खांडववनदाह, महाभारतातील हत्याकांडाचे एक आकलन - ३

Submitted by अतुल ठाकुर on 20 April, 2017 - 13:25

1200px-Krishnarjunas_fight_with_Gods.jpg

कथनशास्त्राच्या दृष्टीने पाहायचे झाले तर मूळात महाभारताचे कर्तृत्व जरी व्यासांकडे जात असले तरी तो अनेक शतके भर पडत घडत गेलेला ग्रंथ आहे त्यामुळे त्याचे कर्तृत्व कुणा एकाकडे देता येत नाही. संपूर्ण महाभारतच Anonymization या कथनशास्त्राच्या घटकाचा आधार घेऊन उभे आहे. एखाद्या कलाकृतीचे श्रेय हे पुज्य मानल्या गेलेल्या व्यक्तीकडे दिले गेले की त्याबद्दल चिकित्सा होण्याचा संभव कमी असतो. व्यास महाभारतात लिहितात आणि त्यात त्यांचा खुद्द सहभाग देखील असतो. पुराणांचे कर्तृत्व व्यासांकडेच आहे. योगावरील व्यासभाष्य तर प्रसिद्धच आहे. आणि या कृतींमध्ये शेकडो वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे व्यास ही खरोखर कुणी व्यक्ती आहे की अशा तर्‍हेने लेखन करणार्‍यांना व्यास हे नाव दिले जाते हे पाहावे लागेल. खांडववन कथा हा महाभारताचाच भाग असल्याने आणि ते पुज्य व्यासांनी सांगितल्याने त्याकाळात ही कथा जशीच्या तशी स्विकारली गेली असण्याची शक्यता आहे. एखादा अन्याय सांगणारी कथा सामान्य माणसाने सांगितल्यास त्याला जाब विचारणारी माणसे कदाचित उभी राहतील मात्र तीच गोष्ट एखाद्या वजनदार माणसाच्या नावे सांगितल्यास जाब विचारणारे उभे राहण्याची शक्यता कमी असते इतकाच मुद्दा या निमित्ताने येथे अधोरेखित करायचा आहे.

खांडववन दाह कथेचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे फँटासायझेशनचा. यात अग्निने ब्राह्मणाच्या रुपात येणे, वरुणाने येऊन दिव्य शस्त्रास्त्रे देणे, अर्जुनाला अक्षय भाता आणि गांडिव धनुष्य मिळणे, इंद्राने जबरदस्त वृष्टी करणे, निरनिराळ्या दिव्य अस्त्राचा वापर, श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राचा वापर करणे अशा अनेक अद्भुत गोष्टींची येथे रेलचेल आहे. या अद्भुततेमुळे एक दैवी झळाळी या कथेला मिळते. हे मुद्दाम सांगण्याचं कारण हे की त्यामुळे या अमानुष संहारालादेखील दैवी झळाळी मिळालेली आहे. हा काळ वेदांमधील देवतांचे महत्त्व कमी झाल्याचा असण्याची शक्यता आहे. कारण वरुण आणि इंद्र या वेदांमधले सर्वोच्च देवता. त्यांचे वेदात वर्णन येते तेच मुळी पृथ्वी, अंतरिक्ष यांना स्थिर करणारे अशा तर्‍हेचे अचाट, अक्राळ विक्राळ असे. इथे मात्र त्यांना मानवी आकार प्राप्त झाले आहेत. आणि आता त्याच देवतांपकी एक येऊन मागणी केल्याक्षणी कृष्णार्जुनाला निमुटपणे शस्त्रे देते. आणि एकाचा, ज्याला स्वर्गाचा राजा म्हणतात त्याचे या दोघांसमोर फारसे चालत नाही. त्यामुळे हा काळ वेदांमधील देवतांचे महत्त्व कमी होऊन शंकर, विष्णु अशा देवतांचे महात्म्य वाढीला लागण्याचा असण्याची शक्यता आहे. खांडववनातील संहाराची मागणी खुद्द अग्निची आहे त्यामुळे तेथेदेखिल अद्भुताचे वलय आहेच. कुठेतरी असे वाटते की या अदभुततेचे वलय काढून घेतले तर काय होईल? बहुधा ही कथा आहे त्यापेक्षा जास्त क्रूर वाटेल.

