तडा गेलाच आहे तर...

Submitted by सत्यजित... on 16 April, 2017 - 21:07

नका बांधू चौकटींनो मला उधळून जावू द्या
तडा गेलाच आहे तर मला निखळून जावू द्या!

नको ते रोजचे बघणे मुखवट्याआडचे मुखडे
मुलामा वाटतो पारा,पुरा निथळून जावू द्या!

घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक स्वप्नांनो
पहाटे काफिला तुमचा मला वगळून जावू द्या!

अशा बेरंग अश्रूंच्या कुठे उरती खुणा मागे?
गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जावू द्या!

मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती
म्हणाली पेटले आहे..अता उजळून जावू द्या!

नको अश्रू,नको सुमने,नका श्रद्धांजली वाहू
ऱ्हदय असलेच तर त्याला जरा ढवळून जावू द्या!

जगाच्या मध्यरात्रीचे असे व्हा सूर्य अश्रूंनो
चकाकी चांदण्यावरची झणीं वितळून जावू द्या!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wah

छान ... आवडली....
घन्या शब्द खटकतो .. दाट अंधारल्या कसा वाटतो ? किंवा गडद अंधारल्या ?

फार छान आहे.
"अश्या बेरंग अश्रूंची कुठे उरते खूण मागे" - शेवटून तिसरं अक्षर दीर्घ (गुरु - दोन मात्रा) असण्याऐवजी लघु (एक मात्रा) झाल्यामुळे थोडा बेरंग झाला.
"अशा बेरंग अश्रूंच्या कुठे उरती खुणा मागे" असा बदल कसा वाटतो?

कृपया गैरसमज नसावा. सुंदर रचनेला उगाच गालबोट लागल्यासारखं वाटलं म्हणून सुचवलं.

मनःपूर्वक स्वागत अनुयाजी! 'मायबोली'वर आपले आणि आपल्या उपरोक्त सुचवणीचेही!
उत्तम बदल सुचवला आहे आपण.लगेच संपादित करतो आहे!
आणि हो,गैरसमज नाही काही! माझ्या लेखनात सुधारणा होणार असेल तर अश्या सूचनांचे सदैव स्वागतच आहे!
धन्यवाद!