‘पश्चिम’चा प्रवास (भाग-१)

Submitted by पराग१२२६३ on 12 April, 2017 - 06:59

दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान साजऱ्या होणाऱ्या रेल्वे सप्ताहाच्या निमित्ताने माझ्या एका प्रवासातील आठवणींचा हा लेखाजोखा...
-----
बऱ्याच वर्षांपूर्वी मुंबईला पहिल्यांदाच गेलो होतो. लोकलची वाट पाहत फलाटावर उभा होतो. त्यावेळी समोरून मुंबई सेंट्रलकडे १९ डब्यांची पश्चिम एक्सप्रेस धडधडत निघून गेली होती. तेवढाच काय तो ‘पश्चिम’शी आजपर्यंत संबंध आलेला होता. पण तरीही या गाडीने प्रवास करण्याची इच्छा निर्माण झाली. का माहीत नाही पण इतर मेल-एक्सप्रेसप्रमाणेच असलेले लाल रंगाचे डबे आणि वलसाडचे फिकट पिवळा रंग आणि त्यावर लाल रंगाचे पट्टे असलेले डब्ल्यूसीएएम-१ हे इंजिन पाहून रोमांचित झालो होतो. तसे पाहिले तर कोणत्याही रेल्वेस्थानकावर जाणे आणि अशा प्रकारे कोणतीही रेल्वेगाडी समोरून धडाडत जाणे हा माझ्यासाठी कायमच रोमांचकारी अनुभव असतो.

बरीच वर्षे संधीची वाट पाहून अखेर पश्चिम एक्सप्रेसने प्रवास करण्याची संधी आली. तशी संधी आधीही मिळाली असती, पण तिची मुंबईतून निघण्याची जरा ऑड वेळ (सकाळी साडेअकरा) असल्यामुळे पुण्याहून त्यानुसार निघणे जरा अवघडच होत असे. मात्र यावेळी मी पणच केला होता. दिल्लीला जाण्याचे ठरल्यावर जाणीवपूर्वक त्यात १२९२५ पश्चिम एक्सप्रेसचा समावेश केला होता. मग रिझर्वेशनची तारीख आली. ‘पश्चिम’ तशी गर्दीची गाडी असल्यामुळे १२० दिवस आधी आरक्षण करून टाकले. पूर्वी ही गाडी मुंबई सेंट्रलहून निघत असे. पण या गाडीच्या काही वर्षांपूर्वी वाढलेल्या डब्यांमुळे तिचे स्थानक मुंबई सेंट्रलहून वांद्रे टर्मिनसला हलवावे लागले. पण त्याचवेळी ही गाडी वांद्र्याहून सुटत आणि पोहचत असली तरी तिच्या दुसऱ्या बाजूला दोन गंतव्य स्थाने आहेत, एक आहे पूर्वीप्रमाणेच अमृतसर आणि दुसरे सिमल्याच्या पायथ्याशी असलेले कालका. मी यापैकी कालक्याची निवड केली, कारण तेथून दिल्लीसाठी १२३१२ कालका-हावडा मेल पकडण्याची माझी योजना होती. कालका मेलला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मला त्या मेलचा प्रवासही करावा असे वाटत होते.

मुंबईत फार लवकरही पोहचू नये आणि फार उशीरही होऊ नये यासाठी पुण्याहून मध्यरात्री एक वाजताची १६३८२ कन्याकुमारी-सीएसटी पकडली. तिकिटेही तिचीच शिल्लक होती. गाडीत बसताच माझ्या साईडच्या खालच्या बर्थवर एक जण झोपलेला दिसला. त्याला सांगितल्यावर तो म्हणाला आमचे सगळे इकडे आहेत, म्हणून मी इकडे झोपतो तुम्ही माझ्या बर्थवर तिकडे खालचाच आहे तो घ्या. तिकडे गेलो तर विवाहित जोडपे आपल्या तान्हुल्यासह माझ्या बर्थवर होते. त्यांना सांगितल्यावर त्यांनी मला विनंती केली की, खालचा बर्थ आम्हाला देऊन तुम्ही वरचा घ्या, कारण लहान बाळ बरोबर आहे. बर ठीक आहे सं मी म्हटलं आणि मनातच पुटपुटलो की, झाली सुरुवात नेहमीप्रमाणे माझ्या बर्थवर सगळ्यांनी डोळा ठेवण्याला.

