श्रीसाईसच्चरित भाग २. अध्याय १ . शब्दार्थ आणि भावार्थ

Submitted by आनन्दिनी on 19 April, 2017 - 23:20

श्रीसाईसच्चरित भाग २. अध्याय १

मंगलाचरण
ओवी १३ ते ४२ भावार्थ

आजच्या टू मिनिट नूडल्सच्या जगात बर्याच जणांना हे भलं मोठ्ठं  मंगलाचरण म्हणजे पाल्हाळ वाटू शकतो. मी माझ्या वैद्यकीय विद्यार्थीदशेत असताना जेव्हा श्रीसाईसच्चरित वाचत असे तेव्हा मी हे मंगलाचरण पटकन 'वाचून टाकत' असे कारण मला मुख्यत्वे रस कथांमध्ये होता. आता मी विचार करते की हेमाडपंतांना इतक्या सगळ्या लोकांना वंदन करण्याची गरज का वाटली असेल? बरं त्यातही नावं न घेतल्यामुळे ही मंडळी, जसं की वेगवेगळे देव, ऋषी,संत हे रागावणार होते असंही नाही. मग एवढी मोठी यादी कशाला? उत्तर आहे हेमाडपंतांच्या मनात असलेली 'कृतज्ञता'. गणपती, सरस्वतीपासून ते काकीपर्यंत सर्वांप्रती ते कृतज्ञ आहेत. तीच कृतज्ञता या मंगलाचरणात दुथडी भरून वाहताना दिसते. आपल्या आयुष्यात आपल्याला कोणाकोणाबद्दल अशी कृतज्ञता वाटते? आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी, आजोबा, आजी, मावशी, काका, मुलं, मित्र असंख्य उत्तरं येतील. सारी चांगलीच आहेत पण आई वडील. ....हे सारे लोक ज्याने आपल्याला दिले त्या परमात्म्याबद्दल आपल्या मनात सर्वाधिक कृतज्ञता असायला हवी ना? 

श्रोत्यांना वंदन करणारे हेमाडपंत तर लीनतेची परिभाषाच बदलतात. 'नाही मज व्युत्पत्ती ज्ञान ' म्हणणारे हेमाडपंत, हे प्रतिकूल परिस्थितीतून वर येऊन वयाच्या ४२ व्या वर्षी मामलेदार होते. त्यांनंतर मुंबईत रेसिडेंट मॅजिस्ट्रेट म्हणून बरीच वर्ष सर्व्हिस करून १९१६ साली ते निवृत्त झाले. अश्या या रिटायर्ड मॅजिस्ट्रेटला , छंद म्हणून लेखन करताना श्रोत्यांना साष्टांग नमस्कार करून अवधान द्या म्हणून विनंती करण्याची काय गरज आहे? काहीही नाही. पण 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' . हेमाडपंत हेसुद्धा वरवर प्रापंचिक वाटत असले तरीही त्यांची जातकुळी ही संतांचीच आहे. मुलाच्या हितासाठी त्याला औषध देताना आई जशी त्याला बाबापूता करून औषध त्याच्या गळी उतरवते  तसे हेमाडपंतसुद्धा स्वतःकडे लहानपण घेऊन आपल्यासारख्या प्रापंचिकांना अवधान द्या म्हणून विनवत आहेत.

 फळांनी लगडलेलं झाड फळभाराने झुकलेलं असतं याचं हेमाडपंत मूर्तिमंत उदाहरण आहेत. आपल्या स्व-अर्जित गोष्टींचा डिग्रीचा, नोकरीचा, पैशांचा अहंकार जेव्हा आपल्याला होतो तेव्हा हेमाडपंतांसारख्या सर्वार्थाने श्रेष्ठ आणि तरीही लीन असलेल्या व्यक्तींचं स्मरण स्वतःला करून दिलं पाहिजे.

