोली टीम - अ‍ॅश, जॉय, दीपा आणि तुषार, तुम्ही तुमच्या व्यग्र वेळापत्रकातून मायबोलीला वेळ दिला, याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. मायबोलीकरांना तुमची काय तयारी चालू आहे, नेमकी काय कामं असतात याबद्दल, तसंच तुमची ओळख वाचायला आवडेल.

Ash.pngअ‍ॅश नाईक - नमस्कार, मी अ‍ॅश नाईक. माझा जन्म गोव्याचा आहे. माझं बालपण पणजीत गेलं. माझं शिक्षण गोवा इंजिनीयरींग कॉलेजमध्ये झालं. गेली २१ वर्षं अमेरिकेत मी सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करतोय. २०१७च्या अधिवेशनात मी स्टिअरींग कमिटीत भोजन-समितीचा (food committee) प्रमुख आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन आमच्या गावात, म्हणजे मिशिगनमध्ये २८ वर्षांनी पुन्हा होतंय. ही संधी आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही सगळेच खूप उत्साहात आहोत. अधिवेशनासाठी येणार्‍या पाहुण्यांना जेवणाचा एक आगळावेगळा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. साधारण ३५००-४००० पाहुणे आम्हाला अपेक्षित आहेत. एवढ्या सगळ्या मंडळींची चोख व्यवस्था ठेवणं, हे जरी कठीण काम असलं, तरी आमची समिती यासाठी सज्ज आहे आणि आम्हाला खात्री आहे की, या अपेक्षा आम्ही पूर्ण करू. ’बीएमएम २०१७’ म्हटलं की आलेल्या मंडळींना इथल्या उत्कृष्ट जेवणाची आठवण राहिली पाहिजे. आम्ही सर्वांना एका मराठी gastronomical tourवर नेणार आहोत. हे चार दिवस सर्वांच्या जिव्हा तृप्त करणार आहोत. यावेळचं वैशिष्ट्य म्हणजे विविधतेनं समृद्ध असा मेन्यू आम्ही तयार करत आहोत, ज्याबद्दल तुम्हाला दिपा इंगळे जास्त माहिती देतील.

Deepa_photo.PNGदीपा इंगळे - नमस्कार, मी दीपा इंगळे. मी कॅन्टन, मिशिगनमध्ये राहते. अमेरिकेत जवळजवळ गेली २० वर्षं आहे. मूळची मी दादर, मुंबईची आहे. बालमोहन विद्यामंदीरमध्ये शालेय शिक्षण आणि रुपारेलमध्ये कॉलेज पूर्ण केलं. मला वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. आमच्या स्थानिक मंडळातदेखील आम्ही याच विभागात स्वंयसेवा करतो. मी आतापर्यंत दोन अधिवेशनांना उपस्थित राहिली आहे. त्या अनुभवांचाही आमच्या तयारीत उपयोग केला आहे. त्यामुळे आता बीएमएमला आमच्या पाहुण्यांचं स्वागत करायला आम्ही उत्सुक आहोत.

आपल्याकडे पाकशास्त्रात असं म्हणतात की, आपण अन्न आधी डोळ्यांनी पाहतो, नंतर त्याचा सुगंध घेतो आणि शेवटी जिव्हेने स्वाद घेतो. तर आम्ही आमचा मेन्यू ठरवताना या गोष्टींचा विचार केला आहे. पुलंच्या ’तुम्हाला कोण व्हायचंय? पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर’ या लेखात म्हटल्याप्रमाणे त्या त्या ठिकाणचा जाज्ज्वल्य अभिमान असणारे अस्सल मराठी खाद्यपदार्थ आम्ही आपल्या मेन्यूमध्ये समाविष्ट केलेले आहेत. हा मेन्यू महाराष्ट्रातील विविधता दाखवणारा असेल. तसंच बरेचसे पदार्थ, जे आता फक्त आठवणीत उरले आहेत, म्हणजे आपण म्हणतो की, हे पदार्थ आपली आजी अथवा आई करत होत्या, पण आम्ही बऱ्याच वर्षात खाल्लेले नाहीत, असे पदार्थ आम्ही निवडले आहेत. उपस्थितांना हे अधिवेशन आपल्या खाद्यसंस्कृतीसाठी लक्षात राहावं, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी, थालिपीठ असणार आहे. पहिला दिवस ’कोल्हापूर विशेष’ आहे. कचोरी, भरली वांगी , कोंबडीचा तांबडा रस्सा. संध्याकाळी ’कोकण - मालवण विशेष’ - त्यात काजूची उसळ, चिकन सागुती, अणसाफणसाची भाजी असेल. दुसर्‍या दिवशी ’मुंबई कट्टा’मध्ये काठी रोल्स, मुंबईकरांना आठवेल अशी फ्रँकी, पावभाजी, दहिवडे असणार आहेत. सर्वांना आवडतील असे शाकाहारी व मांसाहारी पदार्थ असणार आहेत. मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा वरण-भाततर दोनही दिवस असेल. नागपुरी पदार्थांत सावजी चिकन, पातोडी रस्सा आणि शेवटच्या दिवशी पुरी, बटाट्याची भाजी, श्रीखंड असेल. आमच्या डेट्रॉईट्ची खासियत आहे अरेबिक जेवण. त्यामुळे शेवटच्या दिवशी फलाफल, हमस, पिटा ब्रेड, तबुली, बकलावा असे पदार्थ आम्ही Packed lunch boxमध्ये देणार आहोत.

