कुणीतरी हवं असतं.....

Submitted by विद्या भुतकर on 5 April, 2017 - 22:57

आज दुपारी एका जवळच्या मैत्रिणीसोबत बराच वेळ व्हाट्स अँप वर बोलले. मला नक्की आयुष्यात काय हवंय यावर बोलत होतो. तसं तर मला बरंच काही हवं असतं. पण त्या क्षणाला मला ठीक का वाटत नाहीये आणि मला पुढे काय केलं पाहिजे हे तिच्याशी बराच बोलून कळल्यासारखं वाटलं. असं म्हणतेय कारण त्या क्षणाला ते प्रश्न सुटत नसतात, पण तेव्हा ते बोलण्यासाठी कुणीतरी असतं, ती व्यक्ती आपल्यासाठी वेळ देते आणि ऐकून घेते हे काय कमी आहे? सर्व बोलून झाल्यावर प्रश्न सुटला नसला तरी मनावरचं मळभ दूर झालेलं असतं.

मी Engg साठी बाहेर पडल्यानंतर घरी २-३ दिवसांत तरी फोन व्हायचाच. एरवी मी आईशी कितीही बोलले तरी परिक्षेच्या वेळी मात्र दादांशी आधी बोलायचे. का? कारण मी अभ्यास करत नाही, नुसती भटकंती करते, आणि पूर्वीसारखे मार्कही मिळत नाही याबद्दल आईकडे कितीही तक्रार केली तरी माझ्याशी फोनवर बोलताना ते प्रेमाने नेहमीच्या सूचना देतच असत. "कशाचं जास्त टेन्शन घेऊ नकोस. ज्या प्रश्नांच उत्तर येतं ते आधी लिही, मग बाकीच्यांचा विचार कर, आधीच्या पेपरचाही विचार करु नकोस. इ.इ....."

अमेरिकेत एकटी रहात होते तेव्हा कधीतरी घरी फोन करून सांगितलं ना की काम खूप आहे, कामाचा कंटाळा आला आहे, इथं रहावंस वाटत नाही, की ते म्हणायचे, 'त्रास होत असेल तर नको राहूस तिकडे. निघून ये परत. आपल्याला काही नोकरीवाचून अडलं नाहीये'. कधीतरी ते असंही म्हणाले होते की, "तुला काय वर्षाला एखादं ज्वारीचं पोत पुरेसं होईल, कशाला तो नोकरीचा त्रास? " Happy आता माझं एका ज्वारीच्या पोत्याने भागणार असतं तर किती बरं झालं असतं. पण केवळ बोलल्यामुळेही किती बरं वाटतं. असंच कुणीतरी हवं असतं.....

कितीतरी वेळा सगळी गणित चुकत जातात आणि मागे फिरून ती दुरुस्त करणंही अशक्य होऊन जातं.बरेच वेळा सर्व प्रयत्न करुनही आपल्या हातात काहीच नसतं. मग तेव्हा कुणीतरी हवं असतं आपल्याला सांगणारं,समजावणारं, "सर्व काही ठीक होईल". दोघांनाही माहीत असतं की सगळं ठीक होणं अवघड आहे, तरी त्या शब्दांनी जो धीर मिळतो तो वेगळाच. कधी वाटतं, झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष करून धीर देण्याइतकं प्रेम कुणी आपल्यावर कसं करु शकतं?

ते फक्त आई-बाबाच करु शकतात किंवा आपले खरे मित्र-मैत्रिणी. नाहीतर माझ्यासारखे लोक आधी, 'बघ, मी सांगितलं होतं.....' या वाक्यानेच सुरुवात करतात. Happy कुठल्याही अडचणीत असताना, उपाय शोधायचं सोडून ती चूक तुझ्यामुळे झाली की माझ्यामुळे यावरच वाद घालत बसतात आणि मग नंतर साथ न दिल्याचा पश्चाताप करतात. जित्याची खोड....! अशावेळी जी नाती तुटतात ती पुन्हा तशीच जुळत नाहीत. पण जी तग धरून टिकून राहतात ना ती कधीही तुटत नाहीत. असो. मी कशीही असले तरीही मी निराश असताना सांभाळणारं, समजावणारं कुणीतरी हवंच असतं......

-विद्या भुतकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अगदी ही बाबा मंडळी अशीच असतात. माझे बाबाही असेच मी ईतक्या चुका केल्यात की मी स्वतःलाच माफ करु शकत नाही पण बाबा नेहमी पाठीशी असतात आणि माझं त्यांच्यावर खुप प्रेम आहे...

वैजू, धन्यवाद. Happy आईने हा लेख बाबाना दाखवला तर म्हणाले एक कशाला पाहिजे तर अजून ज्वारीची पोती देतो. Happy अशावेळी या गोष्टीनी किती आधार वाटतो. Happy

खूप छान लिहिलंय... परदेशात येऊन राहणारे घरच्यांशी जास्त attach होतात... रोज फोन वरून बोलणे, वीकएंड ला विडिओ चाट... त्यांना समर मध्ये बोलावून परदेश दाखवणे...