खांडववनदाह, महाभारतातील हत्याकांडाचे एक आकलन - ३

Submitted by अतुल ठाकुर on 20 April, 2017 - 13:25

1200px-Krishnarjunas_fight_with_Gods.jpg

कथनशास्त्राच्या दृष्टीने पाहायचे झाले तर मूळात महाभारताचे कर्तृत्व जरी व्यासांकडे जात असले तरी तो अनेक शतके भर पडत घडत गेलेला ग्रंथ आहे त्यामुळे त्याचे कर्तृत्व कुणा एकाकडे देता येत नाही. संपूर्ण महाभारतच Anonymization या कथनशास्त्राच्या घटकाचा आधार घेऊन उभे आहे. एखाद्या कलाकृतीचे श्रेय हे पुज्य मानल्या गेलेल्या व्यक्तीकडे दिले गेले की त्याबद्दल चिकित्सा होण्याचा संभव कमी असतो. व्यास महाभारतात लिहितात आणि त्यात त्यांचा खुद्द सहभाग देखील असतो. पुराणांचे कर्तृत्व व्यासांकडेच आहे. योगावरील व्यासभाष्य तर प्रसिद्धच आहे. आणि या कृतींमध्ये शेकडो वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे व्यास ही खरोखर कुणी व्यक्ती आहे की अशा तर्‍हेने लेखन करणार्‍यांना व्यास हे नाव दिले जाते हे पाहावे लागेल. खांडववन कथा हा महाभारताचाच भाग असल्याने आणि ते पुज्य व्यासांनी सांगितल्याने त्याकाळात ही कथा जशीच्या तशी स्विकारली गेली असण्याची शक्यता आहे. एखादा अन्याय सांगणारी कथा सामान्य माणसाने सांगितल्यास त्याला जाब विचारणारी माणसे कदाचित उभी राहतील मात्र तीच गोष्ट एखाद्या वजनदार माणसाच्या नावे सांगितल्यास जाब विचारणारे उभे राहण्याची शक्यता कमी असते इतकाच मुद्दा या निमित्ताने येथे अधोरेखित करायचा आहे.

खांडववन दाह कथेचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे फँटासायझेशनचा. यात अग्निने ब्राह्मणाच्या रुपात येणे, वरुणाने येऊन दिव्य शस्त्रास्त्रे देणे, अर्जुनाला अक्षय भाता आणि गांडिव धनुष्य मिळणे, इंद्राने जबरदस्त वृष्टी करणे, निरनिराळ्या दिव्य अस्त्राचा वापर, श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राचा वापर करणे अशा अनेक अद्भुत गोष्टींची येथे रेलचेल आहे. या अद्भुततेमुळे एक दैवी झळाळी या कथेला मिळते. हे मुद्दाम सांगण्याचं कारण हे की त्यामुळे या अमानुष संहारालादेखील दैवी झळाळी मिळालेली आहे. हा काळ वेदांमधील देवतांचे महत्त्व कमी झाल्याचा असण्याची शक्यता आहे. कारण वरुण आणि इंद्र या वेदांमधले सर्वोच्च देवता. त्यांचे वेदात वर्णन येते तेच मुळी पृथ्वी, अंतरिक्ष यांना स्थिर करणारे अशा तर्‍हेचे अचाट, अक्राळ विक्राळ असे. इथे मात्र त्यांना मानवी आकार प्राप्त झाले आहेत. आणि आता त्याच देवतांपकी एक येऊन मागणी केल्याक्षणी कृष्णार्जुनाला निमुटपणे शस्त्रे देते. आणि एकाचा, ज्याला स्वर्गाचा राजा म्हणतात त्याचे या दोघांसमोर फारसे चालत नाही. त्यामुळे हा काळ वेदांमधील देवतांचे महत्त्व कमी होऊन शंकर, विष्णु अशा देवतांचे महात्म्य वाढीला लागण्याचा असण्याची शक्यता आहे. खांडववनातील संहाराची मागणी खुद्द अग्निची आहे त्यामुळे तेथेदेखिल अद्भुताचे वलय आहेच. कुठेतरी असे वाटते की या अदभुततेचे वलय काढून घेतले तर काय होईल? बहुधा ही कथा आहे त्यापेक्षा जास्त क्रूर वाटेल.