आणखी एका गोष्टीचा आम्ही विचार केला, तो म्हणजे चटण्या, ज्या मराठी जेवणात हव्याशा असतात. बर्‍याचदा त्या इथे तयार करता येत नाहीत, म्हणून प्रत्येक भारतभेटीतून परतताना आम्ही घेऊन येत असतो. तर लसूण चटणी, शेंगदाण्याची चटणी अश्या विविध चटण्या प्रत्येक जेवणात असतील. त्याचप्रमाणे उन्हाळ्याचे दिवस असल्याने नेहमी ताक असेल.

मायबोली टीम - वा दीपा, तुमचा मेनू ऐकून आताच भूक लागली आहे.

Joy.jpgजॉय बोस - नमस्कार मी जॉय बोस. नाव जरी बंगाली असां तरी मी पक्का मराठी आहे. माझा जन्म पुण्याचा आणि वाढलो नागपूरमध्ये. शालेय शिक्षण सोमलवार हायस्कूल आणि कॉलेज हिस्लॉप. मी अ‍ॅन आर्बर, मिशिगनमध्ये गेली १५ वर्षे रहातो. आणि या अधिवेशनात भोजन समितीचा मी चेअरपर्सन आहे. रेस्टॉरंट व्यवसायाचा मला जवळ जवळ एक दशकाचा अनुभव आहे. सुरुवातीलाच अ‍ॅशने म्हटल्याप्रमाणे ३५००-४००० पाहुण्यांची भोजनव्यवस्था सांभाळणं, हे कसरतीचं काम आहे. ती व्यवस्था नीट व्हावी म्हणून आम्ही एक Operational research टीम तयार केली आहे. रांगा व्यवस्थित पुढे कशा सरकतील याचा आम्ही विचार केला आहे. त्यासाठी आमचं मुख्य ध्येय आहे की, कोणालाच ५-१० मिनिटांपेक्षा जास्त थांबावं लागू नये. उद्घाटन सोहळा संपल्यावर सर्व भुकेले असतात. तर तेव्हा त्यांना फार वेळ थांबावं लागलं तर अधिवेशनाची मजाच जाते. त्यासाठी आम्ही बुफे टेबल्स किती आणि कसे ठेवावेत, याचा विचार केला आहे. ज्येष्ठ मंडळींना किंवा व्हिलचेअरवर असलेल्या पाहुण्यांना फार चालावं लागू नये, म्हणून त्यांची व्यवस्था प्रवेशद्वाराच्या जवळ करत आहोत. VVIP मंडळींसाठी वेगळा भोजनकक्ष असेल. एकंदर प्रयत्न हा आहे की, सर्वांना भोजनाचा छान आस्वाद घेता यावा.

हे अधिवेशनाच्या तीन दिवसांबद्दल झालं. त्याशिवाय आदल्या दिवशी एक PreConvention आहे. तुषार सामंत या व्यवस्थेविषयी सांगतील.

BMM Photo_Tushar Samant.JPGतुषार सामंत - नमस्कार, मी तुषार सामंत. मी मूळचा वसईचा आहे. तिथल्या न्यू इंग्लिश स्कूलमधुन शाळा पूर्ण केली. वर्तक कॉलेजमध्ये इंजिनीयरींगचं शिक्षण घेतलं. गेली दहा वर्षे मी डेट्रॉईटमध्ये राहतो. मी अधिवेशनातील फुड कमिटीचा को-चेअर आहे, तसंच यावर्षी डेट्रॉईट मंडळाचा अध्यक्ष आहे. मला खूप आनंद होतोय की, मी या समितीत काम करतोय, कारण जेवण हा माझा अत्यंत आवडता विषय आहे. PreConvention हे २०१७च्या अधिवेशनाचं एक आकर्षण आहे. गुरुवारी, म्हणजे ६ तारखेला तीन कॉन्फरन्स होणार आहेत. सिनियर मंडळींसाठी उत्तररंग, मेडीकल प्रोफेशनल्ससाठी CME आणि business conference. पुण्याला जसं विद्येचं माहेरघर म्हणतात, तसं डेट्रॉईटला Automobile Industryचं माहेरघर म्ह्टलं जातं. या विषयातील विविध मान्यवरांना एकत्र आणण्याचं काम हे PreConvention करणार आहे. त्यांच्या विषयावरील चर्चा होत असतांना किंवा झाल्यावर त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याचं काम आमची समिती करते आहे. विविध स्तरांमधले, वयोगटातील या मंडळींचा विचार करून आम्ही मेन्यू ठरवला आहे.

याशिवाय संध्याकाळी बॅंक्वे डिनर असणार आहे. त्यात संगीताचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाआधी आम्ही एका वेगळ्या पद्धतीने जेवणाची व्यवस्था केली आहे. तिथे विविध प्रकारचे कॉर्नर्स असणार आहेत. ग्रील कॉर्नर, चाट कॉर्नर, सॅलाड कॉर्नर असे असणार आहेत. उपस्थितांना विविध चविचे पदार्थ तिथे अनुभवता येतील.

मायबोली टीम - या अधिवेशनात बाकी अधिवेशनांपेक्षा तुम्ही वेगळं काय करत आहात, याबद्दल काही सांगाल का?

अ‍ॅश नाईक - दीपा आधीच्या काही अधिवेशनांना उपस्थित राहिली आहे, त्यातून आम्ही काही सुधारणा किंवा चांगल्या गोष्टी काय होत्या त्याचा विचार केला आहे.

दीपा इंगळे: सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंसेवकांची आतिथ्यशीलता. भोजनकक्षात सर्वजण एकदम आलेले असतात, भूक लागलेली असते, जेवण उत्तम आहे याची जाणीव असते आणि पुढचा कार्यक्रम पाहण्याची घाई. इतक्या सर्व लोकांची हसतमुखाने व्यवस्था पाहणं महत्त्वाचं असतं. आलेल्या पाहुण्यांना आपलेपणा वाटतोय, आपली विचारपूस होतेय, हे आवर्जून जाणवलं पाहिजे.

डेट्रॉईट्मध्येच झालेल्या दुसर्‍या एका अधिवेशनाला आम्ही मुद्दाम शिकण्याच्या दृष्टीने उपस्थित राहिलो होतो. तिथे जेवणाचे रिकामे झालेले ट्रे भरणारे अभारतीय असल्यानं त्यांना पदार्थांची नावं माहीत नव्हती. त्यामुळे शाकाहारी मांसाहारी पदार्थांची सरमिसळ झाली. तर आपल्या अधिवेशनात हे टाळण्यासाठी नावाबरोबरच प्रत्येक पदार्थाला नंबर देणार आहोत. त्यामुळे कुठल्या पदार्थाचा ट्रे कुठल्या नंबरमध्ये जाणार हे त्यांना कळणं सोपं होईल. तिथेही आमची देखरेख असणार आहे. भोजनव्यवस्थेसाठी आम्ही ’राजभोग’ला कंत्राट दिलं आहे. त्यांना आम्ही मराठी पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत. त्यांना भेटून ते पदार्थ आपल्याला हवे तसे आम्ही करून घेणार आहोत. सर्व उपस्थितांना रुचकर जेवण कमीत कमी वेळात मिळणं महत्त्वाचं आहे आणि त्याची खबरदारी आम्ही सर्व स्वयंसेवक घेणार आहोत.

मायबोली टीम - दीपा, याआधी उपस्थित राहिलेल्या मंडळींकडून काही सूचना, अनुभव कळले का, ज्यांचा तुमच्या तयारीत उपयोग झाला?

दीपा इंगळे - या अधिवेशनाचा मेन्यू ठरवल्यावर आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्यांत मला एक नाव आवर्जून घ्यायला आवडेल, ते म्हणजे न्यू जर्सीच्या मीनाताई देशपांडे यांचं. त्यांनी बरीच अधिवेशनं पाहिली आहेत. त्यांचं आम्हाला अगदी मोलाचं मार्गदर्शन मिळालंय. त्या आवर्जून आमच्याशी बोलत असतात आणि आम्हीही त्यांना माहिती विचारत असतो.

वर म्हटल्याप्रमाणे एक महत्त्वाचा गोंधळ जो होऊ शकतो तो जर शाकाहारी / मांसाहारी पदार्थांची सरमिसळ झाली तर. ते टाळण्यासाठी आम्ही नंबर सिस्टीम करत आहोत. तसंच एके ठिकाणी अधिवेशनात नाश्त्यासाठी फक्त इडली चटणी होती, काँटीनेंटल पदार्थ नव्हते. त्यामुळे बर्‍याचजणांची गैरसोय झाली होती. आमच्या अधिवेशनात ते आम्ही टाळणार आहोत.

मायबोली टीम - धन्यवाद दीपा. अ‍ॅश, तुम्हाला शेवटी काही सांगायचं आहे का?

अ‍ॅश नाईक - मला वाटतं जेवणातील वैविध्य, जे आम्ही मेन्यूमध्ये दिलं आहे, ते आमच्या पाहुण्यांना आवडेल. वैदर्भीय, कोकणी पदार्थ आहेत. मी गोव्याचा असल्यानं चिकन शाकुती आहे. गोव्यातील एक खास भाजी आहे - अनसापणसाची भाजी, जी जेवणाचा X-factor असेल. उन्हाळ्यात गोव्यात अननस, फणस आणि आंबा खोबर्‍याचा वाटणात घालून केलेली ही भाजी सर्वांनाच आवडेल. तर आम्ही तुम्हां सर्वांचं स्वागत करण्यास उत्सुक आहोत. ६-९ जुलै ग्रँड रॅपीड्सला नक्की या.
या आमंत्रणाचा स्विकार करण्याकरता आजच नावनोंदणी करा.
https://www.bmm2017.org

Group content visibility: 
Use group defaults

टीम ला शुभेच्छा.. मागच्या काही अधिवेशनातून आलेले अनुभव पाठिशी असूदेत, म्हणजे यावर्षी तयारी करताना त्याचा उपयोग होईल.
जेवायला मी आहेच Happy

अबे अ‍ॅश, तू आहेस होय भोजन समिती मध्ये? हाउ डी? हनीवेल नंतर भेटलोच नाही आपण.

पण एक तक्रार आहे. जाहिरातीत विदर्भ, कोल्हापूर, कोकण, पुणे, मुंबई सगळं आहे, पण महाराष्ट्रात असणारा मराठवाडा मात्र नाही. Wink Proud

तुम्हाला शुभेच्छा !

टीमला शुभेच्छा !
< VVIP मंडळींसाठी वेगळा भोजनकक्ष असेल> हे मात्र पटले नाही.

VVIP मंडळींसाठी वेगळा भोजनकक्ष असेल. >>> मला पण हे अजिबात पटले नाही.

मागच्या लॉस अँजेलिसच्या अधिवेशनात, बहुतेक सगळं फूड न्यू जर्सीहून तयार करुन आण्ण्यात आलं होतं. या मागचं लॉजिक काय असावंं ?

भर आर्टेशियाजवळ अधिवेशन असताना, तिथे काय केटरर्स किंवा रेस्टॉरंटची कमी होती का? लोकल बिजीनेसेसना प्राधान्य का देत नाहीत?

बहुतेक सगळं फूड न्यू जर्सीहून तयार करुन आण्ण्यात आलं होतं. या मागचं लॉजिक काय असावंं ?>> शुगोल नाही हो, हे कोणी सांगितलं तुम्हाला? सुके पदार्थ आणले होते पण बकि ताजे पदार्थ अधिवेशन स्थळीच केले होते.

न्युजर्सीहून आलेलं फ्रोजन स्वरुपातलं फूड गरम करुन देण्यांत आलं, ही मला समजलेली बातमी.
ते तसं नव्हतं हे ऐकून बरं वाटलं. तुम्ही गाववालेच असल्यामुळे तुमची खबर नेमकीच असणार याची खात्री आहे.