२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिन परेड @ राजपथ,दिल्ली , भाग ११

Submitted by sariva on 3 April, 2017 - 18:50

11) शरद उत्सव
राज्य: पश्चिम बंगाल. राज्यातील उत्सव पर्व यापासूनच सुरू होते.या उत्सव पर्वाचा केंद्रबिंदू म्हणजे दुर्गापूजेचे पर्व होय.
शरद ऋतूत ग्रामीण पश्चिम बंगालच्या हरित भूमीवर सुंदर पांढरे 'काष फूल'प्रगट हाेणे हा सणांच्या आगमनाचा संकेत मानला जातो व तो संपूर्ण राज्यात 'शरद उत्सव'रूपात खूप आनंद व उत्साहात साजरा केला जातो.
आज जगातील मोठमोठ्या कला-उत्सवांत याचेही नाव घेतले जाते.येथील शामियान्यांच्या(पेन्डॉल्स) अंतर्गत व बाह्य सजावटीच्या शैलीतून येथील कुशल कारागिरांच्या कलेतील सौंदर्य दिसून येते. या सजावटीतून बंगालच्या शिल्पकलेचे व संस्कृतीचे दर्शन घडविले जाते.
चित्ररथाच्या अग्रभागी ढोल वाजविणाऱ्यांचे कौशल्य दाखविले आहे.मागच्या भागात बंगालमधील शरद ऋतूचे दृश्य दाखविले आहे-यात दुर्गामातेच्या भव्य मूर्तीसमोर 'धुनुची आरती',पारंपारिक नर्तक व गायक यांचे प्रदर्शन केले आहे.
1

12) जागो आया
राज्य: पंजाब. विवाह समारंभ प्रसंगी उत्साहाने केल्या जाणाऱ्या 'जागो आया' या लोकनृत्याचे सादरीकरण येथे केले होते.
'जागो'चा अर्थ उठविणे,जागे करणे.परंपरेनुसार गावातील लोकांना विवाह समारंभाचे औपचारिक निमंत्रण दिले जात नसे.त्याऐवजी वर/वधू चे नातेवाईक,मित्रमंडळ विवाहापूर्वी एक रात्र आधी डोक्यावर एक घागर घेऊन 'जागो आया' असे गात गावात सगळीकडे फिरत.गावातील लोकांना विवाह समारंभात सहभागी होऊन समारंभाचा आनंद वाढविण्यासाठी प्रोत्साहित करत.
चित्ररथाच्या अग्रभागी पारंपारिक वेष परिधान करून,डोक्यावर सजवलेली घागर घेऊन 'जागो नृत्य'करणाऱ्या स्त्रिया दाखवल्या होत्या.
मागच्या भागात गावातील पारंपारिक रूपात सजवलेल्या घरात 'जागो' गीतावर नाचत-गाजत विवाहोत्सव आनंदाने साजरे करणारे नातेवाईक दाखविले होते.चित्ररथाच्या दोन्ही बाजूस ग्रामीण पंजाबात गृह-सजावट कशी केली जाते ते दाखविले होते.
1

13) करकाट्टम: राज्य-तामिळनाडू.तेथील ग्रामीण भागात अम्मन मंदिराच्या उत्सव प्रसंगी केले जाणारे लोकप्रिय लोक-नृत्य म्हणजे करकाट्टम.
या जुन्या लोकनृत्यात नर्तक 'करकम'नावाचे एक पितळी भांडे आपल्या डोक्यावर ठेवतात.रंगीत फुलांनी शंकूच्या आकारात सजवलेल्या या भांड्यावर हलक्या लाकडाने बनवलेला एक पोपट सजवून ठेवलेला असतो.डोक्यावरील करकमचा तोल सांभाळत करकम नर्तक आकर्षक नृत्य करतात.तसेच नाथस्वरम्,थाविल,पम्बै व थालम या वाद्यांच्या धूनवर आधारित पारंपारिक लोक-संगीत सादर करतात.
चित्ररथात प्रेक्षकांना आकर्षित करणारे कौशल्यपूर्ण करकाट्टम नृत्य अम्मन मंदिरासमोर सादर केले जात होते.एका कलाकाराने देवी कालीची मुद्रा सादर केली होती. चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संगितकारांद्वारे पारंपारिक वाद्यांवर वाजवलेल्या धूनवर नृत्य करत करकम नर्तक चालले होते.
114) गोव्याचा संगितमय वारसा:
संगीत व नृत्य यांच्या live सादरीकरणातून राज्याचा उत्कृष्ट सांस्कृतिक व संगीताचा वारसा गोव्याच्या चित्ररथात दाखविला होता.गोव्याच्या संपन्न सांगीतिक वारश्यावर विविध राज्यांचा प्रभाव आहे.या चित्ररथात नदीकिनारी केले जात असलेले एक नृत्य दाखविले होते.
चित्ररथाच्या समोरच्या भागात मोराच्या आकारासारखा 'सांगोड्ड' दाखविला आहे. हा सांगोड्ड म्हणजे दोन नावा जोडून बनविलेला एक विशाल प्लॅटफॉर्म आहे.सांगोड्डवर फायबरने बनवलेली एक स्त्री गिटार वाजवत आहे व तिच्याबरोबर एक युवक 'घुमट'हे मातीने बनविलेले वाद्य वाजवताना दाखविला आहे.ट्रेलरवर नदी किनारी असलेले गोव्यातील खास असे खुले (open air) थिएटर इथल्या विशिष्ट गॅलरी/कुंपणासह (distinct balustrade fence) दाखविले आहे.एका भव्य दारासमोर saxophone,ढोल,टासो इ.च्या तालावर नाचणारे काही नर्तक दाखविले आहेत.
चित्ररथाच्या परिघावर टासो,घुमट,घुंगरू,कंसाले,ढोलक,ताल,शामेल,गिटार, saxophone इ. वाद्ये दाखविली असून गोव्याच्या रंगीत फुलांनी तो सजविला आहे.
115 ) होजागिरी
राज्य- त्रिपुरा. या चित्ररथात त्रिपुरा राज्यातील रियांग जमातीचे सुंदर नृत्य सजीव देखावे व मूर्ती यांद्वारे सादर केले होते.
त्या जमातीतील ४ ते ६ महिला व मुलींद्वारे होजागिरी उत्सव प्रसंगी रियांग नृत्य केले जाते. गात असतानाच त्या नृत्यांगाना मातीच्या घड्यावर शरिराचा तोल सावरतात व असे करताना अत्यंत कुशललेने अन्य वस्तू... जसे माथ्यावर बाटली,हातात मातीचा दिवा..असे घेऊन शरीराचा केवळ खालचा भाग हलवून नृत्य करतात. हे नृत्य वेळूची बासरी,सैम्बल व खांब यासारख्या पांरपारिक वाद्यांच्या तालावर चालते.
चित्ररथाच्या सुरूवातीला मातीच्या घड्यावर विशेष होजागिरी नृत्य-मुद्रेत रियांग युवतीची एक विशाल प्रतिकृती होती.अनेक होजागिरी नर्तक विविध मुद्रा व वेगवेगळ्या कृती करत चित्ररथाबरोबर चालत होते.ट्रेलरवर खास ग्रामीण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मोकळ्या जागी-माथ्यावर एक बाटली व त्यावर पेटता दिवा ठेवून कुशलतेने शरीराचे संतुलन साधत होजागिरी नर्तक नृत्य प्रदर्शन करत होते.ट्रेलरच्या मागच्या भागात एक सामान्य रियांग घर दाखविले होते. तेथे काही तज्ञ वादक पारंपारिक वाद्ये वाजवत होते; तर काही रियांग लोक मधुर संगीत व मोहक नृत्याचा आनंद घेताना दाखविले होते.
1क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users