Allegorization चा भाग या कथेत प्रकर्षाने आढळतो. नाग किंवा सर्प म्हणवले गेलेले प्राणी हे वास्तविक प्राणी नसून नाग अथवा सर्प हे ज्यांचे चिन्ह (टोटेम) आहे अशा जमाती असाव्यात अशी दाट शक्यता या कथेत आढळून येते. एकंदरीतच या वनात, आदिवासी जमाती, असूर राहात असावेत असे वाटते. या जमातींची काही पुज्य अशी चिन्हे असतात. वनात राहात असल्याने ही चिन्हे पशूपक्ष्यांची असणे सहाजिकच आहे. ही माणसे वनातले मूळचे रहिवासी असणार. मात्र त्यांचा संहार केला हे सांगणे तत्कालिन ज्यांनी कुणी ही कथा सांगितली त्यांना देखील अवघड गेले असावे. त्यासाठी सर्प आणि नाग ही प्रतिके वापरली गेली. सर्वसाधारणपणे Allegorization चा वापर ही कथा सार्वकालिक आणि देशाच्या बंधनाच्या पलिकडे जाण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ पंचतंत्रातील प्राणीकथांमध्ये माणसाच्या जागी प्राण्याची प्रतिके वापरली गेल्याने त्या कथा कुठल्याही प्रांतात बंदिस्त राहिल्या नाहीत. विश्वव्यापी झाल्या. येथे मात्र Allegorization चा वापर मानवी हत्याकांडाची धार कमी व्हावी म्हणून झाला असावा असे मला वाटते.

महाभारताची कथा सांगण्याची स्वतःची एक पद्धत आहे. याला कथनशास्त्रात स्टायलायझेशन म्हणतात. क्षत्रिय राजे राज्य विस्तारासाठी अनेक उद्योग करीत असतात. पण ते सर्वांच्याच पचनी पडतील असे नसतात. शिवाय या उद्योगांची त्यांना जबाबदारीदेखील घ्यायची नसते. मग क्षत्रियाने द्युताचे निमंत्रण नाकारायचे नसते असा नियम सांगितला जातो. हा धर्माने घातलेला क्षत्रियांवरचा निर्बंध म्हणता येईल. आणि द्युत खेळले जाते. एक पार्टी हरते आणि पुढचे महाभारत घडते. असाच एक नियम म्हणजे ब्राह्मणाला दान नाकारायचे नाही. या नियमाचा फायदा घेऊन कर्णाचे कवचकुंडल मागायला इंद्र ब्राह्मणाच्या वेशात येतो. जरासंधाकडे द्वंद्व युद्धाचे दान मागण्यासाठी भीम, अर्जुन आणि कृष्ण पुन्हा ब्राह्मणाच्या वेशात जातात. तत्कालिन समाजाने घातलेल्या नियमांचा अभ्यास करून शत्रुलाच खडे चारण्यासाठी ते कसे वापरायचे याचे एक पद्धतशीर शास्त्रच जणु विकसित झाले असावे. त्याच पावलावर पाऊल ठेउन अग्नि कृष्णार्जुनाकडे येतो ते ब्राह्मणाच्याच वेशात. आणि खांडववन जाळण्याची भिक्षा मागतो. आता ब्राह्मणाला नाही कसे म्हणायचे? त्याची याचना पूर्ण केली जाते. कृष्णार्जुनाला त्या घटनेचे पातक त्यामुळे लागले नसणार. त्यांनी फक्त याचकाची याचना पूर्ण केली आहे. आणि तो याचक ब्राह्मण असल्याने त्याची याचना पूर्ण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

(क्रमशः)

अतुल ठाकुर


Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि कदाचित कौरव पांडवांच्या युद्धाच्या निमित्ताने पर्सनल स्कोअर सेटल करण्यासाठी पण काही जण उतरले असतील. युद्धात तक्षकाच्या मुलाने अर्जुनाला मारण्याचा निकाराचा प्रयत्न केला होता असे म्हणतात.

