पिंटू

Submitted by अदित्य श्रीपद on 3 April, 2017 - 01:05

पिंटू हा आमचा पाळलेला जातिवंत धनगरी कुत्रा होता. अगदी लहान पिल्लू असताना बाबांच्या मित्राने त्याला घरी आणून दिलं होत.मी हौसेने त्याच नाव ब्रुनो ठेवल होत पण मातोश्री आणि त्यांच्या कन्येने त्याला पिंटू( शी! काय भिकार नाव आहे)) म्हणायचं चंग बांधला. आता त्याला खाऊ पिऊ त्याच घालणार म्हटल्यावर त्याची पंचाईत झाली असणार आणि असे सुंदर ब्रुनो नाव टाकून तो पिंटू या नावालाच साद देऊ लागला.असो .
आमचं लक्ष्मी नगरचं घर अगदी युनिक ठिकाणी होतं . म्हणजे लक्ष्मी नगरची पर्वतीच्या पायथ्याकडुन सगळ्यात पहिली घरांची रांग त्यात आमचं घर होतं, त्यात आमचं हे चाळीतलं घर रमणा गणपतीच्या अगदी जवळ(हाच तो प्रसिध्द रामशास्त्री प्रभुणे यांच्याशी निगडीत असलेला पेशवे कालीन रमणा गणपती ), रमणा गणपतीच्या मागे आधी वस्ती नव्हती पण पुणं वाढू लागलं आणि त्या जागेत झोपडपट्टी कशी वाढली कुणाला कळलेच नाही. हि वस्ती आणि आमच घर अगदी समोर समोर होतं. हे आमचं चाळीतलं अगदी कॉर्नरचं घर त्यामुळे देशपांड्यांनी समोर मागे आणि एका बाजूला असलेल्या मोकळया जागेचा चांगला उपयोग करून तिथे भरपूर झाडं लावली हि झाडं नारळ,आंबा,फणस,चिंच अशी मोठी मोठी वृक्ष वर्गीय होती.(पण झाड लावली तेव्हा लहानच होती.) पुढे या झोपड पट्टीचा उपसर्ग वाढला तेव्हा त्यांच्या बकऱ्या,शेळ्या,कोंबड्या आणि ते लोक स्वतः यांच्यापासून झाडं वाचवण्यासाठी तारेचं कुंपण घातल, फाटक केल आणि पिंटू तर होताच. आता त्याची साखळी निघाली आणि त्याला बागेत २४ तास मुक्त संचार असे, फक्त फाटक लावलेलं असे तो बाहेर जाऊ नये म्हणून.
एके रविवारी,सकाळी सकाळी,आमच्या रविवारच्या शिरस्त्याप्रमाणे घरात चिकन करण्याकरता आई मसाले भाजत होती,देशपांडे बागेत काहीतरी करत होते, मी नेहमी प्रमाणे पिंटूला किंवा ताईला त्रास द्यायच्या नवीन स्किमा मनात योजत होतो(हे माझ दर रविवारी असायचं, दुपार पर्यंत त्यांना छळायचं आणि ताईचा दुपारपर्यंत पेशन्स संपला कि मग तिचा नाहीतर आईचा मार खायचा - जसा रविवारचा चिकन / मटन रस्सा आणि भाकरी कधी चुकायचं नाही तसच हे पण कधी चुकायच नाही )आणि अचानक बाहेर मोठाच गलका झाला,पिंटूचा भुंकण्याचा आवाज येऊ लागला लोक त्याच्यावर ओरडताना ऐकू येऊ लागले, काय झालय हे पहायला मी सगळ्यात आधी बाहेर आलो, पहिलं तर काय! एक कोंबडी जाळी वरून उडून आमच्या बागेत आली होती , पिंट्याने तिच्यावर झडप घातली आणि त्याच्या बहुधा पहिल्या हिसड्यातच ती मेली असावी कारण त्याने तोपर्यंत शांतपणे तिला पुढ्यात घेऊन तिची पिसं हिसकायला सुरुवात केली होती. ते पाहून झोपडट्टीतले लोक भडकले आणि त्याच्या अंगावर आरडा ओरडा करू लागले. अचानक एवढी माणसं आलेली पाहून पिंट्या चवताळला आणि त्याच्या अंगावरचा केस न केस ताठ झाला . तो जंगली जनावरं दात विचकून दाखवतात बघा तसा दात विचकून त्यांच्या अंगावर धावून गेला. फाटक बंद होतं आणि कुणी ते उघडून आत आलं नव्हतं म्हणून नाहीतर इतका चिडलेला कुत्रा आवरण मला सोडा बाबांना पण जमल नसतं. त्यातून नुकत्याच मारलेल्या आणि हिसकाफासक केलेल्या कोंबडीच रक्त त्यावच्या सगळ्या चेहेऱ्याला लागून तो इतका भयंकर दिसत होता कि आम्ही पण गळाठलो. त्याची इतकी भीती मला त्या आधी आणि नंतर हि कधी वाटली नाही.त्याचा तो आवेश पाहून लोक हि घाबरले आणि त्यांना काय कराव सुचेना.थोडा वेळ शांतता पसरली पण थोडावेळच