'नाही केले ग्रंथपारायण' म्हणणारे हेमाडपंत श्रीगुरुचरित्र, विष्णुसहस्रनाम, एकनाथी भागवत, रामायण यांचा नियमित पाठ करत असत. उपनिषदे आणि भगवद्गीता इत्यादी ग्रंथांचाही त्यांचा व्यासंग होता. निवर्तण्या आधी सुमारे एक महिना ते दररोज श्रीकृष्ण निधनाचा श्री एकनाथी भागवतातील विसावा अध्याय वाचत असत. या सार्या वाचनाबद्दल, पठणाबद्दल , ज्ञानाबद्दल कोणतीही प्रौढी मिरवणं तर दूर , या सार्याची वाच्यताही ते कुठे करत नाहीत.
आपण जेव्हा आपल्या वाचनाचा, पठणाचा गवगवा करतो तेव्हा आपला हेतू काय आहे हे आपण तपासून पाहणं जरूरी आहे. आपण सांगितलं नाही तर 'त्या'ला कळणार नाही का? लोकांना प्रभावित करण्याचं साधन म्हणून तर आपलं वाचन पठण नाही ना? अश्या प्रश्नांची उत्तरं आपण स्वतःच शोधली पाहिजेत .

माझ्या सद्गुरूंनी सांगितलं आहे की साईसच्चरित हे फक्त साईबाबांचं नव्हे तर त्यांच्या प्रत्येक भक्तांचही चरित्र आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक भक्त आपल्याला कांहीनाकाही शिकवत आहे.  हेमाडपंतांपासूनच आपला धडा सुरु झाला . हेमाडपंतांएवढी लीनता माझ्याकडे या घडीला तरी नाही पण तरीही मी तुम्हाला आग्रह करते, विनंती करते की साईसच्चरिताने माझं आयुष्य बदललं, माझा आयुष्याचा दृष्टिकोन बदलला. तो ग्रंथ नाही , कल्पतरू आहे, त्याचा अवश्य लाभ घ्या .

इति श्री सद्गुरू चरणार्पणमस्तु
हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ.

आनन्दिनी

शब्दार्थ

ओवी १३ ते १७

आतां नमूं ब्रम्हाकुमारी । सरस्वती जे चातुर्यलहरी ।            या मम जिव्हेसी हंस करीं । होईं तिजवरी आरूढ ॥१३॥
ब्रम्हावीणा जिचे करीं । निढळीं आरक्त कुंकुमचिरी । हंसवाहिनी शुभ्रवस्त्री । कृपा करीं मजवरी ॥१४॥
ही वाग्देवता जगन्माता । नसतां इयेची प्रसन्नता ।            चढेल काय सारस्वत हाता । लिहवेल गाथा काय मज ॥१५॥
जगज्जननी ही वेदमाता । विद्याविभव गुणसरिता । साईसमर्थचरितामृता । पाजो समस्तां मजकरवीं ॥१६॥ साईच भगवती सरस्वती । ॐ कारवीणा घेऊनि हातीं । निजचरित्र स्वयेंचि गाती । उद्धारस्थिती भक्तांच्या ॥१७॥

आता सरस्वती मातेला वंदन असो. माता सरस्वती जी बुद्धिचातुर्याची देवता आहे, तिने माझ्या (मनरूपी) जिभेवर आरूढ व्हावे ॥१३॥

जिने हातात ब्रह्मवीणा धारण केली आहे, जिच्या कपाळावर कुंकू सुशोभित आहे, हंस हे जिचे वाहन आहे अश्या धवल वस्त्रे परिधान करणार्या आई सरस्वती , माझ्यावर कृपा कर  ॥१४॥

ही वणीची देवता, जगताची माता , हिच्या आशीर्वादाशिवाय विद्वत्तापूर्ण कार्य शक्य तरी आहे काय! मग मला (त्याशिवाय) हे लेखन कसं करता येईल  ॥१५॥