Allegorization चा भाग या कथेत प्रकर्षाने आढळतो. नाग किंवा सर्प म्हणवले गेलेले प्राणी हे वास्तविक प्राणी नसून नाग अथवा सर्प हे ज्यांचे चिन्ह (टोटेम) आहे अशा जमाती असाव्यात अशी दाट शक्यता या कथेत आढळून येते. एकंदरीतच या वनात, आदिवासी जमाती, असूर राहात असावेत असे वाटते. या जमातींची काही पुज्य अशी चिन्हे असतात. वनात राहात असल्याने ही चिन्हे पशूपक्ष्यांची असणे सहाजिकच आहे. ही माणसे वनातले मूळचे रहिवासी असणार. मात्र त्यांचा संहार केला हे सांगणे तत्कालिन ज्यांनी कुणी ही कथा सांगितली त्यांना देखील अवघड गेले असावे. त्यासाठी सर्प आणि नाग ही प्रतिके वापरली गेली. सर्वसाधारणपणे Allegorization चा वापर ही कथा सार्वकालिक आणि देशाच्या बंधनाच्या पलिकडे जाण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ पंचतंत्रातील प्राणीकथांमध्ये माणसाच्या जागी प्राण्याची प्रतिके वापरली गेल्याने त्या कथा कुठल्याही प्रांतात बंदिस्त राहिल्या नाहीत. विश्वव्यापी झाल्या. येथे मात्र Allegorization चा वापर मानवी हत्याकांडाची धार कमी व्हावी म्हणून झाला असावा असे मला वाटते.

महाभारताची कथा सांगण्याची स्वतःची एक पद्धत आहे. याला कथनशास्त्रात स्टायलायझेशन म्हणतात. क्षत्रिय राजे राज्य विस्तारासाठी अनेक उद्योग करीत असतात. पण ते सर्वांच्याच पचनी पडतील असे नसतात. शिवाय या उद्योगांची त्यांना जबाबदारीदेखील घ्यायची नसते. मग क्षत्रियाने द्युताचे निमंत्रण नाकारायचे नसते असा नियम सांगितला जातो. हा धर्माने घातलेला क्षत्रियांवरचा निर्बंध म्हणता येईल. आणि द्युत खेळले जाते. एक पार्टी हरते आणि पुढचे महाभारत घडते. असाच एक नियम म्हणजे ब्राह्मणाला दान नाकारायचे नाही. या नियमाचा फायदा घेऊन कर्णाचे कवचकुंडल मागायला इंद्र ब्राह्मणाच्या वेशात येतो. जरासंधाकडे द्वंद्व युद्धाचे दान मागण्यासाठी भीम, अर्जुन आणि कृष्ण पुन्हा ब्राह्मणाच्या वेशात जातात. तत्कालिन समाजाने घातलेल्या नियमांचा अभ्यास करून शत्रुलाच खडे चारण्यासाठी ते कसे वापरायचे याचे एक पद्धतशीर शास्त्रच जणु विकसित झाले असावे. त्याच पावलावर पाऊल ठेउन अग्नि कृष्णार्जुनाकडे येतो ते ब्राह्मणाच्याच वेशात. आणि खांडववन जाळण्याची भिक्षा मागतो. आता ब्राह्मणाला नाही कसे म्हणायचे? त्याची याचना पूर्ण केली जाते. कृष्णार्जुनाला त्या घटनेचे पातक त्यामुळे लागले नसणार. त्यांनी फक्त याचकाची याचना पूर्ण केली आहे. आणि तो याचक ब्राह्मण असल्याने त्याची याचना पूर्ण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

(क्रमशः)

अतुल ठाकुर


Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळात ही कथा नसून इतिहास असावी किंवा नंतर अ‍ॅड केलेली असावी. खांडववन दहन मूळ महाभारताच्या कथेला पुढे नेत नाही. अर्जुनाला दिव्यास्त्रे आणि रथ नंतरही देता आले असते. - माझे वैयक्तिक मत.

छान.

मागच्या भागांच्या लिंक लेखाच्या शेवटी अ‍ॅड करा

मला असे वाचल्याचे आठवते की अर्जुनाला दिव्यस्त्रे त्याने देवांची मदत केली म्हणून मिळाली. त्याच वेळी उर्वशी अभिलाषा व्यक्त करते आणि नकार मिळाल्यावर एक वर्ष नपुंसक होशील असा शाप देते.