माझ्या प्रवासाच्या दिवशी पश्चिमला इंजिनामागे रेल डाक सेवेच्या जागी व्हीपीएच (उच्च क्षमता पार्सल यान) डबा जोडण्यात आला होता. याचाच अर्थ आज या गाडीच्या संचालनाने रेल्वेला चांगले उत्पन्न मिळणार होते. ही गाडी ऐतिहासिकच आहे. २०१६ मध्ये या गाडीला सुरू होऊन ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे तो योग साधून पश्चिमच्या हीरक महोत्सवी वर्षात बराच काळ प्रलंबित राहिलेला प्रवास मी करणार होतो. त्यामुळे वांद्र्याला या गाडीचा फोटो काढून घ्यावा असा मी विचार केला. पण तिथे आमच्या गाडीचा फलाट अडवून बसलेल्या जयपूरहून आलेल्या १९७०७ अरवलीचा तिथून हलण्याचा काही नेम दिसेना. अखेर साडेदहाच्या आसपास या ‘अरवलीबाई’ अखेरच्या तिथून पुढे निघाल्या. स्टेबलिंग लाईनवर जायचे असल्याने छोट्याशा ‘डब्ल्यूडीपी-६ डी’ या अश्वाने अरवलीची जबाबदारी स्वीकारली होती.

आता प्रतीक्षा होती, ती ‘पश्चिम’च्या येण्याची... अकरा वाजण्याच्या आसपास ‘पश्चिम’ बॅक केली जात असल्याचे लांबूनच दिसले. मी फलाटाच्या पुढच्या बाजूला अगदी शेवटीशेवटी उभा होतो. त्या दिवशी बुधवार असल्यामुळे सकाळी ८.१० वाजता एक नंबरवर दिल्ली सराई रोहिल्लाहून आलेली १२२१५ गरीब रथ एक्सप्रेस उभी होती. ती तिथून हलली नव्हती, कारण तिला ‘पश्चिम’नंतर दुपारी १२.४५ वाजता परतीच्या प्रवासाला निघायचे होते. त्यामुळे तिचा सेकंडरी मेंटेनंस तिथेच पार पडणार होता.

आता आमची ‘पश्चिम’ जेमतेम २२-२३ मिनिटे आधीच फलाटावर विसावत होती. त्यामुळे मला तिथे थांबण्यासाठी फारसा वेळ मिळणार नव्हता. माझा डबा २० वा होता. म्हणून मला लवकर मागे माझ्या डब्यापर्यंत जाणे आवश्यक होते. कारण फलाटावर गाडीची गर्दी दिसत होती आणि मी जाण्याआधी माझी जागा (आरक्षण असले तरी) कोणी बळकावू नये असे मला वाटत होते. त्यामुळे गाडीला कोणते इंजिन आहे हे पाहण्यासाठीही वेळ हातात नव्हता. दरम्यान, एक गोष्ट लक्षात आली की, त्या दिवशी ‘पश्चिम’कडून रेल्वेला जास्त फायदा होणार आहे. कारण त्या दिवशी इंजिनाच्या मागे जोडण्यात येणाऱ्या नेहमीच्या ‘आरएमएस’ डब्याऐवजी ‘व्हीपीएच’ डबा जोडलेला होता. म्हणजेच रिकाम्या ‘आरएमएस’ऐवजी हा भरलेला ‘व्हीपीएच’ डबा जास्त उत्पन्न देणारा ठरणार होता. त्याचवेळी माझ्या डोक्यात दुसरे गणित सुरू होते की, गाडी मागे येऊन पूर्ण थांबून, शंटर काढून ते पुढे गेल्यावर समोर दिसत असलेल्या इलेक्ट्रीक ट्रीप शेडपासून आमच्या फलाटापर्यंत पुन्हा पॉईंट्स सेट करून आमच्या इंजिनाला सिग्नल दिला जाणार होता. हे सर्व होण्यासाठी आणखी ५-७ मिनिटे तरी लागणार होती. मग २० व्या डब्यापर्यंत पोहचण्यासाठी हातात कमीच वेळ राहणार होता. म्हणून मग मी माझ्या डब्याच्या दिशेने लगेचच निघालो. मध्ये प्रवाशांची बरीच गर्दी होतीच.

