२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिन परेड @ राजपथ,दिल्ली , भाग १०

Submitted by sariva on 2 April, 2017 - 12:05

6) लक्षद्वीप-एक दुर्लक्षित (unexplored) पर्यटन स्थळ:
लक्षद्वीपच्या या चित्ररथात तेथील समृद्ध सागरी संपत्ती व एक sustainable economic activity म्हणून तेथे पर्यटनाचे महत्त्व दाखविणे हा मुख्य उद्देश होता. तेथील संवेदनशील पर्यावरणामुळे पर्यटन उद्योगच शक्य आहे व अपेक्षितही.
अरबी समुद्रात असमान स्वरूपात विखरून असलेल्या 36 बेटांचा समूह म्हणजे लक्षद्वीप.भारताचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश.
एकमेवाद्वितीय..अनोखी परिसंस्था,कोरल रीफस्,चमकदार रूपेरी वाळूचे किनारे यांमुळे ही बेटे प्रसिद्ध आहेतच,पण त्याबरोबरच साहसी निसर्ग-क्रीडा पर्यटनासाठी सुध्दा लोकप्रिय आहेत. निर्मल जल व स्वच्छ पर्यावरणामुळे अजूनही पर्यटन विकासाला येथे खूपच वाव आहे.
चित्ररथाच्या अग्रभागी व दोन्ही बाजूस तेथील स्वच्छ समुद्राच्या पाण्यात सापडणारे रंगीत मासे,जलचर प्राणी,विभिन्न प्रकारचे कोरल्स या सर्वांचा स्कूबा diversच्या दृष्टीला दिसणारा कॅलिडोस्कोपच जणू चित्रित केला होता.
चित्ररथाच्या वरच्या बाजूस रेतीचा किनारा,माडांच्या दाटीत पर्यटकांसाठी असलेले पर्यावरणपूरक कॉटेज,शांत lagoon व विंड-सर्फिंग, kayaking व रोमांचक जेट स्की असे वॉटर स्पोर्टस् दाखविले होते. 1885 साली तेथे बांधलेले मिनिकॉय लाइट-हाऊस सुद्धा दाखविले होते.
सजीव देखाव्यात तेथील निसर्गसौंदर्य कॅमेराबध्द करणारे दोघे जण,होडीतून मासे पकडणारा एक जण व निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत शहाळे पिणारे एक पर्यटक जोडपे दाखविले होते व त्यांच्या भाग्याचा प्रेक्षकांना हेवा वाटत होता!
1
7) कर्नाटकचे लोकनृत्य:
पारंपारिक कला व लोकनृत्य यासाठी प्रसिध्द असलेल्या कर्नाटकाने या प्रजासत्ताक दिनी चित्ररथाच्या माध्यमातून त्यांच्या पारंपारिक लोकनृत्याचे दर्शन घडविले.
यात भगवान शंकराचे उपासक भक्त 'गोरव' पारंपारिक सामुहिक नृत्यात मग्न असलेले दाखविले होते.
अग्रभागी असलेल्या भक्ताच्या प्रतिमेच्या डोक्यावर अनोखी अशी अस्वलाच्या केसांनी बनवलेली टोपी आहे.हातातल्या डमरूचा ताल धरत तो बासरीची धून वाजवताना दाखविले आहे.
त्यामागे तलवार धारण केलेले योध्दे नृत्य करत होते व पारंपारिक वाद्ये घेऊन काही नर्तक वर्तुळाकार चालत ठेका धरत होते.ढोलाच्या ताला बरोबरच; आकर्षक मुखवटा घातलेला एक सोम नर्तक या सर्व दृष्याला पूर्णत्व प्रदान करत होता.
चित्ररथाबरोबर... रथाच्या चाकाप्रमाणे फिरणाऱ्या विशालकाय ड्रमच्या विद्युतगर्जनेसारख्या आवाजात ढोल,तंबोरा,सतार इ. वाजवत काही कलाकार चालत होते.
मागच्या बाजूस 12 मीटर उंच नंदीध्वजामुळे एकूणच चित्ररथ मनमोहक दिसत होता.
1
⁠⁠8) Model schools of Delhi.
नव्या योजना राबवल्यामुळे दिल्ली सरकारच्या मॉडेल विद्यालयांत शिक्षणाच्या गुणवत्तेत कशी सुधारणा झाली आहे,हे दाखविणारा हा चित्ररथ.
'मेरा स्कूल है ये,मेरा स्कूल है|
सही गलतमें फर्क है क्या,ये सीख सिखलाता..
.....अपना ना सोचू मैं,दुःख सबका जानू|असं काहीसं गाणं याबरोबर चालू होतं.
राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचवायचाच,असा निश्चय करून दिल्लीतील सरकारी शाळांचे आदर्श विद्यालयांत रूपांतर केले जात आहे. खाजगी शाळांमध्ये असतात,तशा पायाभूत सुविधा उपलब्ध केल्याने याचा चांगला प्रभाव शिक्षक व विद्यार्थी या दोघांवरही पडलेला दिसतो.
यात एक विशेष कार्यक्रम सुरू केला असून त्यात नृत्य,सगीत,ललित कला,नाट्य कला,फोटोग्राफी इ. विषयांचे व्यावसायिक शिक्षण त्या-त्या विषयांतील तज्ञांद्वारे दिले जात आहे.
चित्ररथात एका सामान्य सरकारी विद्यालयाचा अदर्श विद्यालयात झालेला कायाकल्प दाखविला आहे.अग्रभागी अशा सुधारलेल्या (upgraded) विद्यालयाची इमारत व तेथे उत्साहाने केवळ शिक्षण घेणाऱ्याच नव्हे,तर खेळ व अन्य उपक्रमांमधे मग्न विद्यार्थांच्या प्रतिमा दाखविल्या आहेत.
मागच्या भागात आधुनिक प्रयोगशाळा,वर्ग दाखविले आहेत. शिक्षणप्रक्रिया चालू असताना शिक्षक व पालक यांच्यात संवाद,विचार-विमर्श याला दिले जाणारे प्रोत्साहन व शैक्षणिक सहलींद्वारे विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या पलीकडील जगातील ज्ञानभांडार खुले केले जाणे; यावर दिलेला भर दर्शविला आहे.
1