ती कोंबडी, झोपडपट्टीमध्ये एक मल्लाप्पा शिंगे नावाचा माणूस राहायचा(अजून हि राहत असेल) त्याची होती. त्याची आई , तिला सगळे अक्का म्हणायचे(आई तिला मुलुख मैदान तोफ म्हणायची …), तिथेच पान टपरी चालवायची , शिवाय तिने काही कोंबड्या पाळल्या होत्या , त्यातलीच हि एक अभागी. झालं, आता अक्का चवताळली आणि देशापान्ड्यांशी भांडायला लागली. आमचे देशपांडे फार खडूस होते पण ते टीपिकली आवाज वगैरे चढवून भांडायचे नाहीत.शिवाय ते अनेक वर्ष समर्थ व्यायाम मंदिरात घुमलेले असल्यामुळे त्यांच एकंदरीत व्यक्तिमत्व पैलवानी होतं,चेहेरा उग्र होता, त्यामुळे चिडलेल्या माणसाला त्यांच्याशी फार वेळ आवाज चढवून बोलता यायच नाही.त्यांचा आवाज हि खण खणीत होता. म्हणजे दुपारी जर पिंटू भून्काल्यामुळे त्यांची झोप मोड झाली तर ते कधी कधी चिडून त्याला “पिंटूsss” अशी जी हाक मारायचे त्यामुळे स्वयपाकघरातल्या भांड्यामधून खण्णकन आवाज यायचा, तो मी स्वतः ऐकला आहे म्हणून सांगतो....असो
त्यांचा आणि त्या अक्काचा साधारण असा संवाद झाला. (कंसातले विचार आमचे!)
अक्का - ओ दादा तुमच्या कुत्र्यान आमची कोंबडी मारली कि …
देशपांडे - हो पाहीलं कि, तशी ती कधी न कधी मारली जाणारच होती म्हणा, आजच गेली.
अक्का-पण आमची लुकसनी किती झाली,
देशपांडे- खरय, पण होत अस कधी कधी …
अक्का-कधी कधी? तुमच्यामुळे आमला इनाकरण फटका
देशपांडे-आमचा काय संबंध
अक्का-तूमच्या कुतरड्यानी मारली कि तिला
देशपांडे-आता आमचा कुत्रा काय बाहेर आला होता का तिला मारायला, ती कम्पौंड मध्ये आली आणि त्याला घावली,मी असतो तर त्याला अस तिला मारू दिल नसत. (मग कसं मारू दिलं असतत?)तुम्ही तुमची कोम्बडी जपून ठेवली पाहिजे,टोपली खाली घालून ठेवायची अशी रस्त्यावर कशाला सोडायची, गाडी आली म्हणजे? तुमचा नातू पण असाच रस्त्यावर खेळत असतो. जपत जा हो! हल्ली वाहनांची गरदी किती वाढली आहे? काय म्हणता काय व्हायचं .( अरे काय संबंध याचा कोंबडीशी! )
अक्का- पण आमची लुकसनी झाली त्याच काय?( बाई वाक्य रिपीट केल कि फ़ाउल धरतात भांडणात. )
देशपांडे:ते जाऊ द्या हो, तुम्ही आधी तुमच्या सुनांना सांगा बर नातवांकडे लक्ष द्यायला. सुना ऐकतात कि नाही तुमचं, काय मल्लाप्पा बायको मान देतेना सासूला? तुझ लक्ष आहेना? (कमाल आहे! कोंबडी कुठे?, पिंटू कुठे?आणि हे घुसले शिंगे गृह कलहात)
मल्लाप्पा : आमच्या घरच सोडा. आधी कोंबडी भरून द्या आमची . (मल्लाप्पा हुशार दिसतो, उगाच फाटे फोडत नाही )
देशपांडे: हो हो देतो कि, अग ए! जरा पातेलं आण …
मल्लाप्पा : ओ दादा, आमची लुकसानी भरून द्या , लई शानपना नको
देशपांडे : पैसे! तुला पैसे हवेत कोंबडीचे (म्हणजे तुम्हाला आता कळालं , कमाल आहे) अरे पण तुमची कोंबडी आपण हून आली आमच्या घरात.
मल्लाप्पा : ए बामना , ( अशी जात कशाला काढायची ? ब्राह्मणांना कुणी जातीवरून शिव्या दिल्याम्हणून attrocity पण लागत नाही) तुला कुत्रा बांधून ठेवायला काय हुत? कोंबडीला काय अक्कल ? त्ये बिच्चारं मुकं जनावर (?)( हो आमचा पिंटू विद्या वाचस्पतीच आहे न , बामना घरचा कुत्रा पण अत्याचारीच …नाहि का !)गेल कि फुकट ? ५०० रुपये काढ भाड्या(हे जरा ठीक आहे, कमीत कमी उच्चार तरी शुद्ध … )
त्याकाळी गावरान चिकन १०५ रुपये किलो होतं आणि ब्रॉयलर ४० रु.
अशी झटापट(शाब्दिक) १०-१५ मिनीटं चालली , शेवटी नाही हो करता देशपांड्यांनी ५० रुपयांवर सौदा तोडला , अक्कांनी १०-१०च्या ५ नोटा वरती झम्पर मध्ये कोंबल्या आणि दारातून हात आत घालून पट्कन कोंबडी उचलली आणि झर्रकन जायला वळली त्या बरोबर देशपांड्यांनी मागून हाक मारली ," अक्का, ५० रुपये दिले कि तुला, आता ती कोंबडी कुठे घेऊन चालली? ती ठेव पिंटूला खायला? यावर त्या अक्कांनी जो लुक दिला आणि ज्या हताशपणे ती कोंबडी टाकून निघाली त्याच वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत .
आजही हा प्रसंग आठवला कि मला हसू आल्याशिवाय राहत नाही .

असच सहज आज देशपांडेंची आणि पिंटूची आठवण आली...त्यांना जाऊन हि आता १३-१४ वर्ष झालीत .
--आदित्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users