२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिन परेड @ राजपथ,दिल्ली भाग ९

Submitted by sariva on 2 April, 2017 - 11:32

आत्तापर्यंत 68 व्या गणतंत्र दिवसाच्या परेडचे आर्मी,नेव्ही,एअरफोर्स,DORD,पॅरा-मिलिटरी व इतर सहाय्यक सिव्हिल फोर्सेस,NCC,NSS या सर्वांचे शिस्तबद्ध संचलन व शक्तिप्रदर्शन आपण पाहिले.
आता पाहू या सांस्कृतिक सादरीकरण.भारताचा गौरवशाली भूतकाळ,सांस्कृतिक विविधता व प्रगती;समृद्ध वर्तमानकाळ व भविष्यकाळातील देशवासियांच्या अपेक्षा यांचे प्रतिबिंब यात दिसावे हा याचा उद्देश. त्यामुळे विविध राज्यांच्या 23 रंगीबेरंगी चित्ररथातून भारताच्या सामाजिक,सांस्कृतिक,औद्योगिक व आर्थिक पैलूंची,तसेच भौगोलिक सौंदर्य व वास्तुशिल्पीय वारसा यांची झलक यातून दाखवण्यात आली.सर्वच चित्ररथ भव्य व खूप सुंदर होते!
चित्ररथ संख्या 23

1) दोल यात्रा

राज्य: ओरिसा

तेथील लोकप्रिय उत्सव म्हणजे 'दोल यात्रा'. हा उत्सव फेब्रु - मार्च महिन्यात होळी पर्वाबरोबरच फाल्गुन पौर्णिमेपूर्वी-फाल्गुन दशमीला येतो. 6 दिवस चालणाऱ्या या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे राधा-कृष्णाची पूजा-अर्चा. या दिवशी गावातील देवता-विशेषतः भगवान कृष्णाच्या मूर्ती छोट्या सुंदर लाकडी मंदिरात ठेवतात.त्याला 'बिमान' म्हणतात.हे सजवलेले बिमान पालखीसारखे उचलून ही मिरवणूक गावातील सर्व घरी देवतांचे दर्शन घेण्यासाठी नेतात.त्यावेळी अबीर उधळला जातो व लोक पारंपारिक गीत व संगीत यांच्या तालावर नाचत असतात.
गावकरी देवाला भोग चढवतात व त्यावेळी होळीच्या सणाला खेळण्यासाठी त्यांना रंग दिले जातात.
चित्ररथात अग्रभागी एका रंगीत पाळण्यात विराजमान भगवान कृष्णाची पूजा-अर्चा दाखवली आहे.
मागच्या भागात बिमान घेऊन मिरवणूकीत चालणारे व कृष्णाची पूजा करणारे लोक दाखवले आहेत.
चित्ररथाच्या खाली दोन्ही बाजूस रस्त्यावरून श्रद्धाळू भक्त घंटा,मृदुंग,मंजिरा इ.पारंपारिक वाद्ये वाजवत पारंपारिक गीताच्या तालावर नाचत आनंदाने जात होते.
'सभी sss देखो हो.. राधा-माधव चाले... असे काहीसे ते ओडिसी गीत होते.
अशा प्रकारे राधा-कृष्णाचे अद्भुत मीलन भक्तिपरंपरेनुसार साजरे करताना येथे दाखवले होते.




2) याक नृत्य:
7 सिस्टर्सपैकी एक राज्य अरूणाचल प्रदेश.या राज्याच्या पश्चिम भागात राहणाऱ्या बौद्ध धर्माच्या अनुयायांचे प्रसिद्ध याकनृत्य या चित्ररथात दाखविले होते.
फेब्रु-मार्च महिन्यात हे बौद्ध 'लोसर उत्सव' साजरा करतात. त्यावेळी हे याक नृत्य केले जाते.
आपल्याकडील शेतकऱ्याला जसे बैलाचे महत्त्व,तसेच स्थान उंच पर्वतश्रृंखलात राहणाऱ्या लोकांच्या जीवनात याक या प्राण्याचे.
शेकडो वर्षांपूर्वी एका जादुई पक्ष्याच्या मदतीने त्यांना याकचा शोध लागला व त्यामुळे त्यांना जीवनात शांती व संपन्नता लाभली.त्यांच्या उत्पनाचे महत्त्वाचे साधन म्हणजे हा याक.
त्यांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात याकचे स्थान असे महत्त्वपूर्ण असल्यामुळेच या बहुपयोगी प्राण्याच्या शोधाचा उत्सव ते या नृत्याद्वारे साजरा करतात.शांती व समृध्दीबरोबरच या नृत्यामुळे त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण होते;असा त्यांचा विश्वास आहे.
'मोनपा' जमातीतील लोक हे प्रसिद्ध मूकनृत्य करतात.हे नृत्य बौद्ध समुदायी व याक यांच्यातील भावपूर्ण व कृतज्ञ संबंध दर्शविते.
या चित्ररथात याकचे सोंग घेतलेल्या लोकांचे नृत्य दिसते आहे व त्यांच्याबरोबर संगीताच्या तालावर उत्साहाने,आनंदाने नाचणारे लोकही दिसत आहेत.