महाभारतात इतकी महा प्रचंड कथानके आणि व्यक्तिरेखा आहेत की केवळ नुसत्या नावांनी एक ग्रंथ भरेल.

आपल्याकडे लोकांचा एक समज असतो - शेवटी सत्याचाच विजय होतो.
त्यामुळे ज्यांचा विजय होतो ती बाजू सत्याचीच हे ढोबळमानाने ठरवून मोकळे होतात, आणि दैवत्वही त्यांनाच दिले जाते.
तसेच आणखी एक म्हणजे ईतिहास हा नेहमी जेते लिहितात हा फंडा पुराणालाही लागू असण्याची शक्यता आहे.
अन्यथा पांडवांच्या बाजूनेही असले एकेक अचरट प्रकार झाले आहेत तरीही त्या काळी म्हणे यात काही वावगे मानले जायचे नाही म्हणत त्याचे समर्थन दिले जाते. अगदी नाहक मरणार्‍याची काहीच चूक नसली तरी त्याच्या मागच्या जन्मीचेच भोग म्हटले की झाले.

चांगला लेख. वाचतोय.
महाभारत वाचताना युद्धातील द्रोण ते दुर्योधन अगदी प्रत्येक सेनापतीचा निप्पात करताना काय काय क्लुप्त्या वापरल्या आणि त्याच कशा धर्माला अनुसरून कशा होत्या हे वाचलं की गम्मत वाटते.
खांडववन जाळणे लेख आणि तुमची टीका आवडत्येय वाचायला. धन्यवाद.

मिळालेल्या / जिंकलेल्या प्रदेशात जेत्याने मृत्यूचे थैमान घालणे हे शिष्टसंमतच आहे तर लोक तैमुरलंग , बाबर व जनरल डायरला का नावे ठेवतात ?

मूळात ही कथा नसून इतिहास असावी किंवा नंतर अ‍ॅड केलेली असावी. खांडववन दहन मूळ महाभारताच्या कथेला पुढे नेत नाही. अर्जुनाला दिव्यास्त्रे आणि रथ नंतरही देता आले असते. - माझे वैयक्तिक मत.

खरं तर तसं नाही. खांडववनात मयासूर हाती लागतो. त्याला जीवनदान दिले जाते. तो मयसभा बांधून देतो. त्यात दुर्योधन जमीन समजून पाण्यात घसरून पडतो आणि द्रौपदी हसते. पुढचे महाभारत ठावूक आहेच.
याच कथेत तक्षक वाचतो मात्र याचा सूड तो परिक्षिताला दंश करून घेतो. त्याचा बदला म्हणून पुढे जनमेजय सर्पसत्र करतो. अशा घटना या खांडववन दाह कथेशी निगडीत आहेत त्यामुळे ही कथा महाभारत कथेला पुढे नेत नाही हे मान्य करणे कठिण आहे.
कथेला फारसे पुढे न नेणार्‍या घटनेचे उदाहरण सांगायचे म्हणजे रामायणातील शबरीची कथा. ती कथा तेथे फक्त आहे. रामाचे आणखी एक गुणवर्णन यापलिकडे ती कथा रामकथेला पुढे नेण्यासाठी काही करते असे वाटत नाही.

छान आहे मलिका! एकदम इंट्रेस्टिंग.
लेख नं २ वर वरदाची पोस्ट पण फार इंट्रेस्टिंग होती.

आणखी मोठा हवा होता हा भाग.. या प्रसंगाच्या वर्णनात नाग सैरावैरा पळू लागले
असे काहिसे शब्द येतात ना ? ज्यावेळी मी ते वाचले तेव्हाही ती जमातच असावी असे वाटले होते.
पुढच्या भागात आणखी सविस्तर वाचायला मिळेल.

हि भर कशी पडली यात अशी शक्यता असेल का, कि जो भाग लोकांना खोटा वाटेल
त्याला मग असे काहितरी दैवी चमत्काराचे वलय द्यायचे ?

आता १०० कौरवांचे बघा. एका स्त्रीला १०० पुत्र होणे अशक्य आहे. त्याकाळी ज्याने
आधी हे वर्णन केले असेल त्याला १०० हा अंक फार मोठा वाटला असेल
( साडी दिली शंभर रुपयांची, या गाण्यात आहे तसे !! )

मग नंतर , गांधारीला गुल्म झाले, त्याचे शंभर भाग केले, आणि ते कुंभात
ठेवले, असे कथानक रचले गेले असेल.

या सगळ्यांचा भैरप्पांनी लावलेला अर्थ जास्त पटतो, आणि ते सर्व मुलगेच का
होते, त्यात मुली का नव्हत्या, याचे त्यांनी दिलेले कारणही पटते.

हि भर कशी पडली यात अशी शक्यता असेल का, कि जो भाग लोकांना खोटा वाटेल
त्याला मग असे काहितरी दैवी चमत्काराचे वलय द्यायचे ?

लोकांना खोटा वाटेल पेक्षा जो भाग लोकांना सरळ सांगता येणार नाही किंवा जो सांगणे सोयीचे नसेल किंवा जे तत्कालिन समाजाच्या देखील नीति नियमांना धरून नसेल त्याला दैवी चमत्काराचे वलय दिले जात असावे असे मला वाटते.

अर्थात कथानक सर्वांकडून स्विकारलं जावं हा एक महत्वाचा उद्देश दैवी झळाळी देण्यामागे असतो हे नाकारता येत नाही. काही प्राचीन शास्त्रांची उत्पत्ती ब्रह्मदेवापर्यंत नेऊन भिडवली जाते यामागचं इंगित हेच असावं.

या सगळ्यांचा भैरप्पांनी लावलेला अर्थ जास्त पटतो, आणि ते सर्व मुलगेच का
होते, त्यात मुली का नव्हत्या, याचे त्यांनी दिलेले कारणही पटते.>> अगदी पटते. भैरप्पांचं बरंचसं पटलं मला तरी!

कथानक सर्वांकडून स्विकारलं जावं हा एक महत्वाचा उद्देश दैवी झळाळी देण्यामागे असतो हे नाकारता येत नाही. काही प्राचीन शास्त्रांची उत्पत्ती ब्रह्मदेवापर्यंत नेऊन भिडवली जाते यामागचं इंगित हेच असावं.

सहमत .. या झळाळी देण्याच्या प्रयत्नाने अखंड हिंदुस्तानला गांधारीची पट्टी बांधण्यात संबंधित लोक यशस्वी झालेले आहेत.

मुळात पांडू व त्याचे वारस याना सामान्य जनतेने सॉफ्ट कॉर्नर का द्यावा हे अद्याप समजलेले नाही. पांडू धडधाकट होता ( त्याचा तो पंडु रोग सोडला तर) . त्याने राज्य संभाळणे अपेक्षित होते. पण शरीरसुख घेता येणार नाही, याचा शाप मिळाल्याने सर्व राज्याचा त्याग करुन तो जंगलात गेला. तिथे नियोगाने मुले निर्माण करण्याचा त्याचा हेतुही स्वतःला स्वर्गप्राप्ती करण्यास पुत्र असावा , हाच होता. राज्याला वारस मिळावा हा हेतु नव्हता, अन्यथा नियोग तर राजवाड्यातही होऊ शकला असता. कुंती माद्री यांचाही राजकारणात सहभाग शून्य होता.

धृतराष्ट्र अंध असुनही इतरांच्या मदतीने अखेरपर्यंत राज्य संभाळत राहिला , कुंतीला व तिच्या मुलाना त्यांच्या गरजेच्या वेळी सहाय्य व त्यानंतर राज्याचा हिस्सा देऊनही तो मात्र आजही भारतीय जनतेच्या नजरेतून उपहासाचाच विषय आहे. पांडू व पांडुपुत्र अनेक वर्षे जंगलातच राहिले, राज्यापासून दूर .. राज्याचा वारस कोण यावर इतका रक्तपात घडवून हजारो तरुणांचे अपमृत्यू , अनेक स्त्रीया विधवा होणे व मागची पिढी नसल्याने कुमार्गाला लागलेली पुढची पिढी ( संदर्भ : गीता , पहिला अध्याय , अर्जुनाचे व कृष्णाचे युद्धाचे दुष्परिणाम यावरील श्लोक) इतके जनतेचे डिग्रेडेशन करुन अखेर पश्च्च्ताप होऊन पापनाशनासाठी तेही पुन्हा राज्य व प्रजा सोडून हिमालयात निघून गेले. पण तरीही भारतीय जनतेची सहानुभूती अनेकदा राज्य सोडून जनतेपासुन दूर राहिलेल्या पांडवांप्रतीच जास्त का आहे, हे मला न उलगडलेले कोडे आहे.