9)चम्बा रुमाल:
राज्य: हिमाचल प्रदेश
18 व्या शतकाच्या उत्तरार्धात हिमाचल प्रदेशाच्या चम्बा प्रदेशात विकसित झालेल्या पहाडी हस्तकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'चम्बा रुमाल'. या पारंपारिक लोककलेत रेशमी धाग्याने हाताने विणलेल्या सॅटीनच्या कापडावर रेशमाच्याच धाग्याने दुहेरी टाक्याने सुंदर भरतकाम केले जाते.विशेष म्हणजे हे भरतकाम उलट व सुलट अशा दोन्ही बाजूने एकसारखेच व सुंदर दिसते.या रुमालावर सामान्यतः रासलीला,अष्टनायिका,तसेच प्राचीन पौराणिक कथा व दृश्ये काढली जातात.
चित्ररथाच्या अग्रभागी चम्बा रुमालावर कशिदाकारी करत असलेल्या एका महिलेची सुंदर प्रतिमा दाखवली आहे.मध्यभागी भगवान कृष्ण व राधा यांना गोपिकांबरोबर रासनृत्य करताना दाखविले आहे.याच भागात चंबा रुमालावर पारंपारिक कशिदाकारी करणाऱ्या चम्बा येथील महिलाही दिसतात.मागच्या भागात चम्बा शहराचे विशाल 'सहस्त्राब्दि द्वार' शोभून दिसत आहे.
1


⁠⁠⁠⁠10) बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ
राज्य-हरियाना. वर्तमान काळातील हा संवेदनशील विषय. हरियाना राज्य या क्षेत्रात पुढे आहे.
'बेटी बचाओ बेटी पढ़ाओ,वह है अंगन की शान|
कल्पना चावला दीपा साक्षीने भारतका चमकाया मान|
बदलो अपनी सोच रवयै...
आपकी बेटी,हमारी बेटी..कर रही नयी नयी खोज़'हे विषयाला साजेसं गाणं लावलेलं होतं.
या चित्ररथात वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांच्या सशक्तीकरणासाठी केले गेलेले प्रयत्न दाखविले होते.दीर्घ काळापासून रूढीवादी दृष्टिकोनामुळे समाजात बऱ्याच मुलींच्या सर्वांगिण विकासात बाधा येत आहे.लोकसंख्येच्या या महत्त्वपूर्ण गटाशी असमान व्यवहार,पक्षपात व काही ठिकाणी त्यांच्या शिक्षणाबद्दल उदासिनता..यामुळे बऱ्याचदा त्यांच्यातील गुणवत्ता वाया जाते. आपल्या पंतप्रधानांकडून मुलींचे शिक्षण,विकास,सशक्तीकरण यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच लैंगिक भेदभाव,शोषण व वाईट चालीरितींविरुध्द पावले उचलण्यासाठी सतत प्राधान्य दिले गेले आहे.
चित्ररथाच्या अग्रभागी असलेली आपल्या मुलीला खेळवणाऱ्या एका प्रसन्न मातेची मूर्ती व पाळणा चित्ररथाचा उद्देश दर्शवितो.मध्य भागात राज्यात मुलींचे शिक्षण तसेच त्यांना उच्च,व्यावसायिक व काँप्युटर शिक्षण देण्यावर दिला जाणारा भर दर्शविणारे मुलींचे वर्ग दाखविले आहेत.त्यामागे कन्येचा जन्मोत्सव आनंदाने साजरा करणारा एक प्रसन्न परिवार दाखविला आहे.चित्ररथाच्या मागच्या बाजूस हरियाणाच्या विविध क्षेत्रात उच्च कामगिरी करणाऱ्या विख्यात कन्यका-कल्पना चावला,साक्षी मलिक,दीपा मलिक इ.च्या प्रतिमा दर्शविल्या होत्या.
1क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users