ह्या जगताच्या जननीने, वेद जिच्यापासून उत्पन्न झाले अश्या या विद्वत्तेच्या स्रोताने, गुणांच्या सरितेने (नदीने) माझ्याकरवी या साईसमर्थांच्या चरित्राचे  अमृतपान सर्वांना करवावे ॥१६॥

साईच साक्षात सरस्वती आहेत. ॐकाराचा नाद करणारी वीणा हाती घेऊन, भक्तांच्या उद्धाराकरिता साईनाथ स्वतःच स्वतःचे चरित्र गात आहेत ॥१७ ॥

ओवी १८ ते २१

उत्पत्तिस्थितिसंहारकर । रजसत्त्वतमगुणाकार ।            ब्रम्हा विष्णु आणि शंकर । नमस्कार तयांसी ॥१८॥
हे साईनाथ स्वप्रकाश । आम्हां तुम्हीच गणाधीश ।     सावित्रीश किंवा रमेश । अथवा उमेश तुम्हीच ॥१९॥
तुम्हीच आम्हांतें सद्नुरु । तुम्हीच भवनदीचें तारूं ।        आम्ही भक्त त्यांतील उतारू । पैल पारू दाविजे ॥२०॥
कांहींतरी असल्याशिवाय । पूर्वजन्मींचे सुकृतोपाय ।      केवीं जोडतील हे पाय । ऐसा ठाय आम्हांतें ॥२१॥

उत्पत्ति स्थिति आणि संहार करणारे, रजस्,  सत्त्व आणि तमस् गुण धारण करणारे (अनुक्रमे) ब्रम्हा , विष्णू आणि शंकर यांना नमस्कार असो ॥१८॥

स्वतः प्रकाशाचा स्रोत असणारे साईनाथ, आम्हांला तुम्हीच गणांचा ईश (गणपती) , सावित्रीचा पती (ब्रम्हा) किंवा रमेचा पतीही (विष्णू)  तुम्हीच आणि उमेचा पतीही (शंकर) तुम्हीच ॥१९॥

आमचे सद्गुरू तुम्हीच. ही भवनदी पार करून नेणारी आमची नौकाही तुम्हीच. आम्हांला संसार सागरातील प्रवाशांना पैलतीराला (मोक्ष) घेऊन चला ॥२०॥

पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य पाठीशी असल्याशिवाय या सद्गुरुंच्या चरणांची सोबत मिळणार नाही हे आम्हांला कळून चुकलं आहे ॥२१॥

ओवी २२ ते २५

नमन माझें कुलदैवता । नारायणा आदिनाथा ।                 जो क्षीरसागरीं निवासकर्ता । दु:खहर्ता सकळांचा ॥२२॥
परशुरामें समुद्र हटविला । तेणें जो नूतन भूभाग निर्मिला ।     प्रांत ‘कोंकण’ अभिधान जयाला । तेथ प्रगटला नारायण ॥२३॥
जेणें जीवांसी नियामकपणें । अंतर्यामित्वें नारायणें । कृपाकटाक्षें संरक्षणें । तयाच्या प्रेरणेआधीन मी ॥२४॥
तैसेंचि भार्गवें यज्ञसाङ्गतेसी । गौडदेशीय ज्या महामुनीसी ।   आणिलें त्या मूळपुरुषासी । अत्यादरेंसीं नमन हें ॥२५॥

नाथांचा नाथ, क्षीरसागरात निवास करणारा, सकळ दुःखांचं हरण करणारा, असा माझं कुलदैवत असणार्या नारायणाला नमस्कार असो ॥२२॥

(विष्णूचा सहावा अवतार) श्री परशुरामाने समुद्र (४०० योजने) मागे हटवून कोकणची भूमी निर्माण केली. तिथे नारायण प्रकट झाला ॥२३॥

हा नारायण सर्वांच्या अंतर्यामी आहे. तो नियमन करून आपल्या कृपादृष्टीने सर्वांचं रक्षण करतो. तोच मला प्रेरणा देतो ॥२४॥