महाभारत हे भरत कुळाचा वारस कोण यावर घडले. त्यातली एक पार्टी अन्यायकारक होती व दुसरी जनतेचा उपकारक होती, असा कोणताही इतिहासात दाखला नाही. राजघराण्याच्या अंतर्ग्त प्रश्नावर जनतेने रक्तपात करवून घेणं हाच एक वेडेपणा होता.. इतिहासात अनेकदा असे रिपिट झालेले आहे.

पण पांडवांची बाजू धर्माची होती असं वारंवार प्रतिपादल्या जातं. मुख्य म्हणजे कृष्ण त्यांच्या बरोबर होता. त्यांची बाजू सत्याची होती..म्हणून ते राज्य करण्यास व त्यावर हक्क सांगण्यास अधिक पात्र होते. याउलट कौरव सदैव अविचाराने वागत राहिले. उन्मत्त व घमेंड ठेवत पांडवांशी व्यवहार केला. द्रौपदीची भर सभेत विटंबना केली...म्हणून पांडवांप्रती सहानुभूती!

तैमूर,
मी सहमत आहे. मला वाटते महाभारतातला मूळ मुद्दा होता तो अनौरस आणि औरस पुत्रांचा.
आणि त्याबाबतीत कौरवांचे म्हणणे बरोबर होते.
पांडवामधेही फार गुण होते, अश्यातला भाग नाही. फक्त त्यांना शस्त्रे चांगली मिळाली.
कृष्णासारखा कुशल राजकारणी मित्र मिळाला. पण त्याने फार काही साध्य झाले असे नाही.

दिनेश...... असे का म्हणता...? पांडवांना अखेरीस जय मिळाला. ... हं....समाधान नाही मिळाले...पण ते कोणत्याच युद्धात मिळत नाही.
कृष्णा सारख्या लोकोत्तर पुरुषाचा सहवास मिळाला. जीवनाचे तत्वज्ञान आकळले.
अनौरस आणि औरस पुत्रांबद्दल कौरवांचे म्हणणे मलाही पटते. ही नीती पुढे अनेक राजांनी अवलंबिली व घराण्यांचा उदयास्त झाला.
सुख, यश, साफल्य........शेवटी काय याचे गमक..? व्याख्या?

अनौरस आणि औरस पुत्रांबद्दल कौरवांचे म्हणणे मलाही पटते.
>>>>
असहमत,
व्यास हा वेदवती चा अनौरस मुलगा ( कुरुवंशाशी त्याचा संबंध नाही)
त्याच्या पासून धृतराष्ट्र, आणि पांडू झाले, पांडू ने नियोग करून पांडव पैदा केले,
म्हणजेच यात सगळेच अनौरस, कोणीच मूळ कुरुवंशाशी संबंधित नाही,
म्हणून झगडा केवळ राज्य कोणी मिळवायचे या बाबत होता.

कृष्णा सारख्या लोकोत्तर पुरुषाचा सहवास मिळाला. जीवनाचे तत्वज्ञान आकळले.

Proud

ही त्यांची वैयक्तिक अचिव्हमेंट झाली. जनतेच्या सुखा दु:खाशी / जनतेच्या प्रगतीशी याचा काय संबंध ? जनतेच्या गरजा त्याने भागल्या का ? जनतेला त्याने सुख मिळाले का? राजाने तप करावे, तत्वज्ञान समजुन घ्यावे, कुंडलिनी जागी करावी ,, या कामांसाठी जनतेने राजा निवडून दिलेला असतो का?

पांडवाना जय मिळाला ? काय गमावले त्यात ? सर्व पुत्र ... याला जय म्हणायचा ?
स्वर्गारोहणात द्यूताचे व्यसन असणारा धर्म स्वर्गात पोहोचतो ( आणि त्याचा कुत्रा ) हा न्याय झाला ?

माझ्या या विधानाने खळबळ माजणार हे नक्की ! पण समोर आहेत ते तूझे गुरु आणि बंधू असले तरी त्यांचा वध
कर .. हा सल्ला माझ्या धर्माच्या कल्पनेत बसत नाही. मूळात एखाद्या प्रसंगात, त्या वेळेला, त्या प्रसंगी (कदचित योग्य असलेल्या)
सुनावलेल्या चार युतीच्या गोष्टी.. हा सार्वकालिक धर्म होऊ शकतो, हे मला पटत नाही.. आणि हे सर्वच
धर्माच्या बाबतीत खरे आहे.

सिम्बा... सगळे कौरव, ध्रुतराष्ट्राचे पुत्र होते आणि पांडवापैकी कुणीच पंडूचे पुत्र नव्हते... हा मुद्दा.

वारसा हक्क !!!

१. एक कोळीण + एक गंधर्व = मत्य्सगंधा ( सत्यवती)

२. सत्यवती + पराशर = व्यास

३. व्यास + अंबिका / अंबालिका = धृतराष्ट्र व पंडू

४. कुंती / माद्री + पाच देव = पांडव ( कर्णही तसाच)

विद्याधर पुंडलिक यांची "चक्र" हि एकांकिका होती.. ( बहुदा काल्पनिक ) त्यात द्रौपदीला उपरती होते
आणि ती म्हणते कि हा विनाश त्यांच्यापैकी कुणीही थांबवू शकले असते. त्यात ती अश्वथाम्याला
बोलावून, त्याच्या जखमेत तेल घालते..

हे असेच खरोखर महाभारतात असते तर मला आवडले असते.

सिम्बा... सगळे कौरव, ध्रुतराष्ट्राचे पुत्र होते आणि पांडवापैकी कुणीच पंडूचे पुत्र नव्हते... हा मुद्दा.>>>>>>
हो पण ज्यांचे राज्य होते ते कुरु भीष्माच्या रूपाने असह्यय बघत होते,
आणि 2 उपरे लोक, आणि त्यांची औरस/अनौरस मुले कोणी राज्य करायचे या वरून भांडत होते.

Btw आपण मागचे काही मेसेज पांडवांच्या " अनौरस" पणाची चर्चा का करतो आहोत?
"त्या" काळच्या नितिनियमांप्रणाने नियोग पद्धतीने झालेली मुले औरस होती,
त्यामुळे औरस अनौरस हा मुद्दा तेव्हा आला नसेल,

कारण ते दासीपुत्र होते. व्यास व दासी यांचे पुत्र .. भरतकुळाशी त्यांचा काहीच संबंध नव्हता.

कर्तूत्व हे जन्मावर आधारीत नसते, असे सांगणारा दुर्योधन अद्याप जन्माला यायचा होता.

एक मुद्दा उल्लेखनीय आहे तो म्हणजे कौरव राज्यकर्ते म्हणून कसे होते आणि पांडव कसे होते यावर फारसे भाष्य झालेले दिसत नाही.
म्हणजे कौरव जनतेवर अत्याचार करत होते, नागरिक हलाखीत जीवन जगत होते का? का पांडव राज्य म्हणजे रामराज्य होते?
ज्या हस्तिनापूर च्या कौरव लोकांना पांडवांनी मोठ्या संख्येने ठार मारले त्याच प्रजेवर नंतर पांडवांनी राज्य केले तेव्हा जनतेने त्यांना साथ दिली का?

कौरव राज्यकर्ते म्हणून कसे होते आणि पांडव कसे होते यावर फारसे भाष्य झालेले दिसत नाही.
कारण अत्याचारी राज्यकर्त्यांच्या तावडीतून जनतेला सोडवणे हा त्यांचा कधी अजेंडा च नव्हता,
हि केवळ संपत्ती/अधिकार मिळवण्यासाठी होणारी लढाई होती,
मुघल राजपुत्रात व्हायची तशी.

एक मुद्दा उल्लेखनीय आहे तो म्हणजे कौरव राज्यकर्ते म्हणून कसे होते आणि पांडव कसे होते यावर फारसे भाष्य झालेले दिसत नाही.
एक संदर्भ द्यायचा तर भारविच्या "किरातार्जुनीय" नाटकाच्या पहिल्याच अंकात युधिष्ठिराचा हेर त्याला वनात भेटुन दुर्योधन कसा उत्तमप्रकारे राज्यकारभार करीत आहे ते सांगतो. त्या संपूर्ण भाषणात दुर्योधनाची खुप स्तुती केली आहे.

आणि प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली तर माझ्या माहितीप्रमाणे कौरवांचे सैन्यबळ पांडवांपेक्षा जास्त होते. याचाच अर्थ कौरवांच्या पक्षात जास्त राजे होते. कौरव अन्यायी असते तर हे शक्य झाले नसते असे मला वाटते.

Pages