पळतपळत मी माझ्या डब्याजवळ पोहचलो. डब्यावर पाहिले, तर डबा ८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आल्याचे लक्षात आले. डब्यात शिरलो, तर जे वाटत होते, तेच झाले. मी तिथे पोहचायच्या आधी १०-१२ वर्षांची दोन पोरं माझ्या सीटवर बसलेली होती. मी त्यांना माझे आरक्षण असल्याचे सांगितले तरी ती हलायला तयार नव्हती. तिथेच एक जण साधारण ४०-४५ वर्षांचा पुरुषही उभा होता. मला तो त्याच्या मोबाईलवर रेल्वेकडून आलेला मेसेज दाखवू लागला आणि सांगू लागला की, आता माझे रिझर्वेशन कंफर्म झाले आहे. पहा हा मेसेज. गाडीत सर्वांची गडबड सुरू असल्यामुळे मला वाटले तो मला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, या सीट आमच्याच आहेत. दरम्यान, सांगूनही ती मुलं तिथून हलण्यास तयार नव्हती. ती मुलं माझे बोलणे ऐकून गोंधळलेली होती. मग लक्षात आले की, मोठ्या कोणी तरी त्या मुलांना मोकळी जागा दिसत असल्यामुळे तिथे बसवून गेले होते. त्यांचे आई-वडील वगैरे त्याच डब्यात पण दुसरीकडे होते. त्यांच्यापैकी मोठ्या मुलाने लहान मुलाला वडिलांना बोलावण्यासाठी धाडले. त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आले की, ती तमीळ मुले आहेत. त्यामुळे मगाशी मला मोबाईलवर सीट नंबर दाखवणाराही त्यांच्यापैकीच एक असल्याचे वाटले. मग पाचएक मिनिटांनी त्या मुलांना तिकडे बसलेल्या त्यांच्यापैकी मोठ्यांनी बोलवून घेतले आणि मला माझी जागा मिळाली. मग तो मोबाईलवर नंबर दाखवणाराही तिथे माझ्या समोर बसला आणि मला सांगू लागला काय झाले ते. मग माझ्या लक्षात आले की, याचा त्या मुलांशी काहीही संबंध नाही आहे आणि तोही ती मुले उठण्याची वाट पाहत उभा होता. २-४ मिनिटांनी पुन्हा एक जण येऊन या दोन्ही सीट आमच्या आहेत असे सांगत आम्हाला तिथून उठण्यास सांगून सामान आणि माणसं आणायला निघून गेला तो परत आला नाही.

आता आम्ही दोघे आपापल्या सीटवर शांतपणे बसलो होतो. पुढे लोको पायलट्सची आणि मागे गार्डची गाडी सोडण्यापूर्वीची पूर्वतयारी सुरू होतीच. घड्याळात ११.३५ झाले होते. तोपर्यंत ‘पश्चिम’ला सोडण्यासाठी सेक्शन कंट्रोलरची परवानगी घेऊन झालेली असणारच. पण गाडी अजून सुटली नव्हती. कारण अजून ‘ब्रेक पॉवर सर्टिफिकेट’ लोको पायलटपर्यंत पोहचले नव्हते. ११.३५ लाच पॉईट्समन त्या सर्टिफिकेटवर गार्डची सही झाल्यावर पळतपळत इंजिनाच्या दिशेने गेलेला दिसला. म्हणूनच गाडी अजून हलली नव्हती. अखेर ११.४० ला गाडी सुटली, पण ३-४ सेकंदातच थांबली. मला वाटलं, नेहमीप्रमाणे यायला उशीर झालेल्यांसाठी चेन पुलिंग झाले असणार. त्यामुळे सुटेल मिनिटाभरात, असा विचार मनात आला. पण मिनिटाभरात गाडी हलली आणि पुन्हा एखादा फूटभर पुढे जाऊन पुन्हा चेन ओढल्याप्रमाणे थांबली. मग विचार आला की, कोण चेन ओढत असेल. पुन्हा ५-६ मिनिटांनी गाडी हलली आणि लगेच थांबली. आता काही तरी वेगळेच तांत्रिक कारण असल्याचे जाणवले.

‘पश्चिम’ सुटण्याच्या आधी आमच्या शेजारच्या फलाटावर १९०४९ वांद्रे (ट) दिल्ली सराय रोहिल्ला एक्सप्रेस उभी राहिली होती. तिला सुटण्यासाठी अजून तासापेक्षा जास्त वेळ असल्यामुळे त्या गाडीत फारशी हालचाल नव्हती. पण आमच्या शेजारी त्या गाडीचा बी-२ डबा होता. त्याच्या बॅटरीचे चार्जिंग मात्र सुरू करण्यात आले होते. रेल्वेमध्ये सामान चढवणे-उतरवण्यासाठी रोजंदारीवर काम करणारे तरुण त्यातून ब्लॅकेटवगैरे सामान बाहेर देऊन आमच्या डब्यातून पलीकडे फलाटावर नेत होते. आमची गाडी सुटत नव्हती त्यामुळे त्यांचे सामान पलीकडे कधीच नेऊन झाले. मग त्या सगळ्यांनी आमच्या डब्याजवळ गाडीत पाणी भरण्यासाठी असलेला नळ सुरू करून मनसोक्त त्याचा फवारा आपल्यावर उडवून घेण्यास सुरुवात केली. त्यांचे हे बराच वेळ चाललेले पाहून माझ्या मागे बसलेल्या आजोबांनी खिडकीतून त्या सगळ्या तरुणांना झापले - काय इकडे सगळीकडे दुष्काळ पडलाय आणि काय तुमचे पाणी वाया घालवणे चाललेय. करा तो नळ आधी बंद आणि व्हा बाजूला. त्या तरुणांवर तो अनपेक्षित हल्ला होता. त्यामुळे भांबावलेल्या त्या तरुणांनी नळ बंद करून टाकला.