कौरवांचे सैन्यबळ जास्त असण्याचे कारण वेगळे आहे
एक तर ते सत्ताधारी होते, त्यामुळे राजांना वळवून घ्यायला त्यांच्याकडे साधने उपलब्ध होती
अनेक राजे कुणाची बाजू घ्यावी या द्विधा मनस्थितीत होते, अनेकांनी भीष्म, द्रोण यांच्याकडे पाहून कौरव पक्ष स्वीकारला
नातेवाईक म्हणून बाजू घेण्याचे प्रमाण फारसे नव्हते
आणि या सगळ्यात राजांच्या मताला किंमत होती, सामान्य सैनिकांना त्यांचा राजा म्हणेल तिथेच लढावे लागले. त्यांना विचारले असते तर तुमच्या भावा भावाच्या लढाईत आम्ही का मरु म्हणत निघून गेले असते, असेही प्रशिक्षित सैनिक पेक्षा ऐनवेळी जुजबी शिक्षण देऊन उभे केलेलेच जास्त होते.
ना त्यांच्या वाट्याला यश, पराक्रम, कीर्ती व कौतुक
फक्त लढत लढत मरून जायचे हेच काम

द्धात तक्षकाच्या मुलाने अर्जुनाला मारण्याचा निकाराचा प्रयत्न केला होता असे म्हणतात.>>>>
तक्षकाचा मुलगा अश्वसेन, कर्णाच्या भात्यात बाण बनून राहिला होता, खांडव वनात त्याची आई जळली त्याचा बदला घेण्यासाठी,
ऐनवेळी हा बाण येताना पाहून कृष्णाने रथ खाली दाबला आणि अर्जुनाचा मुकुट उडाला.

>>>>
एक तर ते सत्ताधारी होते, त्यामुळे राजांना वळवून घ्यायला त्यांच्याकडे साधने उपलब्ध होती>>>>
अर्थात they were better networked, सुरवातीला पांडवांच्या बाजूने पांचाल, आणि विराट सोडून कोणी नव्हतेच ( दोन्ही सोयरे, त्यात पांचालांचा द्रोणावर विशेष राग, शिखंडी चा भीष्मावर राग)

पूर्ण इतिहासात असेच आहे, १९४७ थोडेफार अपवाद

नाही सगळ्या युद्धात नाही, कित्येक साधे शिपाई बघता बघता पराक्रमाने सेनानी बनले असल्याची उदाहरणे आहेत. महाभारतात असे कुणी दिसत नाही.

मला रामायण महाभारत दोन्हीबद्दल बिगेस्ट इश्यू आहे स्त्रियांना दिलेली वागणूक. पांचालीचा अपवाद वगळता बहुपतीत्वाचे उदाहरण नाही. पुरूष मात्र कितीही लग्न करत होते आणि नवंरा मेलेला असला किंवा त्याने टाकले असले तरी पुनर्विवाहाचा रस्ता स्त्रीला बंद. पित्याचा वारसाहक्क तिला नाही. त्यातुलनेत युरोपियन ख्रिस्ती समाजात स्त्रीची स्थिती हजार वर्षांपूर्वीही तुलनेने बरी होती.
स्त्रियांचे इतके शाप घेणार्या संस्कृतीचा काहीतरी भयाण अंत होणे हेच योग्य वाटते. युगांत म्हणा वा पर्व संपले म्हणा, good riddance!

ख्रिस्ति धर्माला २ हजारच वर्षे झाली ... महाभारत स्त्रीया व ख्रिचन स्त्रिया ... डेटा कंपेरेबल कसा होइल?

त्यातुलनेत युरोपियन ख्रिस्ती समाजात स्त्रीची स्थिती हजार वर्षांपूर्वीही तुलनेने बरी होती.
>> ह्या माहितीला आधार काय?

प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली तर माझ्या माहितीप्रमाणे कौरवांचे सैन्यबळ पांडवांपेक्षा जास्त होते. याचाच अर्थ कौरवांच्या पक्षात जास्त राजे होते. कौरव अन्यायी असते तर हे शक्य झाले नसते असे मला वाटते.
>>
पण हा premise बरोबर वाटत नाही.
आज अमेरिके कडे बघा. जगाच्या द्ऱुष्टीने अत्यंत अन्यायाकारक धोरणे असून आणि त्यात आपला तोटा होत असूनही जगातले बरेच देश मिंधे आहेत किंवा powerless आहेत आणि वेळ आल्यास अमेरिकेला पाठिंबा देण्यावाचून पर्यायच रहात नाही.

बाकी ले ख आवडताहेत.