3) महाराष्ट्र: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
लोकमान्यांच्या 160 व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आपल्या राज्याने पुन्हा देशासमोर आणले.
'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे व तो मी मिळवणारच' असे म्हणून लोकांमधे राष्ट्रवादाची भावना प्रज्वलित करणारे टिळक..
'केसरी', 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू करून त्यांद्वारे व 'गणेशोत्सव', 'शिवजयंती' सुरू करून त्याद्वारे समाज जागृती करणारे टिळक...
एक गणितज्ञ,संपादक,लेखक,
उत्कृष्ट वक्ता असणारे निर्भिड देशभक्त लोकमान्य आपण जाणतोच.
त्यांच्या जीवनातील प्रसंग या चित्ररथात दाखवले होते.
चित्ररथाच्या अग्रभागी वृत्तपत्रासाठीच्या लेखनात मग्न असलेल्या लोकमान्यांची भव्य प्रतिमा होती.
मध्यभागात वरच्या बाजूस पुढे त्यांच्या केसरी व मराठा व प्रसिद्ध वृत्तपत्रांचे प्रकाशन (प्रेस), त्याच्या मागे राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव दाखविला होता.
मध्यभागी खालच्या बाजूस त्यांचे ओजस्वी वक्तृत्व दाखविणारा प्रसंग होता.
चित्ररथाच्या मागच्या बाजूस वरच्या भागात त्यांच्या प्रेरणेने शिक्षण घेणारी मुले व सजीव देखावा स्वरूपात मल्लखांबाच्या कसरती करणारा एक जण व कुस्ती खेळणारे 2 तरूण दाखविले होते.
तर मागच्या बाजूस खाली लोकमान्यांचे मंडालेच्या कारागृहातील वास्तव्य दाखविले होते.
चित्ररथाच्या खाली रस्त्यावर
' हे पहिले नमन हो..
करीतो वंदन,
तुम्ही ऐका हो गुणिजन..
आम्ही करितो वंदन ..'
या गीतावर महाराष्ट्रीय वेशभूषेत भगवे झेंडे घेतलेले व लेझिम पथक तालावर नाचत होते.
आपल्या राज्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या पथकाचा जरा जास्तच अभिमान वाटला.




4) लाइ हराओबा:
राज्य: मणिपूर
लाइ हराओबा म्हणजे देवतांना प्रसन्न करण्याचा उत्सव.जगातील खूप जुन्या धार्मिक नाट्यांपैकी हे एक. नाट्यमुद्रेचा हा वारसा मणिपूरच्या 'मैते' समुदायाच्या लोकांनी आत्तापर्यंत खूप श्रध्देने जपला आहे.
या नाट्यामधे सहभागी झालेले लोक आपल्या समाजाच्या सर्व लोकांना स्वास्थ्य,समृध्दी लाभावी व ग्रामवासियांची प्रगती व्हावी यासाठी स्थानिक देवतांची पूजा-अर्चा करतात.
मैते समुदायाची पुजारीण 'माइबी' पारंपारिक नृत्य व गायनासह हे पवित्र अनुष्ठान कुशलतेने व विधिवत् पूर्ण करते. समुदायातील अन्य सदस्यसुध्दा पारंपारिक तंतुवाद्य (पेना) व ड्रम्स (लांग्देंग पुंग) यांच्या सुरतालावर यात भाग घेतात.
माणिपूरच्या या चित्ररथात पाळल्या जाणाऱ्या या एका जुन्या प्रथेचे चित्रण पारंपारिक वेषात केले आहे. यात पुजारिणीला (माइबी) पवित्र नृत्याद्वारे देवतांना निद्रेतून जागे करण्यासाठी यात सहभागी श्रध्दाळूंसह आपल्या पारंपारिक वेशभूषेत नृत्य करताना दाखविले आहे.




5) कच्छची कला व जीवनशैली:
राज्य : गुजरात
या चित्ररथात गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील कला व संस्कृती दाखवली होती.
कच्छ हा जिल्हा भरतकामाच्या 16 वेगवेगळ्या प्रकारांसाठी प्रसिद्ध आहे.
संध्याकाळ संगीतमय करण्यासाठी तेथे मोर्चांग,नागफणी,सुरंधा व बोरिंदो ही पारंपारिक वाद्ये वाजवली जातात.
रोगन कला, mud work व 'भुंगा' बनवण्याची कला यांमुळे कच्छची जगात एक विशेष ओळख आहे.
चित्ररथात अग्रभागी कच्छचे पारंपारिक भरतकाम करण्यात मग्न असलेल्या एका कच्छी स्त्रीची प्रतिमा आहे.
मागच्या बाजूस मोची (cobbler) भरतकाम करण्यात मग्न लोक व दाबडा म्हणजे सुंदर भरतकाम केलेल्या कपडयाने झाकलेला उंट,रोगन कलाकृती व कच्छी लोकांचे पारंपारिक निवासस्थान 'भुंगा' दाखाविले आहे.
चित्ररथाबरोबर चालणारे रंगीबेरंगी पारंपारिक वेषभूषेतील कच्छी लोक 'रास' नृत्याचे प्रदर्शन करत आहेत.
1


विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users