इकडे ‘पश्चिम’ काही पुढे सरकत नव्हती. निघायचे आणि ४-५ सेकंदात पुन्हा थांबायचे तिचे सुरूच होते. आता बराच वेळ झाला होता. माझ्या सीटचे भवितव्य जरा संदिग्ध वाटत असल्याने गाडीला काय झाले आहे, ते पाहायला मला खाली उतरणे अवघड झाले होते. अखेर १२.३८ वाजता तांत्रिक दोष दूर झाला आणि ‘पश्चिम’ वांद्र्याहून खरंच सुटली. इलेक्ट्रीक ट्रीप शेड ओलांडत असताना माझे लक्ष त्यामध्ये गेले, तर लाल रंगातील बडोद्याचे बरेच डब्ल्यूएपी-४ ई हे कार्यअश्व तिथे आपल्या ड्युटीआधी आपल्या तब्येतीची तपासणी करून घेत असलेले दिसले. काही जणांची तपासणी पूर्ण झाल्यामुळे ते शेडच्या बाहेर काही अंतरावर विश्रांती घेत होते. तोपर्यंत ५८ मिनिटांत या गाडीने थोडे-थोडे करत जेमतेम ८-१० फुटांचेच अंतर कापले होते.

पुढच्या काही मिनिटांतच १२.४५ वाजता शेजारून अहमदाबादहून आलेली आणि मुंबई सेंट्रलकडे निघालेली १२९३२ एसी डबल डेकर बडोद्याच्या डब्ल्यूएपी-५ या कार्यअश्वाच्या मदतीने धडाडत निघून गेली. कोणत्या एसी डबल डेकर गाडीचे ते माझे पहिले दर्शन! दोन्ही गाड्या शेजारच्या लाईन्सवरून जात असल्याने त्यांच्या चाकांचा एकत्रित खडाक-खडाक आवाज किती लयबद्ध आणि सुंदर येत होता. ‘पश्चिम’मधील एकंदर जागेच्या परिस्थितीमुळे माझे आत लक्ष असतानाच हे घडले. मी जरा बेसावधच होतो. कारण माझी जागा मागायला कोणी तरी येणार हा माझा आजपर्यंतचा अनुभव इथे अगदी खरा ठरत होता.

‘पश्चिम’चा पहिला व्यावसायिक थांबा - अंधेरी - जवळच असल्यामुळे गाडी अजून त्या मानाने हळुहळूच पळत होती. बघताबघता अंधेरी आले. तिथे गाडीत गडबडीने चढलेले तरुण माझ्या सीटजवळ येऊन म्हणू लागले - ही आमची सीट आहे, इथून उठा. मग त्यांच्या लक्षात आले की, आपला डबाच चुकला आहे. तेवढ्यात गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. १३.१५ ला बोरिवलीत आलो असताना एक कुटुंब आमच्या डब्यात नाही नाही आमच्या सीटजवळ येऊन आम्हाला तिथून उठण्यास सांगू लागले. कारण तेच आमच्या सीट्स आहेत. आता हा प्रकार पाहून आमच्या आसपासचे जोरजोरात (आमच्यावर) हसत होते. हे काय चालले आहे, येतोय तो यांच्याच सीटच्या मागे का लागलाय, काँप्युटरवर आरक्षण होत असले तरी एकच नंबर दोघा-तिघांना येऊ शकतो, मग ते कसे अशा गप्पा आमच्या आसपास रंगल्या होत्या. त्याच दरम्यान त्यांच्यातील एकाने आम्हाला सल्लावजा इशारा दिला - आता तुमचे स्टेशन येईपर्यंत तुच्या सीट्सवरून हललात तर बघा.
-- क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग बर्‍यापैकी मानवीय झाला आहे कारण नेहमीप्रमाणे तांत्रिक बाबींचे अवडंबर न लिहिता, वेगळ्या कोनातून लिहिलेय.. आणि मला ते आवडले.

IMG_20170413_0001.jpg

हा लेख लिहीत असतानाच इंडियन रेल्वेज या रेल्वे मंत्रालयाद्वारे प्रकाशित होणाऱ्या मासिकाचा वार्षिक अंक, ज्याची दरवर्षी आतूरतेने प्रतीक्षा असते, तो हातात पडला.