तसेच भार्गव मुनींनी यज्ञाच्या सांगतेसाठी (पूर्ततेसाठी) गौड देशातील ज्या मूळपुरुषास आणले त्या मूळपुरुषाला मी अतिशय आदराने वंदन करतो ॥२५॥

ओवी २६ ते ३१

आतां नमूं ऋषिराज । गोत्रस्वामी भारद्वाज । ऋग्वेदशाखा ‘शाकल’ पूर्वज । आद्यगौड द्विजजाती ॥२६॥
पुढती वंदूं धरामर ॥ ब्राम्हाण परब्रम्हावतार ।                     मग याज्ञवल्क्यादि योगीश्वर । भृगु पराशर नारद ॥२७॥
वेदव्यास पाराशर । सनक सनंदन सनत्कुमार ।               शुक शौनक सूत्रकार । विश्वामित्र वसिष्ठा ॥२८॥
वाल्मीक वामदेव जैमिनी । वैशंपायन आदिकरूनी । नवयोगींद्रादिक मुनी । तयां चरणीं लोटांगण ॥२९॥
आतां वंदूं संतसज्जनां । निवृत्ति - ज्ञानेश्वर - मुक्ता - सोपाना । एकनाथा स्वामी जनार्दना । तुकया कान्हा नरहरि ॥३०॥
सकळांचा नामनिर्देश । करूं न पुरे ग्रंथावकाश ।         म्हणोनि प्रमाण करितों सर्वांस । आशीर्वचनास प्रार्थितों मी ॥३१॥

आता ऋषींमध्यें श्रेष्ठ अश्या भारद्वाज मुनींना जे माझ्या गोत्राचे स्वामी आहेत त्यांना वंदन. ऋग्वेदाच्या शाकल शाखेचे, आद्य गौड या ब्राम्हण पोटजातीचे पूर्वज असे हे गोत्रस्वामी भारद्वाज होत   ॥२६॥

धरा - अमर , पृथ्वीवर अमर अश्या परब्रम्हाच्या अवतारासमान ब्राह्मणांना वंदन असो. मग याज्ञवल्क्य आदि योगीश्वराना तसेच भृगु , पराशर आणि नारद मुनींना वंदन असो ॥२७॥

पराशरांचे पुत्र वेदव्यास, सनक , सनंदन , सनत्कमार शुक, सूत्रे रचणारे शौनकमुनी , विश्वामित्र आणि वसिष्ठ यांना नमस्कार असो ॥२८॥

वालमीकी , वामदेव, जैमिनी , वैशंपायन इत्यादी नवयोगीन्द्र मुनींच्या पायी लोटांगण ॥२९॥

आता संत सज्जनांना वंदन असो. निवृत्ति , ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आणि सोपानदेव, एकनाथ स्वामी , जनार्दन स्वामी , संत तुकाराम, कान्होबा आणि नरहरी या सर्वाना वंदन असो ॥३०॥

सर्वांची नावं देत गेल्यास ग्रंथ पुरा होणार नाही म्हणून सर्वाना एकत्रित प्रणाम करून मी आशीर्वाद मागतो ॥३१॥

ओवी ३२ ते ३६

आतां वंदूं सदाशिव । पितामह जो पुण्यप्रभाव  । बदरीकेदारीं दिला ठाव । संसार वाव मानुनी ॥३२॥
पुढें वंदूं निजपिता । सदा सदाशिव आराधिता ।    कंठीं रुद्राक्ष धारण करिता । आराध्यदेवता शिव जया ॥३३॥
पुढती वंदूं  जन्मदाती । पोसिलें जिनें मजप्रती ।  स्वयें कष्टोनि अहोरातीं । उपकार किती आठवूं ॥३४॥
बाळपणीं गेली त्यागुनी । कष्टें सांभाळी पितृव्यपत्नी । ठेवितों भाळ तिचे चरणीं । हरिस्मरणीं निरत जी ॥३५॥
अवघ्यांहूनि ज्येष्ठ भ्राता । अनुपम जयाची सहोदरता । मदर्थ जीवप्राण वेंचिता । चरणीं माथा तयाचे ॥३६॥