कौरवांपुर्वीचे भरत कुळी राजे हे न्यायी व प्रजाहितदक्ष म्हणुनच ओळखले गेलेले आहेत... धृतराष्ट्र भीश्माच्या सल्ल्यानेच राज्य चालवत होता... युद्धाबद्दल स्वतंत्र व आक्रमक भुमिका दुर्योधनाची असली तरी राजकारणातील सल्ल्यांबद्दल दुर्योधन भीष्म , विदुर , द्रोण यांना आदर देत असे.

...

पांडव लहानपणी जंगलात वाढले.
बाप मेल्यावर ते कौरवांच्या आश्रयाला आश्रित म्हणुन आले.
नंतर मग वारस कोण यावर ते द्युत , वनवास अज्ञातवास वगैरे ...
फक्त खांडववन व इंद्रप्रस्थ इतकेच त्यांचे सत्ताक्षेत्र होते.

महाभारत संग्राम्जिंकल्यावर मग ते पहिल्यांदाच अखंड हस्तिनापुराचे राजे झाले अन नंतर मग म्हातारपणी हिमालयात निघुन गेले.

पांडवांनी हस्तिनापुरावर राज्य त्यापुर्वी कधी केलेच नव्हते , मग ते प्रजाहितदक्ष होते हे तरी कशावरुन खरे मानायचे ?

...
( हे सगळे लिहिताना मला काँग्रेस व बीजेपी का आठवत आहे ? Proud )

पण हा premise बरोबर वाटत नाही.
आज अमेरिके कडे बघा. जगाच्या द्ऱुष्टीने अत्यंत अन्यायाकारक धोरणे असून आणि त्यात आपला तोटा होत असूनही जगातले बरेच देश मिंधे आहेत किंवा powerless आहेत आणि वेळ आल्यास अमेरिकेला पाठिंबा देण्यावाचून पर्यायच रहात नाही.

नानबा, कौरवांच्या काळी इतर राजे कौरवांचे मिंधे होते असा उल्लेख कुठेही आढळत नाही. तेव्हा कृष्णाला पराभूत करुन पळवून लावणारे जरासंधासारखे राजे होते. त्यांनी कौरवांचे मांडलिकत्व कधीही पत्करले नव्हते.

दुर्योधन हा उत्तम राजा आणि प्रशासक होता. खुद्द भीष्मही हे शरशय्येवर मान्य करतात.
खरंतर स्मृती व इतर न्यायशास्त्राप्रमाणे राज्यावर खरा हक्क दुर्योधनाचाच. नियोगाने कौरव राण्यांना मुलं झाली म्हणून ती कौरवच (जरी ब्लडलाईन वेगळी असली तरी). पण धृतराष्ट्र आंधळा होता म्हणून पंडुने त्याच्या वतीने 'रीजंट' म्हणून राज्य केले. रीजंटची मुलं राजे होऊ शकत नाहीत. धृतराष्ट्राची संतती, मोठा मुलगा अव्यंग असल्याने राज्यावर हक्क त्याचाच होता.

अर्थातच या घडामोडी झाल्या असतीलच तर स्मृती आणि अशा समाजनियमन सांगणार्‍या संहितांच्या बर्‍याच आधी झालेल्या असल्याने त्यांच्या कडे असे नियम असतीलच असे नाही. पण आपण सनातन हिंदू धर्माने सांगितलेली कथा म्हणून वाचताना (जसं रामायण वाचताना सुष्टदुष्ट विभागणी करतो तसं) धर्मशास्त्राचे नियम लावून बघितले तर कौरवांची बाजू न्याय्यच होती असं मला वाटतं. महाभारतात सुष्ट-दुष्ट अशी सरळ, स्वच्छ विभागणी कुठेच नाही. सगळीच 'माणसे' आहेत. गुंतागुंतीची व्यक्तिमत्वे, गुणावगुण यांची मिश्रणे आहेत.

आणि चिकित्सक प्रतीत द्रौपदी वस्त्रहरण नाहीये. म्हणजे तिचा अपमान आहे, तिला राजसभेत ओढत आणणं आहे, पण वस्त्रहरण नाहीये. असं माझ्या आठवणीप्रमाणे. परत एकदा तपासून बघायला हवंय.

जरा पुस्तकांत शोधाशोध केल्यावर असं दिसतं आहे की जरी दु:शासनाने तिचे वस्त्र ओढले आणि त्याजागी आणखी एक निर्माण झाले असा उल्लेख असला (कृष्णाचा धावा वगैरे काही उल्लेखच नाहीये) तरी नंतर प्रत्येक ठिकाणी द्रौपदी, भीम, युधिष्ठीर इ. च्या तोंडी जेव्हा तिच्या अपमानाचा उल्लेख येतो तेव्हाही फक्त तिच्या रजस्वला एकवस्त्रा अवस्थेत केसांना धरून फरफटत राजसभेत ओढत आणण्याचाच उल्लेख येतो, वस्त्र फेडण्याचा उल्लेख कधीच होत नाही. तेव्हा खरी घटना तेवढीच असावी असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

अतूल आणि वरदा
मस्त. त्यात तैमूरही मध्ये मध्ये फोडणी देतायत. वाचायला मजा येतेय.

तैमूर, तेव्हढं राजकारणी लोकांना आणू नका मध्ये.

द्रौपदी खरे तर पांडवांची नेता असायला हवी होती. तिने आपल्या आर्ग्यूमेंटसने द्युतात
हरवलेले सगळे परत मिळवले होते. पांडवांची पण मुक्तता केली होती, पण परत
द्युताचे निमंत्रण आले आणि युधिष्ठिराने परत सर्व गमावले.

महाभारतावर व्यासांचे शिल्प म्हणून नरहर कुरुंदकरांनी चिकित्सक पद्धतीने लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध आहे, खरेतर प्रस्तावनेतच कुरुंदकर स्पष्ट करतात की वेळोवेळी महाभारतावर दिलेल्या विविध व्याख्यानांचे एकत्रित रूप म्हणजे हे पुस्तक आहे. या पुस्तकात महाभारताच्या चिकित्सक प्रतीतील तसेच पारंपारिक प्रतीतील अनेक घटनांचा उहापोह आहे. वर वरदाताई सांगतात त्याप्रमाणे दुर्योधन प्रजेच्या संदर्भात कुशल प्रशासक होता असा उल्लेखही स्पष्ट आठवतो. धागालेखक म्हणतात त्याप्रमाणे युगांत मध्ये इरावतीबाई कर्वेंनी ह्या खांडववन दाह विषयावर बरेच चांगले लिखाण केलेले वाचलेले आठवते. एका बाबतीत कुरुंदकर, इरावतीबा‍ईंमध्ये आणि चिकित्सक प्रतीचे संपादक (संदर्भ – व्यासांचे शिल्प) यांचे एकमत आहे की भर पडत गेलीच पण अवघड किंवा विचित्र प्रकरणे (खांडववन दाह यासारखी) काढून टाकणे, दडपणे , पुढील हस्तलिखित प्रतीत प्रकरणच गायब करणे असे झाले नाही तर त्यासंदर्भात किंवा त्या प्रकरणाच्या सकारात्मक पुष्टीकरणासाठी (त्या त्या वेळेच्या समाजमान्यतेप्रमाणे) वेगळ्या कथा जोडल्या गेल्या.

औरस अनौरस हे प्रकार तर आजच्या काळाचे संदर्भ लावले तर महाविचित्र वाटतात पण या संदर्भात त्यावेळी असणारे बीजक्षेत्रन्याय वगैरे स्पष्टीकरण वाचता, ह्या गोष्टी समाजमान्य होत्या असे वाटते.

ज्यांना महाभारताविषयी कुतुहल आहे त्यांनी व्यासांचे शिल्प हे पुस्तक नक्की वाचावे असे सुचवावेसे वाटते.

अतुल - हे फक्त उदाहरण आहे. ॲनेक बाजू आणि अनेक कारणे असू शकतात हे दाखवण्यासाठी. परत कुरुकुलात भीष्म द्रोणाचार्य वगैरे असल्याने त्यांचा दरारा वगैरे असणारच.
पांडव चांगले असा दावा करत नाहिये अजिबात. पण ते प्रिमाईस बरोबर नाही वाटले.
बाकी तुमच्या लेख माले सारख्या लेखांमुळे माबो वर येणे जस्टिफायेबल वाटते. लेख्मालेकरता thanks.. Happy

Pages