आता माझे आजोबा सदाशिव, ज्या पुण्यात्म्याने संसार त्यागून बद्रीकेदारी ठाव दिला (राहिले) त्यांना वंदन असो ॥३२॥

ज्याने रुद्राक्ष धारण करून सदैव शिवाची आराधना केली अश्या स्वपित्याला वंदन असो ॥३३॥

अहोरात्र कष्ट करून जिने मला पोसले , उपकृत केले त्या मातेला वंदन असो ॥३४॥

मातेच्या निर्वाणानंतर जिने माझे सारे कष्ट काढले, मला सांभाळले, जी सदैव हरिस्मरणात असते, अश्या चुलतीला / काकीला माझे नमन ॥३५॥

माझा मोठा भाऊ ज्याच्या प्रेमाला उपमा देता येणार नाही, ज्याने माझ्यासाठी आपले जीवप्राण वेचले त्याच्या चरणी मी मस्तक ठेवतो ॥३६॥

ओवी ३७ ते ४२

आतां नमूं श्रोतेजन । प्रार्थितों आपुलें एकाग्र मन । आपण असतां अनवधान । समाधान मज कैंचें ॥३७॥
श्रोता जंव जंव गुणज्ञ चतुर । कथाश्रवणार्थीं अति आतुर । तंव तंव वक्ता उत्तरोत्तर । प्रसन्नांतर उल्हासे ॥३८॥
आपण जरी अनवधान । काय मग कथेचें प्रयोजन । म्हणोनि करितों साष्टांग वंदन । प्रसन्नमन परिसावें ॥३९॥
नाहीं मज व्युत्पत्तिज्ञान । नाहीं केलें ग्रंथपारायण । नाहीं घडलें सत्कथाश्रवण । हें पूर्ण आपण जाणतां ॥४०॥
मीही जाणें माझें अवगुण । जाणें माझें मी हीनपण । परी करावया गुरुवचन । ग्रंथप्रयत्न हा माझा ॥४१॥
माझेंचि मन मज सांगत । कीं मीं तुम्हांपुढें तृणवत । परी मज घ्यावें पदरांत । कृपावंत होऊनि ॥४२॥

आता मी आपणा श्रोत्यांना वंदन करतो. आपल्याकडे चित्त एकाग्र करून हे आख्यान ऐकण्याची विनंती करतो. आपलं जर लक्ष नसेल तर मला समाधान कुठलं ॥३७॥

श्रोता जेवढा गुण जाणणारा, चतुर आणि कथा ऐकायला उत्सुक, तेवढा वक्ता अधिकाधिक प्रसन्न ॥३८॥

आपलं जर चित्त नसेल तर कथेचं कारणंच (उपयोगच) काय! म्हणून मी आपल्याला सांष्टांग नमन करून प्रसन्न मनाने ऐकण्याची विनंती करतो ॥३९॥

मला वाङ्मय व्याकरणाचं ज्ञान नाही. मी ग्रंथांचं पारायण केलेलं नाही. माझ्याकडून सातकथांचं श्रवणही झालेलं नाही हे आपण (श्रोते) पूर्ण जाणता ॥४१॥

मीसुद्धा माझे हे अवगुण, माझ्यातील उणीवा जाणतो. तरीही गुरूच्या गोष्टी सांगण्यासाठी हा माझा ग्रंथप्रयत्न आहे ॥४१॥

माझंच मन मला सांगतं की मी तुमच्यापुढे कस्पटासमान आहे. तरीही कृपाळूपणे आपण श्रोतेहो मला पदरात घ्या ॥४२॥
  

हरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ 
आनन्दिनी

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults